घरफिचर्सबॉलीवूडचा लोकेशन पॅटर्न !

बॉलीवूडचा लोकेशन पॅटर्न !

Subscribe

सिनेमा बनवताना लोकेशन ही गोष्ट दुय्यम असते हे खरं आहे. दिग्दर्शक, कथा, अभिनेता, अभिनेत्री आणि मग लोकेशन असा क्रम असला तरी लोकेशनला महत्व आहे. सिनेमा हे दृश्य माध्यम असल्याने इथे व्हिज्युअल्सना महत्व आहे, इथे डोळ्यांना चांगलं दिसेल, लोकांना आवडेल अशाच ठिकाणी शूटिंग केलं तर त्याला प्रतिसाद मिळतो. विचार करा एखादा रोमँटिक सिन रस्त्याच्या कडेला शूट होतोय, बाजूला ट्रॅफिक आहे, गाड्यांचा आवाज, धूर आहे, असा सिन तुम्हाला बघायला आवडेल का? नायक कुणीही असो, दिग्दर्शक कितीही मोठा असो, पण अशा दृश्यांच्या वेळी लोकेशन महत्वाची असते. रोमँटिक सिन स्वित्झर्लंडच्या सुंदर पर्वतातच चांगला वाटतो. म्हणून भारत असो किंवा कुठलीही फिल्म इंडस्ट्री तिथे लोकेशन्स महत्वाच्या ठरतात.

आपल्याला जे खर्‍या आयुष्यात करता येत नाही ते सिनेमात पाहून आपण आपली इच्छा पूर्ण करत असतो. व्यवस्था बदलून टाकणं, एका हिरोने शंभरांना लोळवणं, आपलं प्रेम आयफेल टॉवरच्या खाली उभं राहून व्यक्त करणं, अशी अनेक स्वप्नं तो पडद्यावर पाहूनच पूर्ण करत असतो. भारतात हिंदी सिनेमांची प्रेक्षकांना हीच देण आहे, की त्यांची स्वप्नं ते पडद्यावर दाखवत आलेत. अँग्री यंग मॅन असो कि रोमँटिक हिरो यांचा वापर करून भारतीय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट निर्मात्यांना नेहमीच यश आलंय. सिनेमा आपल्याला का आवडतो ? कथा, नायक, संगीत, दिग्दर्शन या सार्‍या बाबी आहेतच, पण अजून एक गोष्ट आहे, ज्यासाठी सिनेमा पाहिला जातो ती म्हणजे सिनेमा शूट झालेली लोकेशन, आपल्या डोळ्यांना जे चांगलं वाटतं, ज्या गोष्टी दैनंदिन जीवनात आपल्याला पाहायला मिळत नाही अशाच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.

मोबाईल आणि इंटरनेटमुळे आता क्षणात सगळं काही पाहायला मिळतं, एका क्लिकवर स्वित्झर्लंड, अमेरिका यांसारखे देश आणि त्यांचे फोटोज, व्हिडीओज उपलब्ध होतात. पण 20 वर्षांपूर्वी असं काही नव्हतं, त्या काळात परदेशवारी केवळ अशा सिनेमांद्वारेच घडायची जे बाहेरील देशात चित्रित केले जायचे. त्या सिनेमांचं वेगळं आकर्षण प्रेक्षकांना असायचं, जे साहजिक होतं. हनिमूनला महाबळेश्वरला जाणार्‍या लोकांना जर स्वित्झर्लंड पाहायला मिळत असेल तर त्यांच्या मनात त्याबद्दल आकर्षण नक्कीच असणार. एकंदरीत काय तर प्रेक्षकांना विदेशातील लोकेशन्स आवडतात म्हणून तिथं जाऊन सिनेमांचं चित्रीकरण करण्याचा ट्रेंड आपल्याकडे सुरू झाला होता, जो आजतागायत चालूच आहे.

- Advertisement -

सिनेमा बनवताना लोकेशन ही गोष्ट दुय्यम असते हे खरं आहे. दिग्दर्शक, कथा, अभिनेता, अभिनेत्री आणि मग लोकेशन असा क्रम असला तरी लोकेशनला महत्व आहे. सिनेमा हे दृश्य माध्यम असल्याने इथे व्हिज्युअल्सना महत्व आहे, इथे डोळ्यांना चांगलं दिसेल, लोकांना आवडेल अशाच ठिकाणी शूटिंग केलं तर त्याला प्रतिसाद मिळतो. विचार करा एखादा रोमँटिक सिन रस्त्याच्या कडेला शूट होतोय, बाजूला ट्रॅफिक आहे, गाड्यांचा आवाज, धूर आहे, असा सिन तुम्हाला बघायला आवडेल का? नायक कुणीही असो, दिग्दर्शक कितीही मोठा असो, पण अशा दृश्यांच्या वेळी लोकेशन महत्वाची असते. रोमँटिक सिन स्वित्झर्लंडच्या सुंदर पर्वतातच चांगला वाटतो. म्हणून भारत असो किंवा कुठलीही फिल्म इंडस्ट्री तिथे लोकेशन्स महत्वाच्या ठरतात.

विदेशातील दृश्य किंवा तिथे शूट झालेली एखाद दोन गाणी सिनेमात असतील तर सिनेमा प्रसिद्धच होतो, असा समज काही काळ बॉलिवूडमध्ये होता. म्हणून एकेकाळी प्रत्येक दुसर्‍या सिनेमात बाहेरील देशात केलेले शूटिंग असायचं, याबाबतीत जेवढी क्रेझ प्रेक्षकांना असायची तेवढीच सिनेमात काम करणार्‍या स्टार्सला देखील होती. अक्षय कुमारनेदेखील एका मुलाखतीत हे मान्य केलं होतं की, तो एकेकाळी फक्त बाहेर शूटिंग असलेल्या सिनेमांना होकार द्यायचा. पण विदेशात शूटिंग करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली होती ? 1964 साली राज कपूरचा संगम सिनेमा हा स्वित्झर्लंडमध्ये शूट करण्यात आला होता, त्यानंतर आजपर्यंत अनेक सिनेमांचं शूटिंग बाहेर झालंय आणि होतंय. पण विदेशातील शूटिंग वगळता बहुतांश हिंदी सिनेमे कुठे शूट होतात ? मुंबई, दिल्ली ही शहरं वगळता भारतात कुठल्याही शहरात मोठ्या प्रमाणात सिनेमांचं शूटिंग होत नाही.

- Advertisement -

गेल्या काहीकाळात हिंदी सिनेमा मुंबई, दिल्ली यांसारख्या मेट्रो सिटीजकडून उर्वरित भारताकडे वळला आहे. अनेक सिनेमांच्या कथा या मुंबई किंवा दिल्ली पेक्षा मेरठ, लखनौ, वाराणसी यांसारख्या छोट्या शहरात घडताना पाहायला मिळतात. असं अचानक घडतंय का ? याआधी छोट्या शहरात सिनेमांचं शूटिंग इतक्या प्रमाणात का होत नव्हतं ? अचानक छोट्या शहरांवर निर्मात्यांच प्रेम जडलंय का ? असे अनेक प्रश्न आहेत. काहीवेळा असाही सूर येतो की, छोट्या शहरात शूटिंगसाठी लागणारा खर्च कमी असतो, शूटिंग लवकर संपविता येते म्हणून अशा ठिकाणी सिनेमे शूट केले जातात. कदाचित हे एक कारण असू शकत, पण मग या आधीही तो खर्च कमीच असताना, इथे सिनेमांचं चित्रीकरण का केलं जात नसावं ? यामागे एक कारण आहे. बॉलिवूडमध्ये एक प्रकार यशस्वी झाला की, तोच पॅटर्न बनतो हे सत्य आहे. बायोपिक यशस्वी झाले की, त्याची रांग लागलेली आपण पाहिली आहे. अगदी असाच एक पॅटर्न सध्या हिट झालाय. छोट्या शहरातील साधे विषय हाताळून सिनेमा बनवणे, अशाप्रकारातील सिनेमांना गेल्या 5/7 वर्षात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हेच कारण आहे की, चित्रपट निर्मात्यांनी आपला मोर्चा छोट्या शहरांकडे वळविला आहे. याआधीही सिनेमांचं शूटिंग गावांमध्ये व्हायचं पण छोटी शहरं आणि गावं यात फरक आहे. पूर्वी सिनेमांचं शूटिंग क्वचितच एखाद्या गावामध्ये व्हायचं, पण आता हे प्रमाण वाढले आहे.

आयुष्मान खुराणा हे नाव गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीत चलनी नाणं ठरतंय. कमी बजेटमध्ये छोट्या शहरातील आपल्याला साधे वाटणारे पण वेगळे विषय हाताळून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. आयुष्यमान खुराणाच्या सिनेमातील विषय ग्रामीण भारतातील नसतात, ते विषय छोट्या शहरातील असतात, म्हणून त्याचा बहुतांश प्रेक्षक वर्ग हा छोट्या शहरातील असतो. ही छोटी शहरी मुख्यत्वे करून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशमधील अलिगढ, आग्रा, बरेली, झांसी, कानपुर, लखनौ, मेरठ, मिर्झापूर, वाराणसी यांसारख्या जिल्ह्यात गेल्या काळात बर्‍याच सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे.

फक्त आयुष्मानच्या सिनेमांची यादी काढली तर लगेच ही बाब लक्षात येईल, दम लगाके हैशा – हरिद्वार ऋषिकेश, बरेली की बर्फी- बरेली, आर्टिकल 15- बदायू, ड्रीम गर्ल- मथुरा, बाला-कानपुर, गुलाबो सीताबो-लखनौ या सगळ्या फिल्म्स छोट्या शहरात शूट झालेल्या असूनही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाच्या यशात कथा, दिग्दर्शक आणि अभिनेत्याचा मोलाचा वाटा असतो, हे मान्य पण जिथे सिनेमा शूट होतो त्या स्थळाला महत्व प्राप्त होते हे सत्य आहे.गावात एकदा सिनेमा शूट झाला की, लोक त्या गावाकडे गर्दी करतात. ते गाव पर्यटनस्थळ बनतं. सिनेमाच्या माध्यमातून त्या शहराचं वैभव, संस्कृती या सगळ्या गोष्टी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतात. अगदी गुलाबो सीताबो सिनेमाबाबत विचार केला तर लखनौमधील जुने वाडे आणि नवाबांचं ते जुनं शहर सगळं डोळ्यात सामावून घ्यावं असं आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘चमन बहार’ सिनेमा तर छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात शूट झालाय. सिनेमातून त्या गावाचं रूप पाहायला मिळालं. या व्यतिरिक्त टॉयलेट एक प्रेम कथा, सुईधागा, बद्रीनाथ की, दुल्हनिया, मसान, जॉली एल एल बी 2 या आणि अशा अनेक हिट फिल्म्स छोट्या शहरात शूट झालेल्या आहेत.

गुलाबो सीताबो सिनेमात दाखविण्यात आलेला फातिमा महल, मसानमधील तो घाट, गँग्स ऑफ वासेपूरमध्ये दाखवलेलं गाव अशा अनेक लोकेशन्स आपल्याला कायम स्मरणात राहतात. जिथे कथा संपते तिथे याच लोकेशन्स आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, मसानच्या शेवटी स्वच्छ झालेला तो घाट नव्या सुरुवातीचं प्रतीक बनतो. कथेला साजेसं लोकेशन मिळालं नाही तर सिनेमा प्रभाव पाडूच शकत नाही आणि केवळ लोकेशन चांगलं असेल बाकी काहीच नसेल तरीही सिनेमा प्रभाव पडू शकत नाही. उदाहरणार्थ 2 महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर अतिशय टुकार सिनेमा मिसेस सिरीयल किलर प्रदर्शित झाला होता, उत्तराखंडमधील नैनिताल या अतिशय सुंदर शहरात हा सिनेमा चित्रित करण्यात आला होता. नयनरम्य निसर्ग, पाणी, महाल सगळं काही सिनेमात होतं, नव्हती ती चांगली कथा आणि उत्तम दिग्दर्शन त्यामुळे हा सिनेमा सपशेल आपटला.

अनेक मसालापटांमध्ये दाखविण्यात आलेल्या लोकेशन्स या बनावट वाटत असल्यानं त्यांच्याशी आणि कथेशी आपण कनेक्ट होऊ शकत नाही. स्टुडण्ट ऑफ द इयर मधलं कॉलेज, टोटल धमालमधील ते शहर या सगळ्या लोकेशन आपल्याला बनावट वाटतात, या उलट 3 इडियट किंवा छीचोरेमध्ये दाखविण्यात आलेले कॉलेज आणि हॉस्टेल आपल्याला कनेक्ट होतात. इंग्लिश मिडीयम सिनेमात राजस्थानातील स्थानिक मिठाईवाल्यांची भांडणं कुठंही बनावट वाटतं नाहीत किंवा बालामधील आयुष्मानच्या घरच्यांचे उपाय नॉर्मल भासतात. कारण आपण आपल्या भोवताली हे सगळं अनुभवत असतो. जे आपण अनुभवतो तेच पडद्यावर पाहायला मिळालं तर आपल्याला ते अधिक जवळचे वाटते.

सिनेमा कुठे शूट होतो? यापेक्षा सिनेमात काय आहे ? हा प्रश्न अधिक महत्वाचा असतो आणि असायला हवा, पण तरीही जिथे सिनेमा शूट होतो त्या ठिकाणांना एक विशेष महत्व आहे. गेल्या काही काळात छोट्या शहरांकडे वळलेली हिंदी सिनेसृष्टी पाहिली तर असं वाटतं की, आता सिनेमा भारतभर पोहोचतो आहे. त्यास हरकतदेखील नाही. पण एकच पॅटर्न वारंवार चालविला तर लोक त्याला कंटाळतात हे सत्य आहे. कधी नाही पाहिलेलं लखनौ एक दोनदा मी सिनेमात पाहू शकतो. पण दरवेळी 200 रुपयांचं तिकीट काढून जर मला असंच लखनौ किंवा मेरठ पाहावं लागत असेल तर मी तरी तसे सिनेमे पाहणार नाही. लॉकडाऊननंतर बजेट वाचविण्याच्या चक्करमध्ये असे प्रयोग वाढण्याची शक्यता आहे, वेगळा विषय हाताळला तर कदाचित लोकं प्रतिसाद देतील, अन्यथा जागांच्या नावाखाली चालणार्‍या सिनेमांना, प्रेक्षक त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -