Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स बोईसर-तारापूर : आगीची औद्योगिक वसाहत

बोईसर-तारापूर : आगीची औद्योगिक वसाहत

देशातील प्रदूषणकारी औद्योगिक वसाहतीच्या यादीत बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहत आघाडीवर असल्याचे उजेडात आले आहे. इथे वारंवार स्फोट आणि आग लागण्याच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षी कारखान्यांमधून होणार्‍या प्रदूषणावर गंभीर ताशेरे ओढत केंद्रीय प्रदूषण विभागाने अनेक कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. तारापूर औद्योगिक क्षेत्रात 1400 हून अधिक कारखाने आहेत. त्यापैकी 501 कारखाने घातक रसायनांचे उत्पादन घेतात. यातील 35 हून अधिक कंपन्या अतिघातक विभागात मोडतात. पण, त्यानंतरही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय येथे होत असलेल्या अपघातांकडे तितक्या गंभीरपणे पाहत नसल्याने कामगारांच्या जीवावर बेतत आहे.

Related Story

- Advertisement -

देशातील प्रदूषणकारी औद्योगिक वसाहतींच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीत गेल्या दोन वर्षात कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि आगीत 21 कामगारांनी आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी 35 हून अधिक कंपन्या अतिघातक विभागात मोडत असून औद्योगिक वसाहत कामगारांसाठी सुरक्षित राहिलेली नाही. गेल्या महिन्यात तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 प्लॉटमध्ये तारा नाइट्रेट या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले होते. स्फोटाची तीव्रता इतकी भयावह होती की कंपनीमधील एक इमारतही कोसळली होती. तसेच आसपासच्या कंपन्यांनाही त्याचा फटका बसला होता. ही घटना घडून वीस दिवस उलटले असतानाच तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट क्रमांक टी-101, हर्षल केमिकल कंपनीत मोठी आग लागली होती. कंपनीत ज्वलनशील रसायनाचा मोठा साठा असल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन तास लागले होते. या आगीत एक कामगार जखमी झाला होता. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांनी औद्योगिक वसाहतीत होत असलेले स्फोट आणि लागत असलेल्या आगी चिंतेचा विषय बनला आहे. एकतर देशातील प्रदूषणकारी औद्योगिक वसाहतीच्या यादीत बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहत आघाडीवर असल्याचे उजेडात आले आहे. गेल्या वर्षी कारखान्यांमधून होणार्‍या प्रदूषणावर गंभीर ताशेरे ओढत केंद्रीय प्रदूषण विभागाने अनेक कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली होती.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात 1400 हून अधिक कारखाने आहेत. त्यापैकी 501 कारखाने घातक रसायनांचे उत्पादन घेतात. यातील 35 हून अधिक कंपन्या अतिघातक विभागात मोडतात. पण, त्यानंतरही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय येथे होत असलेल्या अपघातांकडे तितक्या गंभीरपणे पाहत नसल्याने कामगारांच्या जीवावर बेतत आहे. येथे अधिकतर कामगार कंत्राटी पद्धतीवर भरती केले जातात. त्यातही बहुतांश कंत्राटी कामगार महाराष्ट्राबाहेरील विशेषतः युपी आणि बिहार राज्यातील आहेत. कंत्राटात अनेक राजकीय आणि सरकारी अधिकार्‍यांची छुपी भागिदारी असल्याने कंत्राटदारांना याभागात कायदेशीर संरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकदा स्फोट आणि आगीत दगावलेल्या अथवा जखमी झालेल्या कामगारांची खरी संख्या लपवण्याचेही प्रकार घडताना दिसतात. अर्थात याला सर्वच सरकारी यंत्रणांचाही छुपा पाठिंबा असल्याचेही लपून राहिलेले नाही.

- Advertisement -

गेल्या काही वर्षात या ठिकाणी झालेल्या अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भयावह परिस्थितीचा अंदाज येतो. गेल्या सहा वर्षांत 582 अपघात झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत अपघातांची संख्या वाढली असून त्यात 21 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 70 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. 15 कामगारांना कायमचे अपंगत्व आले. 8 मार्च 2018- नोवा फेम स्पेशालिटी कंपनीमध्ये स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 13 कामगार जखमी झाले होेते. सप्टेंबर 2018 ला यूपीएलई या कंपनीला ब्रोमीन या रसायनांच्या गळतीमुळे झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू होऊन चार कामगार गंभीर जखमी झाले होते. 20 जानेवारी 2019 रोजी रामदेव केमिकल्स या कंपनीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. 27 जानेवारी 2019 ला साळवी केमिकल्समध्ये पेटते सॉल्व्हट अंगावर पडल्याने सात कामगार जखमी झाले होते. 14 मे 2019 ला आरती ड्रग्ज या कारखान्यांमध्ये झालेल्या वायूगळतीत 45 कामगारांना बाधा झाली होती. 12 ते 2019- स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन कारखाना व्यवस्थापकासह तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. 24 मे 2019 ला करीगो ऑरगॅनिक्स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट होऊन पाच किलोमीटपर्यंतचा परिसर हादरला होता. 30 ऑगस्ट 2019 ला औषधनिर्मिती करणार्‍या एसएनए हेल्थकेअर या कारखान्यात वायुगळती होऊन सुपरवायझर ठार झाला होता.

तर नवीन वर्षाच्या दुसर्‍या आठवड्यात 11 जानेवारी 2020 ला तारा नायट्रेड या रासायनिक कंपनीत स्फोट होऊन आठ कामगारांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की 25 किलोमीटरच्या परिसरात हादरा बसला होता. प्रारंभी भूकंप झाल्याच्या अफवेने भीतीही पसरली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात हर्बल केमिकल कंपनीत मोठी आग लागून एक कामगार जबर जखमी झाला.

- Advertisement -

औद्योगिक वसाहतीत गेल्या सहा वर्षांतील स्फोट आणि आगीची आकडेवारीही चिंताजनक आहे. 2015 साली 107, 2016 मध्ये 99, 2017 मध्ये 90, 2018 मध्ये 135, 2019 साली 144 तर जानेवारी 2020 मध्ये 7 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अनेक उद्योजक आपल्याकडे परवानगी असलेल्या उत्पादनाऐवजी अधिक नफा देणार्‍या उत्पादकांकडे वळतात. मात्र त्यामुळे रासायनिक प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्याने, या प्रक्रियेदरम्यान काही विपरीत घडल्यास, कच्च्या मालामध्ये वेगळ्या घातक रसायनांची भेसळ असल्यास अपघात होतात, असे प्रथमदर्शनी उजेडात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे बोईसर-तारापूर परिसरात 500 हून अधिक रासायनिक कारखाने असताना, याभागात स्फोट आणि आगीच्या घटना वारंवार घडत असताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय मात्र दूरवर वसईत कार्यरत आहे. औद्योगिक सुरक्षा, सुरक्षा नियमांची कठोरपणे अंमलबजावणी, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आदी बाबींकडे सरकारी यंत्रणांचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येते.

- Advertisement -