भावी मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत लॉबिंग…

BJP leaders lobbying for future CM post in Delhi

देशामध्ये काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष आणि तुलनेने अन्य पक्षांपेक्षा केडर बेस पक्ष म्हणून ओळखले जातात. काँग्रेसची स्वतःची अशी एक स्वतंत्र पक्षपद्धती आहे तसेच गांधी कुटुंबीयांशी असलेल्या निष्ठेला येथे प्रचंड महत्त्व आहे. भाजपचे तसे नाही, असे समजण्याचे कारण नाही येथेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपच्या संघटनात्मक कामकाजाचा रिमोट कंट्रोल हाती असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेल्या नाते संबंधाला 2014 नंतरच्या मोदी युगात भाजपमध्ये प्रचंड महत्त्व प्राप्त झाले. त्याआधी देखील भाजपमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी असलेल्या सलगीला पक्षात अनन्यसाधारण महत्त्व होते. 2014 नंतरच्या मोदी पर्वात अडवाणी आणि वाजपेयी यांचे समर्थक अथवा निष्ठावंत म्हणून समजल्या जाणार्‍यांचे पंख छाटण्याचे पद्धतशीर काम भाजपमध्ये गेल्या सात वर्षांच्या काळात करण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये गांधी घराणे हेच पक्षातील सत्तेचे सर्वोच्च केंद्र असल्यामुळे तेथे हे प्रकार अधिक उघडपणे आणि आताच्या भाषेत बोलायचे झाल्यास पारदर्शकपणे होत असतात. भाजप हा शिस्तबद्ध आणि साधन सुचिता पाळणारा आणि किमान तसे दाखवणारा पक्ष असल्यामुळे हेच प्रकार या पक्षात छुप्या पद्धतीने होत असतात.

त्यामुळेच महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत ज्या काही हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत ते पाहता भाजपात तातडीने नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल की, न जाईल याबाबत जरी आत्ताच्या स्थितीला संभ्रमाचे वातावरण असले तरीदेखील येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे ही राज्यातील एखाद्या तरुण आक्रमक नेतृत्वाकडे सोपवली गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्रदेशाध्यक्षपदाला आताच्या घडीला एवढे महत्व येण्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपच्या एकूणच निर्णय प्रक्रियेत प्रदेशाध्यक्ष पदाला महत्त्वाचे स्थान आहे. मग अगदी ग्रामपंचायतीच्या उमेदवार निश्चिती पासून ते अगदी महापालिका जिल्हा परिषदा विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा आणि गेल्या सात वर्षांपासून देशात भाजपचे सरकार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून केंद्रीय राज्यमंत्री म्हणून अथवा केंद्र सरकारच्या विविध लाभो व पदांवर होणार्‍या नियुक्त्यांमध्ये ही प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीचे मत हे महत्त्वाचे ठरते. आणि त्याही पुढे आणखीन विचार करायचा झाल्यास जर राज्यांमध्ये भाजपला सत्तास्थापनेची संधी प्राप्त झाली तर संबंधित राज्याचा भाजपचा प्रदेशाध्यक्ष याला मुख्यमंत्रीपदासाठी सर्वप्रथम संधी दिली जाते. त्यामुळेच 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता येणार हे निश्चित झाले त्यावेळी एकनाथ खडसे, सुधीरभाऊ मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि याबरोबरच भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले तत्कालीन केंद्र मंत्री नितीन गडकरी अशा सार्‍या दिग्गजांची नावे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असतानादेखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे प्रदेशाध्यक्ष पद हे प्रमुख कारणीभूत होते.

देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीचा जर भाजपचा राजकीय इतिहास बारकाईने पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास महाराष्ट्रातील काही विशिष्ट प्रस्थापित नेत्यांचा त्याकाळीदेखील विरोध होता. मात्र याबाबत फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे आभार मानले पाहिजेत. कारण फडणवीस यांना प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचा हट्ट आणि आग्रह हा दिल्लीदरबारी त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी लावून धरला होता. केवळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आग्रह किंवा हट्ट म्हणा यामुळे केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले होते.
योगायोगाने देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर देशात भाजपचे आणि महाराष्ट्रात फडणवीस यांचे स्टार असे काही चमकले की.. भगवान देता है तब छप्पर फाड के देता है .. राजकीय क्षेत्रातील कोणत्याही नेत्याला हेवा वाटावा असा हा फडणवीस यांचा काळ होता. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. केंद्रात भाजपचे सरकार आले नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2014 ते 2019 अशी सलग पाच वर्षे ते मुख्यमंत्री होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्येदेखील भाजपने स्वबळावर एकशे पाच आमदार देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आणून दाखवले आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजप आणि शिवसेना यांचे सरकार येणार असे वाटत असतानाच शिवसेनेच्या वेगळ्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात भाजपला आणि त्यातही विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या सर्वोच्च पदापासून दूर व्हावे लागले. मात्र तरीदेखील महाराष्ट्र भाजपवरील देवेंद्र फडणवीस यांची एकहाती असलेली मांड आणि पकड ही काही त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या दीड-पावणेदोन वर्षांच्या काळामध्ये कमी होऊ दिलेली नाही, हे लक्षात घेणेदेखील तितकेच महत्वाचे आहे.

महाराष्ट्रात सत्तेतून भाजपा पायउतार झाल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली. विधान परिषदेमध्ये भाजपाचे अनेक वरिष्ठ आणि तुल्यबळ नेते हे विरोधी पक्षनेते होण्यास पात्र असतानादेखील मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली. प्रवीण दरेकर यांना ही संधी देण्यामागे फडणवीसांचा राजकीय हेतू हा भाजपमधील तथाकथित प्रस्थापित नेत्यांना राज्यस्तरीय सत्ता पदापासून दूर ठेवणे हाच होता. त्यामध्ये ते वेळोवेळी यशस्वी ठरले होते. ती स्वतः मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांच्या खुर्चीकडे साधी नजर वर करून बघणार्‍या एकनाथ खडसे,पंकजा मुंडे, विनोद तावडे यासारख्या वरिष्ठ भाजप नेत्यांना विधानसभेचे साधे तिकीटही न मिळण्याची व्यवस्था फडणवीसांनी केली. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांचा शब्द चालतो हे अधोरेखित झाले आहे. एवढे सारे सविस्तरपणे सांगण्याचे मुख्य प्रयोजन हे की फडणवीसांना ही जी मूळ ताकद मिळाली ती महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे हे दुर्लक्षून चालणार नाही.

आगामी काळात महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत भाजप तसेच राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. गेल्या पावणे दोन वर्षात महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही. तो विरोधी पक्षात आहे, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी अथवा अन्य कोणत्याही राजकीय हालचाली झाल्यास आणि त्यातून जर भाजपला पाठबळ मिळाले तर आगामी काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे लक्षात घेऊनच भाजपची नेतेमंडळी प्रदेशाध्यक्षपदासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्य पातळीवर आणि दिल्लीतदेखील लॉबिंग करू लागली आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. आगामी प्रदेशाध्यक्षपदासाठी जी नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत त्यामध्ये मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार, नागपूरकर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच संजय कुटे यांचा समावेश आहे. यामध्येदेखील मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव प्राधान्याने प्रथम क्रमांकावर घेतले जात आहे, याचे कारण असे की आशिष शेलार यांनी मुंबई भाजप अध्यक्ष असताना मुंबईतील भाजप नगरसेवकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे तसेच विधानसभेमध्ये भाजपचा आक्रमक तरूण चेहरा आणि मराठा समाजाचे आक्रमक नेतृत्व या दृष्टीने शेलार यांच्याकडे पाहिले जाते.

मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना आशिष शेलार यांची कामगिरी पक्षात आणि विधिमंडळात उठावदार होतीच, मात्र अध्यक्षपदानंतरही आशिष शेलार यांनी भाजपातील स्वतःचे पक्षकार्य थांबवले नाही. पक्ष संघटना बळकट होण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सर्वदूर संघटनात्मक पातळीवर कार्य केले. कार्यकर्ते, पदाधिकारी, संबंधित नेते यांच्याशी तेथील स्थानिक प्रश्नांवर बैठका घेतल्या आणि भाजपचे पक्ष संघटन ग्रास रूटवर अधिक भक्कम आणि बळकट कसे होईल यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे मराठा समाजातील आक्रमक नेतृत्व अशी आशिष शेलार यांची ओळख आहे. त्यामुळे भाजपला जर चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आक्रमक मराठा नेतृत्व महाराष्ट्रात द्यायचे असेल तर त्यासाठी आशिष शेलार हे अत्यंत फिट चेहरा आहेत, याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

अर्थात विदर्भ वीर नागपूरकर असलेले माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेदेखील पारडे जड व्हावे लागेल. कारण एक तर ते नागपूरसारख्या संघाचे मुख्यालय असलेल्या शहरातील आहेत. त्यामुळे उद्या जर संघाने बावनकुळे यांच्या पारड्यात वजन टाकले तर तेदेखील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. अर्थात, यामध्ये सर्वात मोठी मेख जी आहे ती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नेमकी भूमिका काय असेल अथवा नसेल याची. अगदी एका वाक्यात सांगायचे झाले तर केंद्रीय नेतृत्वाला जर महाराष्ट्रात नेतृत्वबदल हवा असेल तर आगामी प्रदेशाध्यक्ष आक्रमक शैलीचा आणि स्वतंत्र विचारसरणीचा देण्यावर पक्षीय नेतृत्वाचे अधिक लक्ष असू शकेल, मात्र जर केंद्रीय नेतृत्वाला पुढचा काळदेखील महाराष्ट्राचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच करावे असे वाटत असेल तर आगामी प्रदेशाध्यक्ष हा देवेंद्र फडणीस यांच्या सांगण्याऐकण्यातील असेल असा देण्यात येईल. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करताना केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना कितपत विश्वासात घेते यावरच महाराष्ट्र भाजपचे पुढचे प्रदेशाध्यक्षपद तसेच राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.