बॉलिवूड सेलिब्रेटींनी वेधले लक्ष

Bollywood Review 2021 most Memorable Moments
बॉलिवूड सेलिब्रेटींनी वेधले लक्ष

२०२१ हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी लकी ठरले. पहिल्या लॉकडाऊननंतर बंद झालेली सिनेसृष्टी पुन्हा एकदा नव्या जोशात उभी राहिली. दुसर्‍या लॉकडाऊनचा तसा फारसा फरक सिनेसृष्टीला पडला नाही. त्यामुळे या वर्षात बॉलिवूड सेलिब्रेटींचे विवाह सोहळे, घटस्फोट, अनेक चटका लावून जाणार्‍या सेलिब्रेटींची एक्झिट ते आयकर, ड्रग्स छापेमारी या सगळ्या गोष्टींसाठी २०२१ हे वर्ष बॉलिवूडमध्ये गाजले. अनेक सिनेमांनी थिएटर्समध्ये न जाता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हजेरी लावली. लॉकडाऊनमुळे लागलेल्या सवयीमुळे ओटीटीवर रिलीज झालेले अनेक सिनेमे तसेच वेब सीरिज यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नव्या धाडणीचे, नव्या विषयाचे, आशयाचे सिनेमे २०२१ मध्ये प्रेक्षकांना पाहता आले. २०२१ मधील हा बॉलिवूड आढावा…

सेलिब्रेटींच्या लग्नाचा धुमधडाका

२०२१ वर्षाची सुरुवात अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाने झाली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये लगीनसराई जोमाने सुरू झाली. एकापाठोपाठ अनेक सेलिब्रेटींनी लग्नगाठ बांधली. त्यातील काहींची लग्न अगदी मनापासून स्वीकारली गेली तर काहींची लग्न का होत आहेत, असाच प्रश्न उभा राहिला. विरुष्का, दिपवीरनंतर आलिशान पॅलेसमध्ये आणि फार गुप्त पद्धतीने कतरिना आणि विक्की कौशलचे राजस्थानमध्ये लग्न झाले. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. मीडिया तर त्यांच्या लग्नातील कपड्यांपासून हनीमूनपर्यंत जाऊन पोहोचली होती. मात्र, वर्षाचा शेवट विक्की-कतरिनाच्या लग्नाने गाजवला. तसेच २०२१ मध्ये राजकुमार राव-पत्रलेखा, यामी गौतमी-आदित्य धर या सेलिब्रेटींनीही लग्न उरकली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचे लग्नही यंदा खास ठरले. लग्नातील प्रत्येक विधींचा आनंद घेऊन लग्नात कल्ला करणारी अंकिता २०२१ ची कुलेस्ट नववधू ठरली.

डाम डौलात झालेल्या सेलिब्रेटींच्या लग्नात काही लग्नांनी खास लक्ष वेधले. त्यातील एक लग्न म्हणजे अभिनेते दिपक जोशी उर्फ जेठालाल यांची मुलगी नियती जोशी हिचे. भारतीय नववधूने लग्नात कसे दिसले पाहिजे किंवा कसे वागले पाहिजे हे सगळे रुढीवाद मोडत पांढर्‍या झालेल्या केसांनीच बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नियतीच्या चमकणार्‍या राखाडी पांढर्‍या केसांनी सर्वांचे लक्ष वेधले. तसेच लग्नाच्या सर्व विधी महिला भटजींकडून करवून घेऊन हिंदू विवाह विधींमध्ये असलेल्या पुरुष संस्कृतीली छेद देणारी अभिनेत्री, मॉडेल दिया मिर्झाही लोकांच्या लक्षात राहिली.

सेलिब्रेटींचे धक्कादायक घटस्फोट

एकीकडे सेलिब्रेटी नव्या आयुष्याला सुरुवात करत होते तर दुसरीकडे अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे नाते संपवले. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतला. बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी लग्न मोडले. सर्व घटस्फोटांमध्ये साऊथची प्रसिद्ध जोडी समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाने सर्वांना मोठा धक्का दिला. दाक्षिणात्यच नाही तर बॉलिवूड, हॉलिवूड सिनेसृष्टीत या जोडीला पसंती मिळाली होती. २०२१ मध्ये या सेलिब्रेटींसोबतच सुष्मिता सेन-रोहमन शॉल, किरण मेहता-निशा रावल, हनी सिंह-शालिनी सिंह या लिव्ह इनमधील कलाकारांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सेलिब्रेटींच्या मागे ईडी अन् एनसीबीची पिडा

अवैध पॉर्नोग्राफी निर्मितीच्या हाय प्रोफाइल प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर बॉलिवूड पुन्हा एकदा ढवळून निघाले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड २०२१ वर्षात पुन्हा एकदा ईडी आणि एनसीबीच्या रडारवर आली. कॉर्डेलिया ड्रग्स क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशींतर्गत अटक करण्यात आली. सरत्या वर्षात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला २०० कोटी रुपये वसुली प्रकरणात ईडीने समन्स बजावले. बॉलिवूड मुंबई पोलीस, ईडी, एनसीबीच्या रडारवर असताना अभिनेत्री कंगना मात्र तिच्या वादग्रस्त विधानांमुळे वर्षभर चर्चेत राहिली. देशाला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होते, या कंगनाच्या वक्तव्यांमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली. राज कुंद्रा, आर्यन खान, कंगना रणौत, जॅकलीन हे सेलिब्रेटी २०२१ या वर्षात सर्वात वादग्रस्त ठरले.

कलाकारांची अकाली एक्झिट

बॉलिवूडमध्ये अनेक घटना घडत असताना काही दिग्गज मंडळींनी या जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांच्या अकाली जाण्याने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. ट्रॅजेडी किंग ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या दु:खातून बॉलिवूड सावरत नाही तोवर अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा हार्ट अटॅकने झालेला मृत्यू ही २०२१ मधील सर्वात धक्कादायक घटना होती. पुढचे अनेक दिवस फक्त आणि फक्त सिद्धार्थ शुक्ला आणि त्याच्या जाण्याने कोलमडून गेलेल्या शेहनाज गीलचीच चर्चा मीडियामध्ये सुरू होती. अभिनेता पुनीत राजकुमार हा साऊथ सुरस्टार असला तरी त्याची एक्झिटही मनाला चटका लावणारी ठरली. सुरेखा सीकरी, राजीव कपूर, राज कौशल, ब्रम्हा मिश्रा, अनुपम श्याम अशा अनेक दिग्गज मंडळींनी २०२१ मध्ये जगाला अलविदा म्हटले.

बॉलिवडचे हे वर्ष अनेक तगडे सिनेमे, वेब सीरिज, कलाकारांची लग्न, ईडी, एनसीबीच्या चौकशांमध्ये गेले. मात्र, वर्षाच्या शेवटच्या दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये शिरकाव केला. बॉलिवूडकरांच्या रंगलेल्या पार्ट्या त्यांना भोवल्या. अभिनेत्री करिना कपूरला कोरोना झाला. उपचाराअंती करिना आता बरीही झाली आहे. मात्र, यानिमित्ताने बॉलिवूडला पुन्हा एकदा कोरोनाचे संकट खुणावू लागले आहे.