घरट्रेंडिंगभैया पाटील... मराठा समाजाचा प्रबोधनात्मक चेहरा

भैया पाटील… मराठा समाजाचा प्रबोधनात्मक चेहरा

Subscribe

पुरोगामी-प्रतिगामी हे शब्द हल्लीच्या तरुण पिढिला नवीन वाटतात किंबहुना ते कळतही नाहीत. महाराष्ट्रातील राजकारणी स्वतःला पुरोगामी असल्याचे सतत सांगतात. पण तरुणांना उमजेल अशा भाषेत सांगणारे खुप कमी आहेत. भैया पाटील ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय...

आजच्या घडीला सोशल मीडिया हा परवलीचा शब्द झालाय. राजकारण्यांपासून ते मतदारापर्यंत, भांडवलदारांपासून ते ग्राहकांपर्यंत असे अनेक घटक आपपल्या विचारांची झुल चढवून सोशल मीडियावर वावरत आहेत. भारत आणि चीनच्या लोकसंख्येलाही काही दिवसांनी मागे टाकतील इतके युजर्स सोशल मीडियावर दिवसेंदिवस अॅक्टिव्ह होत आहेत. आधी फक्त मित्रांना कनेक्ट करणारा सोशल मीडिया आता अमेरिकासारख्या बलाढ्य देशाची निवडणूक ‘मॅनिप्युलेट’ करण्याइतका ताकदवर झाला आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत स्वस्त झालेल्या डेटापॅकमुळे भारतातही सोशल मीडिया आपला रंग दाखवू लागलाय. धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यातील पाच लोकांचे जमावाकडून झालेले हत्याकांड व्हॉट्सअॅपमुळे घडले. भारतात सोशल मीडिया अफवांचे पिक पिकवण्यासाठी वापरात असला तरी काही सुज्ञ तरुण मंडळी याचा वापर समाज प्रबोधनासाठी करत आहेत. यापैकीच एक आहे नांदेड जिल्ह्यातला भैया पाटील…

सोशल मीडियाचा वापर ज्याप्रकारे पैसे कमवण्यासाठी काही लोक करतायत त्याप्रमाणेच स्वतःची भूमिका, विचारधारा पेरण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.  २००७ साली तो ऑर्कुटवर संघटना बांधणी आणि पुरोगामी विचार पेरण्याचे काम करत होता. कालांतराने ऑर्कुट बंद पडले आणि भैयाने आपला मोर्चा फेसबुककडे वळवला.

- Advertisement -

फेसबुक प्रोफाइल लिंक – https://www.facebook.com/BhaiyaPatil
वय – ३२
फॉलोअर्स – १४०० हजार

“सोशल मीडियावर अनेक लोक द्वेषाची पेरणी करतात. अफवा पसरवतात. खोटा इतिहास खपवतात आणि तरुणांची माथी भडकवतात. त्यामुळे त्यांच्यातल्याच कुणी एकाने त्यांना समजेल, उमजेल या भाषेत प्रोग्रेसिव्ह विचार मांडायची गरज होती. समाजात अनेक विचारवंत आहेत. पण तरुणांना अपील होईल, अशी शैली खुप कमी लोकांकडे आहे. ज्यांच्याकडे आहे ती लोक सोशल मीडियावर नाहीत. त्यामुळे हे काम मी करण्याचे ठरवले.” – भैया पाटील

- Advertisement -

आजचा फेसबुकवरचा एक मोठा युवा वर्ग हा १९९० नंतर जन्मलेला आहे. त्यांना आणीबाणी माहीत नाही, ९० चे आर्थिक धोरण माहीत नाही, अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना माहीत नाहीत. मग ते कोण्या एका नेत्याचे ऐकून माना डोलावतात आणि तेच खरं असल्याचे मानतात. पण त्यांना जागरूक करण्याचे काम मी करतो. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्याची जबाबदारी मी उचलली, असं भैया सांगतो.

मी न घाबरता लिहित गेलो. हळू हळू द्वेषाची पेरणी कमी झाली. अनेक मराठा तरुण दलित विरोधी कमेंट करायचे. जातीव्यवस्था माननारे काहीजण अजूनही वरचे, खालचे या गैरसमजूतीत होते. पण महापुरूषांचे दाखले देत सतत लिखाण केल्याने आता बराच फरक पडला आहे. लोक तसा विचार करत नाहीत. सामाजिक द्वेष पसरवणे कमी झाले आहे. फेसबुकवर तरी एका मोठ्या वर्गाला प्रोग्रेसिव्ह विचार करण्यासाठी उद्युक्त केल्याचे समाधान भैयाला आहे.

याच फेसबुकचा वापर करुन भैयाला मराठी क्रांती मोर्चा सारखे आंदोलन पसरवता आले. क्रांती मोर्चाच्या सोशल मीडियाची जबाबदारी भैयावरच होती. आज माझ्या नावाने अनेक लोक प्रोफाईल, पेज, ग्रुप करण्याचा प्रयत्न करतात. फॉलोअर्स, लाईक्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मी ते करु देत नाही. माझ्या निदर्शनास आल्यावर मी लगेच फेसबुकला रिपोर्ट करतो. कारण माझ्या तोंडून चुकीचे शब्द घुसडवायचा अनेकदा प्रयत्न झाल्याचेही भैया सांगतो.

अर्थात या प्रवासात अनेक कटू प्रसंगही आले. त्या अनुभवाविषयी बोलताना भैया सांगतो की, स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिले होते, तेव्हा मला फोन करुन प्रंचड त्रास दिला गेला. लोकांची सत्य ऐकण्याची मानसिकताच नसते. तरिही मी लिहित राहिलो. मराठा क्रांती मोर्चाचे श्रेय घेण्यावरुन भय्यूजी महाराजांच्या विरोधात मीच पहिल्यांदा लिहिले होते. तेव्हाही त्यांच्या अनुयायांनी फोन करुन धमक्या दिल्या. पण मी मागे हटलो नाही. आज भैयू महाराज आपल्यात नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणे योग्य होणार नाही.

आपल्या कामाबद्दल आणि भविष्यातील वाटचालीबद्दलही भैयाचे विचार माय महानगरने जाणून घेतले. प्रतिगामी संघटनाकडे मनुष्यबळ, संपत्ती, सत्ता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना चुकीच्या मार्गावर वळवणे त्यांना सोपे जाते. तरुण चुकीच्या मार्गाला जावू नयेत यासाठी मी फेसबुकच्या लेखणीतून प्रयत्नशील राहील, अशा विश्वास भैया व्यक्त करतो.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -