घरफिचर्सअनुभवलेली आणीबाणी !

अनुभवलेली आणीबाणी !

Subscribe

जुलै 1974 मध्ये बिहार विधानसभेच्या रिकाम्या जागांसाठी नियमानुसार निवडणुका घेणे आवश्यक होते, परंतु निवडणूक आयुक्तांवर दबावतंत्राचा वापर करून त्या बेमुदत पुढे ढकलल्या. 2 ऑक्टोबर 1974 पासून तीन दिवस बिहार बंद झाला. 4 नोव्हेंबरला सर्व मंत्र्यांना घेराव घालण्यात येणार होता. वाहतूक यंत्रणेवर निर्बंध होते तरीही 50 हजारांपेक्षा अधिक लोक पाटण्यात जमले होते. याच मोर्चात जयप्रकाशजींसह अनेक नेत्यांना लाठीमाराला सामोरे जावे लागले. या निदर्शनानंतर इंदिराजींनी निवडणुकीस आपल्या मागे जनता आहे हे सिध्द करण्याचे जयप्रकाशजींना आव्हान दिले. हे आव्हान स्वीकारत जयप्रकाशजींनी 18 नोव्हेंबर 1974 रोजी जाहीर सभा बोलावली. पाटण्याच्या इतिहासात एव्हढी विराट सभा कधी झाली नव्हती. ‘जनता येत आहे-सिहांसन खाली करा.’ ही घोषणा होत होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला २६ जूनला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या आणीबाणीत आलेल्या धगधगीत अनुभवांना दिलेला उजाळा.

26 जून 1975 ला लादलेल्या आणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाली. आताही आपण आणीबाणीतल्या निर्बंधात आहोत. ती आणीबाणी आणि आताची आणीबाणी यात फरक आहे, त्या 45 वर्षांच्या आणीबाणीचा मागोवा घेऊ.

1975 ला लादलेली आणीबाणी अराजकतेमुळे लादली गेली का ? काही राजकीय अभ्यासकांच्या मते, पोलीस सशस्त्र दलांना बंडाची दिलेली चिथावणी, रेल्वे रुळ, पूल स्फोटके वापरुन उडविण्याचा प्रयत्न, 1974 चा रेल्वे संप, राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न, नक्षलवाद वाढत होता. बंगाल, कोलकाता यांना त्याची झळ बसत होती. 1960 च्या महागुजरात निर्मितीनंतर गुजराती अस्मिता फुलू लागली. 1969 ला अहमदाबादला झालेल्या जातीय दंगलीने झालेले नुकसान – 1971 च्या युध्दानंतर वाढलेली महागाई, उभी राहिलेली विद्यार्थी आंदोलने आणि उभी राहिलेली नव निर्माण चळवळ.

- Advertisement -

जुलै 1974 मध्ये बिहार विधानसभेच्या रिकाम्या जागांसाठी नियमानुसार निवडणुका घेणे आवश्यक होते, परंतु निवडणूक आयुक्तांवर दबावतंत्राचा वापर करून त्या बेमुदत पुढे ढकलल्या. 2 ऑक्टोबर 1974 पासून तीन दिवस बिहार बंद झाला. 4 नोव्हेंबरला सर्व मंत्र्यांना घेराव घालण्यात येणार होता. वाहतूक यंत्रणेवर निर्बंध होते तरीही 50 हजारांपेक्षा अधिक लोक पाटण्यात जमले होते. याच मोर्चात जयप्रकाशजींसह अनेक नेत्यांना लाठीमाराला सामोरे जावे लागले. या निर्देशनानंतर इंदिराजींनी निवडणुकीस आपल्या मागे जनता आहे हे सिध्द करण्याचे जयप्रकाशजींना आव्हान दिले.

हे आव्हान स्वीकारत जयप्रकाशजींनी 18 नोव्हेंबर 1974 रोजी जाहीर सभा बोलावली. पाटण्याच्या इतिहासात एव्हढी विराट सभा कधी झाली नव्हती. जनता येत आहे-‘सिहांसन खाली करा.’ ही घोषणा होत होती.

- Advertisement -

15 फेब्रुवारी 1975 रोजी जयप्रकाशजींनी विरोधी पक्ष पुढार्‍यांची बैठक आयोजित केली. या सभेस माझा लढा सांस्कृतिक परिवर्तन, शैक्षणिक समस्यांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे 2 मार्च रोजी मोहन धारीयांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी केली गेली. 6 मार्च 1975 दिल्ली मोर्चाने जय प्रकाशजींचे आंदोलन बिहारपुरते सीमीत न रहाता ते देशव्यापी झाले. सत्तारुढ पक्षावर जनतेचा दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता. अहिंसक मार्गाचा हा लढा होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 12 जून रोजी इंदिरा गांंधीनाच 6 वर्षे निवडणुकीस उभे राहण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.

गुुजरातमध्येेही जनता आघाडीचे लोक बहुमताने निवडून आले. रामलीला मैदानावर इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी झालेल्या विराट सभेत जयप्रकाशजींनी भाषणात म्हटले, ‘लष्करी शिपायांना कायद्याच्या विरोधी कोणी हुकूम दिला तर तो त्यांनी नाकारावा’. लष्करात बंडखोरी माजवू बघतात असा आरोप करीत जयप्रकाशजींना पहाटे अटक केली गेली. इथेच 26 जून 1975 पासून आणीबाणी लादली गेली. यावेळी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अनेक नेत्यांनी यावेळी असाही निर्णय घेतला की कायदा मोडून तुरुंगात जायचे नाही. उलट खेडोपाडी जावून लोकशिक्षण करायचे. यावेळी एस. एम. जोशींनी किमान 2 लाख लोकांशी संपर्क साधून देशात काय घडते आहे हे लोकांना सांगण्याचा संकल्प केला. खेडोपाड्यात जाऊन मोठ्या कष्टाने त्यांनी हा संकल्प पूर्ण केला. कित्येक देशप्रेमी सहभागी झाले होते.

आणीबाणीतील अटक झालेल्या कुटुंबीयांतील मुलांच्या शिक्षणाचे सातत्य कायम रहावे, त्यांच्या घरची चूल पेटावी म्हणून मदतीसाठी सदैव तयार असलेले डॉ. पी. व्ही. मंडलीक, लढा यशस्वी व्हावा व गजाआड असलेल्यांची वाण होवू नये म्हणून पायांला भिंगरी लागल्यागत सातत्याने राबणारे प्रभूभाई संघवी त्यांना मदत करणारे राजाभाऊ पाटील यांच्या मेहनतीला दाद द्यायला हवी.

आणीबाणीत मिसाखाली 34,988 तर डी.आय.आर. खाली 75,818 अश्या एकूण 1,10,806 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. ही संख्या स्वातंत्र्यलढ्यातील सत्याग्रहींपेक्षा अधिक होती.

इंदिरा गांधींनी जाहीर केलेला 20 कलमी कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या अमंलबजावणीत सप्टेंबर 1973 मध्ये 17 लाख नसबंदी झाल्या. वर्षभरात नसबंदीचा आकडा 80 लाखांवर गेला. सत्तेचा अर्मयाद वापर झाला.

सेन्सॉरशिपमुळे वृत्तपत्रांसह प्रसिध्दी माध्यमांवर बंधने आली. संजय, बन्सीलाल, यशपाल कपूर या बाल-लाल-पाल यांचा स्वैराचार लोकांच्या ध्यानी आला. आणीबाणीत कैद्यांनाही दिली गेलेली वागणूक जनतेच्या जिव्हारी लागली. आणीबाणी जेव्हा मागे घेतली गेली तेव्हा मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पराभूत होऊन – जनता पक्ष सत्तेवर आला आणि अल्पावधीत सत्ता गमावूनही बसला.

आणीबाणी काळात झालेल्या परिणामास जनसंघ मुख्य प्रवाहात आला. अनेक राज्यात काँग्रेसची पिछेहाट झाली. आणीबाणीत सेन्सॉरचा बडगा असतानाही काही वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणीबाणी विरोधात विचार मांडत राहिले. साधना, कर्तव्य, राजमोहन गांधी यांचे हिंमत नियतकालिक, दिल्लीला अमिया राव व बी.जी. राव यांनी सत्य समाचार बुलेटिन चालू केले होते. बिहारमधून तरुण क्रांतिदार, दिल्लीतून आवाज व चिंगारी, तामिळनाडूतून रेजिस्टन्स, मुंबईतून गोपालांचे ओपिनिअन व नानासाहेब गोरे संपादित जनता गुजरातमधून भूमिपूत्र, महाराष्ट्रातून साधना ही मात्र जनतेच्या बाजूने होती. लेखन उच्चार व मुद्रण स्वातंत्र्यासाठी या नियतकालिकांनी लढा दिला.

महाराष्ट्रात आणीबाणीचे साहित्य तयार करण्यासाठी त्या काळात प्रभूभाई संघवींनी आपल्या सहकार्‍यांसह यंत्रणा राबिवली. जॉर्ज फर्नाडिस यांचे एका हुकूशाहीची कुळकथा-ज्याचे मराठी भाषांतर प्रा. पुष्पा भावे यांनी केले. कोणीही ही पुस्तिका छापण्यास तयार होईना. प्रभुभाईंनीच त्यातून मार्ग काढला. त्यांनी ते माझ्याकडून सुवाछ अक्षरात लिहून घेतले. त्यासाठी एक जागा निश्चित करण्यात आली, तीही निर्जन वस्तीतील. सुप्रसिध्द चित्रकार व्ही. ए. ओके यांचे ते घर होते. त्या घरातच माझ्या हस्ताक्षरात जॉर्ज फर्नाडिसांची हुकूमशाहीची कुळकथा काळ्या शाहीने लिहिली गेली. त्याचे मुखपृष्ठही ओके यांच्या कुुंचल्यातून साकारलेले. ती पुस्तिका गोविंद सावंतने तशीच्या तशी छापली. गोविंद सावंतच्या छोटेखानी प्रेसमधून मी आणि राजाभाऊ यांनी पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे एका टॅक्सीत भरले. थेट निघालो. पुस्तकांच्या त्या प्रति कोणीही आपल्या घरी ठेवून घेईना. शेवटी त्या मीच माझ्या घरी माळ्यावर ठेवल्या. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी एका रात्री माझा भाऊ कै. दिनकर सावंत यांनी त्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत लपवून ठेवल्या. पुढे त्या पुस्तकाचे काम सुरळीत सुरू झाले आणि आणीबाणी उठल्यावरही ती पुस्तके लोक घेत होते. त्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी त्या पुस्तिकेचा उपयोग केला. नायगावात सत्याग्रह घडविणे, पत्रकांचे वितरण करणे आदी कामे प्रामुख्याने विनायक जागृष्टे, विष्णू आंग्रे, सुभाश सरफरे, चंद्रा श्रीनिवासन, नाटेकर, गिरकर मास्तर, बाप्पा कुणकेकर, यशवंत गावंड आदी प्रमुख मंडळी करीत होती. तर एरवडा-ठाणे येथील तुरुंगात मुंबईचे कार्यकर्ते अधिक असल्याने त्यांच्या कुटुंबियांना आठवड्यातून एकदा बसने घेऊन जाण्याची जबाबदारी मोतीराम केणींनी बजावली. त्याकाळात राष्ट्रसेवा दलाची स्वतःची बस होती. आणि तिचे सारथी होते पांचाळ.

अटक झालेल्यांचे खटले भोईवाडा कोर्टात चालत. कोर्टात तारखेसाठी येणार्‍या सत्याग्रहींच्या भोजनासाठी व्यवस्था नायगावची मंडळी पहात.

सत्याग्रहींच्या केस लढवल्या त्या अ‍ॅड.चंद्रकांत शेेट्ये, अ‍ॅड. मेघनाथ गिरकर, अ‍ॅड. शरद मोकाशी, अ‍ॅड. रवींद्र मिश्री या वकिलांनी.

मुंबईतून असंख्य कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नायगावातून सरला संसारे, संचिवनी आंग्रे, गोविंद गजमल, तुकाराम तावडे, अनंत नवले, जॉर्ज पटेल, मनोहर नाईक, रघुनाथ रजपूत, सदाशिव इप्ते, प्रभाकर कामत, मनोहर फाटक यांना अटक होऊन तीन महिन्याचा कारावास भोगावा लागला. आर्थर रोडच्या त्या जेलमध्ये वयाने मोठी असलेली माणसे मी तरुण होताना पाहिली. विनोद सांगताना व चर्चा करताना वयस्कांच्या अंगात तरुणाई संचारताना अनुभवली. संभा चव्हाण, कमलाकर ठाणेकर, कृष्णकात नेवरेकर, सोंगसिंग कोहली अशी किती नावे घ्यावीत ? आमच्या सोबतच सत्याग्रहात सामील झालेला माधव प्रभू हा उत्तम कूक होता. चलाखिनी जेलच्या आत त्याच्या हातची अंड्याची बुर्जी खाण्याची मजा और होती. ती गफलत एकदा आमच्या अंगाशी आली. आणि जेलरच्या लाठीमारास सामोरे जावे लागले.

9 जानेवारीचा दिवस का कुणास ठावूक सत्याग्रही माझ्या सभोवती येत होते. बोलत होते. प्रत्येक जण माझ्या वडिलांची चौकशी करीत होते. जॉर्ज दादाच्या घरुन डबा आला होता. रात्रीच्या गप्पा रंगल्या आणि गजमलांनी मला वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली. गजमलांच्या कुशीत शिरुन अश्रू ढाळले आणि स्वतःला सावरले. बॅरॅकमधील सर्व सत्याग्रही एकत्र जमले…… श्रध्दांजली….. मी स्तब्ध.

रात्री झोपताना मी गतस्मृतीत शिरलो. पुन्हा आठवणी दाटून आल्या. मी पांघरुन डोक्यावर घेऊन अश्रूंना वाट करुन देत होतो. शेजारी झोपलेल्या माधवने कानोसा घेतला. पुन्हा सगळ्यांचे जागणे, समजावणे, रात्र सरली….. गजमल, जॉर्ज पटेल, बाबा तावडे, मनोहर नाईक, सोबतीला माधव प्रभू यांनीच माझ्या सामानाची आवराआवर केली. कोणा सहकार्‍यानेच माझी बॅग उचलली. जेलरच्या दिशेने जडपायाने चालू लागलो. जेलरच्या कचेरी बाहेर विष्णू आंग्रे, विनायक जागृष्टे, चंद्रा श्रीनिवासन हे तिघे उपस्थित होते. मी दिसताच जेलर नाना क्षिरसागर पुढे आले त्यांनी सांत्वन केले. योगायोग त्यांची मुलगी स्मिता माझ्या वर्गात होती. बाहेर निघण्याच्या तयारीत मी बॅरॅककडे वळून पाहिले. सर्व साथी एकसाथ उभे राहून गजाआडून पहात होते. मला सोडण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची माफी मागण्याचे पत्र चंद्राने दाखविले. क्षणार्धात माझ्या मनाने कौल दिला. दुःखद घटना घडलीच आहे माफी मागून चळवळीचा अपमान करण्यापेक्षा पुन्हा परतलेले बरे ! त्याक्षणी मी निर्णय घेतला आणि माफी मागणार नाही, असे प्रगट केले. क्षणभर सारे स्तब्ध झाले. बॅग घेवून मी पुन्हा परतलो तो आमच्या बॅरॅकच्या दिशेने सारे काही पुन्हा शांत…… एक गडद छाया. त्या दुःखद छायेतच मी मला सावरले चळवळीच्या यशासाठी.

जयप्रकाशजी जेव्हा सरकारी मदत नाकारतात !
जयप्रकाशजींना मूत्रपिंडाचे कार्य पार पाडण्यासाठी जे यंत्र घ्यावे लागणार होते, त्यासाठी व जयप्रकाशजींच्या स्वास्थ्यासाठी निधी जमविण्याच्या कामी पू.रवि शंकर महाराज, केदारनाथजी, दादा धर्माधिकारी, स्वामी आनंद यांनी निधीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार काही निधी जमला. शांतिलाल शहा, एस.एम. जोशी, मोहिद्दिन हॅरिक, नारायण देसाई, राजेश्वर प्रसाद व प्रभुभाई संघवी यांची विनियोग समिती नेमण्यात आली. पैश्यांची आणखी गरज लागली तेव्हा एस.एम. जोशींनी काहींना व्यक्तिशः पत्रे लिहिली. तीन महिन्यात 1 लाख 56 हजार रुपये जमा झाले. या समितीने जवळ जवळ 6 लाख रुपये जमविले. इंदिराजींकडून 90 हजार रुपयांचा ड्राफ्ट आला. डाललिसिस प्रक्रिया करण्याच्या यंत्राची पूर्ण किंमत देण्यास त्या तयार होत्या. ही रक्कम स्वीकारण्याबाबत काही हितसंबंधींकडून दबाब येत राहिला, तरीही जयप्रकाशजींनी इंदिरा गांधीना लिहिले, ‘मी आपण पाठविलेला चेक स्वीकारु शकत नाही, याबद्दल दिलगीर आहे. पंतप्रधान निधीतून आपण ही रक्कम देत आहात. या रकमेचा उपयोग इतर अनेक नैसर्गिक आपत्तींसाठी आपणास करता येईल. माझी गरज जवळपास पूर्ण झालेली आहे. तरी माझ्याबद्दल आपण जी आस्था दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे.

-भास्कर सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -