घरफिचर्सकाँग्रेसचे जनरेशन गॅप

काँग्रेसचे जनरेशन गॅप

Subscribe

करोना आजाराची सर्वत्र दहशत असताना देशभरात गेले दोन दिवस होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. मोबाईलच्या रिंगटोनवर खोकल्याचा आवाज आणि त्यानंतर घ्यायची काळजी याचा लोकांनी इतका धसका घेतला आहे की आता लोक फोनऐवजी व्हॉट्सअपवर बोलत आहेत इतकेच. सर्वत्र करोना, करोना चालले असताना मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपाने ऐन रंगपंचमीला काँग्रेसच्या चेहर्‍यावर काळजीचे रंग पसरले असून भाजपची कळी खुलून गुलाबी झाली आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य हातून गेल्यामुळे जळजळ झालेल्या भाजपला काँग्रेसमधील या उलथापालथीमुळे थंडाई प्यायल्यासारखे झाले आहे. काय गंमत असते बघा, मध्य प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलणार असे वाटत असताना राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजप सरकार येणार अशी स्वप्ने भाजपच्या समर्थकांना पडू लागली आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी मोदी भक्तींची सोशल मीडिया बिग्रेड कामाला लागली आहे. या सार्‍याला कारणीभूत ठरले आहे ते काँग्रेसच्या जनरेशन गॅपचे आऊटडेटेड राजकारण.

आपला राजकीय शत्रू काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला असताना देखील काँग्रेस श्रेष्ठी नेहमीप्रमाणे दिल्ली दरबार राजकारण करणार असेल तर या पक्षाला देवही वाचवू शकत नाही. संसदेत राणा भीमदेवी थाटात मोदींविरोधात रान पेटवायचे आणि ही पेटवापेटवी संपली की काही महिने अज्ञातवासात निघून गेल्यासारखे गायब व्हायचे असे राजकारण राहुल गांधी करणार असतील तर काँग्रेसची अवस्था उद्ध्वस्त शाळेसारखी होणार, यात नवीन काही नाही. इतका तळ गाठूनही मग्न तळ्याकाठी युगांत होऊन लोटल्यासारखी काँग्रेस बसत असेल तर पक्षात तरुण रक्ताने फक्त सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. या बोचर्‍या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या वयस्कर दरबारी मंडळीकडून मिळत नसल्यामुळेच आज ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा तरुण नेता काँग्रेसला रामराम करून भाजपचे घर जवळ करत आहे. उद्या कदाचित ही आग राजस्थानमध्ये पसरून उपमुख्यमंत्री सचिन पायलटही पायउतार होऊ शकतात. राहुल गांधी यांच्याप्रमाणे मनमानी राजकारण करून काँग्रेसच्या तरुण नेत्यांना आपले राजकारण दावणीला बांधता येणार नाही. कारण त्यांच्याकडे गाडी, बंगला, पैसा असे सांगून झाल्यावर आणि तुम्हारे पास क्या है असे विचारल्यानंतर सांगायला ‘मेरे पास माँ है’ असा डायलॉग मारता येणार नाही. तोपर्यंत त्याच्या राज्यात भाजपने काँग्रेसचे युवा नेतृत्व साफ केलेले असेल. शिवराज चौहान यांच्यासारखा कुशल राज्यकर्ता भाजपकडे असल्याने गेली १५ वर्षे भाजपने भौगोलिकदृष्ठ्या देशातील सर्वात मोठ्या राज्यावर मध्य प्रदेशवर राज्य केले. आताही ते सत्तेत येणारच होते, पण काँग्रेसने निसटत्या विजयासह सत्ता स्थापन केली. पण, सत्ता स्थापन केल्यानंतर भविष्याचा विचार करून मध्य प्रदेश तसेच राजस्थानमध्ये युवा नेतृत्वाच्या हातात सत्तेची सूत्रे देण्याची गरज असताना येरे माझ्या मागल्या करत कमलनाथ आणि अशोक गेहेलोत यांच्यासारख्या वयस्कर माणसांकडे धुरा सोपवण्यात आली. आता ही माणसे जुनी असली तरी जाणती नसल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी काँग्रेसची हालत झाली आहे.

- Advertisement -

शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते भाजपात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धुळवडीचा दिवस असतानाही मंगळवारी दोन तासांपेक्षा अधिक वेळ पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांनी त्यांना वेळ दिला. खरेतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा असतानादेखील शिंदे यांना त्यांच्याऐवजी शहा यांना भेटावेसे वाटते यावरून काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये एक दोन व्यक्तींभोवती पक्ष फिरत आहे हे स्पष्ट आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे कितीही म्हणत असतील की काँग्रेस हा गांधी घरण्याभोवती फिरतो तसा त्यांचा भाजपही मोदी आणि शहा या दोघांच्या हातात आहे, हे ते नाकारू शकत नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेशा देश श्रेष्ठ हे नवीन कार्यकर्त्यांना सांगायला सोपे आहे. कारण नड्डा हे शहा यांच्या हातातील बाहुले आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. असो. शिंदे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला असून काँग्रेसकडूनही तो तातडीने स्वीकारण्यात आला. आपल्या युवा नेत्यांचे राजीनामे स्वीकारण्याची तत्परता काँग्रेसने ज्या वेगाने दाखवली त्या वेगाने त्यांनी आपला पक्ष मोठा केला असता तर आज या पक्षाला सलाईन लावण्याची वेळ आली नसती. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या ६ मंत्र्यांसह १९ आमदारांनी देखील राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जण सध्या बंगळुरूमध्ये असून त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या प्रतींसह फोटो देखील काढला आहे. यामुळे आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. हे होत असताना काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी देखील मध्य प्रदेशमधील आमचे सरकार वाचेल असे मला वाटत नाही, असे म्हटले आहे. हे सांगताना ते शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, हे सांगण्यास ते विसरत नाही. जहाज बुडत असताना ते वाचण्याऐवजी आपण जहाजावरील कॅप्टनला पदावरून दूर केले आहे, असा हा प्रकार झाला. काँग्रेस पक्ष कुठे चालला आहे, हे दाखवणारे त्यांचे हे दिशाहीन राजकारण आहे.

मध्य प्रदेश निवडणुकीचे निकाल लागल्यापासून शिंदे काँग्रेसवर नाराज होते. खरेतर ही निवडणूक जिंकण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र, सत्ता आल्यानंतर त्यांना डावलले गेले. कदाचित शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यास आपले उरले सुरले राजकारण संपवून टाकतील, या भीतीमुळे कमलनाथ आणि दिग्विजय सिंग या दोघांनी शिंदे यांच्या निर्णयांना महत्त्व न देता त्यांना कायम दोन हात दूर ठेवले गेले. १८ वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहून आपल्याला अपेक्षित फळ मिळाले नाही, अशी नाराजी शिंदे यांना सलत होती. गंमत म्हणजे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही शिंदे यांना मिळालं नाही, कमलनाथ यांनीही ते पदही स्वतःकडे ठेवत शिंदे आपल्यापेक्षा मोठे होणार नाहीत, असा अट्टाहास केल्यामुळे या नाराजीत आणखी वाढ होत गेली. शिंदे यांना राज्यसभेवर निवडून आणत केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार भाजप करत असल्याची चर्चा आहे. हे करताना शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पुन्हा एकदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात येईल, असे दिसते. अजून कमलनाथ सरकार कोसळले नसतानाही मंगळवारी चौहान यांच्या घरावर विजयाची गुढी उभारण्यात आली. मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा असून ११४ आमदार असलेल्या काँग्रेसने सत्ता स्थापन करत इतर ६ आमदारांचा पाठिंबा मिळवला होता. मात्र, आता १९ आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसकडे ९५ आमदार राहिले असून १०७ वर असलेली भाजप बंडखोर आमदारांसह बहुमताच्या दिशेने जात आहे. आता ते कधी सत्ता स्थापन करतात ते पाहायचे. मात्र, मध्य प्रदेश सत्तांतराच्या दिशेने जात असताना आता भाजपचे मिशन राजस्थान आणि महाराष्ट्र… असा कल्ला करत भाजपचे भक्त मात्र सोशल मीडियावर चेकाळत सुटलेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -