घरफिचर्सआकाशवाणी ते आसमान दर्शन...

आकाशवाणी ते आसमान दर्शन…

Subscribe

जून 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘सामना’त लिहिलेल्या एका खरपूस समाचार घेणार्‍या अग्रलेखानंतर मोदींनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे लेखी पत्राद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी 2022 रोजी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे स्वत:चं, शिवसेनेचं आणि कधी काळी असलेल्या हिंदुत्ववादी युतीचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचा लेखाजोखा राऊत नेमका कसा मांडतात आणि त्यासाठी त्यांना किती वेळ मिळू शकतो हे आताच सांगणं कठीण आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, अशी आकाशवाणी करणार्‍या राऊत त्यांना आसमान दाखवण्याचा चंग भाजपने बांधला आहे, एवढे मात्र नक्की.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर कोणताही आसभास नसताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी आकाशवाणी करणारे शिवसेनेचे नेते, श्रमिक संपादक, पवारांच्या लेखी असलेला सध्या ‘कामाचा’ मोहरा अशा अनेक ओळखीने लब्ध असलेल्या संजय राऊत यांना आकाशवाणीच्या बदल्यात आसमान दर्शन घडवण्याचा चंग भाजपने बांधलेला दिसतोय. याचं कारण अनेक कलुषित आणि वादग्रस्त नेते भाजपमध्ये असताना संजय राऊत यांना लक्ष्य केलं जातंय. याकरिता संजय राऊत यांचं फक्त राजकारण किंवा वक्तृत्व याच गोष्टी कारणीभूत नाहीत, तर याच्या जोडीला निमित्त ठरलंय ते संजय राऊत यांचे वादग्रस्त उद्योजक आणि राजकीय व्यावसायिकांबरोबर असलेले हितसंबंध. जोडीला जितकं आपलं राजकीय मूल्य आहे त्यापेक्षा अधिक उपद्रवमूल्य सादर करण्याची संजय राऊत यांची कार्यशैली हीदेखील कारणीभूत ठरली आहे. मंगळवारी संजय राऊत यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी जप्त केली. यामध्ये दादरमधला एक आलिशान फ्लॅट आणि अलिबागमधल्या काही मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी असं जप्त केलेल्या संपत्तीचं स्वरूप आहे. या कारवाईमुळे संजय राऊत हादरून जातील असं समजण्याचं काहीच कारण नाही. पण ते दुखावले मात्र नक्कीच गेलेत. त्यांच्या दुखावण्याला नेमकं कोण जबाबदार आहे याचा संजय राऊत यांना विचार करावाच लागेल. स्वतःकडे ‘इलेक्टोरल मेरिट’ नसतानाही गेली 25 वर्षे संजय राऊत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात परिणाम करणारा घटक आहे.

संजय राऊत यांच्या कारकीर्दीची सुरुवातीची काही वर्षे त्यांना खिंडीत गाठणं ही एक कठीण गोष्ट होती. याचं कारण त्यांचं नेमस्त वागणं आणि मोजकंच बोलणं… नंतर मात्र संजय राऊत यांच्या एक गोष्ट लक्षात आली. आपली लेखणी धारदार तर आहेच ती लक्ष्यभेदही करू शकते. पण त्याच वेळेस त्यांनी आपल्या वाणीलाही लेखणीपेक्षा धारदार शस्त्र म्हणून उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. 2014 ते 2019 पर्यंत संजय राऊत यांच्या वाणीला तितकसं महत्व नव्हतं. याचं कारण भाजपबरोबर शिवसेना राज्याच्या सत्तेत बसली होती. केंद्रात एनडीएचा घटक म्हणून मोदींच्या हाताला हात लावत मम करत होती. यादरम्यान राऊत जे काही बोलत होते त्यातील बहुतांश गोष्टी ते ‘सामना’तून व्यक्त होत होते. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि त्यामुळे ‘सामना’तून मांडलेल्या राऊतांच्या मताला किंवा संपादकीयला विलक्षण महत्व होतं आणि आहे. कारण ‘सामना’ लिहितोय म्हणजे ठाकरे व्यक्त होत आहेत अशी समज आणि धारणा असलेला माध्यमांचा खूप मोठा वर्ग राष्ट्रीय पत्रकारितेत ‘सामना’ला महत्व देऊन बसलेला आहे. ‘सामना’ ला मिळणारे महत्व अलगदपणे संजय राऊत यांना स्वत:कडे परावर्तित करून घ्यायचं होतं. 2019 साली मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर संजय राऊत यांना ही आयती संधी चालून आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्रिपदाचं आणि त्यासाठी बंद दाराआडील चर्चेचं निमित्त काढून शिवसेना भाजपबरोबर असलेला आपला 25 वर्षांचा संसार शिवसेनेनं मोडून टाकला. यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरत असले तरी उद्धव ठाकरे यांना 2005 पासून मुख्यमंत्रिपदाची असलेली अभिलाषा संजय राऊत यांनी नेमकी हेरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला आपली धर्मनिरपेक्षपणाची कथित तत्त्वं आणि मूल्यं सांभाळत येती काही वर्षे तरी सत्ता मिळणे दुरापास्त होतं. कारण उपप्रादेशिक कार्यकक्षा असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला जोपर्यंत स्वतःच्या मनगटावरील घड्याळाच्या जोरावर 100हून अधिक जागा मिळवता येणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राची सत्ता जोरकसपणे आपल्या हाती ठेवणं पवारांना कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे कमीत कमी आमदारांच्या संख्येची गुंतवणूक करत सत्तेतला जास्तीत जास्त फायदा उठवण्यासाठी भाजपपेक्षा शिवसेना या पक्षाला पवारांनी प्राधान्य दिलं. पवारांनी केलेली ही निवड उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरवण्याच्या कामाची जबाबदारी पदानं शिवसेनानेता असलेल्या आणि उपपदाने पवारांचा ‘मोहरा’ असलेल्या संजय राऊत यांनी लीलया पेलली होती आणि इथेच खरा संजय राऊत या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा घात झाला. पवारांच्या पक्षातल्या कुणाहीपेक्षा आपल्या पवार निष्ठा बावनखणी आहेत. त्याच वेळी आपण शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाचे सदासर्वकाळ हितचिंतक आहोत, असं सांगण्याचा आणि भासवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी कसोशीने केला. या प्रयत्नात दोन्हीकडच्या त्यांच्या हितशत्रूंनी जिथे जिथे माहितीची रसद पुरवायची तिथे ती पुरवली आणि संजय राऊत यांना अडचणीत आणले.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होण्याच्या चाळीस दिवस आधीपासून ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार’ ही आकाशवाणी केली आणि तीच आकाशवाणी कशी बरोबर आहे याच्या ठळक बातम्या राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ देऊ लागले. या गोष्टीला आता अडीच वर्षे झाली, मात्र या अडीच वर्षांत एकही दिवस असा गेला नाही की रोज आपल्या कार्यालयात जायला निघणारे संजय राऊत माध्यमांशी बोलले नाही. त्याच वाहिन्या आणि त्यांचे तेच प्रतिनिधी. खासदार संजय राऊत मात्र रोज आपण बोललंच पाहिजे या नेटाने ‘मैत्री’मधून खाली उतरतात आणि मुद्यात दम असो वा नसो, आपल्या अंगच्या विलक्षण अभिनय कलागुणांना वाव देत भाजपवर आणि त्यातही मोदींवर तोंडसुख घेतात. राऊतांच्या या रोजच्या बोलघेवडेपणाचा त्यांच्या चिमुटभर समर्थकांना जरी आनंद होत असला तरी भाजपसहित शिवसेना आणि राष्ट्रवादी, काँग्रेसमधल्या अनेक छुप्या हितशत्रूंना राऊतांनी दुखावलेलं आहे. सध्या भाजपसाठी ‘सबका मालिक एक’ असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर रोज सकाळी उठून केली जाणारी टीका अंध आणि डोळस अशा दोन्ही नमो भक्तांच्या जिव्हारी लागत असते. त्यातून उरलेल्या देवेंद्र भक्तांना ज्या फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याची खात्री होती ते राज्यातलं सर्वोच्च सत्तेचे पद राऊतांमुळेच हिरावलं गेलेलं आहे याची कल्पना असल्याने महाराष्ट्र भाजपा दबा धरून बसलेला होता. आधी म्हटल्याप्रमाणे राऊत यांचे काही वादग्रस्त मित्र त्यांनी केलेल्या आर्थिक चुका आणि त्यातून राऊतांना मिळालेला व्यावसायिक लाभ या गोष्टींमुळे ते अडचणीत आले. शिवसेना भवनमधली पत्रकार परिषद त्यात राऊत यांचं फडणवीस यांची छबी कलुषित करणं, योग्य कागदपत्रांशिवाय पत्रकार परिषदेत साडेतीन नेत्यांची भ्रष्टाचारी म्हणून संभावना करून या सगळ्याचा परिपाक राऊत यांची संपत्ती जप्त झाली. त्यानंतर अवघ्या 24 तासांत शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले. केंद्र सरकार नियंत्रित करत असलेल्या संस्थांपैकी एक असलेल्या ईडीने राऊत यांच्या संपत्ती जप्तीबद्दलची झलक दाखवताच पवारांचं थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचणं या गोष्टीकडे दैनंदिन राजकीय घटना म्हणून बघणं भोळेपणाचं ठरेल. काँग्रेसने आपलं पुनरुज्जीवन केलं पाहिजे इथपासून ते देशात मोदींच्या विरोधात आघाडी उभी राहिली पाहिजे इथपर्यंतच्या कोणत्याही पल्लेदार मोदी विरोधाला राऊत यांचा केंद्रबिंदू असतो तो पवारनिष्ठांचा आणि पवारश्रद्धेचा.
या सगळ्या गोष्टींची कल्पना असलेल्या भाजपच्या चाणक्यांनी संजय राऊत यांना अलगद झेलबाद केलं. यासाठीची सगळी व्यवस्था स्वतः राऊत यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी करून दिली. त्यानंतर मात्र शरद पवारांनी आपला मोहरा कामी येतोय असं लक्षात येताच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मी राऊत यांच्या मुद्यावर पंतप्रधानांच्या भेटीत नाराजी व्यक्त केली असल्याचं बोलून दाखवलं. शरद पवार हे मोहरा कामी येतोय म्हणून नाराज झालेत की मोहरा आज कामी आल्यावर आपल्या कुटुंबातलं कोणी कामाला लागेल म्हणून नाराज झालेत हे येणार्‍या काही दिवसांमध्ये घडणार्‍या घटनांवरून स्पष्ट होईल. पवार ज्याला आपला मोहरा म्हणून मान्यता देत होते ते संजय राऊत मात्र भाजपमधल्या साडेतीन शहाण्यांची नावे सांगू शकले नाहीत किंवा मोहित कंबोज यांना तुरुंगात पाठवू शकले नाहीत. त्यांच्या डरकाळ्या या कागदी वाघाच्या डरकाळ्या ठरल्यात. त्याउलट अनिल देशमुख आणि पाठोपाठ नवाब मलिक यांना क्लीन बोर्ड करत भाजप हॅट्ट्रिकच्या वाटेवर आहे. रोज न चुकता बोलल्याने राऊतांनी पक्षात आणि पक्षाबाहेर अनेक शत्रू बनवलेत. संजय राऊत यांच्यासमोर ‘बंधू’पणाचा जप करणार्‍यांच्या पोटात नेमकं कोणतं वैर तुंबलेलं आहे याची सच्चाई राजकीय दिव्यदृष्टी असलेल्या संजय यांना कळलीच नाही हे गेल्या काही दिवसांतल्या घटनांवरून स्पष्ट झालेलं आहे.
जून 2014मध्ये पंतप्रधानांवर लिहिलेल्या एका खरपूस समाचार घेणार्‍या अग्रलेखानंतर मोदींनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे लेखी पत्राद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी 2022 रोजी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे स्वत:चं, शिवसेनेचं आणि कधी काळी असलेल्या हिंदुत्ववादी युतीचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचा लेखाजोखा राऊत नेमका कसा मांडतात आणि त्यासाठी त्यांना किती वेळ मिळू शकतो हे आताच सांगणं काहीसं कठीण आहे. आपण कधी चुकतंच नाही असं कुठल्याही ठाकरेंना नेहमी वाटत असतं. किंबहुना आपण केलेल्या चुका या ‘लोकमान्य’ होऊ शकतात. गेली 30 वर्षांहून अधिक काळ ठाकरे कुटुंबाशी सख्य असलेल्या राऊतांनाही याच गैरसमजानं भारून टाकलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाची आकाशवाणी करणार्‍या राऊतांना आसमान दाखवण्यासाठी गल्ली ते दिल्लीची भाजपा सज्ज झाली आहे. ‘झुकेंगा नही साला’ म्हणणारे राऊत यातून कसे निसटतात यावरच मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजकीय ग्रहतार्‍यांचा खेळ अवलंबून आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -