Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सगे सारे... कागदावर उतरलेली सगी माणसं

सगे सारे… कागदावर उतरलेली सगी माणसं

माणसं पुस्तकांपेक्षा कमी नसतात. त्यांना वाचता येतात, लिहता येतात. त्यांना समजून घेता येतं. मग माणसांचं हे पुस्तक अनेकविध विचारांची पानं बनून जातं. यात गझल असते, नज्म असते. आवाज असतो. विचार असतो, अनुभव असतो, इतिहास असतो आणि कलेचे विविधरंगही असतात. हीच माणसं समाज, राजकारण, चळवळ असतात. अशा अनेकविध रंगातल्या माणसांना वाचण्याचं काम गुलजार यांनी सगे सारे मधून केलं आहे. या माणसांना वाचून त्यांना कागदावर शब्दांतून उतरवताना गुलजार यांच्या कवितेचं वैशिष्ठ्य असलेली तरल संवेदशीलता सगे सारे च्या हिरव्या पानापानावर एखाद्या धुक्यासारखी हळूवार उतरली आहे.

Related Story

- Advertisement -

यातल्या कविता या कवीचं स्वगत नाही. काही माणसांना त्यांनी पाहिलेलं आहे. काहींशी संवाद साधलाय, तर काही माणसं जगण्याच्या कुठल्याश्या प्रवासात भेटलीत. तर काही मित्रत्वाच्या अधिकारातले आहेत तर काही माणसं फक्त वर्तमानपत्रांच्या बातम्या, कॉलममधूनंच भेटलेली आहेत. अशा माणसांच्या जगण्यातून आपलंही जीवन समृद्ध झाल्याचं गुलजार यांनी नमूद केलं आहे. माणसांशी जोडलेली ही जाणीव कुठल्याही नातेसंबंधांची मोहताज नसते. ही जाणीव हेच या नात्याला स्वतंत्र पण मजबूत बांधण्याचं काम करते. ही वाचलेली माणसं म्हणजेच सगे सारे…हे प्रचलित अर्थाने सगे नाहीत. पण मनाशी जोडलेले सगे आहेत…हेच गुलजार नमूद करतात.

खूप माणसं भेटली या प्रवासात
काही माझी, आपली-काही शेजारपाजारची
अज्ञात आहेत, अनोळखी आहेत
परंतु…
सारे सगे, सग्यांसारखे वाटतात

- Advertisement -

पुस्तकाच्या सुरुवातीलाच गुलजारजी हे सगेपण कबूल करतात. कला, कविता, चित्रपट, साहित्य अशा अनेकरंगी जगात ५ दशकांहून अधिक काळ मुशाफिरी करणार्‍या गुलजार यांची ही सगी माणसं वाचणं महत्वाचं यासाठी ठरतं. गुलजार यांच्या लेखणीतून ही माणसंही वाचता येतात. त्यामुळे ही इतर माणसंही आणि गुलजार यांच्यातली वेगळी अशी सीमारेषा राहात नाही. यातल्या काही कवितेतून हा अनुभव येतोच. ही सगी होता होता त्या एकात्म मानवपणात सामावली जातात.
पुस्तकाची पहिली कविता गुलजार यांची सेल्फ पोट्रेट म्हणून समोर येते. हा आरसा असतो, स्वतःच्या छबीच्या त्यामुळे इथं स्वतःशी खोटं बोलून किंवा शब्दच्छल करून चालणार नसतं. इथं स्वतःतलं मोठेपण गुंडाळून ठेवावं लागतं. अगदी कवीपणही. मग माणूस म्हणून मागे उरतं ते एक कोडं…जगणं रोजंच बदलून जातं. त्यामुळे हे कोडं कसं उलगडणार? असा सहज प्रश्न या ऑस्कर, फिल्मफेअर विजेत्या आणि हिंदी, उर्दू कवीला पडतो. हे माणूसपणंच या माणसांशी आपल्याला जोडून ठेवतंय. त्यामुळे दिग्दर्शक आणि नावजलेल्या कवीपणाच्या आड त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रश्न येतंच नाही. तसा प्रयत्नही गुलजार यांच्याकडून केला जात नाही.

बिरजू महाराज या कवितेत ते म्हणतात
तुम्ही पाहिलं होतं का?
काळाला आकाशातून उतरताना
पायात घुंगरू होते त्याच्या

- Advertisement -

हा काळ जगण्याचा नाद घेऊन येतो, त्यामुळेच त्याचा पायात घुंगरू असतात. बिरजू महाराज आणि त्यांची कला हा एक आनंददायी काळच असतो…हा काळ हा नाद संपणारा नसतो. हेच गुलजार सुचवतात.

ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्यावर लिहलेल्या कवितेत

एक अदाकार आहे मी…असं ते म्हणतात.
जगावी लागतात कैक आयुष्य एकाच हयातीत मला

ही हतबलता नाही. हा अनुभव आहे. त्या पात्रांचा जी माझ्यात असतात. जी पडद्यावर मी साकारतो. पण ज्यावेळी ही पात्रा माझ्यातून निघून जातात तेव्हा त्यांच्या खुणा अमिटपणे माझ्या मनावर उमटून गेलेल्या असतात. ही पात्र आपल्या खुणा माझ्यात सोडून जातात. नसिरुद्धीन शाह यांनी समांतर आणि एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते म्हणून जे योगदान दिलेलं आहे. त्याचा विचार करता या संवेदनशील अभिनेत्याने ही पात्र मनाने जगली होती हेच स्पष्ट होतं. पण ही पात्र त्यातली माणसं शहा यांच्या मनाच्या तळाशी ठाण मांडून बसलेली आहेत. त्यात चांगली आणि वाईटही आहेत. पण ती माणसं आहेत. म्हणूनंच कलाकार माणसं हीच एखाद्या नाटकाचा प्रयोग बनत जातात. त्यांच्यातल्या मनांतल्या मंचावर अनेकविध कलाकार एकाच वेळेस असतात. हळूहळू या माणसांमुळे ती समृद्ध होत जातात आणि त्यांचीच एक स्वतंत्र रंगभूमी तयार होते. अरुण शेवतेंवरील कवितेत गुलजार म्हणतात.

तुझ्या सोबत अरुण, नेहमीच मी भटकलो आहे
गर्दीनं ओसंडलेल्या शहरांमध्ये जाऊन,

माणसं म्हणजे गर्दी समुह आणि मनं म्हणजे गर्दी या शहरांत माणसांची गर्दी आहे. कारण तिथं मनं चालतात, बोलतात, हालतात, पोटापाण्यासाठी रोजचा संघर्ष करतात. गुलजार यांना माणसांचं हे माणूस असणं महत्वाचं वाटतं. ही माणसं त्यांना झाडांसारखी सावली देणारी जिवंत वाटतात. त्यांच्या सुख दुःखांची मुळं शोधण्याचा प्रयत्न गुलजारजी या कवितेतून करतात.
मुन्शी प्रेमचंद यांच्याविषयी लिहताना गुलजार तक्रार नोंदवतात.

प्रेमचंदचा सहवास तर चांगला वाटतो
पण त्याच्या सहवासात यातना खूप आहेत

प्रेमचंद यांच्या लेखणीतून उघड्या पडलेल्या यातना संवेदनशील गुलजार यांना नाकारता येत नाहीत. कफन, निर्मला किंवा गोदान वाचलेल्यांना प्रेमचंद यांच्या या यातना ओळखीच्या असतात. त्यातून गुलजार यांचीही सुटका झालेली नाही. त्यामुळेच त्यांचा सहवास जरी त्यांना हवाहवासा वाटतो पण या यातनांचं काय करू ज्या मला तुझ्याकडून मिळाल्या आहेत. तुझ्याच असल्यामुळे मला त्या टाकताही येत नाहीत. अशी हतबलता कवी गुलजार व्यक्त करून जातात.

नामदेव ढसाळ हा पारदर्शक माणूस होता. जसा आहे जसा होता. तस्साच आतून बाहेरून वाचला, लिहला जाणारा. त्यांना मानवी कवितेतल्या आक्रंदनाचा अंगार म्हटलं गेलं. ज्यावेळी नामदेव ढसाळांचा मृत्यू झाला त्यावेळी त्याला निरोप देण्यासाठी गेलेल्या गुलजार यांनी

अभी तो चिता गर्म है….बहुत देर लगेगी इसे ठंडी होने में

या शब्दांतून त्यांनी या आपल्या सगे कवी मित्राला शब्दांजली वाहिली होती. हे ढसाळच्या कवितेतली ही तक्रार आणि त्यातला अंगार थंड होणारा नाही. जोपर्यंत निर्भेळ मानवतावादाची स्थापना इथल्या मातीत आणि मनांत होत नाही. तोपर्यंत हा अंगार गार पडणारा नाही. हे त्यांनी सुचवलं होतं. सगे सारे मध्ये गुलजार नामदेव ढसाळांविषयी लिहतात

जागोजागी ईश्वर भेटलेत खूप…
खांद्यावर हात ठेवून जेव्हा दाबायचे
तेव्हा हाडं दुखायची

हीच वेदना ढसाळांच्या कवितेचीही होती. म्हणूनंच तर ढसाळांनी मी तुझ्या देवाला, व्यवस्थेला शिव्या देतो…म्हटलं…इथं ढसाळ आणि गुलजार हे खर्‍या अर्थानं एकाच वेदनेने बांधलेले सगे होते. हे स्पष्ट होतं. दोघांची भाषाशैली जरी वेगळी असली तरी वेदनेची अनुभूती सारखीच होती. सगे सारे मध्ये अशाच पद्धतीने बिमल रॉय, आशा भोसले, ओम पुरी, कुसुमाग्रज, कलबुर्गी अशा अनेकविध माणसांवर कविता लिहल्या आहेत. या सर्वच माणसांना पुस्तक समजून गुलजार यांच्या मनाच्या तळाशी असलेल्या एखाद्या मेज वरून निरव हळूवार चांदण्याच्या तरल प्रकाशात बसून वाचणं हा आनंदाचा अनुभव आहे. किशोर मेढे यांनी गुलजार यांच्या मनांतून पाझरणारे हे शब्दरुपी माणसांच्या अनुभवाचे अत्तर तोच सुवास, गंध कायम ठेवून मराठीच्या कुपीत हळुवारपणे भरला आहे.

सगे सारे – गुलजार
अनुवाद-किशोर मेढे , ऋतुरंग प्रकाशन

- Advertisement -