घरफिचर्सस्तनपान जीवनाचा पाया

स्तनपान जीवनाचा पाया

Subscribe

स्तनपान करण्याकडे सध्या अनेक सुशिक्षित व स्वत:ला आधुनिक समजणार्‍या या माता दुर्लक्ष करतात. कारण स्तनपानामुळे त्यांच्या शरीराच्या बांध्यावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे असते. पण स्तनपान करणे हे जसे बालकांसाठी महत्त्वाचे असते तसेच मातांसाठीही तितकेच महत्त्वाचे असते.

स्तनपान हे बाळाच्या पौष्टिकतेच्या व रोगप्रतिकारक शक्तीच्या गरजा भागवण्यासाठी असलेला नैसर्गिक व उत्तम मार्ग आहे. पूर्वी आपल्या देशात प्रत्येक महिला आपल्या बाळाला स्तनपान करत असत. त्यामुळे अनेक बालके ही सुदृढ व सशक्त असायची. परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे व स्तनपानाबाबतीतील गैरसमजांमुळे अनेक महिला स्तनपान करण्याकडे दुर्लक्ष करू लागल्या आहेत.

त्यातच जाहिरातबाजीमुळे स्तनपानाबाबत अनेक पर्याय (उदा. बाटलीतून दूध पाजणे) निर्माण झाल्याने महिलांनी त्याला प्राधान्य दिले. या पर्यायांमुळे मुलांमध्ये कुपोषण वाढणे, जडत्त्व येणे, जुलाब, न्यूमोनिया, कानाचा संसर्ग असे अनेक आजार होऊन बालकांमध्ये अशक्तपणा वाढत आहे. बालके शारीरिक आजारांबरोबरच मानसिकदृष्ट्याही अशक्त होत आहेत. त्याचा परिणाम भावी पिढीवर होताना दिसत आहे. अनेक मुले ही थोड्याशा शारीरिक कामानेही थकतात तसेच एखाद्या बिकट प्रसंगाचा सामान करताना त्यांच्यात मानसिक कणखरपणा दिसून येत नाही. भावी पिढी शारीरिक व मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम ठरत असल्याने त्याचा परिणाम देशाच्या विकासावरही होण्याची शक्यता आहे. व्यवस्थित स्तनपान न करण्यात आल्याने कुपोषणाने बालमृत्यू होण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्या देशासमोर कुपोषण ही एक गंभीर समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी स्तनपान हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

- Advertisement -

स्तनपान करण्याकडे सध्या अनेक सुशिक्षित व स्वत:ला आधुनिक समजणार्‍या या माता दुर्लक्ष करतात. कारण स्तनपानामुळे त्यांच्या शरीराच्या बांध्यावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे असते. पण स्तनपान करणे हे जसे बालकांसाठी महत्त्वाचे असते तसेच मातांसाठीही तितकेच महत्त्वाचे असते. महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारे स्तनाचा व अंडाशयाचा कर्करोगाला स्तनपानामुळे आळा बसतो.

बाळाच्या जन्मानंतर पहिले दोन दिवस मातेला येणारे चिकट दूध हे बाळासाठी फार महत्त्वाचे असते. त्याबाबत अनेक गैरसमज असले तरी हे दूध बाळासाठी लसीचे काम करते. हे दूध बाळाला दिल्याने त्याला जंतूसंसर्गापासून बचाव होऊन ते सुदृढ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एका तासात त्याला स्तनपान करणेही महत्त्वाचे असते. सिझरिन केले असेल, बाळाची प्रकृती गंभीर असेल किंवा अन्य काही समस्या असल्यास किमान पहिल्या चार तासांमध्ये बाळाला स्तनपान करणे फार गरजेचे असते. त्याचप्रमाणे जन्मानंतरचे पहिले सहा महिने बाळाला स्तनपान करणे हे त्याच्या आरोग्याच्या दृष्टिने फार महत्त्वाचे असते. हेच स्तनपान जर दोन वर्षांपर्यंत सलग केल्यास बाळाला पुरशा प्रमाणात पोषकतत्त्वे मिळून त्याची शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते. स्तनपानामुळे आई व बाळांमधील भावनिक बंध वाढण्यास मदत होते.

- Advertisement -

एखाद्या बाळाला पुरेसे किंवा व्यवस्थित स्तनपान न झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या बुद्धिमत्तेवर होतो. त्याच्या बौद्धिक क्षमतेची पातळी वाढण्यात अडथळे येतात. त्यामुळे तो शिक्षणात कमी पडतो व परिणामी त्याच्यावर नोकरीच्या चांगल्या संधी गमावण्याची वेळ येते. त्यामुळे त्याच्या जीवनस्तर उंचावण्यात अडथळे येतात. परंतु बाळाला व्यवस्थित स्तनपान केल्यास त्याची बौद्धिक क्षमतेची पातळी 2.6 ने वाढण्यास मदत होते व बालकांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. स्तनपान कमी प्रमाणात झाल्याने बाळ अशक्त होऊन त्याला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हेपेटायटिस, स्थूलपणा असे आजार उद्भवतात. त्यामुळे उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे स्तनपान हे लहान बाळांसाठी एक प्रकारे रक्षाकवच आहे.

आजच्या घडीला देशात 40 टक्के बालकांना फक्त सहा महिन्यांपर्यंत स्तनपान केले जाते, तर 45 टक्के बालकांना 24 महिन्यांपर्यंत स्तनपान केले जाते. कुपोषण रोखण्यासाठी स्तनपान हे सर्वाधिक प्रभावी आहे. स्तनपानामुळे दरवर्षी 8 लाख 23 हजार बालमृत्यू व 20 हजार मातांचा मृत्यू रोखता येऊ शकतो. स्तनपान हे जसे बालकांसाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे ते मातांसाठीही लाभदायक आहे. त्यामुळे ‘स्तनपान’ हा अन्नपोषण, अन्नसुरक्षा व दारिद्य्र निर्मूलनासाठी असलेला अविभाज्य व मूलभूत घटक असल्याने त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या बाळाला बाटलीने दूध पाजण्याऐवजी स्तनपान करून बाळाचे आरोग्य व आयुष्य उत्तम ठेवावे. जेणेकरून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यास मदत होईल.

वर्ल्ड अलांयन्स् ऑफ ब्रेस्टफिडींग अ‍ॅक्शनने (वाबा) प्रत्येक बाळ हे सक्षम व सुदृढ व्हावे यासाठी स्तनपानाचा दर 2025 पर्यंत कमीतकमी 50 टक्के करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी ‘स्तनपान जीवनाचा पाया’ हे ब्रीदवाक्य ठेवले आहे.


-डॉ. सुषमा मलिक

प्राध्यापक आणि विभाग प्रमुख
बालरोगचिकित्सक, नायर हॉस्पिटल

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -