बंगाली लेखिका आशापूर्णा देवी

आशापूर्णा देवी या प्रसिद्ध बंगाली लेखिका होत्या. ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी होत्या. परंपरेच्या जोखडात बांधलेल्या स्त्रीच्या स्थितीचं, तिच्या प्रश्नाचं एकूणच समस्त बंगाली भावजीवनाचं दर्शन, अत्यंत सहज, सरळ पण प्रभावी शैलीत आपल्या साहित्यातून त्यांनी घडवलं. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1909 रोजी कोलकात्यामध्ये एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे त्या शाळेत कधीच गेल्या नाहीत.

पण घरात त्यांना अक्षर ओळख करून दिली होती. वसुमती साहित्यमंदिराद्वारा प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तके तर आशापूर्णादेवींनी वाचली होतीच, पण कालीसिंह लिखित महाभारताची पारायणं केली होती. रवींद्रनाथांच्या अनेक कविता, गीते त्यांना पाठ होती. घरामध्ये भाऊ अभ्यास करायला लागला की, ऐकून, ऐकून, त्याच्या पुस्तकात डोकावून, ते धडे, त्या कविता त्यांच्या पाठ होऊन जात असत.

विवाहानंतर पती कालीदास बाबू नाग यांच्या प्रोत्साहनामुळे त्या अविरत लिहीत राहिल्या. सारं घरकाम उरकून रात्रीच्या निवांतवेळी, घरातच असलेल्या पतीच्या टाईपरायटरवर त्या साहित्यनिर्मिती करू लागल्या. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांची ‘बाइ देर डाक’ ही पहिली कविता शिशूसाथी मासिकात प्रसिद्ध झाली. त्यांची दोनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १७८ कादंबर्‍या, ३० कथासंग्रह, ४७ बालवा स्वरूपातील पुस्तके, शिवाय इतर २५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

‘प्रेम ओ प्रयोजन’ (१९४४),‘अग्नि-परीक्षा’(१९५२),‘छाड़पत्र’(१९५९),‘प्रथम प्रतिश्रुति’(१९६४),‘सुवर्णलता’(१९६६), या काही महत्वपूर्ण कादंबर्‍या तर ‘जल और आगुन’(१९४०)‘और एक दिन’(१९५५),‘सोनाली संध्या’ (१९६२),‘आकाश माटी’(१९७५),‘एक आकाश अनेक तारा’(१९७७),‘सागर सुखाचे जाय’, हे काही महत्वाचे कथासंग्रह होत. पुरोगामी विचारांच्या या लेखिकेला लीला पुरस्कार, कोलकाता विद्यापीठ (१९५४), पद्मश्री (१९७६), ज्ञानपीठ पुरस्कार, हरनाथ घोष पदक, बंगीय साहित्य परिषद (१९८८), जगतरानी स्वर्ण पदक, कोलकाता विद्यापीठ (१९९३) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा या श्रेष्ठ लेखिकेचे १३ जुलै १९९५ रोजी निधन झाले.