घरफिचर्समेंदू ताब्यात घ्या, माणसे ताब्यात येतात...!

मेंदू ताब्यात घ्या, माणसे ताब्यात येतात…!

Subscribe

आयुष्यभरासाठी! वरून आदेश येतो आणि मग मेंदू कामाला लागतो आणि मागचा पुढचा, कुटुंबाचा, समाजाचा विचार न करता आदेशाचे पालन केले जाते.

भीमा कोरेगाव झाले, पोरेबिरे झाली आणि आता भिडेंनी आपले हुकमी अस्त्र मनू बाहेर काढून थेट तुकोबा ज्ञानोबा माऊलींवर हल्लाबोल केलाय आणि तरीही आम्ही शांतचित्त! आणि वर मुख्यमंत्री सांगणार : भिडेंची चौकशी सुरु आहे . भिडेंचा बोलविता धनी कोण आहे, हे न समजण्याइतके लोक आता खुळे राहिलेले नाहीत. अन्यथा शेतकर्‍यांचा जोडधंदा असलेल्या शेळी पालनामधील बोकडांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची हिंमत जैन समाजाला झाली नसती.

स्थळ १ : सायन चुनाभट्टी. काळ- १९८१ : राष्ट्रसेवा दलाचे शिबीर : साने गुरुजींचा फोटो आणि एक ओळ : खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. स्मिता पाटील आणि निळू फुले मार्गदर्शनाला. गिरणगावातील सारे शाळा आणि कॉलेजचे युवक हजर. त्यातलाच मी एक दहावीतला मुलगा. महादेव शिवकर, पंढरीनाथ तांडेल या जनता पक्षाच्या सीनियर कार्यकर्त्यांनी सर्व मुलामुलींना एकत्र केलेले. आणीबाणीला विरोध करताना साथी जयप्रकाश नारायण यांनी दिलेला संपूर्ण क्रांतीचा नारा युवकांच्या कानात कायम गुंजत असल्याने शिबिरात प्रचंड उत्साह. याच शिबिरातील अरुण शिवकर, प्रफुल्ल दळवी यांनी पुढे जाऊन स्वतःला सामाजिक कामांमध्ये झोकून दिले. तर सुरेखा दळवी, उल्का महाजन यांचा रायगड जिल्ह्याच्या आदिवासी भागातील कामाचा निर्धार झाला होता.

- Advertisement -

स्थळ २ : विक्रोळी, कन्नमवार नगर : काळ- १९८६- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सायंवर्ग : संघाचा झेंडा रोवलेला आणि एक साथच्या सुरात खाकी हाफ पॅण्ट घालून एक युवक छोट्या छोट्या मुलांना देशभक्ती आणि हिंदू धर्माचे धडे द्यायचा. बर्‍याच मुलांना सुरुवातीच्या खेळात रस असायचा, नंतर ती कंटाळून जायची. हळूहळू ती यायची बंद व्हायची. मग तो सायंवर्ग घेणारा युवक घरी जाऊन मुलांना शाखेत आणायचा. पोरे मग लपून बसायची. पण तो युवक कधी निराश झालेला मी पाहिला नाही. त्याने आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि पुढे जाऊन याच वर्गातून कामगार वर्गाच्या वसाहतीत कट्टर हिंदूत्ववादी तयार झालेले मला पाहायला मिळाले.

स्थळ ३ : वेंगुर्ले : काळ : २०१३ : ग्रामदेवता सातेरी देवीची जत्रा. सर्व गाव देवीच्या दर्शनाला लोटलेला. कोकणी माणूस देवभोळा असला तरी उगाच कुठल्या धर्म पंथाच्या मागे फरफटत जाणारा कधीच नव्हता. मात्र याच जत्रेत आमच्याच गावच्या आजूबाजूची २०-२५ मोठी माणसे, काही युवक हातात एका हिदू संघटनेचे बोर्ड घेऊन उभी होती. चेहरे कमालीचे शांतचित्त. एखाद्या यंत्रासारखे. कोणी तरी आदेश दिल्यासारखे. हातात हिंदू धर्माची पुस्तके. ती विकत घ्यायचा आग्रह नाही. हेच तरुण- तरुणी मग सिंधुदुर्गमधील जत्रांच्या तीनचार महिन्यांच्या काळात सर्व पंचक्रोशीत तशीच यंत्रवत चेहर्‍यांनी उभी. कर्नाटक पोलिसांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या शोधात पकडलेला एक आरोपी हा त्याच रांगेतला एक होता, हे आता कळतंय…

- Advertisement -

या तिन्ही घटना मेंदूत फिट बसल्यात. ही काहीतरी मेंदूचीच गडबड आहे. नाही तर तुमच्या आमच्यासारखी, सर्वसामान्य घरातील मुलेमुली टोकाचा विचार कसा काय करू शकतात. आज वरील तिन्ही घटनांचा एकमेकांशी संदर्भ लावला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते- मेंदू ताब्यात घ्या, माणसे आपसूक ताब्यात येतात…आयुष्यभरासाठी! वरून आदेश येतो आणि मग मेंदू कामाला लागतो आणि मागचा पुढचा, कुटुंबाचा, समाजाचा विचार न करता आदेशाचे पालन केले जाते. थेट माणसे मारण्यापर्यंत मजल जाते आणि मारली जाणारी माणसे ही… बाबानो, धर्माबिर्माच्या मागे जाऊ नका, त्यामधून कधीच काही हाती आलेले नाही. आलाय तो फक्त दुसर्‍या धर्मांचा दु:स्वास, अशी सांगणारी असतात. त्यात गौरी लंकेश यांच्याप्रमाणे पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी असतात…!

शाहू, फुले,आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात गेले काही महिने जो काही धिंगाणा सुरू आहे तो भिडे यांनी ताब्यात घेतलेल्या मेंदूचाच एक प्रकार आहे. अन्यथा अनेक दशके शांतचित्त असलेले भीमा कोरेगाव अचानक कसे काय पेटते? हा एका रात्रीत झालेला चमत्कार नाही. मेंदू ताब्यात घेण्याचे वर्ग अनेक वर्षांपासून सुरू होते आणि आताही सुरु आहेत… त्याचे गोंडस नाव आहे, ‘गड किल्ल्याची माहिती आणि शिवाजी महाराजांचा इतिहास’. पण, महाराजांनी इतर धर्माचा दु:स्वास करायला सांगितले नव्हते. तो रयतेचा राजा होता. नाव शिवाजीचे आणि कट मनू पुन्हा आणण्याचा… हे होत आहे. कारण भिडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार आहे. हे काय सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. भिडे फक्त भीमा कोरेगाव पेटवून मोकळे झालेले नाहीत. आधी त्यांनी मेंदू ताब्यात घेतलेला शिष्य वर्ग तयार करून घेतला. ते फक्त आदेश देणार. माझ्या बागेतील आंबे खा आणि होत नसतील तर पोरेबिरे होतील… खरे तर भिडेंचे आधुनिक संशोधन पाहून या विषयावर आपले आयुष्य वेचणार्‍या डॉक्टर, संशोधकांनी आपले शोधबिध बंद करून भिडेंच्या बागेतील आंबे प्रयोगशाळेत ठेवले पाहिजेत. ‘आंबे खा, पोरे घ्या…’ आहे की नाही गंमत!

भीमा कोरेगाव झाले, पोरेबिरे झाली आणि आता भिडेंनी आपले हुकमी अस्त्र मनू बाहेर काढून थेट तुकोबा ज्ञानोबा माऊलींवर हल्लाबोल केलाय आणि तरीही आम्ही शांतचित्त! आणि वर मुख्यमंत्री सांगणार : भिडेंची चौकशी सुरु आहे . भिडेंचा बोलविता धनी कोण आहे, हे न समजण्याइतके लोक आता खुळे राहिलेले नाहीत. अन्यथा शेतकर्‍यांचा जोडधंदा असलेल्या शेळी पालनामधील बोकडांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची हिंमत जैन समाजाला झाली नसती. आपल्यामागे मुख्यमंत्री आहेत, आपल्या सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, हे जाणूनच भिडे आणि जैन समाज अचानक शांतचित्त जीवनात विषप्रयोग करू लागतात.

जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद आणि धर्मभेद या कर्मकांडाच्या भिंती उभ्या करून वेदाला आणि देवाला कोंडून ठेवणार्‍या कणखर भिंती उखडून टाकण्यासाठी ज्ञानोबारायांनी विश्वात्मक कल्याणासाठी देवाकडे पसायदान मागितले. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा मेळा भेदाभेद भ्रम अमंगल,’ असा आकाशाएवढा व्यापक भक्तीवाद तुकोबांनी जगापुढे मांडला आणि हाच महाराष्ट्राचा वारसा आहे. तो हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भिडेंसारखे मनुवादी पुढे येत असतील तर, ‘भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी…’ असा तुकोबारायच रोखठोक भक्तीवादही सांगतो….

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -