घरफिचर्सचिखलदरा विदर्भातील नंदनवन!!

चिखलदरा विदर्भातील नंदनवन!!

Subscribe

सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. चिखलदर्‍यापासून जवळच मेळघाट आहे. मेळघाट परिसर हा ‘व्याघ्रप्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. त्यामुळे चिखलदर्‍याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीण तर मुक्त संचार करतात.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत ‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदर्‍याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात. चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे. येथील इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. असे म्हणतात की,पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता. त्यावेळी येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकनरीचे रूपांतर चिखलदरीत झाले अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शितलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात.

सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. चिखलदर्‍यापासून जवळच मेळघाट आहे. मेळघाट परिसर हा ‘व्याघ्रप्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. त्यामुळे चिखलदर्‍याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीण तर मुक्त संचार करतात. उन्हाळ्यात मात्र येथे पानझडी सुरू होते. कारण हा जंगल परिसर शुष्क पानझडी अरण्याच्या प्रकारात मोडते. परंतु पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्यादी पर्वताचे रूप प्राप्त होत असते. सातपुडा पर्वतराजीत कोरकू, गोंड, माडिया इत्यादी जमातींचे आदिवासी लोक राहतात. दाट जंगले व नागमोडी वळणांचे घाटरस्ते यामुळे हा भाग विदर्भाचे गिरीस्थान म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. येथील हजारो फूट खोल दर्‍या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायर्‍या उतरून गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. पावसाळ्यात तेथील धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. वनोद्यानात संध्याकाळी कुटुंबियांसोबत फिरायला मज्जा येते. रात्री वाघांच्या डरकाळ्याही ऐकायला येतात. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी. येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. भीम कुंड- दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. विशेष म्हणजे या कुंडातील पाणी लाल रंगाचे दिसते. भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे.

चिखलदर्‍याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर ‘बहामनी किल्ला’ आहे. किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. नर्सरी गार्डन- येथे एक औषधी वनस्पतींचे सुंदर गार्डन आहे. या गार्डनमध्ये सर्वप्रकारच्या औषधी वनस्पती तसेच काही मसाल्याच्याही वनस्पती आहेत. पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) तर पर्यटकांना चक्राऊन टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदर्‍यापासून ११ किलोमीटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. खर्‍या देवीचे मंदिर पश्चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले.

- Advertisement -

वैराट हा चिखलदर्‍यातील रेंजर प्रशिक्षण कॉलेजकडील एक प्रमुख पॉईंट असून तो चिखलदर्‍यापासून ८ कि. मी. अंतरावर आहे. मेळघाटातील हा सर्वात उंच पॉईंट आहे. वैराटकडे जाताना दोन्ही बाजूकडे सातपुड्याच्या उंच-उंच पर्वतरांगा नजरेत पडतात. येथे महाभारतकाळात वैराट राजाची नगरी होती म्हणून या जागेला वैराट असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. वैराट या उंच ठिकाणावरून सूर्यास्त पाहताना निसर्गाचं आगळं वेगळं रूप पहायला मिळतं.

कसे जाल?

रेल्वे- मुंबई- हावडा या मुख्यरेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी येथे एस.टी. किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. अमरावतीहून चिखलदरा ९४ किमी अंतरावर आहे. अमरावतीहून चिखलदर्‍याला जाण्यासाठी एसटी व खाजगी वाहन सहज मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -