वनस्पती वैज्ञानिक पंचानन माहेश्वरी

१९४९ पासून त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतिविज्ञान विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम केले. १९५९ मध्ये अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. माहेश्वरी यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान व गर्भविज्ञान या विषयांत मोठा शिष्यवर्ग आणि संशोधनाची एक परंपरा निर्माण केली

पंचानन माहेश्वरी यांचा आज स्मृतिदिन. पंचानन माहेश्वरी हे भारतीय वनस्पती वैज्ञानिक होते. त्यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान व गर्भविज्ञान यांसंबंधी विशेष महत्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९०४ रोजी जयपूर येथे झाला. जयपूर येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण अलाहाबाद येथील एविंग ख्रिश्चन कॉलेजात व अलाहाबाद विद्यापीठात झाले. त्यांनी १९२७ मध्ये एम.एस्सी. व १९३१ मध्ये डी.एस्सी. या पदव्या संपादन केल्या. १९२८-३० मध्ये त्यांनी एविंग ख्रिश्चन कॉलेजात वनस्पतिविज्ञानाचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी आग्रा येथील महाविद्यालयात प्रथम अध्यापक आणि पुढे सहयोगी प्राध्यापक (१९३०-३७), अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक (१९३७-३९), डाक्का विद्यापीठात प्रथम अध्यापक व नंतर जीवविज्ञान विभागाचे प्रमुख (१९३९-४९) म्हणून काम केले.

१९४९ पासून त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतिविज्ञान विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम केले. १९५९ मध्ये अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. माहेश्वरी यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान व गर्भविज्ञान या विषयांत मोठा शिष्यवर्ग आणि संशोधनाची एक परंपरा निर्माण केली. १९५७ पासून त्यांनी प्रायोगिक गर्भविज्ञानातील संशोधनास प्रारंभ केला आणि त्यांच्या शिष्यांनी व सहकार्‍यांनी ते कार्य पुढे चालू ठेवले. दिल्ली विद्यापीठातील वनस्पतिविज्ञानाची प्रयोगशाळा त्यांनी प्रगत राष्ट्रांतील अद्ययावत प्रयोगशाळांशी तुलना करता येईल इतकी समृद्ध केली. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, कॅनडा, ब्रिटन, नेदर्लंडस, जर्मनी, इंडोनेशिया इ.अनेक देशांतील वनस्पतिवैज्ञानिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या व तेथील संशोधनाचा अभ्यास केला.

त्यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ त्यांना अनेक सन्मान मिळाले. इंडियन बोटॅनिकल सोसायटीचे बिरबल सहानी पारितोषिक (१९५८), मॅक्गिल विद्यापीठाची (माँट्रिऑल, कॅनडा) डी.एस्सी (१९५९), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे सुंदरलाल होरा सुवर्णपदक (१९६३) वगैरे बहुमान त्यांना मिळाले. अशा या थोर वैज्ञानिकाचे १८ मे १९६६ रोजी निधन झाले.