रंग बरसे रे…

Subscribe

‘राजकारणाचा रंग कसा? नेत्यांना आवडेल तसा!’ त्यामुळे ही मंडळी रंगाचा बेरंग कधी करतील, त्याचा नेम नाही. अनेक रंगांना स्वतःशी बेईमान व्हावं लागतं ते राजकारणातच. आजचा तिरंगा, चौरंगा कधी भगवा होईल, याचा नेम नाही. त्यामुळे राजकारणातले रंगोबा नेहमीच अस्वस्थ असतात. पांढर्‍या शुभ्र खादीच्या आड कोणता रंग आहे, हे कुणालाच कधीही कळत नाही.

चौकीदाराच्या हाती काठी नाही तर पिचकारी… गळ्यामध्ये धनुष्य अडकवत तो निघालाय रंगपंचमी खेळायला…त्यामुळे आपसूकच राजकारणातले सारेच रंग पुन्हा एकदा खुलायला लागलेत. चौकीदाराच्या पिचकारीत शिटी लावण्यात आलीय. दिल्लीत वाजवलेली ही शिट्टी आता गल्लीतही वाजू लागलीय. पण तिच्या आवाजाने घडाळाचे काट्यांनी फिरणं बंद केलेय आणि हाताचा ‘पंजा’ आखडता घेतला गेला. राजकारणातील रंगोबा अचानक थंडोबा झालेय. म्हणूनच की काय ‘माढा’चाही रंग यंदा फिकाच पडलाय. कालपर्यंत काँग्रेस गवतात रंग उधळणारी पोरं आता एकाएकी कमाळाशी पिंगा घालू लागलीय.

- Advertisement -

ऐन उत्सवकाळात ओस पडलेल्या काँग्रेसी घरांच्या भिंतींवर आता केवळ कधीकाळी उडालेल्या रंगांच्या आठवणी तेव्हढ्या शिल्लक राहिल्यात. घरच्या घरं ओस पडतात की काय अशी भयशंकाही ऐन पंचमीत डाचू लागतेय. त्यात कुणीतरी नवरंगाची उधळण करीत कमळाला माखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे घडाळ्याची पुसटशी टिकटिक सुरू झालीय आणि हातातही किंचतशी ऊर्जा भरली गेलीय. एकूणच काही काळापूर्वी पांढराफटक असलेला कॅनव्हास वेगवेगळ्या रंगांनी माखला अन् हळूहळू कॅनव्हॉसच्या मागून सुरू झाली भीतीची अन् चिंतेची धकधक! रंगपंचमीनिमित्त या अस्वस्थ पंचमीचा घेतलेला हा धांडोळा.

‘राजकारणाचा रंग कसा? नेत्यांना आवडेल तसा!’ त्यामुळे ही मंडळी रंगाचा बेरंग कधी करतील, त्याचा नेम नाही. अनेक रंगांना स्वतःशी बेईमान व्हावं लागतं ते राजकारणातच. आजचा तिरंगा, चौरंगा कधी भगवा होईल, याचा नेम नाही. त्यामुळे राजकारणातले रंगोबा नेहमीच अस्वस्थ असतात. पांढर्‍या शुभ्र खादीच्या आड कोणता रंग आहे, हे कुणालाच कधीही कळत नाही. त्यामुळे ही अस्वस्थता अधिकच गडद होत जाते, पण या पांढर्‍या रंगातली मस्ती मात्र, त्यांची अस्वस्थता नेहमीच झाकाळून टाकते. खाकी रंगालाही तुडवण्याची मुभा असलेल्या या पांढर्‍या रंगांविरोधात कुणी बोललं तरी ‘हक्कभंग’ होतो. हक्क नसलेल्या सामान्य रंगांना भंग करण्याची ताकद केवळ या पांढर्‍या रंगातच असते. दुसरीकडं भगवी आणि गुलाबी रंगाच्या साईड इफेक्टवर कुणी बोललं तर अभिव्यक्तीवर शिंतोडे उडतात.

- Advertisement -

सुरक्षिततेचे काळे मुद्दे ‘सहिष्णुतेला’ अधोरेखित करतात. म्हणून ‘रागरंग’ या शब्दाचा सर्वाधिक वापर होतो तो राजकारणातच. मुद्दा असा की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पंचमीतले रंग काहीसे संमिश्र दिसताहेत. गेल्या काही वर्षांपासून एकाच पक्षाचा रंग अधिक उठावदार दिसत असल्यामुळे अन्य रंग काहीसे झाकले जाताहेत. त्यामुळे सर्वच रंगांची अस्वस्थता आणि धकधक वाढतेय. त्यातच रंगपंचमीचा सण आल्यामुळे ही अस्वस्थता आता या पिचकारीतून बाहेर पडू पाहतेय, पण यंदा पंचमीवर दुष्काळाचं सावट असल्यानं या पिचकार्‍याही म्यान कराव्या लागताहेत. अर्थात ‘ड्राय डे’ ओला करून साजरा करण्याची सवय जडलेली ही मंडळी त्यातूनही मार्ग काढून रंगांची उधळण करतेय यात वादच नाही.

बघता बघता ही मंडळी एका आखाड्यात एकत्र आली. त्यांनी रंग बाटवण्यास सुरुवात करताच रंगांनीही आपला मूळ स्वभावधर्म टाकून विशिष्ट ‘धर्म’ अंगिकारला आणि ते राजकीय पक्षांचे प्रवक्ते झाले. त्यागाचा आणि ज्ञानाचा प्रतीक असलेला भगवा रंग काहीसा कडवट होऊन पुन्हा एकदा गरजतोय. त्याचे ‘साहेब’ आता दुरावले असले तरीही त्याचा बाणा मात्र कायम आहे. अर्थात हा बाणा कायम राहावा म्हणून तोही धडपडतोय. त्याच्यावर अस्तित्व टिकवून ठेवण्याची वेळ आलीय हीच शोकांतिका. दोन्ही प्रकारच्या भगव्यांना छळतोय तो नवनिर्माणाचा चौरंग. चारही दिशेने तटबंदी करून भगव्याला अडचणीत काढण्याचाच जणू त्यांनी संकल्प केलाय. ‘नुसतंच तोंडात बळ’ म्हणणार्‍यांच्या पिचकार्‍या मोडीत काढल्या नाही, तर नाव बदला असा सज्जड दम त्याने काही दिवसांपूर्वी भरलाय. यंदा टाळी कुणी द्यायची याची वाट बघण्याचा प्रश्नच नव्हता, पण टाळीऐवजी राजकीय लोकांची टोळी मात्र सक्रीय झालीय हे लपून राहिलेलं नाही.

कमळ गुलाबी असतं हे अनेकांच्या विस्मृतीत गेलंय. भगवं आणि हिरवं कॉम्बिनेशन लेऊन आलेलं कमळ सध्या चांगलंच बहरलंय. आजुबाजूच्या धुळवडीतली घाण आपल्या अंगावर कमीत कमी उडेल याची खबरदारी घेत या कमळानं, हळूच कुणाच्या तरी अंगावर रंग फेकण्यात धन्यता मानली अन् त्यात ते यशस्वीही झालंय. त्याच्या या गनिमी पद्धतीच्या रंगपंचमी खेळण्याने अन्य रंगांच्या अस्वस्थतेत अधिकच वाढ होतेय. एकूणच, आगामी काळात ठेवणीतली पिचकारी उडवत युतीतल्या सार्‍यांचीच लाली वाढवण्याची धडपड आता युद्धपातळीवर सुरू आहे. दुसर्‍या पातळीवर युतीचा फुगा हा भ्रमाचाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी आघाडीचा रंग एकवटलाय. आघाडीचा रंग उडवण्यासाठी निळा आणि हिरवा सज्ज झालाय. या बदललेल्या रंगानं अनेकांना भुवया उंचावायला भाग पाडलंय. अर्थात हे बळ नेहमीच स्वत:साठी नाही तर विरोधकांसाठी खर्ची करण्याची पद्धत इथं रुढ झालीय. त्यामुळे स्वबळावर आता स्वकीयांचाच विश्वास उरलेला नाही.

दुसरीकडे भुजांमधलं बळही काहीसं वाढायला लागलंय. जसजशी निवडणुकीची पंचमी जवळ येतेय तसतसं हे बळ वाढतं, हा पूर्वानुभव आहे. विरोधकांना ऐनवेळी कवेत घेण्याचा दांडगा अनुभव या मंडळींच्या पदरी आहे. यंदा परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्यानं कोणाला लागणार नाही, त्रास होणार नाही, दगाफटका होणार नाही, अशा बेतानंच रंग उधळले जाताहेत. लोकसभेच्या पंचमीत काय होतं हे बघूनच विधानसभेसाठी रंग गोळा करण्याचा यांचा मानस दिसतोय.

असं असलं तरीही आपल्या पांढर्‍या शुभ्र झब्ब्यावर काळ्या रंगाचा डाग पडू न देण्याचीही काळजी ही सारीच मंडळी वाहते. मात्र, डाग न पडण्याची काळजी घेतानाच नवं कोरं ‘गुलाबी’ प्रेम मात्र यांचं कमी होत नाही. हा गुलाबी रंग त्यांना भलताच भावतोय. अर्थात हा गुलाबी रंग आहे तो नव्या नोटांचा. या गुलाबी रंगाचं कृष्ण रंगात होणारं परिवर्तन राजकीय आखाड्यातच ठळकपणे दिसू शकतं. म्हणूनच नोटांचा रंग वाढला की त्याला काळ्या पैशांचा ‘मान’ मिळतो आणि हा मान निवडणुकीच्या काळात निर्णायकी ठरतोय हे विशेष. असो, तर आगामी निवडणूक पंचमीसाठी सारेच जण आपापले रंग घेऊन उभे आहेत. राजकीय खेळ्यांमुळे काहींचा रंग अधिकच तजेलदार होतोय, तर काहींचा काहीसा फिका पडतोय. मात्र, क्षणाक्षणाला ज्या पद्धतीने उमेदवारांसाठी पक्ष बदलला जातोय, ते पाहता राजकारणातल्या रंगांचा खरा रंग सरड्यासारखाच असल्याचा भास होतो. आज याच्याबरोबर असलेला रंग उद्या त्याच्याबरोबरच असेल याची शाश्वती नसते.

पण, या मंडळींना सरड्याची तरी उपमा कशी देणार हो? ‘सरड्याची धाव ही कुंपणापर्यंत असते. यांची तर धाव पार स्वीस बँकेपर्यंत पोहोचलीय ना! रंगांची ही बरसात निवडणुकीच्या आखाड्यात अव्याहतपणे सुरू राहील. कुणी विरोधाचा, कुणी समझोत्याचा, कुणी मैत्रीचा तर कुणी द्वेषाचा रंग उधळत आपापल्यापरीनं राजरंगात सहभागी होतोय. सप्तरंगांचं ऐक्य तोडत एकेका रंगाला स्वतःच्या दाराशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न या काळात सार्‍यांकडूनच होईल. पण या पाळीव रंगांपासून सर्वसामान्य मात्र नेहमीसारखा कोसो दूर राहील, यात शंकाच नाही.

रंग बरसे रे…
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -