घरफिचर्सश्रद्धा-अंधश्रद्धेचा हिंदोळा !

श्रद्धा-अंधश्रद्धेचा हिंदोळा !

Subscribe

पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या मित्राने विचारले की, खरंच तुमच्या कोकणात देवदेवस्कीचे प्रकार चालतात का? त्यावर मी त्याला एकच विचारलं की, असे प्रकार कोणत्या ग्रामीण भागात चालत नाहीत? पण तरीही कोकणी माणूस म्हणजे देवदेवस्की करणारा अशी त्याची प्रतिमा बनली आहे. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. पूर्वापार चालत आलेली ग्रामसंस्कृतीदेखील तेवढीच कारणीभूत आहे.

कोकणात विशेषतः दक्षिणेकडे पसरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिजात निसर्गसौदर्य प्राप्त झाले आहे. एकूण किनारपट्टीपैकी १२१ किलोमीटरचा समुद्रकिनारा एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला आहे. इथली लालमाती, आंब्या-फणसांनी बहरलेली झाडं, तिथल्या काजूच्या बागा, नारळाची झाडं. इथली देवळ, देवस्थानं, त्याचंबरोबर इथल्या चालीरीती, सण-संस्कृती, गणपती-होळीसारखे उत्सव हे जनमान्य झाले आहेत. या सर्वाबरोबर इथल्या श्रद्धा-अंधश्रद्धांनादेखील तेवढेच महत्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

हल्लीच कधी टीव्हीवरील कोकणातल्या लोकजीवनावर आधारित मालिका बघून माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील मित्राने विचारले की, खरंच तुमच्या कोकणात असे देवदेवस्की, भुताखेताचे किंवा जादुटोण्याचे प्रकार चालतात का? त्यावर मी त्याला एकच विचारलं की, असे प्रकार कोणत्या ग्रामीण भागात होत नाहीत? पण तरीही कोकणी माणूस म्हणजे देवदेवस्की करणारा ही त्याची प्रतिमाच बनली आहे. त्याला वेगवेगळी कारण आहेत. त्याला पूर्वापार चालत आलेली ग्रामसंस्कृतीदेखील तेवढीच कारणीभूत आहे.

तळकोकणात देवपान किंवा वाडवळ हा प्रकार फार प्रचलित आहे. शेतात किंवा ज्याठिकाणी गुरे-ढोरे चरायला जातात त्याठिकाणी काही अशुभ घडू नये किंवा शेतात व्यवस्थित पिकं यावं म्हणून त्याठिकाणी कोंबडा बळी द्यायची प्रथा आहे. पूर्वी कोकण फार गरीब होतं. भात या पिकाव्यतिरिक्त दुसरं पिकं फार तर नाचणी किंवा कुळीद एवढचं कोकणी शेतकर्‍याला माहीत होतं. दोनवेळेच्या जेवणाची जिथे मोताद होती तिथे मांसाहार खिश्याला परवडणार तरी कसा ? या सर्वातून देवपान हा प्रकार पुढे आल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे देवाधर्माच्या नावाने किंवा देवाने घरभात राखावं म्हणून कोंबड्याचा बळी देऊन त्याच मांस शिजवून ते देवाचा प्रसाद म्हणून भक्षण करावं ही प्रथा जनसामान्यात रूढ झाली असावी, असा अंदाज आहे. ते कोंबड्याचं मांस शिजवून मांसाहार खाण्याची इच्छा पूर्ण होत होती. यात देवाच्या भक्तीपेक्षा जिभेचे चोचले पुरवणे हा एक हेतू असू शकतो. मग या भक्तीला कोणतातरी देव हवा म्हणून अनेक कल्पित देव स्थापन झालेले आढळतात.

- Advertisement -

लहानपणी गावी गेलो की, जेव्हा घरातील दिवे जायचे तेव्हा आम्ही सर्व मुलं खळ्यात गप्पा मारत बसू. आजूबाजूची पाच-दहाजण त्या गप्पात सामील व्हायचे. दिवे गेले की घरासमोरची झाडं गळून फक्त सावली पडली आहे अशीच दिसायची. तेव्हा कोणतरी मध्येच देवचाराचा विषय काढायचा. देवचाराचा विषय निघाला की, सर्वांची गाळण उडायची. एकेक विलक्षण कथा ऐकायला मिळायची. कोण म्हणायचं गेल्या वर्षी पांडू गुरवाक देवचारान धरल्यान. तवापासून तो पिसाळल्यागत करताहा. कोणतरी त्यावर मग आण्णा गावकाराची सून दुपारी काजीत गेली ती परत येताना देवचारान तिका धरल्यान. अशा अनेक कथांची पैदास अशा गप्पांमधून व्हायची.

लहानपणी प्रश्न पडायचा की, देवचार म्हणजे नक्की काय? कोणी विद्वान म्हणतात की, देवचार म्हणजे विध्वंसक प्रवृत्ती नसून गावात एखाद्या वडील माणसाची भूमिका पार पाडतो. खूप वेळा तो चुका माफ करतो, पण त्याच्या मर्यादेचे कोणी उल्लंघन केले तर मात्र देवचाराचा रोष ओढवतो. कधीकधी रात्रीच्या वेळी गोलगोल फिरून पुन्हा त्याचजागी येणे, याला चकवा लागणे असे म्हणतात. या चकवा लागण्याचे कारण देवचार आहे अशी लोकांची समजूत आहे. या देवचाराला खूश ठेवण्यासाठी किंवा त्याने गावची रखवाली करावी म्हणून दरवर्षी त्याच्या नावाने मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. यात पुन्हा एक सांस्कृतिक संघर्ष आहे. कारण देवचाराचे वर्णन ज्याप्रकारे करतात त्यावरून ते रूप आदिमानवाशी साधर्म्य दाखवते. परंतु वर्षानुवर्ष तळकोकणात ही परंपरा पाळली जाते.

रात्रीच्या वेळी घराबाहेर पडलं की, जुनीजाणती माणसं देवचारापासून सांभाळा. त्याची वाट तेका देवा, तेच्या वाटेत कोणी येऊ नको म्हणून सांगायचे. मागे एकदा वेंगुर्ल्याजवळ आरवली या गावी गेलो असता, तिथल्या पुजार्‍यांनी एक अजब गोष्ट सांगितली. त्या गावचं दैवत वेतोबा असून तेथील लोक वेतोबाला मोठं पायताण आणि रसबाळी केळ्याचा घड अर्पण करतात. या गोष्टीचं मला मोठ्ठं नवल वाटलं. पण पुजार्‍यांनी त्या गोष्टीचा खुलासा केला की, वेतोबाला अर्पण केलेले पायताण घालून स्वतः वेतोबा या गावचं रक्षण करतो. या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की, देव आपलं रक्षण करतो ही भावना मुळात लोकांमध्ये सकारात्मक विचार घडवून आणते. ही गोष्ट लोकांची मानसिक बाजू सक्षम करणारी ठरते. हेच त्या श्रद्धेचे फलित मानता येते. मुळात या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा तेथील भौतिक, सामाजिक किंवा धार्मिक वातावरणातून निर्माण झाल्या आहेत.

घरात कोणतेही कार्य करायचे झाल्यास कौलप्रसाद घेण्याची प्रथा आहे. यावेळी देवतेच्या अंगाला तांदूळ चिकटवून उजवा म्हणजे सकारात्मक किंवा डावा म्हणजे नकारात्मक कौल मागितला जातो. ही प्रथादेखील पुन्हा माणसाच्या आंतरिक मनाशी जोडलेली आहे. जो कौल मिळतो तशी माणसाशी वृत्ती होऊन तो ते कार्य करत असतो. त्याला आधार फक्त धार्मिकतेशी जोडलेले आपणास आढळतात, पण बहुतेक कोकणी माणूस कौलप्रसाद घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याला हात घालत नाही हे सत्य डोळ्याआड करता येत नाही.

एकदा वेंगुर्ल्याजवळील मातोंड या गावी श्रीदेव घोडेमुख या देवस्थानाला जाण्याचा योग आला. तेथील एका व्यक्तीने जी माहिती दिली ती ऐकून अचंबित व्हायला झालं. शरीराच्या कोणत्याही भागचं दुखणं असेल तर या ठिकाणी नवस बोलला जातो व तो नवस फेडताना त्याच अवयवाची मातीची प्रतिकृती देवाला अर्पण करण्याची इथे प्रथा आहे. याच देवस्थानच्या जवळ वेतोरे म्हणून गाव आहे. तेथे सातेरी देवीचे स्थान आहे. येथील सातेरीमातेच्या तिर्थाने अनेक त्वचारोगी रोगापासून मुक्त झाल्याचा हवाला देतात. तसेच या विहिरीच्या पाण्यात विष उतरवण्याची क्षमता असल्याचेही सांगतात. या तिर्थात किंवा पाण्यात कोणता घटक आहे ज्यामुळे हे रोगनिवारण होतात हे शोधण्यासाठी या पाण्याचे नमुने परदेशात तपासण्यासाठी पाठवण्यात आले. पण तपासणीअंती पाण्यात असे कोणतेच विशेष घटक नसल्याचे निदर्शनास आले. मग हे काय ? जेव्हा श्रद्धेचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा अतिरेक झाला की, त्याचे रूपांतरण अंधश्रद्धेत होते हे मात्र मान्य करावे लागते.

गेली अनेक वर्षे मालवण तालुक्यातील आचरे या गावी दर तीन वर्षांनी गावपळण होत असते. या प्रकाराची समाज माध्यमांनी आणि प्रसार माध्यमांनी अनेक वेळा दखल घेतली. गावपळण म्हणजे संपूर्ण गावाने तीन रात्री गावाबाहेर मुक्काम करायचा. अगदी गुरेढोरेदेखील गावाबाहेर न्यायची. या प्रथेतून अनिष्ठ असे काहीच घडत नाही. या प्रथेचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या प्रथेमुळे संपूर्ण गाव एका छत्राखाली येतो. बाहेरच्या वातावरणाशी गावकरी जोडले जातात. या विषयावर आचरा गावचे सुपुत्र कै. डॉ. विद्याधर करंदीकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, गावपळण ही प्रथा म्हणजे या आचरे गावची ओळख आहे. या तीन दिवसात प्रत्यक्ष ग्रामदैवत रामेश्वर घरदाराचे रक्षण करतो, अशी आमची समजूत आहे. यामुळे गावकरी एकत्र येऊन एकमेकांशी नव्याने संवाद साधतात, नाहीतर कामाच्या गडबडीत असा संवाद साधायला कोणाला वेळ आहे? यामुळे सामजिक संबंध दृढ होतात हे मात्र खरे आहे.

कोकणातील या रूढी-परंपरेचा वारा अनेक साहित्यिकांच्या सहित्यात आढळतो. कवी वसंत सावंत, डॉ. महेश केळुसकर, नामदेव गवळी, वीरधवल परब यांच्या कवितेत या परंपरेचा वारा अखंड खेळत आहे. त्याचप्रमणे जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, चिं त्र्यं खानोलकर, प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या कथाकादंबर्‍यांतून या रूढी-परंपरेचा अनेक अंगांनी उल्लेख आलेला आहे. कोकणी माणूस म्हणजे देवदेवस्की करणारा हा एक समज जनसामान्यांत आहे आणि तो खोटादेखील आहे. तो देवदेवस्की करणारा नसून पूर्वापार चालत आलेल्या परंपरा तो पुढे चालवतो. त्यात सामाजिक घडी विस्कटून टाकायचा त्याचा उद्देश नसतो.

या परंपरा जपताना त्यातील सत्याची बाजू त्याने मांडली आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा हा प्रश्न शेवटी त्याच्या सामाजिक जाणिवेचा एक भाग आहे. त्यातून समाज जोडला जात असतो. हे आपणास विसरता येणार नाही. ही भावनिक आणि काही अंशी धार्मिक बाजू आपण समजून घेतली पाहिजे.

– प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -