घरफिचर्सउतरती कळा लागलेले कुलाबा मार्केट

उतरती कळा लागलेले कुलाबा मार्केट

Subscribe

बघता बघता स्ट्रॅण्ड सिनेमाच्या गल्लीत कुलाबा मार्केट अस्तित्वात आले. हे मार्केट म्हणजे स्थानिक लोकांची दैनंदिन जिवनातील गरजा भागवण्याची ती सोय होती. या भागाला कुलाबा मार्केट असे नाव इंग्रजांच्या काळातच पडले.

कुलाब्यातील ससून म्हावरे बाजार विकसित झाल्यावर त्याच अनुषंगाने भाजी आणि इतर किराणा मालाची गरज भासू लागली. पूर्वी जेव्हा ससून डॉक अस्तित्त्वात नव्हता तेव्हा अलिबाग, रेवस, उरण येथून येणारी भाजी आणि इतर किरणा माल हा सध्या असित्त्वात असलेल्या ससून डॉकच्या धक्क्यावरून यायचा. त्याची विक्री धक्क्यावरच होत होती. पण त्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यावर ससून डॉक हा पूर्णपणे जहाज व्यापारासाठी वापरण्यात आला. त्यावेळी म्हणजे उपलब्ध आकडेवारीनुसार, १९३२ साली ससून डॉकच्या मोकळ्या जागेत बसणारे भाजीवाले, किरणा मालचे व्यापारी हे तेथून विस्थापित झाले. त्यांनी सध्या असलेल्या स्ट्रॅण्ड सिनेमाच्या गल्लीत आपला डेरा टाकला. हे किरणा माल, भाजीपाला विक्रेते ही कुलाबात राहणार्‍या व्यक्तींची सोय होती. मग त्यात गरीब श्रीमंतांपासून अनेकजणांचा समावेश होतो. त्यामुळे हे फेरीवाले कुलाबामधून संपूर्णत: विस्थापित होणे कोणाच्याच सोयीचे नव्हते. त्यामुळे स्ट्रॅण्ड सिनेमाच्या गल्लीत त्यांना बसायला जागा देण्यात आली. एकाचे-दोन, दोनाचे चार असे फेरीवाले तेथे बसू लागले. त्यातून मग त्या ठिकाणी एक बाजार विकसित झाला. त्याला कुलाबा मार्केट असे म्हटले जाते.

फेरीवाल्यांपासून सुरू झालेले कुलाबा मार्केट हळूहळू आकार घेऊ लागले. रस्त्यावर बसणारे किरणा मालाचे व्यापारी दुकान घेऊन स्थापित झाले. त्याचबरोबर इतर गृहोपयोगी सामानांची दुकानेही तेथे अस्तित्व आली. ही दुकाने प्रामुख्याने ज्यु लोकांची होती. ससून डॉकची निर्मिती मुळातच एका ज्यूने केली होती. त्यांच्यासोबत आलेले ज्यू कुलाबामध्ये सध्या ज्या ठिकाणी छाबड हाऊस अस्तित्वात आहे, त्याच्या आजूबाजूला वसले. या ज्यूंनी कुलाबा मार्केटमध्ये आपली दुकाने थाटली. त्याचप्रमाणे या कुलाबा मार्केटमध्ये काही मराठी माणसांनीही आपल्या उपजिविकेसाठी दुकाने थाटली. बघता बघता स्ट्रॅण्ड सिनेमाच्या गल्लीत कुलाबा मार्केट अस्तित्वात आले. हे मार्केट म्हणजे स्थानिक लोकांची दैनंदिन जिवनातील गरजा भागवण्याची ती सोय होती. या भागाला कुलाबा मार्केट असे नाव इंग्रजांच्या काळातच पडले.

- Advertisement -

स्वातंत्र्यानंतर हे कुलाबा मार्केट अधिकच बहरत गेले. या ठिकाणीच एक छोटे खानी मासे बाजारही अस्तित्वात आहे. ससून डॉकच्या जवळ असताना या मासे मार्केटची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ससून डॉकमध्ये मासे खरेदी करणे हे अनेकांना शक्य होत नाही. त्याचे कारण तेथे असणारी गैरसोय. दुसरे म्हणजे तेथे मासे घाऊक खरेदी करावे लागतात. त्यामुळे कुलाबातील पॉश लोक ससून डॉकमध्ये जाणे सहासा टाळतात. त्यांच्या सोयीसाठी कोळणी या कुलाबा मार्केटमध्ये मासे घेऊन बसू लागल्या. श्रीमंतांना काहीशा महाग दराने हे मासे विकून त्या चार पैसे कमावू लागल्या. अशा तर्‍हेने कुलाबा मार्केटमध्ये मासे बाजारही असित्त्वात आले. मात्र तरीही कुलाबा मार्केटची खरी ओळख ही भाजीपाला आणि किरणा माल विकत मिळणारे ठिकाण अशीच होती. त्याच बरोबर हार्डवेअर दुकाने, फ्रिज, वॉशिंग मशिन, टिव्ही अशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकानेही पूर्वी होती. मिठाईची दुकाने ही स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध होती. हा भाग पूर्वी सकाळ, संध्याकाळ गजबलेला असायचा. या मार्केटच्या अनुषंगाने खर्‍या अर्थाने आताचे कुलाबा वसले, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

या मार्केटच्या आजुबाजूलाही अनेक दुकाने त्यावेळी अस्तित्वात आली. त्यात प्रामुख्याने मुस्लिम मालक असलेली कॅफे आणि हिंदू मालक असलेली मिठाईची दुकाने ही प्रमुख आकर्षणे होती. कुलाबा कॅफेत मिळणारा खिमा आणि ऑमलेट पाव हा सुप्रसिद्ध होता. कुलाबा स्वीट मार्टमधील मिठाई मुंबईत प्रसिद्ध होती. कुलाबामध्ये गेलेली व्यक्ती ती मिठाई घेऊनच परतायची. गल्लीत शिरल्यावर आत पत्राशेड मध्ये बसणारे भाजीवाले हे प्रामुख्याने या मार्केटचे आकर्षण आहे. पण त्याही पेक्षा मार्केटच्या रस्त्यावर भाजी घेऊन बसणार्‍या फेरीवाल्यांकडूनच सर्वाधिक वस्तूंची खरेदी केली जाते. कपड्यांच्या आणि इतर दुकानांमध्ये कधी काळी गर्दी असायची आता त्यांची जागा मॅकडोनाल्ड, कॅफे कॉपी डे यांसारख्या मल्टिनॅशनल स्टोअर्सने घेतली आहे. तरीही काही दुकाने आपले असित्त्व टिकवून तेथे उभी आहेत.

- Advertisement -

कुलाबा मार्केटचे पूर्वीचे दिवस हे खूपच वैभवशाली होते. मार्केटच्या आजुबाजूला असलेल्या इमारतीतील प्लॅटचे दर या मार्केटमुळे जास्त होते. पण निसर्गात कुठलीही गोष्ट कायमस्वरुपी नसते. तिच अवस्था या कुलाबा मार्केटची झाली. गेल्या दोन दशकात कुलाब्यातील इतर विभाग पॉश झाले. तेथे वेगवेगळ्या ब्रॅण्डची दुकाने स्थापित झाली. श्रीमंत लोकवस्ती वाढली. त्याचा परिणाम असा झाला की, या मार्केटमध्ये येणारी लोक कमी झाली. येथील ज्यू दुकानदार, दुकाने विकून इस्रायला स्थलांतरीत झाले. फार लोक खरेदीसाठी येत नसल्यामुळे हळूहळू इतर दुकानदारही तेथून निघाले. त्यातच स्ट्रॅण्ड थिएटर बंद पडले. त्यामुळे येथील रहदारीही कमी झाली. त्याचा परिणाम असा झाला की, कुलाबा मार्केटने आपले जुने वैभव गमावले. आज हे मार्केट केवळ नावालाच शिल्लक आहे. चाळीस, पन्नास आणि साठच्या दशकात हे मार्केट संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध होते. आता कुलाबा मार्केट म्हणजे रस्त्यावरील कपड्या, आभूषणांची दुकाने मानले जाते. मुळच्या कुलाबा मार्केटने आपली ओळखही फुसून टाकण्यास सुरुवात केली आहे. पण मार्केटचे वैभव ज्यांनी पाहिले ते आजही त्याला लागलेली अवकळा पाहून हळहळतात. भविष्यात हे मार्केट नाहिसे होईल. त्या अगोदर निदान मुंबईकराने हे मार्केट एकदा तरी पहायला हवे.


-आबा माळकर

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -