Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स दुर्लक्षित आदिवासी नेतृत्वाचे चरित्र

दुर्लक्षित आदिवासी नेतृत्वाचे चरित्र

लाल श्याम शाह यांच्याविषयी अभिजन समुहांना आणि सर्वसामान्यांना फारशी माहिती असणार नाही. लाल श्याम शाह यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे, याविषयी महाराष्ट्र, मध्य प्रदेश अथवा छत्तीसगढ सरकारला कल्पना असेल असेही नाही. ‘लाल श्याम शाह - एका आदिवासीची जीवनकथा’ या चरित्रासाठी लेखक सुदीप ठाकूर यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी केवळ एक अपरिचित व्यक्तिमत्व या पुस्तकातून मांडले नाही तर समकालीन भारताचा इतिहास या चरित्राच्या निमित्ताने कथन केला.

Related Story

- Advertisement -

लाल श्याम शाह नावाचे एक आदिवासी नेते होऊन गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात जमीनदार ही त्यांची प्रमुख ओळख होती. लोक त्यांना आदराने महाराज म्हणून संबोधत असत. स्वातंत्र्योत्तर काळातील तीन दशके त्यांनी आदिवासी समुहाच्या विकासासाठी समर्पित गांधीवादी राजकारण केले. विविध आदिवासी आंदोलनांचे नेतृत्व केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु ते इंदिरा गांधी अशा अनेकांकडे आदिवासींच्या प्रश्नाबद्दल मांडणी केली आणि त्यांचा सतत पाठपुरावा केला. छत्तीसगड आणि विदर्भाच्या सीमेवर त्यांनी चार पाच दशके संघर्ष तेवत ठेवला. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला नाही, सतत विरोधी बाकावर असतानाही काही प्रश्न धसास लावण्यात ते यशस्वीही झाले.

लाल श्याम शाह यांच्याविषयी अभिजन समुहांना आणि सर्वसामान्यांना फारशी माहिती असणार नाही. लाल श्याम शाह यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, याविषयी महाराष्ट्र, मध्य प्रदेश अथवा छत्तीसगढ सरकारला कल्पना असेल असेही नाही. दिल्ली मुंबई व्यतिरिक्तच्या खबरा सामान्यांपर्यंत अभावानेच पोहचतात. कोलकाता अथवा चेन्नईत आज काय घडत आहे? हेही जेव्हा आपल्याला माहिती असत नाही. भुवनेश्वर, गंगटोक, कोहीमा, एर्नाकुलम, आयझॉलमध्ये या आठवड्यात कोणत्या हालचाली झाल्या याबद्दल आमच्या ‘सबसे तेज’ दूरचित्रवाणी वाहिन्या एकही शब्द बोलत नसतात तेव्हा जंगलाच्या आत मुंबईपासून हजार किलोमीटर दूरवर एका आदिवासी नेत्याने काय पायपीट केली याबद्दल कुणी बोलेल अशी जरासुद्धा शक्यता नाही.

- Advertisement -

लाल श्याम शाह हे भारतीय राजकारणातील त्या निवडक राजकीय नेतृत्वांपैकी एक होते, ज्यांनी मानवी मूल्यांचे संवर्धन करत आपला राजकीय प्रवास केला. आमदार आणि खासदारकीच्या खुर्चीविषयी कधीच मोह बाळगला नाही. देशातील सत्ताधीश जे बोलतात तसे वागत नाहीत, त्यांना आदिवासींविषयी स्वारस्य नाही, त्यांच्या प्रश्नाविषयी आस्था नाही हे लक्षात येताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 1952 आणि 1956 साली त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, निमित्त होते आदिवासीवासी प्रश्न आणि 1963 साली त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला, तोसुद्धा आदिवासी समुदायासाठीच.

‘लाल श्याम शाह – एका आदिवासीची जीवनकथा’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे, कारण काळोखाच्या जगात ते वाचकाला घेऊन जाते. हे पुस्तक आपल्याला एका अशा भारताचे दर्शन घडवते जो भारत जंगलाबाहेर वास्तव्य करणार्‍यांना अपरिचित आहे. हे पुस्तक आपल्याला भारतीय राजकर्त्यांचा कुरुप चेहरा दाखवते. राजकारणामागच्या राजकारणाचा परिचय करवून देते. खुर्चीसाठी हपापलेल्यांच्या गदारोळात मूल्याधिष्ठित राजकारण करणार्‍यांचे अंधारात ढकलले जाणेही अधोरेखित करते. हे पुस्तक आपल्याला सांगते की स्वातंत्र्यापूर्वी राजकुमारी आणि महाराणी म्हणून जगलेल्या एका आदिवासी कन्येचा, जी कन्या आमदार आणि खासदाराची पत्नीसुद्धा होती, जेव्हा मृत्यू झाला, त्यांच्या निधनाची पुसटशी चार ओळींची बातमी वृत्तपत्रात छापून आली नाही.

- Advertisement -

‘लाल श्याम शाह’ या चरित्रासाठी लेखक सुदीप ठाकूर यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी केवळ एक अपरिचित व्यक्तिमत्व या पुस्तकातून मांडले नाही तर समकालीन भारताचा इतिहास या चरित्राच्या निमित्ताने कथन केला. परिघावरच्या माणसांचा जीवघेणा संघर्ष, त्याचे लढे हे देशाच्या व्यापक पटलावर दिसत नसतील कदाचित पण त्यांना दुर्लक्षून देशाच्या प्रगतीचा विचार अशक्य असतो हे या पुस्तकाने ठळकपणे मांडले आहे. चंद्रकांत भोंजाळ यांनी सहज, प्रवाही भाषेत हे पुस्तक मराठीत अनुवादिले आहे. खरेतर भोंजाळ हे मराठीतील अत्यंत महत्त्वाचे अनुवादक आहेत. ‘साधने’त प्रकाशित झालेला रामचंद्र गुहा यांचा लेख वाचून ते स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी ‘लाल श्याम शाह’ यांचे हे चरित्र मराठीत घेऊन येण्याचा निर्णय घेतला. साधना प्रकाशनाने हे पुस्तक योग्य दिवशी मराठीत प्रकाशित करून लाल श्याम शाह यांच्याप्रति कृतज्ञताच व्यक्त केली आहे.

हे पुस्तक एकट्या लाल श्याम शाह यांचे जीवनचरित्र नाही. सांगता येणार नाही इतक्या जमिनीचे मालक असणारे लाल श्याम शाह महाराज यांनी गांधीविचाराने जी पाऊले उचलली त्यांचे जंगलवाटांवरील पाऊल ठसे या पुस्तकात पहाता येतात. शाह यांनी आदिवासींसाठी सुरू केलेले ‘सचित्र आदिम जातिसेवक’ हे नियतकालिक असेल अथवा छोट्या छोट्या शेतकर्‍यांसाठी केलेला त्याग असेल काळाच्या पार्श्वभूमीवर तो अत्यंत मोठा होता. लाल श्याम शाह हे त्या नेतृत्वापैकी होते ज्यांनी 1945 साली आदिवासींसाठी स्वतंत्र गोंडवाना राज्याची मागणी केली होती. छत्तीसगढच्या अस्तित्वाने ही मागणी काही प्रमाणात प्रत्यक्षात आली. तथापि गोंडवाना राज्याचा विस्तार आणि नकाशा हा आजच्या छत्तीसगढपेक्षा निराळा होता. त्यात महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांचाही समावेश असणार होता. बांग्लादेशी निर्वासितांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि त्याचा ‘दंडकारण्या’वर पडलेला ताण हा सर्वप्रथम लाल श्याम शाह यांनीच मांडला. ‘मालिक मकबुजा’ कायद्यातील पळवाटांकडेही त्यांनीच लक्ष वेधले. नव्या मध्य प्रदेश राज्याच्या स्थापनेमुळे साठच्या दशकात शेतकर्‍यांच्या तांदूळ विक्रीवर आलेले निर्बंध आणि त्यामुळे त्यांची झालेली होरपळ सिंहासनापर्यंत पोहचवली ती शाह यांनीच.

मोठ्या जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध पहिला आदिवासी संघर्ष उभा करण्यातही शाह यांचा वाटा होता. जल, जंगल आणि जमीन या आदिवासींच्या तीन मूलभूत हक्कांविषयी लाल श्याम शाह हे सतत बोलत राहिले. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी रायपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते, या अधिवेशनावर घनदाट जंगलातील तीस हजार आदिवासींचा मोर्चा शाह घेऊन गेले. खुद्द पंतप्रधान नेहरु या मोर्चाला सामोरे गेले होते आणि त्यांनी आदिवासींना आश्वस्त केले होते. नक्षलवाद्यांचा मार्ग चुकीचा आहे हे सुरुवातीच्याच काळात त्यांना ठणकावून सांगणारे आणि बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला सहाय्य करणारे लाल श्याम शाहही या पुस्तकात भेटतात. त्यांची ही भेट हृद्य आहे.

या चरित्राचे लेखक सुदीप ठाकूर हे पत्रकार आहेत. तीन दशके ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. चरित्र वाचत असताना त्यांची पत्रकारितेतील नजर सतत जाणवत राहते. त्यामुळे छोट्या मोठ्या आठ प्रकरणांमध्ये लिहिलेले लाल श्याम शाह यांचे चरित्र रंजक, वेधक आणि वाचनीय झाले आहे. ज्यांना आदिवासी जीवनाविषयी आस्था आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंड जाणून घ्यायचा आहे आणि ज्यांना जमिनीवरची लढाई कशी असते हे समजून घ्यायचे आहे त्यांनी ‘लाल श्याम शाह’ हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

(लाल श्याम शाह- एका आदिवासीची जीवनकथा / सुदीप ठाकूर, अनुवाद – चंद्रकांत भोंजाळ/ साधना प्रकाशन, पुणे/ पहिली आवृत्ती जून 2019/ पृष्ट्ये 136, किंमत 150 रुपये)

प्रा. विद्या सुर्वे बोरसे

- Advertisement -