घरफिचर्सबिनपैशाचा तमाशा...फुकटचे मनोरंजन

बिनपैशाचा तमाशा…फुकटचे मनोरंजन

Subscribe

महाराष्ट्रात फुकटचे मनोरंजन करण्याची सध्या शर्यतच लागलेली आहे. मनोरंजन किंवा खळखळुन हसवण्यासाठी कलाकारांची, विनोदवीरांचीच गरज लागते असे नाही. राजकारणीही तुमचे 24 x 7 मनोरंजन करू शकतात. फुकटचे मनोरंजन करण्यात भाजपकडून सर्वात आघाडीवर आहेत माजी खासदार आणि भ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ असा दावा करणारे डॉ. किरीट सोमय्या, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे. या तिघांकडून राज्यातील जनतेचे दररोज फुकटचे मनोरंजन केले जात आहे. विषय एक, अजेंडाही एक. महाविकास आघाडीचे सरकार पडण्याच्या देण्यात येणार्‍या नवनवीन तारखा आणि भ्रष्टाचाराचे आरोप.

विरोधी पक्ष असलेला भाजप सत्ताधार्‍यांवर आरोप करणार हे ठिक. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मोर्चे, निदर्शने, आंदोलने, अटक या गोष्टी ओघाने आल्या. पण विरोधी पक्षाला आयते निमित्त देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते आणि त्यांना साथ देणारे सनदी अधिकारी दारूगोळा पुरवित असणार हे काही उदाहरणांवरुन दिसते. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांना मुलुंडच्या घरात स्थानबद्ध करुन ठेवल्याची मुंबई पोलिसांची करामत पाहता हे कायद्याचे राज्य आहे का, असाच सवाल निर्माण होतो.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सोमय्या यांना जिल्ह्यात येण्यास बंदी घालणारे आदेश काढताना त्यांच्या जीवाला धोका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दगडफेक करतील असा अंदाज व्यक्त केला. झेड सिक्युरिटी असणार्‍या व्यक्तीला धोका असणे म्हणजे राज्यात कुणीही सुरक्षित नाही. त्यात सीआयएसएफचे 42 कमांडो, एक बुलेटप्रुफ गाडी रात्रंदिवस सोबत असूनही सोमया यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानेच कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बाजावली आणि ठाकरे सरकार स्वत:च्याच ट्रॅपमध्ये पुन्हा एकदा अडकले.

- Advertisement -

सोमय्या हे कागल तालुक्यात जाऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांंच्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करणार होते. सवयीप्रमाणे टीव्ही चॅनेल, यूट्यूब चॅनेल, वेबसाईटला मुलाखती दिल्या असत्या. काही काळ ब्रेकींग न्यूज चालल्या असत्या. पुरूषवर्ग रात्री आयपीएल बघण्यात आणि महिला वर्ग डेली सोप बघण्यात गुंग झाल्या असत्या. मात्र किरीट सोमय्या यांना त्यांच्या घरातच चार तास मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केल्याने सोमय्या यांना आयतेच आरोप करण्यासाठी नवीन कारण मिळाले. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करण्यात काही मोजकेच राजकारणी तरबेज असतात. त्याप्रमाणे सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मिळालेल्या फुलटॉसवर अशा काही चौकार षटकारांची बरसात केली की ठाकरे सरकारच पुरते गोंधळून गेले. काय करावे ते कळत नव्हते, केला तुका आणि झाला माका…अशी म्हणण्याची वेळ ठाकरे सरकारवर आली. सोमय्यांवर कारवाई करण्यात मुख्यमंत्री कार्यालयाची कोणतीही भूमिका नाही. गृहखाते असे निर्णय घेत असते, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडीच्या डझनभर नेत्यांविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. सोमय्यांनी या प्रकरणी ईडीकडे तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली असून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यापूर्वीही सोमय्या यांनी कृपाशंकर सिंह, बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित आणि नारायण राणेंवर बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र हे सर्वजण भाजपत आले आणि पवित्र झाल्यामुळे सोमय्या यांनी शांत बसणेच पसंत केले असणार. भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीच्या किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांच्या जावयांवर आरोप केला आहे.

- Advertisement -

यात आरोप केलेले हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली, नवाब मलिक यांचे जावई समीर खान, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे आहेत. यापैकी मुश्रीफ वगळता सर्वांच्या जावयांना चौकशीला सामोरं जावं लागलं किंवा जेलमध्ये. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच किरीट सोमय्या यांनी लावला आहे. आधी अनिल परब, अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड नंतर हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील आले आहेत.

ठाकरे सरकार पुरस्कृत दुसर्‍या मनोरंजनपर कार्यक्रम म्हणजे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना 24 ऑगस्ट रोजी रत्नागिरीतून केलेली अटक. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंशी असलेलं वैमनस्य नवीन नाही. ठाकरेविरुद्ध राणे हा सामना महाराष्ट्रात 2005 पासून रंगतोय. 15 वर्षांनंतरही विरोधाची धार दोन्ही बाजूंनी कमी झालेली नाही. नारायण राणेंच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेनेने भाजपला थेट आव्हान देत राणेंसह भाजपलाही शिंगावर घेण्याचे धाडस केले. राणेंसारख्या आक्रमक राजकीय प्रतिस्पर्ध्याला अटक करून उद्धव ठाकरेंनी आपला राजकीय डाव खेळला खरा पण त्यानंतर आठवडाभर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील सामना राणे यांनी जोर लावून खेळला आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सातत्याने शिवसेनेवर टीका करत होते. शिवसेना भवन फोडण्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘अरे-तुरे’ अशी एकेरी भाषा वापरण्यात आली.

त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेतील महत्वाच्या नेत्यांना कल्पना देत राणेंच्या अटकेची रिस्क घेतली असेच म्हणावे लागेल. नारायण राणेंवर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भाजपचे केंद्रीय नेते राणेंच्या मदतीला धावले नाहीत. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एक ट्वीट केलं, तर प्रवक्ते संबित पात्रा यांनी अटक चुकीची असल्याचं वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपली चौकशी केल्याचा दावा राणे यांच्याकडून केला जातो. याउलट, रिपब्लिक न्यूजचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजपच्या सर्वच केंद्रीय नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. तशी राणेंच्या अटकेनंतर दिसून आलेली नाही. राज्यातील एक गट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आहे.

भाजपच्या या गटाला या गोष्टी मान्य नाहीत. राणेंची लोकप्रियता वाढत राहिली तर देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अडचणीची ठरू शकते. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटक नाट्यानंतर राज्यातील आगामी राजकारणाच्या दिशा पुरेशा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे संघटन आणि गृह खाते सांभाळणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुत्सद्देगिरीमुळे भाजपचा आशीर्वाद रथ रोखला गेला. मात्र त्याच वेळी राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेचा वेध घेण्याची भाजपची खेळी काही प्रमाणात यशस्वी झाली, काही प्रमाणात उलटली. राणेंना भाजपमध्ये प्रवेश मिळाला तो त्यांच्या नेतृत्व गुणांपेक्षा सेनेविरोधातील उपद्रवमू्ल्यामुळे. पण, महाविकास आघाडी सरकारने त्यांना लगाम घालत भाजपच्या विरोधात महत्वाचा संदेश देशभर दिला.

भाजपला अन्य पक्षांतही ‘चाणक्य’ असू शकतात, याचे भान राणेंच्या अनपेक्षित अटक नाट्यावरून आले असावे. राणेविरुद्ध सेना या खेळात सेनेने बाजी मारली असली तरी राणेंचे ‘प्यादे’ खेळवण्यात भाजपलाही यश आले आहे. आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील 10 महत्वाच्या महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत नारायण राणेविरुद्ध शिवसेना या नाट्याचे अनेक अंक पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. भाजप कायम ‘इलेक्शन मोड’वर असतो, असे राजकीय निरीक्षक सांगतात. पण, त्यासाठी भाजपआधी ‘मिशन मोड’वर कामाला लागतो, हे उदाहरणावरून दिसते. युद्ध जिंकण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि रणनीती आखलेली अशी व्यूहरचना तयार हवी, हे भाजपने ओळखले आहे. खरे तर विरोधकांनीही हे तंत्र आत्मसात केले पाहिजे. काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आलबेल नाही. शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या कोथळा काढण्याच्या वक्तव्यावर चांगलीच टीका केली होती.

दुसरीकडे राज्यभरात शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना फोडून राष्ट्रवादीत आणलं जात आहे. काँग्रेसही शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. किरीट सोमय्या प्रकरणाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अंतर वाढू लागल्याचे दिसत आहे. राजकारणात एक दरवाजा नेहमी किलकिला ठेवायचा असतो. कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो तसा आयुष्यभर मित्रही नसतो. उद्धव ठाकरेंचा राणेंची अटक आणि किरीट सोमय्या यांना कोल्हापूर बंदी हा डाव बुमरँग होण्याची चिन्हे आहेत. कारण काही बेताल आरोप किंवा रोजच्या बडबडीवर दुर्लक्ष करायचे असते. जेवढे अरे ला का रे करणार तेवढी आपली किंमत कमी होणार हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवेत. राजकारणात कायम आरोप होत असतात. त्यामुळे विरोधकांच्या प्रत्येक आरोपावर जर सत्ताधारी खुलासे करत बसले तर राज्य काय चालवणार ?

राज्यातील जनता सुज्ञ आहे. जनता सब जानती है की ये पॉलिटीकल तमाशा शुरू है, इसका मतलब अब इलेक्शन आने वाली है. त्यामुळेच आरोपांवर शांत राहून योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करण्याची शरद पवारांची स्टाइल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगिकारायला हवी. अन्यथा भाजपकडून भविष्यात उकसवण्याचे प्रकार होत राहणार. त्याला ठाकरे सरकार बळी पडले तर महाविकास आघाडी सरकारचा दुसरा वर्धापन दिन साजरा करणे कठीण होईल. कारण भाजपचा ‘एक पात्री एक कलमी’ कार्यक्रम सुरू झाला आहे. भाजपच्या प्रत्येक पात्राची भूमिका ठरलेली आहे. त्या भूमिकेपुरता तो नेते आरोप करण्यासाठी स्टेजवर येतो आणि आरोप करुन निघून जातो. त्या प्रत्येकाला उत्तर द्यायचे की दुर्लक्ष करायचे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे. कारण शिवसेनेतील काही नेते, सल्लागार आणि सनदी अधिकारी हे भाजपला रोखले पाहिजे असे सांगतील. पण ते रोखताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच उघडे पडायला नको म्हणजे झाले.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -