घरफिचर्स...तर कोरोनापेक्षाही कॅन्सर धोकादायक !

…तर कोरोनापेक्षाही कॅन्सर धोकादायक !

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळाने केवळ डॉक्टरच नव्हे तर रुग्णांनाही उपचारांच्या एका वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागतंय. कॅन्सर हॉस्पिटल्सबाबत ही बाब अधिक प्रकर्षाने दिसून येतेय. कारण, कर्करोगग्रस्तांना संसर्गाची शक्यता अधिक असते. त्यांना रुग्णालयात प्रवेश केल्यापासून ते प्रत्यक्ष उपचारापर्यंत प्रत्येक स्तरावर जोखीम असते. कर्करोगाच्या निदानाला विलंब झाला तर तो कोरोनापेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

सध्याची ही स्थिती गेल्या दशकभरात दोन वेळा झालेल्या व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्राला तडाखा देणार्‍या बदलांसारखी आहे. म्हणजे 2008, 2013 या कालावधीत केवळ भारतच नव्हे तर जगभरातील उद्योग-व्यवसायांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागला होता. या परिस्थितीला केवळ एक विषाणू कारण ठरेल, असं गेल्यावर्षी सांगितलं असतं तर कुणाचा विश्वासच बसला नसता. मात्र, आता प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षेत्र या परिस्थितीला कमी-अधिक प्रमाणात सामोरं जातोय. ज्या वैद्यकीय क्षेत्रावर करोनामुक्तीची जबाबदारी आहे, ते क्षेत्रदेखील यातून सुटलेलं नाही. सद्य:स्थितीत कोरोनाचा संसर्ग एवढा झपाट्याने वाढतोय की, इतर आजारांवरील उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांसह हॉस्पिटल्सनेदेखील अनेक बदल केले आहेत. लक्षणे नसलेला व्यक्तीदेखील करोनाचा वाहक असू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊनच रुग्णालये आता प्रत्येक व्यक्तीवर तितक्याच काळजीपूर्वक उपचार करत आहेत. सुरक्षेचा भाग म्हणून रुग्णांचे मित्र किंवा कुटुंबियांना रुग्णांजवळ थांबू दिले जात नाही. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल आणि करोनाबाधिताकडून संसर्गाची शक्यता आपोआपच राहणार नाही.

सद्य:स्थितीत रुग्णालयांकडून सुरक्षेच्या सर्वच उपाययोजनाचं पालन केलं जातंय. विशेषतः येणार्‍या प्रत्येकाचं प्रवेशद्वारावरच तापमान तपासणं हा आता नियमित भाग झालाय. शरीरातील ऑक्सिजनची कमतरता हेदेखील कोविडचं एक लक्षण असतं. त्यामुळे आमच्या रुग्णालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या तपासणीसाठी प्रवेशद्वारावर पल्स ऑक्सिमीटरही वापरलं जातंय. अतिरिक्त दक्षता म्हणून आम्ही ही तपासणी सुरू केलीय. त्यामुळे कर्मचारी आणि रुग्णही कोरोना संसर्गापासून मुक्त राहतील. बहुतांश रुग्णालयांनी तेथील कर्मचारी आणि रुग्णांनाही पीपीई किट वापरणं बंधनकारक केलंय. प्रतीक्षा कक्ष, डॉक्टरांची केबिन, तपासणी कक्ष यातील अतिरिक्त स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणालाही सुरुवात झालीय. कोरोना संसर्गाची जोखीम टाळण्यासाठी रुग्ण प्रत्यक्ष येण्याची गरज नसेल तर त्याला टेलिफोनद्वारेच मार्गदर्शन केलं जातंय.

- Advertisement -

कोविड-19 परिणाम

कोणत्याही आजाराच्या रुग्णांमध्ये कमी अधिक प्रमाणात ताण आणि नैराश्य दिसतं. त्यातच कॅन्सरचं निदान म्हटलं की, आधीच व्यक्ती तणावाखाली असते. आता करोनामुळे निर्माण झालेली स्थिती आणि लागू असलेल्या बंधनांमुळे त्यात वाढच झालीय. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला पाहण्यासाठी त्याच्या आप्तस्वकियांनी येणं, हे नवं नाही. पण आता हेदेखील बंद झालंय. अगदी डॉक्टर्स आणि परिचारिकांनाही रुग्णांपासून सुरक्षित अंतर ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. या परिस्थितीमुळे रुग्ण अधिक एकाकी पडत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊन आणि प्रवासावरील बंधनांनी ही परिस्थिती आणखी बिकट बनलीय. कारण, मित्र आणि कुटुंबियांच्या भेटीमुळे मिळणारा धीर, मानसिक आधार बंद झालाय. कर्करोगग्रस्तांना अशा काळात मानसिक आरोग्य कायम राखण्यासाठी स्वकियांचा आधार खूप गरजेचा असतो. ही उणीव भरुन काढण्यासाठी रुग्णांनी रुग्णालयातील कर्करोग समुपदेशन तज्ज्ञांशी चर्चा करावी, असं मला वाटतं. मानसिक, सामाजिक, वर्तणूक आणि कर्करोग अशा चारही क्षेत्रांचा या तज्ज्ञांचा अभ्यास असतो. कोविडने या तज्ज्ञांचं महत्त्व अधोरेखित केलंय.

- Advertisement -

रुग्णांच्या सक्षमतेची गरज

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भावनिक आघात आणि मानसिक त्रासाला कसं सामोरं जावं, याचं तंत्र रुग्णांना शिकवलं जातं. एवढंच नव्हे तर जे काळजीवाहू असतात त्यांनाही रुग्णांच्या भावनिक गरजांना कसं सामोरं जावं, याविषयी समुपदेशन केलं जातं. कदाचित आवाहनानंतरही सुमारे 10 टक्के रुग्ण कर्करोग समुपदेशक तज्ज्ञांशी बोलण्याचा पर्याय निवडतात. मात्र, काही रुग्णालयांमध्ये हा भाग नियमित बनलाय आणि त्याचा खूप विधायक परिणामही दिसतोय. कोरोनाच्या काळात मी स्वतः कर्करोग अनुषंगाने मानसिक-सामाजिक घटक विषयावर अभ्यास पूर्ण केला. तब्बल 700 कर्करोग रुग्ण, काळजीवाहू आणि रुग्णालय कर्मचार्‍यांच्या निरीक्षणातून तावून सुलाखून निघालेला हा शोधनिबंध लवकरच प्रसिद्ध होईल. समुपदेशन किती गरजेचं आहे, हे लक्षात येऊन रुग्णालयांना या अभ्यासामुळे त्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

कर्करोगग्रस्तांवर कोविडचा परिणाम
कोरोना संसर्गाचा धोका आणि रुग्णालयांमध्ये जाण्यासाठीची धास्ती यामुळे वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेण्यात रुग्णांकडून विलंब होताना दिसतोय. त्यामुळेच कर्करोगग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांना सांगावसं वाटतं की विलंबाने होणारं कर्करोग निदान हे करोनापेक्षा अधिक धोकादायक असतं. कारण, निदान जेवढं लवकर होईल तितकं आजारावर मात करण्याची संधी अधिक असते.

-डॉ. राज नगरकर (लेखक प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ तथा एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एम.डी. आहेत.)

-शब्दांकन : प्रशांत सूर्यवंशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -