घरफिचर्सस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज

Subscribe

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांच्या गादीवर आलेले हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरुष. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. त्यांना तीन वडीलबहिणी होत्या. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूप रामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोड्यावर बसणे, शस्त्रविद्या, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले. संभाजीराजांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाईबरोबर झाला (१६६५).

तिचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाईपासून कन्या भवानीबाई आणि पुत्र शिवाजी ही दोन अपत्ये संभाजीराजांना झाली. चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले. दुर्गाबाई ही आणखी एक पत्नी असल्याचा उल्लेख उत्तरकालीन कागदपत्रांत येतो. मे १६६६ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्यास गेले होते. वयाच्या नवव्या वर्षीच ते मोगली मनसबदार बनले. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांसह बाहेर पडले, पण वाटेत त्यांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवले होते. पुढे ते २० नोव्हेंबर १६६६ रोजी राजगडास पोहोचले. संभाजीराजे मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी १६६७ च्या उत्तरार्धात औरंगाबादला गेले व परतले (५ नोव्हेंबर १६६७). त्यांना १६७१-७४ दरम्यान राज्यकारभाराचा अनुभव यावा, म्हणून महाराजांनी महादजी यमाजी हा वाकेनिवीस दिला. १६७२ पासून त्यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला.

- Advertisement -

रायगडावर स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजीराजांचा बहुतेक काळ शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यातच गेला. त्यांची एकूण कारकीर्द नऊ वर्षांची. त्या सबंध काळात सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, वाडीकर सावंत, दळवी यांच्याशी त्यांना मुकाबला करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांनी अष्टप्रधानांद्वारे राज्यव्यवस्था चालू ठेवली. मात्र, कवी कलशाची त्यांनी छंदोगामात्य या नवीन पदावर नियुक्ती केली. वतनाचे निवाडे, किल्ल्यांची निगराणी तसेच जमिनीचे महसूल पूर्वापार पद्धतीने चालत होते, तेच त्यांनी पुढे चालू ठेवले. आयात-निर्यात कर तसेच खंडणी व चौथाईची वसुली व्यवस्थितपणे झालेली दिसते. १६८६-८७ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी पुनर्वसनासाठी कौलनामे दिले.

व्यापार्‍यांना सवलती देऊन महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न केला. सैनिकी व्यवस्थेत घोडदळ, पायदळ, तोफखाना तसेच समुद्रावरील शत्रूशी लढण्यासाठी कार्यक्षम नौदल निर्माण केले. छत्रपती संभाजी महाराजांकडे धैर्य, शौर्य आणि धडाडी हे सेनापतीला आवश्यक सर्व गुण होते. काही लढायांतील त्यांचे नेतृत्व विलक्षण चापल्याचे आणि प्रशंसनीय आहे. छत्रपती संभाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण पुढे चालू ठेवून अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका (मोईन) पूर्ववत करून दिल्या. अशा या महान पराक्रमी योद्ध्याचे ११ मार्च १६८९ रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -