घरफिचर्ससेलिब्रेशन करा, पण जपून!

सेलिब्रेशन करा, पण जपून!

Subscribe

पुढील ६ दिवस हे साजरे करण्याचे असतात. २५ डिसेंबर, ख्रिसमसनंतर लागलीच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. समाजातील प्रत्येक वयोगटाला साहजिकच हे सर्व दिवस उत्साहात साजरे करण्याची इच्छा असते. त्याकरता सर्वच जण तयारी करतात. आता समाज पुढारलेला आहे. कालपर्यंत तरुण मुले, नोकरदार पुुरुष मंडळी हेच ख्रिसमस आणि न्यु इयरच्या सेलिब्रेशनचे आयोजन करत होते. मात्र आता अगदी शाळा-महाविद्यालयांतील मुले-मुली आणि निवृत्त झालेली ज्येष्ठ मंडळी यांच्यासह नोकरदार महिला, गृहिणी आणि बचत गट चालवणारे महिला मंडळ तसेच किटी पार्टीतील वुमन ग्रूप इत्यादी सर्वच जण मोठ्या प्रमाणात हे दिवस साजरे करत असतात. अशा प्रकारे समाजातील सर्वच घटकाला या दिवसांची प्रतीक्षा असते. संपूर्ण वर्ष जीवनाचा गाडा पुढे हाकत असताना जेवढी दमछाक झालेली असते. त्यातून थोडी उसंत घेत सरत्या वर्षातील क्षीण मागे टाकत नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी यानिमित्ताने थोडेसे मनोरंजन केले जाते. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वत्र यासाठी तयारी सुरू असते. अगदी गावकुसातील चावडीपासून ते शहरांतील स्पोर्ट्स क्लब, चाळी, इमारती आदी सर्वत्र छोट्या मोठ्या पार्ट्या, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने मोठमोठ्या हॉटेलांमध्येही सेलिब्रेशन पार्ट्यांचे आयोजन केले जाते. समुद्र चौपाट्यांपासून ते डोंगरदर्‍यांपर्यंत सर्वत्र जाऊन हे सेलिब्रेशन करणारी मंडळी काही कमी नाहीत. ही सर्व भलीमोठी प्रस्तावना करण्यामागे कारणही तसेच आहे.

ख्रिसमस ते थर्टी फर्स्ट हे ६ दिवस समाजात किती मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, त्यात कोणकोणते घटक सहभागी असतात, याचा प्रत्यय यावा, म्हणून केलेला हा प्रयत्न आहे. मात्र या सर्व उत्सवी समाजघटकांना त्यांच्या आनंदावर कोणतेही विरजन पडू न देता आम्हाला त्यांना काही सूचना करावयाच्या आहेत. सेलिब्रेशन म्हणजे मद्यपान हे समीकरण बनले आहे. म्हणून त्याचा अतिरेक करू नका. खरेतर मद्यपान हे निषिद्धच असले पाहिजे. याआधीही अनेक सर्वेक्षणामध्ये शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणी पहिल्यांदा मद्याचा अनुभव हे याच दिवसांमध्ये घेतात, त्यानंतर त्यांना त्याचे व्यसन जडते, पुढे त्याचा त्यांच्या जीवनावर कसा कसा परिणाम होत जात असतो, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे शाळा-महाविद्यालयांमधील मुलांनी मद्याच्या आहारी न जाता, सेलिब्रेशन हे व्यसनाशिवाय करण्याकडे स्वत:लाच सक्ती करावी. कारण समाजात अशा तरुणांना मद्यासोबत अमली पदार्थांचे व्यसन लावण्यासाठी बरेच समाजकंटक कार्यरत आहेत आणि ते याच दिवसांचा फायदा घेत अधिकाधिक तरुणाईला अमली पदार्थांच्या आहारी ढकलून देतात. म्हणून पालकवर्गानेही सतर्क राहून या दिवसांत आपली मुले सेलिब्रेशन कशा पद्धतीने करणार आहेत, याकडे लक्ष देऊन ते जाणून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

दुसरे अशा प्रकारचे सेलिब्रेशन करण्यासाठी गडकिल्ल्यांकडे जाणे टाळावे. हल्ली तरुण-तरुणींचा ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट यांचे सेलिब्रेशन हे गडकिल्ल्यांवर जाऊन करण्याचा कल असतो. त्याठिकाणी बहुतेक जण रात्रभर डिजे लावून अश्लील गाण्यांवर नाचणे, मद्यपान करणे, अश्लील चाळे करणे असे प्रकार करतात, यातून या ठिकाणाचे पावित्र्य नष्ट होतेच, त्याचबरोबर अशा पुरातन वास्तूंचे नुकसानही होते. म्हणून याठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे. हल्ली सेलिब्रेशन म्हटले की, अनेक जण समुद्रकिनारी किंवा धरणांच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. ख्रिसमस असो की थर्टी फर्स्ट हे दोन्ही सेलिब्रेशन हे मध्यरात्री होत असते. अशा वेळी उत्साहाच्या भरात अनेक जण खोल समुद्रात किंवा धरणात उतरतात आणि बुडून मरतात. उत्सवाचा रंगाचा बेरंग होऊ नये, म्हणून या अशा ठिकाणी सेलिब्रेशनचे आयोजन करू नका. यंदा राज्य सरकारने या दिवसांमध्ये रात्रभर बार आणि दारू विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे साहजिक यंदा मद्यपींची संख्या अधिक असणार आहे. अशा मद्यपींनी रात्री वाहने चालवणे टाळावे.

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट या रात्री मद्यपान करून वाहने चालवली जात असल्याने मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होत असतात. त्यातून जीवितहानी होते. त्यामुळे सेलिब्रेशन हे कुणाच्या जीवनाचा अंत होण्यास कारणीभूत ठरू नये, याकरता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्याचे युग स्त्री-पुरुष समानतेचे समजले जाते, त्यामुळे तरुणी आणि महिला यांना अमुक एक करू नका, असे म्हणणे म्हणजे बुरसटलेले, स्त्री स्वातंत्र्यविरोधी म्हणून शिक्का मारला जातो, असा कोणताही पूर्वग्रह निमार्र्ण होऊ नये, म्हणून इथे प्रामाणिकपणे सूचना करत आहोत. मागील काही वर्षांपासून याच दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तरुणी या बेसुमार मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे दिसून आले आहे. रात्रभर मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तरुणींनी स्वत:च याचा गांभीर्याने विचार करून आत्मपरीक्षण करावे आणि अशा प्रकारे सेलिबे्रेशन आपल्या आयुष्याचे नुकसान करणारे ठरणार असेल, तर त्यांनी वेळीच सावधगिरी बाळगून या प्रकारच्या पार्ट्यांच्या आयोजनापासून दूर राहणे पसंत करावे. एकूणच काय तर पुढील सहा दिवस साजरे करत असताना आनंदाचा बेरंग होऊ देऊ नका. पोलीस, आर.टी.ओ. विभागाकडून वाहन चालविण्याबद्दल असलेल्या महत्त्वाच्या म्हणजे ‘डोन्ट ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ या सूचनेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपला जीव जसा अनमोल आहे तसाच तो इतरांचाही आहे. आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

सेलिब्रेशनच्या वेळी अथांग सागर व सागर किनारा पाहून अनेकजण भारावून जातात. सागर किनारी, बीचवर लावण्यात आलेल्या सुचनांचे पालन करा व आपला आनंद द्विगुणीत करा. वाहन असो की फटाके आनंदाच्या भरात याचा आवाज किती मोठा होतो हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. प्रदूषणाचा कळस होतो. इतरांना त्याचा त्रास होतो. हे त्यावेळी समजत देखील नाही. तेव्हा ख्रिसमस, थर्टी फर्स्ट साजरा करताना अगदी आपल्याकडून हे टाळले गेले तर त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात इतरांना होऊ शकतो हे लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी वावरताना कसे वागावे, कसे चालावे, बोलावे याबाबत स्वत:ची अशी आचारसंहिता असणे गरजेचे आहे. जल्लोष करत असताना स्वत:सोबत इतरांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या. आनंददायी सोहळ्यास अनुचित प्रकाराच्या निमित्ताने गालबोट लागणार नाही हे पहावे. थोडक्यात काय, तर सेलिब्रेशन करा, पण जपून!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -