वैफल्यातून घोडचुका!

editorial

महाराष्ट्रात भाजपची अवस्था सध्या फार विचित्र झालेली आहे. कारण केंद्रात भाजपची बहुमतात सत्ता आहे, पण दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात पक्षाला इतर पक्षांच्या तुलनेत जास्त जागांवर विजय मिळवता आला तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. हातातोंडाशी आलेली सत्ता शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या अट्टाहासामुळे गेली. अगदी सहज आपण पुन्हा येऊ असे वाटत असताना हातची सत्ता अगदी सहज गेली. याचा जो मानसिक धक्का महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना बसलेला आहे, त्यातून ते बाहेर आलेले नाहीत. त्या मानसिक धक्क्यातूनच गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडावे यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत, पण काही केल्या सरकार काही पडत नाही. उलट भाजपचा जो विविध प्रकारे विरोध सुरू आहे, त्यातून सत्तेतील तीन पक्ष एकमेकांना अधिक घट्ट पकडून ठेवत आहेत. त्यामुळे सरकार पडण्याची शक्यता अधिक धूसर होत आहे.

त्याचबरोबर विरोधात असलेल्या भाजपचे नैराश्य अधिकच वाढत जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडण्याच्या कितीही तारखा राज्यातील भाजपच्या नेत्यांनी जाहीर केल्या, राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या तक्रारी केल्या, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी खंत व्यक्त केली, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर जणूकाही सत्ताधारी आणि त्यातही शिवसेनेच्या नेत्यांविरोधात घोटाळ्यांच्या आरोपांची फॅक्टरीच उघडली आहे की काय असे वाटावे असा त्यांचा आरोपांचा दररोज भडिमार सुरू असतो.

गेल्या अडीच वर्षांत त्यांनी जे आरोप केले आहेत, ते संग्रहीत केले तर त्याची कितीतरी बाडे तयार होतील. भाजपच्या नेत्यांचा सर्वात जास्त राग त्यांच्या हातून सत्ता काढून घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक हे किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर असतात, पण दररोज पत्रकार परिषदा घेऊन घोटाळ्यांच्या आरोपांची कागदपत्रे वितरित करूनही त्याचा सरकारला धक्का लागण्यासाठी काहीही परिणाम होत नाही हे पाहून तर भाजपच्या नेत्यांचे नैराश्य अधिकच वाढत आहे. या नैराश्यातून त्यांनी काही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असा शब्द नुकताच वापरला. इतकेच नव्हे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांची मानहानी केली. सुरुवातीला ती विधाने आपण गावच्या भाषेत केली असे म्हणून पाटील यांनी ती बेदखल करण्याचा प्रयत्न केला, पण याविषयी राज्य महिला आयोगाकडे अनेक तक्रारी गेल्या आणि आयोगाने त्यांच्याकडे खुलासा मागितल्यावर मात्र हे प्रकरण गंभीर वळण घेत आहे हे चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आयोगाला पत्र लिहून मी सुप्रिया सुळे आणि सगळ्या माता भगिनींचा अपमान केल्याबद्दल माफी मागतो, असे म्हटले.

सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे आपल्या विरोधात राज्यात रान पेटणार आणि सगळ्याच महिलावर्गाचा रोष आपण ओढावून घेणार, त्याच्या झळा आपल्याला भारी पडणार, इतकेच नव्हे तर वरून आदेश आला तर आपले प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे माफीनामा पाठवला आणि आपली सुटका करून घेतली. आपली यातून सुटका झाली असे पाटील यांना वाटत असले तरी त्यांनी केलेली चूक त्यांची पाठ सोडेल असे वाटत नाही. या ठिकाणी पाटील यांनी टीका करताना जी भाषा वापरली ती केवळ चूक म्हणता येत नाही.

त्यातून त्यांची वैफल्यग्रस्तता दिसून येते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने गेली अडीच वर्षे आपण नाना युक्त्या करत आहोत, वक्तव्ये करत आहोत. आपण दोन दिवसांत मंत्री होणार असाही आशावाद व्यक्त करून सगळ्यांना धक्का दिला, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात जे नैराश्य आणि वैफल्य साचलेले आहे, त्याचा स्फोट होऊन त्याचे टोक गाठून तुम्ही कुठेही जा, मसनात जा, असे शब्द पाटलांच्या तोंडून आले. सध्या केवळ चंद्रकांत पाटलांचीच नाही तर राज्यातील सगळ्याच भाजपच्या नेत्यांची अशीच मानसिक अवस्था झालेली आहे. काहीही केले तरी तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पडत नाही ही त्यांची व्यथा आहे.

आता लवकरच मुंबईसह राज्याच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरही भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतात. त्यामुळे भाजपच्या जागा जास्त निवडून आल्या तरी त्यांना सत्ता मिळवता येत नाही. त्यामुळे उद्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अगदी निवडणुकीनंतर हे तीन पक्ष एकत्र आले तरी भाजपची सत्ता येणार नाही. आता मुंबईत पूर्वीसारखी मोदी लाटही नाही. त्यामुळे मुंबईत मागील निवडणुकीइतका आकडा गाठता येईल का, अशीही भीती भाजपच्या नेत्यांना सतावत आहे. शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपवाले राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या प्रभावाचा फायदा करून घेऊ पाहत आहेत, पण त्यामुळे मुंबईतील परप्रांतीयांची मते भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणावरून जो काही राज्यात हलकल्लोळ केला, तो पाहिल्यावर ठाकरे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे कसे प्रयत्न सुरू आहेत हे लोकांना दिसले. कारण राणा दाम्पत्याला अचानक हनुमान चालीसा मातोश्रीवर जाऊन वाचण्याची प्रेरणा कशी काय मिळाली हेही एक रहस्य आहे. त्यात पुन्हा त्यांच्या बचावासाठी किरीट सोमय्या धावून जातात यातून गुपित उघड होते. पुढे अडीच वर्षांनी जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होईल, तेव्हाही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सध्याचा फॉर्म्युला कायम राहिला तर आपले काय होणार, असाही प्रश्न राज्यातील भाजप नेत्यांंना सतावत आहे. नुकतेच संभाजीराजे छत्रपती यांचे वडील छत्रपती शाहू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जे विधान केले, त्यामुळे तर सगळ्यांनाच धक्का बसला. एकूणच परिस्थिती राज्यातील भाजप नेत्यांचे वैफल्य वाढवणारी आहे. त्यातून त्यांच्या हातून चुका नव्हे, तर घोडचुका होत आहेत.