प्रसिद्ध जीवरसायनशास्त्रज्ञ कमला सोहोनी

कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहारतज्ञ व पहिल्या भारतीय महिला जीवरसायनशास्त्रज्ञ होत्या. सिद्धहस्त लेखिका दुर्गा भागवत यांच्या त्या भगिनी होत. कमला सोहोनी यांचा जन्म १८ जून १९११ रोजी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण इंदूर येथे घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील बी.एस्सी. पदवी प्रथम क्रमांकात मिळविली (१९३३). ही पदवी घेणार्‍या त्या पहिल्या महिला होत. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बंगळुरू येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत घेतले. तेथे त्यांनी तज्ज्ञ शिक्षक श्रीनिवासय्या यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या प्राण्यांचे दूध व कडधान्ये यांतील प्रथिनांवर केलेले संशोधन मुंबई विद्यापीठाला सादर केले आणि १९३६ मध्ये एम.एस्सी. पदवी मिळविली.

सोहोनी यांना १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ व ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ अशा दोन शिष्यवृत्त्या उच्च शिक्षणाकरिता मिळाल्या व त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी वनस्पती कोशिकांच्या श्वसनक्रियेवर अभ्यास केला. बटाट्यावर संशोधन करताना त्यांना प्रत्येक वनस्पती कोशिकांत ‘सायटोक्रोम-सी’चा शोध लागला. हे मूलभूत संशोधन सोहोनी यांनी केंब्रिज विद्यापीठाला सादर करून पीएचडी पदवी संपादन केली (१९३९). त्या केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळविणार्‍या पहिल्या भारतीय विदुषी ठरल्या.

भारतात परत आल्यानंतर त्यांची नेमणूक दक्षिण भारतातील कुन्नूर येथे भारत सरकारच्या ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ या आहारशास्त्रात संशोधन करणार्‍या संस्थेत सहायक संचालिका म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी पोषणशास्त्राचा अभ्यास करून हरभर्‍यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभर्‍यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून व कातडीखालून होणारे चिवट आजार थोड्याच अवधीत बरे होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केले. अशा या महान शास्त्रज्ञाचे २८ जून १९९८ रोजी निधन झाले.