घरफिचर्सबड्यांचा फुटला भ्रमाचा भोपळा!

बड्यांचा फुटला भ्रमाचा भोपळा!

Subscribe

रशियात सध्या सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेने भव्यदिव्य आयोजन आणि मैदानांवर होत असलेल्या थरारक लढतींमुळे अख्ख्या जगाला वेड लावले आहे. अंतिम सामन्यापर्यंत फुटबॉलची ही झिंग चढतच जाणार आहे. तत्पूर्वी साखळी सामन्यांमध्ये झालेल्या लढती विशेष लक्षवेधी ठरल्या. या सामन्यांमध्ये छोट्या संघांनी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संघांना चांगलाच घामटा फोडला. त्यामुळे या फुशारकीबाज बड्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे.

कोणत्याही संघाला कमी लेखू नये, हे यावेळच्या रशियात होत असलेल्या फिफा २०१८ या फुटबॉल स्पर्धेने दाखवून दिले आहे. बलाढ्य जर्मनीचा संघ साखळी फेरीतच बाद झाला आहे. दक्षिण कोरियाने त्यांना २-० ने पराभूत केले. या सामन्यात जर्मन संघाने जास्त वेळ बॉल आपल्या ताब्यात ठेवला असला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना त्याचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. या सामन्यातील कोरियन संघाची कामगिरी कौतुकास्पद होती. गोलरक्षक हयुन वू चो याने अप्रतिम गोलरक्षण केले. त्यामुळे तो सामनावीर किताबचा मानकरी ठरला. गेल्या अनेक वर्षांचा आढावा घेतल्यास विश्वचषक स्पर्धेत इतकी नामुष्की जर्मन संघावर प्रथमच ओढावली आहे.

- Advertisement -

पेरूने ऑस्ट्रेलियावर २-० अशी मात केली. अर्जेंटिनासारख्या संघाच्या तर नाकीनऊ आले. अखेरच्या साखळी सामन्यात नायजेरियाने अर्जेंटिनाला कडवी टक्कर दिली. अर्जेंटिनाने साखळी फेरीतील या सामन्यात नायजेरियाचा २-१ ने कसाबसा पराभव करत निसटता विजय मिळवला. कसा तरी बादफेरीत अखेर प्रवेश मिळवला. या विजयाबरोबर ‘ड’ गटात अर्जेंटिना संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. दुसरीकडे जपानही आक्रमकरित्या खेळत आहे. ब्राझीललाही साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांत कडवी झुंज द्यावी लागत होती. इंग्लंडही लोकप्रियतेच्या शिखरावर नाही. त्यामुळे यंदाच्या अंतिम फेरीत कोणते संघ असतील, हे सांगता येणार नाही. फिफा २०१८ ही विश्वचषक स्पर्धा प्रचंड उत्साहात रशियात सुरू आहे. साखळी फेरी जवळजवळ संपली आहे. बाद फेरीचे सामने आता सुरू झाले आहेत. साखळीतून बाद फेरीत पोहोचता पोहोचता अनेक मातब्बर संघांच्या नाकीनऊ आले. प्रामुख्याने कमी लेखलेल्या संघांनी केलेला उत्कृष्ट खेळ या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले आहे.

प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखू नये, खेळ हा जोशातच आणि डावपेच आखून खेळावा हे मोठ्या संघांनी शिकण्याची वेळ आता आली आहे. जपान आणि दक्षिण कोरिया या आशियाई संघांनी साखळी फेरीत ठसा उमटवला आहे. पूर्व आशियाई देश म्हणून भारतासाठीही ही दिलासादायक बाब आहे. ज्युुडो आणि ताइक्वांडो हे खेळ अनुक्रमे जपान आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय खेळ समजले जातात. तर ब्राझील, रशिया, फ्रान्स, जर्मनी या देशांचा फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ आहे. तेथे हा खेळ लोकांचा जीव की प्राण आहे. त्याच भावनेतून तो खेळला जातो. तसेच त्याकडे पाहिले जाते. शिवाय या देशांच्या राष्ट्रीय अस्मितेशीही हा खेळ निगडित आहे. या पार्श्वभूमीवर जपान आणि दक्षिण कोरियाचे साखळी सामन्यांतील यश विशेष लक्षणीय ठरले आहे.

- Advertisement -

पोर्तुगाल आणि इराण यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. इराण हा पश्चिम आशियाई देश आहे. पोर्तुगालमध्ये फुटबॉल प्रचंड लोकप्रिय तर इराणमध्ये फ्री स्टाईल कुस्तीचे वेड आहे. तेव्हा पोर्तुगाल इराणच्या तुलनेत उजवा असणार यात वादच नव्हता. तरीही इराणने या देशाला कडवी झुंज दिली आणि साखळी फेरीत १-१ अशी बरोबरी साधली.
मोरोक्को हा पूर्व आफ्रिकेतील देशही ताकदीने मैदानात उतरला होता. अखेरच्या साखळी सामन्यात या देशाने बलाढ्य स्पेनला कडवी झुंज देऊन सामना २-२ असा बरोबरीत सोडविला. या सामन्यानंतर स्पेनचा कर्णधार रामोस याने काढलेले उद्गार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. मोठे संघ तुलनेने बरोबरीच्या नसलेल्या संघांविरुद्ध खेळताना कसे वागतात, हे त्यातून सूचित होते. कर्णधार रामोस म्हणाला की, आम्ही बादफेरी गाठली असली तरीही आम्हाला खेळाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. खेळाडूंना या चुकातून बोध घेण्याची गरज आहे. छोट्या संघांविरुद्ध आपण सहज जिंकू अशा गाफील भावनेतून मोठे संघ खेळत असतात, पण त्यामुळेच त्यांना तोंडघशी पडावे लागते, हेच दिसून येते.
प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठीच खेळत असतो.

फिफा २०१८ मध्ये हेच या छोट्या संघांनी दाखवून दिले आहे. सामन्यात हार जीत होतच असते. परंतु, हार जीतपेक्षा अटीतटीची झुंज देऊन हरलो आणि हरता हरता जिंकलो ही भावना खेळाडूंना विलक्षण समाधान देत असते. फिफाचे उपउपांत्य फेरीचे सामने नुकतेच सुरू झाले आहेत. त्यातून पुढे कोण जिंकेल, कोण विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असतील हे उलगडत जाईल. झालेल्या चुका सुधारून आता बाद फेरीत पोहोचलेले संघ दर्जेदार खेळाची मेजवानी फुटबॉल प्रेमींना देतील, अशी आशा आहे. पण तूर्तास तरी धक्कादायक निकाल पाहता छोट्या संघांनी बलाढ्य संघांचा भ्रमाचा भोपळा फोडला आहे हे मात्र नक्की.


अक्षय गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -