घरफिचर्सव्यक्तीपूजा विरोधी सामूहिक नेतृत्व

व्यक्तीपूजा विरोधी सामूहिक नेतृत्व

Subscribe

सामूहिक नेतृत्वाचा संघ आणि त्या संघामध्ये समूहभावना या गोष्टींची सर्वांत जास्त गरज असते. ही गोष्ट गेल्या सव्वाचार वर्षांत भारतीय राजकारणात फार विरळ झाली. त्यामुळे भाजपची निवडणुकीय कामगिरी एका बाजूने उज्वल होत होती तर दुसर्‍या बाजूने भाजपचे सामूहिक नेतृत्व विषयक आत्मभान खूपच वरवरचे राहिले. यामुळे एकदम भाजपच्या पडझडीला सुरुवात झाली. भाजपच्या विवेकशील भक्तांना खरे तर ही घडामोड खटकते. परंतु, त्याबद्दल निश्चित भूमिका घेतली जात नाही.

भारतीय राजकारणात नेतृत्वाची चर्चा काळ्या – पांढर्‍या अशा परस्पर विरोधी चौकटीमध्ये केली जाते. या खेरीजचे नेतृत्व खलनायक म्हणून मांडले जाते. समकालीन दशकामध्ये तर ही चौकट भारतीय राजकारणातील विलक्षण प्रभावी ठरली आहे. प्रसार माध्यमांमध्ये ही चौकट पोलादी दिसते. तिचे विश्लेषण नरेंद्र मोदी-विरूद्ध राहूल गांधी असे केले जाते. परंतु, हे दोन्ही नेते मानव आहेत. त्यांना मनुष्य या नात्याने मर्यादा आहेत. या गोष्टीचे आत्मभान राहिलेले नाही. या काळ्या-पांढर्‍या चौकटीमुळे तर या दोन नेत्यांच्या खेरीज भारतात नेतृत्वच नाही, अशी विचारप्रणाली उदयास आली. ही भारतीय राजकारणातील गफलत दिसते. ही घडामोड समकालीन दशकातील राजकीयदृष्ठ्या महत्त्वाची आहे. तिला तंत्रज्ञानाचे घडवले आहे.

भारतीय राजकारण आघाड्यांच्याकडून भाजपकडे सरकले. त्यास जवळपास साडेचार वर्ष पूर्ण झाली आहेत. या साडेचार वर्षांच्या काळात नेतृत्वानेच केवळ राजकारण घडवले, असे मिथक तयार झाले. सामाजिक-आर्थिक प्रश्नांच्या तुलनेत नरेंद्र मोदी-विरूद्ध राहुल गांधी या द्वैताचील नेतृत्वाचा मुद्दा जास्त प्रभावी ठरला. यामुळे पक्षाचे स्वरुप बदलत गेले. भाजपचे स्वरुप पक्षकेंद्रीत असण्याऐवजी ते नेतृत्व केंद्री झाले. अर्थातच भाजपची गेल्या साडेचार वर्षांतील जडणघडण व संरचना नरेंद्र मोदीकेंद्रीत राहिली. 2013 च्या आधी भाजपमध्ये सामूहिक नेतृत्वाची परंपरा होती. एका पेक्षा जास्त नेते पक्षांतर्गत खुली सत्तास्पर्धा करत होते. परंतु, सामूहिकतेची जागा केवळ नरेंद्र मोदींनी घेतली. त्यामुळे मोदीविरोधी इतर अशी द्वैतवादी नेतृत्वाची विचारसरणी उदयास आली. नरेंद्र मोदींवर संघाचे नियंत्रण आहे, हा मुद्दा वेगळा आहे. तो मुद्दा संघ-भाजप संबंधाशी संबंधीत आहे. केवळ भाजप हा एक पक्ष म्हणून तो नरेंद्र मोदीकेंद्रीत राहिला.

- Advertisement -

भारतीय राजकारणात व्यक्तीपूजा ही सतत दिसते. व्यक्तीपुजेभोवती राजकारण फिरविण्याची प्रथा आहे. सहाजिकच नरेंद्र मोदी देखील यापासून दूर राहिले नाहीत. व्यक्तीपूजा आणि लोकशाही या दोन गोष्टी तत्त्व म्हणून परस्पर विरोधी आहेत. मात्र, या परस्पर विरोधी गोष्टीचा संबंध सातत्याने भारतीय राजकारणात दिसतो (इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी). व्यक्तीगत नेतृत्वाच्या जागी सामूहिक नेतृत्वाची एक संघ निर्माण करणे हे भारतीय राजकारणातील सर्वांत मोठे आव्हान पन्नाशीच्या दशकापासून आज पर्यंत राहिले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सामूहिक नेतृत्वाचा मुद्दा जवळपास दिसत नाही. त्यामुळे भारतीय राजकारणाची तसेच पक्ष म्हणून भाजपची पडझड सुरू झाली. वरवर पाहाता गेल्या चार-सव्वाचार वर्षांत भाजपने निवडणुकीय पध्दतीने विस्तार केला. परंतु, त्या निवडणुकीय विस्ताराला फार अधिमान्यता मिळाली नाही. पक्षांतर्गत आणि पक्ष बाह्य अशा दोन्ही पध्दतीने अधिमान्यतेचा मुद्दा भारतीय राजकारणातील चर्चा विश्वात होता. कारण नेतृत्वाची चर्चा सकारात्मतेबरोबर विरोधाची देखील झाली.

व्यक्तीपूजावादी नेतृत्व भारतीय राजकारण घडविते कारण समाजामध्ये व्यक्तीपूजा असते. व्यक्तीपुजेमधील विशेष गुण जनतेच्या सामूहिक हितसंबंधापेक्षा वेगळा असतो. तो नेतृत्वाचा गुण सामूहिकपणे कामगिरी करत नाही. त्यामुळे एका बाजूला व्यक्तीपूजा आणि दुसर्‍या बाजूने व्यक्ती द्वेष अशी मूल्यव्यवस्था परस्पर विरोधी काम करता दिसते. त्यांची एक संरचना घडत जाते. या गोष्टींचे आत्मभान भारतीय राजकारणातील नेते आणि पक्षांना आहे. त्यामुळे व्यक्तीपुजावादी नेते सामूहिक नेतृत्वाच्या विरोधी असतात. तसेच प्रत्येक नेता व्यक्तीभोवती पक्षांची बांधणी करतो. परंतु, सरतेशेवटी तो व्यक्ती द्वेषाच्या वैशिष्ठ्यामध्ये अडकतो. पक्षापासून तसेच संरचनात्मक राजकारणापासून त्या नेतृत्वाला वेगळे केले जाते. त्यामुळे नेतृत्व आणि राजकारण (संरचनात्मक, मूल्यात्मक) या मध्ये एक प्रकाराचे अंतर पडत जाते.

- Advertisement -

सत्तास्पर्धा ही खुल्ली आणि लोकशाही पध्दतीची न राहाता ती जास्तीत जास्त व्यक्ती द्वैष केंद्रीत होते. ही मालिका भारतात दिसते. उदा. इंदिरा गांधी यांना गुंगी गुंढीया व दुर्गा देवी अशा परस्पर विरोधी उपमा वापरल्या गेल्या. हा प्रवास शरद पवार, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, राहूल गांधी इत्यादीचा देखील दिसतो. या प्रक्रियेमुळे भारतीय राजकारणात जवळपास पर्यायी नेतृत्व नसते, अशी भ्रामक जाणीव घडवली जाते. सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये अशी भ्रामक जाणीव घडविण्याचा प्रयत्न दिसतो. परंतु, वस्तुस्थितीमध्ये भारतीय राजकारणात एका पेक्षा एक असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा साधा विचारही केला जात नाही. ही खरे तर भारतीय राजकीय समाजाची कुंटीत अवस्था दिसते.

नरेंद्र मोदींना पर्याय नाही, ही एक घडवलेली जाणीव आहे. या जाणीवेमध्ये व्यक्तीपुजेची मात्रा जशी आहे, तशी सामूहिक नेतृत्वाच्या द्वैषाचीही मात्रा दिसते. सामूहिक नेतृत्वाबद्दलचे आकलन फारच दुबळे केले गेले. सामूहिक नेतृत्व म्हणजे बेजबाबदारपणा अशी धारणा भारतीय राजकारणात घट झाली. त्यामुळे सामूहिकपणे नेतृत्वाचा प्रवास ही संकल्पना राजकारणात सर्वांत जास्त अवघड ठरते. खरे तर सामूहिक नेतृत्वाची परंपरा भारतात आहे. विशेष नव्वदीच्या दशकापासून ते 2013 पर्यंत अपरिहार्यता म्हणून सामूहिक नेतृत्वाची परंपरा घडली. परंतु, 2014 नंतर सामूहिक नेतृत्वावरील विश्वास कमी झाला. व्यक्तीपूजा किंवा व्यक्तीकेंद्रीत नेतृत्व संपूर्ण भारतीय राजकारण करण्यास अपुरे ठरते. यांचे कारण भौगोलिक दृष्ठ्या आणि सामाजिक दृष्या भारत हा जास्त गुंतागुंतीचा देश आहे. येथे सामूहिक नेतृत्वाचा संघ आणि त्या संघामध्ये समूहभावना या गोष्टींची सर्वांत जास्त गरज असते. ही गोष्ट गेल्या सव्वाचार वर्षांत भारतीय राजकारणात फार विरळ झाली. त्यामुळे भाजपची निवडणुकीय कामगिरी एका बाजूने उज्वल होत होती तर दुसर्‍या बाजूने भाजपचे सामूहिक नेतृत्व विषयक आत्मभान खूपच वरवरचे राहिले. यामुळे एकदम भाजपच्या पडझडीला सुरुवात झाली. भाजपच्या विवेकशील भक्तांना खरे तर ही घडामोड खटकते. परंतु, त्याबद्दल निश्चित भूमिका घेतली जात नाही.

सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या नेतृत्वातील मुख्य फरक म्हणजे सोनिया गांधीनी सामूहिक नेतृत्वाला सहमती दिली होती. या उलट राहूल गांधी यांच्याबद्दल खुद्द काँग्रेसच्या परंपरागत नेतृत्वाला खात्री नाही. त्यामुळे राहूल गांधींबद्दल धरसोड खुद्द काँग्रेस पक्षांतर्गत दिसते. काँग्रेस बरोबर काँग्रेस परिवार आणि काँग्रेस प्रणीत आघाडी अशा दोन्ही पातळ्यांवर खरी मागणी सामूहिक नेतृत्वाची आहे. विविध राज्यांमधील प्रादेशिक नेतृत्वाची प्रतिमा समाज विरोधी, राष्ट्रवाद विरोधी, स्वच्छ प्रतिमा विरोधी अशी रचली गेली आहे. अशा घटनांना नेतेे मानव म्हणून काही प्रमाणात जबाबदार आहेत. परंतु, या पुढे जाऊन भारतीय राजकारणात प्रादेशिक नेतृत्व विरोधीची मोहिम जोरकसपणे चालविली जाते. त्यास बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचार आणि जातीचा दारुगोळा मिळतो. थोडक्यात भाजप, काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाचा र्‍हास झाला. तसेच प्रादेशिक नेतृत्वाची गळचेपी केली गेली. यातून दैनंदिन राजकारणात सामूहिक नेतृत्वाचा जवळपास र्‍हास झाला. शिवाय राजकारण म्हणजे खास व अति महत्त्वाचे क्षेत्र म्हणून ठरवले गेले.

राजकारण घडविण्याच्या ईश्वरी क्षमताचा भ्रामक शोध घेतला गेला. यामधून आज भारतीय राजकारणातील सामूहिक नेतृत्वाचा आशय घटला आहे. व्यक्तीपूजा किंवा व्यक्तीकेंद्रीत नेतृत्व हेच भारतीय राजकारणापुढील मोठे आव्हान आहे. पक्षीय सत्तास्पर्धा, नेतृत्वातील सत्तास्पर्धा, जाती-जातींमधील व्यक्तीगत द्वैष भावना यांच्या सिमारेषांनी सामूहिक नेतृत्वाची कोंडी केली आहे. यांचे आत्मभान भाजप, काँग्रेस आणि प्रादेशीक पक्षांनाही नाही. केवळ भाजप विरोध म्हणजे सामूहिक नेतृत्व नव्हे. तर भारतीय सामाजिक वास्तवाशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे सामूहिक नेतृत्व अशी अटकळ त्यामध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -