सत्तेसाठी राजकीय पुष्पगुच्छ

उत्तर प्रदेश असो की पंजाब या दोन्ही ठिकाणी काल मंत्रिमंडळ बनवताना राजकीय पुष्पगुच्छ बनवण्याचं काम दोन्ही पक्षांच्या हायकमांडकडून करण्यात आलं आहे. यापैकी पंजाबमध्ये तर काँग्रेस निष्ठावंत अमरिंदर यांचे विरोधक, विद्यार्थी नेते, महिला, मुस्लीम, दलित या सगळ्यांचा समावेश करताना एक विलक्षण ताळमेळ साधण्यात आलेला आहे.

editorial

सध्या पितृपक्ष सुरू आहे. या कालावधीमध्ये अनेकजण शुभकार्यांना सुरुवात करत नाहीत. मात्र याच पितृपक्षात काल उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सातजणांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं, तर पंजाबमध्ये पंधराजणांना कॅबिनेटमंत्रीपदी बसवण्यात आलं. यापैकी पंजाबमध्ये काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी दलित चरणसिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलंय. पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणी पुढील सहा महिन्यात विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यापैकी उत्तर प्रदेश हे भाजपसाठी आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यासाठी खूपच महत्वाचं राज्य आहे. स्वतः नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातूनच लोकसभेत पोहचत असतात. तर काँग्रेससाठी पंजाब हे एक महत्वाचं राज्य आहे. त्यामुळे सुजलाम- सुफलाम पंजाब सतत आपल्या हाती राहील यासाठी काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न असतो. उत्तर प्रदेश असो की पंजाब या दोन्ही ठिकाणी काल मंत्रिमंडळ बनवताना राजकीय पुष्पगुच्छ बनवण्याचं काम दोन्ही पक्षांच्या हायकमांडकडून करण्यात आलं आहे. यापैकी पंजाबमध्ये तर काँग्रेस निष्ठावंत अमरिंदर यांचे विरोधक, विद्यार्थी नेते, महिला, मुस्लीम, दलित या सगळ्यांचा समावेश करताना एक विलक्षण ताळमेळ साधण्यात आलेला आहे. पुष्पगुच्छ जसा वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या, प्रकाराच्या फुलांनी सजवला जातो अगदी तसेच हे राजकीय पुष्पगुच्छ सजवण्यात आले आहेत. पंजाबमध्ये पंधराजणांपैकी चार वेळा आमदार असलेल्या तृप्त राजिंदर बजवा यांना ७८ व्या वर्षी मंत्रिपदी संधी देताना त्यांच्याकडे सिद्धू समर्थक आणि कॅप्टन अमरिंदर विरोधक ही गोष्ट जशी पाहिली गेली तसा त्यांच्या ज्येष्ठतेचाही विचार केला गेलाय. तीच गोष्ट ऑलिंपिकवीर हॉकी कर्णधार परगतसिंह यांची. १९९२ साली बार्सिलोना आणि ९६ साली अटलांटा ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार्‍या पंजाब पोलीसमधून पोलीस अधीक्षक पदावर काम केलेल्या परगत सिंह यांचा उपयोग चन्नी यांना कामकाजात नक्कीच होऊ शकतो. त्याचवेळी पंजाब महिला काँग्रेसचा चेहरा असलेल्या अरुणा चौधरी आणि मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा असलेल्या रजिया सुलताना यांनाही स्थान देण्यात आलेलं आहे. रजिया सुलताना यांचे पती मोहम्मद मुस्तफा हे नवज्योत सिंग सिद्धू यांचे सल्लागार म्हणून काम करतात. गांधी परिवार निष्ठावंत अमरिंदर सिंग राजा वडिंग यांना संधी देताना तरुणाईला साद घालण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय. पंजाबला पहिल्यांदा दलित मुख्यमंत्री देणार्‍या काँग्रेसने राजकुमार वरेका यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन राज्यातील दलित जनतेला साद घातली आहे. हे सगळं करत असताना काँग्रेस परिवारवाद जोपासायलाही चुकलेली नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांतसिंग यांचे नातू आणि युवक काँग्रेसचे नेते गुरुकिरण सिंग कोहली यांनाही कॅबिनेट मंत्रीपदी संधी देण्यात आलेली आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसने जे केलं तीच गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. २०२४ साली नरेंद्र मोदी यांना हॅट्ट्रिक करण्यासाठी सर्वाधिक भरवसा असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. अशी आजच्या घडीला भाजपवाल्यांची धारणा आहे. उत्तर प्रदेशमध्ये ६० सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. त्यातील ५३ जागा भरलेल्या होत्या. आज सात जणांची नव्याने वर्णी लावून मंत्रिमंडळाची ‘साठी’ पूर्ण करण्यात आलेली आहे. यापैकी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आलेली आहे तर सहा जणांना राज्यमंत्रीपदी बसवण्यात आलं आहे. हे करत असताना भाजपने ब्राह्मण, ओबीसी आणि दलित असा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच आगामी निवडणुका लढण्याचं भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ठरवलेलं आहे. याचं कारण मुख्यमंत्रीपदी सलग पाच वर्षे सक्षमतेने पूर्ण करण्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी किमया साधली आहे. बर्‍याच वर्षानंतर ही गोष्ट साध्य झालीय. भाजपसाठी ‘पोस्टरबॉय’ म्हणून नरेंद्र मोदी यांची छबी असली तरी नेतृत्व आणि सत्ता समीकरण ही योगी आदित्यनाथ यांनाच जुळवावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांनी आता कंबर कसलेली आहे. २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक करू शकतात की नाही याचा फैसलाही उत्तर प्रदेशमध्येच होणार आहे. याचं कारण सर्वाधिक लोकसभेच्या ८० जागा असलेला उत्तर प्रदेश हाती असणारा पक्ष दिल्लीचं तख्त आपल्या हाती ठेवू शकतो, याचं भान राखत उत्तर प्रदेशात १३ टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राम्हण समाजाला जितीन प्रसाद यांच्या रुपाने प्रतिनिधित्व देऊन कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलंय. राज्यातील १०० विधानसभा जागांवर दलित मतदारांचं प्राबल्य आहे. संपूर्ण राज्यात २०.५ टक्के दलित, १९ टक्के मुस्लीम आणि ९ टक्के यादव आहेत. दलितांना आणि मागासवर्गीयांना आपल्याकडे आकर्षित करताना योगींनी अचूक ताळमेळ साधला आहे. जितीन प्रसाद, धर्मवीर प्रजापती,पलटू राम, दिनेश खटिक, संजयकुमार गोड, संगिता बिंद आणि छत्रपाल गंगवाल या सात जणांना मंत्रीपदाची संधी देताना शक्य तितके समाज आणि जाती सत्तेच्या विस्तारात उपयोगी येतील हे पाहिलं गेलंय. सभांमधून नेते सर्वधर्मसमभावांचे प्रतिपादन करत असले तरी सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग हा विविध जातींच्या गल्लीबोळांतूनच जात असतो, याची कल्पना असल्यामुळे ते त्या त्या जातीच्या उमेदवाराला पुढे आणत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला केंद्रीय मंत्रिमंडळाचा केलेला मागील विस्तार आणि त्यात ४३ नव्या सहकार्‍यांना संधी देताना ज्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तेच उत्तर प्रदेशमध्ये होताना दिसलं. उत्तर प्रदेश असो किंवा पंजाब दोन्ही ठिकाणी सत्ता मिळवणं आणि टिकवणं या गोष्टींसाठी जे करावं लागतं ते करण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात काँग्रेसमधून आलेल्या नारायण राणे किंवा राष्ट्रवादीतून आलेल्या आणि ओबीसी चेहरा असलेल्या कपिल पाटील यांना जशी संधी दिली तोच प्रकार योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण जितीन प्रसाद यांच्याबाबतीत केलेला आहे. मोदी असो किंवा योगी. दोघांचा प्रयत्न हा फक्त सत्तेमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा आहे. त्यामुळे कोण कुठल्या जातीतून, वर्गातून आणि पक्षातून कधी आला ह्यापेक्षा त्याचं राजकीय मूल्य हाच मुद्दा या दोघांसाठीही महत्वाचा ठरतो. एरव्ही निवडणुकीचा अर्ज दाखल करताना किंवा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताना तारखा आणि मुहुर्तांचे मेळ घालणार्‍या राजकारण्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी श्राद्धपक्षामधल्या दिवसांचीही निवड केली जातेय. याचं कारण कोणत्याही कार्यकाळात एकच गोष्ट निर्विवाद सत्य असते आणि ती म्हणजे हाती असलेली सत्ता. त्यासाठीच आजचा राजकीय पुष्पगुच्छांचा घाट घालण्यात आला. त्यातून पदांवर बसणार्‍यांना किती काळ काम करता येणार यापेक्षा मिळणारा गाड्यांचा ताफा, बंगला, दालनं, सुरक्षांची कडी आणि मंत्रीपदं या गोष्टींच्या जोरावरच या नेत्यांच्या समाजांना आणि जातींना आपल्याकडे आकर्षित करून ठेवून पुढच्या पाच वर्षांसाठी त्यांच्या पाठीराख्यांच्या हाती आश्वासनांचे पुष्पगुच्छ देण्याचं काम मोदी असो, योगी असो किंवा पंजाबातले सिध्दू-चन्नी यांना करायचं आहे. आणि त्यासाठी हे राजकारणी सदैव तयार असतात. पुढच्या सत्तेसाठी मंत्रिमंडळ विस्तारुन शंखनाद करण्यात आलेला आहे.