घरफिचर्ससशस्त्र क्रांतीचे जनक

सशस्त्र क्रांतीचे जनक

Subscribe

भारतातील आद्यक्रांतिकारक आणि सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. आज त्यांची जयंती. ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात वासुदेव फडके यांचा जन्म झाला.

भारतातील आद्यक्रांतिकारक आणि सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. आज त्यांची जयंती. ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात वासुदेव फडके यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा जवळच्याच कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडके कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये प्रवीण झाले होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वासुदेव बळवंत फडके पुण्याला आले. येथे सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. पुण्यात असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला. भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीला ब्रिटिशांची धोरणं कारणीभूत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके यांच्यावर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा प्रभाव पडला. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणे आणि यासाठी मागासलेल्या जातींनासुद्धा या लढ्यात सहभागी करून घेण्याचे महत्त्व साळवे यांनी फडके यांना पटवून दिले. मतभेद झाल्याने फडके यांनी लष्कारातील नोकरीला रामराम ठोकला.
ब्रिटिशांची दडपशाही आणि पारतंत्र्याची जाणीव निर्माण झालेल्या फडके यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात बंड पुकारले. त्यासाठी त्यांनी गावोगावी फिरून ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी निर्माण केली. यासाठी त्यांनी शिवकालीन गनिमीकाव्याच्या युक्तीचा अवलंब केला. १८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळात सरकारने पाठ दाखवली असताना वासुदेव फडके यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागांना भेटी दिल्या. तसेच दुष्काळग्रस्त भागातील जनतेची मतदसुद्धा केली. यावेळी सरकारच्या भूमिकेमुळे संतापलेल्या फडके यांनी सरकार उलथवून टाकण्याचा पण केला. १८७९ नंतर फडके यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. त्यानंतर आणखी काही दरोडे टाकले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. फडके यांनी सुरुवातीला पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली, पण येथून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर फडक्यांनी महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या ‘सैन्यात’ भरती केले. या सर्वांना सोबत घेत त्यांनी इंग्रज सरकारविरोधात युद्धाची घोषणा केली. आपल्या सहकार्‍यांसोबत त्यांनी शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाडी टाकल्या. यावेळी हाती लागलेल्या खजिन्यावरच फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर पुढे त्यांनी पुणे शहरावर कब्जा मिळवला. फडक्यांनी सुरू केलेला पहिला सशस्त्र उठाव चिरडण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल बक्षीस जाहीर केले. सरकारच्या या चालीला फडके यांनी जशास तसे उत्तर दिले. फडकेंनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणार्‍यास त्याहून मोठे बक्षीस जाहीर केले. इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या बंडात मदत मिळावी यासाठी फडके हैदराबाद संस्थानात गेले. पण निजामाच्या सेवेतील अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकार्‍यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला. या अधिकार्‍यांनी फडक्यांना महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.
२० जुलै १८७९ रोजी फडके पंढरपूरकडे जात होते. वाटेत कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले. त्यांना पुण्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथेच त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील सर्व वकिलांनी वकीलपत्र घेण्यास नकार दिलेला असताना सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. त्यानंतर उच्च न्यायालयात खटला सुरू असताना महादेव चिमाजी आपटे यांनी फडकेंच्या बचावाचे काम केले. वासुदेव फडके यांना आजीवन कारावास आणि तडीपारीची शिक्षा सुनावण्यात आली. अरेबियातील एडन येथील तुरुंगात फडक्यांना ठेवण्यात आले. तुरुंगात मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडके यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यातच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी या आद्यक्रांतीकारकाचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -