बोन्सायची झाडं

दिवाकर कांबळी, बियन चव्हाण, विजय चिंदरकर आणि विवेक राजापुरे. कोण होते हे? ... ही नावं आहेत त्या साहित्यिकांची ज्यांनी दर्जेदार लेखन करूनदेखील त्यांची क्वचितच कोणी दखल घेतली असेल. साहित्य संमेलन, निरनिराळ्या साहित्यिक संस्था याचं नक्की प्रयोजन काय? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. साहित्य संमेलनात त्याच त्याच कवी, लेखक, समीक्षक यांची रेलचेल बघता साहित्य संमेलन नक्की कोणासाठी हा प्रश्न नक्कीच पडतो किंवा ज्या साहित्यिक संस्था वर्षानुवर्षे कार्य करत आहेत त्यादेखील या साहित्यिकांना वेशीबाहेर का ठेवतात, हे कळत नाही.

मागच्या आठवड्यात कॉलेजमध्ये शिकत असतानाचा मित्र अभिनेता संदीप जुवाटकर भेटला. त्याचा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार होता म्हणून वेळ ठरवून आम्ही ठाण्याला भेटलो. कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघेही क्रिकेटर व्हायचं स्वप्न घेऊन वावरत होतो. तेव्हा कसोटी, रणजी सामने बघायला कुठेकुठे जात होतो. आयुष्याच्या एका टप्प्यावर क्रिकेटला रामराम ठोकून संदीप अभिनयाच्या क्षेत्रात घुसला आणि मी प्राध्यापकी करू लागलो, कधीमधी पांढर्‍यावर काळी अक्षरं उजळवू लागलो. पण भेटलो की, क्रिकेटवरच्या गप्पा रंगतात. गप्पांच्या ओघात संदीप म्हणाला, वैभव, शंतनू सुगवेकरला टेस्ट क्रिकेट खेळायला मिळायला हवं होतं रे. त्यावर मी ठीक आहे रे, कोणाच्या नशिबाचा भाग असतो. चांगला दर्जा असला तरी काहीवेळा नशीब साथ देत नाही रे.

संदीप जे म्हणत होता त्यात खूप सत्यांश होता. मलादेखील मनापासून वाटत होतं की, शंतनू सुगवेकर या महाराष्ट्राच्या रणजीपटूला खरच कसोटी खेळायची संधी मिळायला हवी होती. त्याची फलंदाजीतली नजाकत, त्याचा दर्जा, त्याचं टेंपरामेंट या गोष्टी नक्कीच वरच्या श्रेणीतल्या होत्या. त्याच्यापेक्षा कमी दर्जा असलेल्या अनेकांना ती संधी मिळाली होती. आज ट्वेंटी ट्वेंटी, आयपीएलच्या गदारोळात त्याचं नावदेखील झाकोळल जाईल.

आपल्या आजूबाजूला अनेक असे प्रसंग घडत असतात. तेव्हा वाटतं अनेक व्यक्तींना गुणवत्ता असतानादेखील संधी मिळत नसते किंवा त्यांना मुद्दामहून डावललं जातं. त्यांची गुणवत्ता लोकांसमोर येऊ नये याची पुरेपूर काळजी प्रस्थापितांकडून घेतली जाते. नोकरी-धंद्यात हा अनुभव नेहमीच येत असतो. संदीपला त्याच्या घरी सोडलं आणि मी माझ्या घरी येण्यासाठी बस पकडली आणि संदीपने डोक्यात भुंगा सोडून गेल्यावर त्याविचाराने मी अनेक क्षेत्रातल्या दर्जेदार व्यक्तींचा विचार करू लागलो आणि विचार करता करता अनेक नावं डोळ्यासमोर येऊ लागली. दिवाकर कांबळी, बियन चव्हाण, विजय चिंदरकर आणि विवेक राजापुरे. कोण होते हे ? … ही नाव आहेत त्या साहित्यिकांची ज्यांनी दर्जेदार लेखन करूनदेखील त्यांची क्वचितच कोणी दखल घेतली असेल. साहित्य संमेलन, निरनिराळ्या साहित्यिक संस्था याचं नक्की प्रयोजन काय? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. साहित्य संमेलनात त्याच त्याच कवी, लेखक, समीक्षक यांची रेलचेल बघता साहित्य संमेलन नक्की कोणासाठी हा प्रश्न नक्कीच पडतो किंवा ज्या साहित्यिक संस्था वर्षानुवर्षे कार्य करत आहेत त्यादेखील या साहित्यिकांना वेशीबाहेर का ठेवतात? किंवा त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यात का यशस्वी होत नाहीत?

प्रस्थापित साहित्यिकांना देखील या साहित्यिकांनी पुढे येऊ नये असे वाटत असेल का? चाकोरीबाहेरचं लेखन करून असे किती साहित्यिक लोकप्रिय झाले आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या कसदार साहित्य लिहिणार्‍या लेखकांनी आपली लेखणी चालवली ही स्वतःची वेगळी शैली हाताळत. वर उल्लेख केलेल्यांपैकी विजय चिंदरकर आणि विवेक राजापुरे अल्पायुषी ठरले. १९५८ साली मालवण येथे कवी अनिल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनानंतर विजय चिंदरकर हे नाव थोडे नावारूपाला येत असतानाच वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी विजेचा धक्का लागून चिंदरकर गेले. पुढे त्यांचे मित्र आ. ना. पेडणेकर यांनी चिंदरकर यांच्या निवडक तीस कविता एकत्र करून ‘सूर्य फुटेना शितीजाला’ हा छोटेखनी काव्यसंग्रह प्रकाशित केला. नियती, निसर्ग, जन्म-मृत्यूच्या फेर्‍याची रूपके घेऊन चिंदरकर यांची कविता विशेष फुलली होती. माणसाच्या अंतर्मनाशी साद घालणारी…

काजळलेल्या ढगाढगांनी
निळ्या नभाला झाकाळावे
पुनवेच्या आभाळाला
आठवण ग्रहणाची

अशी ही कविता. परंतु या लक्षवेधी ठरलेल्या कवीची ओळख जुन्या पिढीला नाही. या कवीच्या कवितेवर कोणते चर्चासत्र नाही की, त्याच्या नावाने कोणता पुरस्कार नाही. ही या कवीच्या कवितेची उपेक्षाच नव्हे का? मध्यंतरी अजय कांडरने आवनओलच्या माध्यमातून व्यासपीठावरून बोलताना या कवीची आठवण काढली तेव्हा कोकणातल्या साहित्यिकांना या कवीचा शोध लागला हे आमचं दुर्दैव नव्हे का ?

तीच तर्‍हा विवेक राजापुरे यांची. विद्रोही म्हणता येईल अशी कविता राजापुरेंनी लिहूनही समृद्ध होण्याच्या वाटेवर असतानाच वयाच्या अवघ्या तिशीत रेल्वे अपघातात राजापुरेंचा मृत्यू झाला. राजापुरे यांनी नवीन लेखक अनुदान योजनेत आपल्या कविता संग्रहाचे हस्तलिखित पाठवले; पण त्यातील अकरा कविता वगळून कवितासंग्रह प्रकाशित करण्याची अट घालण्यात आली. याचा अर्थ कवीचा आवाज बंद करण्याचाच हा प्रकार होता. त्याचा विचार दाबण्याचा हा प्रयत्न होता. राजापुरे यांनी मिळालेले अनुदान नाकारले आणि त्यानंतर त्यांचा ‘सामोरा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांची कविता महानगरीय बकाल संस्कृतीचे प्रदर्शन मांडते उदा.

कविंनो, सुतारकाम शिका
वा ब्लू फिल्ममधले नग्न व्हा अवयव
सातासमुद्राकडे वहाणारे
कल्पनाशक्तीचे तल्लख वारे
तुम्ही व्हा पाठमोरे

अशा वेगळ्या शैलीत आपली कविता नागर समाजावर शस्त्र धरते. राजापुरे यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या कथा एकत्र करून त्याचा कथासंग्रह निघाला. अस्तिव आणि रिअलीझमच्या पलीकडे पाहणारी राजापुरे यांची कविता लोकांपर्यंत पोचलीच नाही. वेगवेगळ्या प्रकारे सादरीकरणात अडकलेली कविता अजूनही चंद्र, तारे, आकाश यांच्यातून बाहेर पडत नाही हेच मोठं आव्हान असू शकतं. मराठी साहित्यातला कंपूबाजपणा नेहमीच चांगलं साहित्य वेशीबाहेर कसं ठेवता येईल यात यशस्वी झालेला आहे. साहित्य संमेलन झालं की, पुस्तकविक्रीचे मोठेमोठे आकडे ऐकायला मिळतात, ते आकडे कुठली ‘सूत्र’ मिळवतात हा प्रश्न नेहमीच पडतो. पण त्या संमेलनातून किती नवीन आणि अनवाणी साहित्यिकांना व्यासपीठ मिळत?, झाडाच्या नव्या कोवळ्या फांद्या छाटल्या तर त्या झाडाची वाढ जशी खुंटून ठेवली जाते त्याप्रकारे साहित्यव्यवहार चालतोय.

समीक्षा हा तर वेगळाच मुद्दा आहे. एखादी साहित्यकृती अमुकअमुक समीक्षकांनी गाजवली नाही तर व्यर्थच. त्यामुळे कोणाला गाजवायचं आणि कोणाला पाडायचं याची जबाबदारी तर अनेक समीक्षकांनी आपल्या शिरावर आधीपासूनच घेतली आहे. कित्येकांनी तर ती साहित्यकृती वाचायचीदेखील तसदी घेतलेली नसते. मराठी साहित्यव्यवहार किती कोता आहे याची कल्पना तर करवत नाही जेव्हा या साहित्यिकांचं साहित्य आपण वाचायला घेतो आणि मग कळतं अरे हा साहित्यिक आपल्या नजरेतून सुटला कसा. कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ‘गिरणगाव नाका’ ही कादंबरी वाचायला मिळाली. कादंबरी विलक्षण होती. म्हणजे मानवीनात्याची प्रचंड गुंतागुंत.

विषय तर खूप जड म्हणजे मराठी साहित्यात असे विषय क्वचितच! ज्या पुरुषाला मानसपुत्र मानलं. त्याच्याकडून शरीरसुख घेऊन पुन्हा सर्व मालमत्ता त्याच्या नावावर करणारी स्त्री या पुस्तकात मांडली गेली होती. कादंबरी एकदा वाचून कळली नव्हती म्हणून दुसर्‍यांदा वाचली. आता कादंबरी कळत होती, पण लेखक भाव खाऊन गेला. लेखकाचं नाव- दिवाकर कांबळी. ‘गिरणगाव नाका’, ‘डोकेफुट’ आणि ‘परळ ६८’ या कादंबर्‍यांचे लेखक. मराठीत अतिशय महत्त्वाचे लेखन करणारे हे लेखक दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात वारले, हे तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीतून कळलं. दिवाकर कांबळी नावाचा लेखक दहिसर येथे मुंबईच्या उपनगरात राहतो याची कल्पना सिंधुदुर्गातल्या लोकांना होती; पण मुंबईतल्या साहित्यिकांना याची गंधवार्ता पण नव्हती.

२०१४ च्या मे महिन्यात माझी ‘कोकणीमाती’ वाचून दिवाकर कांबळींनी फोन केला होता. तेव्हा त्यांच्या तिन्ही कादंबर्‍या मी वाचल्या आहेत हे त्यांना सांगितल्यावर त्यांना आनंद झाला होता. एवढा मोठा लेखक आपल्याला फोन करतो, याचा आनंद मलादेखील झाला होता. कांबळी गेले तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीची रिप रिप ( R.I.P) देखील नव्हती. साहित्यिक संस्थांना याची माहिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कोकणातून मुंबईत आलेल्या लोकांना कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, त्यांना आपलं बस्तान बसवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याचं विस्तृत वर्णन त्यांनी आपल्या कादंबर्‍यांतून केलं आहे. त्यांच्या कादंबर्‍यांवर एखादं चर्चासत्र घडवून आणावं असं कोणाच्या मनात का येत नाही? , त्यांच्या कादंबरीवर अभ्यास करून एखादा निबंध लिहावा असं कोणत्याही समीक्षकाला वाटू नये ही कसली लक्षणं? याचा अर्थ आम्ही प्रस्थापित साहित्यिकांना तेवढे मोठेपणा देऊन मोकळे होतो.

जी अवस्था कांबळींची तीच अवस्था बियन चव्हाण यांची. कांबळी हे शिरोड्याचे तर बियन चव्हाण वेंगुर्ल्याचे. चव्हाण एकदा वसईत भेटलेले. ‘बडा फास्ट’ आणि ‘यातनाचक्र’ सारख्या मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या जीवनशैलीवर लिहिलेल्या या कादंबर्‍या जवळपास जयवंत दळवींच्या ‘चक्र’ आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘माहीमच्या खाडी’च्या तोडीच्या. कांबळी आणि चव्हाण दोघांची शैली विलास सारं, चंद्रकांत खोत आणि भाऊ पाध्ये यांच्यासारखी तरी दोघेही प्रसिद्धीपासून लांब. तरी त्यांच्यावर कोणी लिहू नये हा केवढा दैवदुर्विलास! कांबळी, चव्हाण, चिंदरकर किंवा राजापुरे हे प्रसिद्ध किंवा उपेक्षित रहातात, यामागे नियतीला दोष देऊन आपण मोकळे होऊ शकत नाही. हे सर्व उपेक्षित राहतात त्यामागे साहित्यिक वर्तुळातील कोतेपणा तेवढाच कारणीभूत आहे. पुरस्कार, प्रसिद्धी याच्यामागची लॉबी किंवा त्यासाठी लावली जाणारी वशिलेबाजी हे काही लोकांपासून लपून राहत नाही, पण यामुळे दुर्लक्षित साहित्यिक प्रकाशात येत नाहीत असं नाही. त्यांचं साहित्य, त्यांची कला लोकांपर्यंत पोचत नाही हा आपला करंटेपणा आहे.

गावागावातून भजनपरंपरा जपणारे कित्येक भजनी बुवा किंवा त्यांना साथ करणारे कित्येक बिना नावारूपाला आलेले तबलजी असोत, जगाच्या पाठीवर विलक्षण कला सादर करणारे दशावतारी कलावंत असोत, कठपुतली, पांगुळगाड्याचे खेळे करणारे कलाकार, चित्रकलेच्या कोणत्याही तत्सम डिग्रीशिवाय देखील असाधारण चित्रकला पेश करणारे आमचे नामानंद मोडक किंवा भिंतीवर केवळ फराटे मारून गणपतीत भिंत रंगवणारे परब मास्तर यांची नोंद कोणी घेतली असेल? तरी कलाकारांची कला ही अबाधित राहतेच की! कधीतरी यांना पांढर्‍या कागदावर स्थान मिळायला हवे ना? आम्ही आमचे हात एवढे आखडून ठेवले आहेत की मनात असूनदेखील आम्ही यांना जवळ घेऊ शकत नाही. झाडांच्या कोवळ्या फांद्या आम्ही छाटायच्या आणि झाड वाढत नाही म्हणून आम्हीच बोंब मारायची हेच या सर्व प्रकारातून दिसून येते. या मोठ्या वटवृक्ष होणार्‍या झाडांना आम्हीच तर बोन्साय केलं आहे.