घरफिचर्सकरोनाचे आक्रमण आणि सामूहिक जबाबदारी !

करोनाचे आक्रमण आणि सामूहिक जबाबदारी !

Subscribe

मुंबई, ठाणे असो वा कल्याण या शहरात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातही करोनाच्या रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. करोनाचा विषाणू रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारच्या आवाहनाला साथ देणे गरजचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच दुकाने कार्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. गर्दी टाळून प्रत्येकाने घरी बसा, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर ते आपल्याच जीवावर बेतणार आहे.

सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे करोना नावाच्या व्हायरसची. जगभरात फोफावणार्‍या या विषाणूमुळे पृथ्वीवरील मानवजात भयभीत झाली आहे. करोना हा संसर्गजन्य असल्याने त्याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. परदेशातील घोंघावणारे हे आक्रमण थेट मुंबई, ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत पोहचलं आहे. लाखो लोक नोकरी व्यवसायनिमित्त लोकल ट्रेन, बसमधून प्रवास करीत असतात. त्यामुळेच त्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. राज्य असो वा स्थानिक प्रशासन सर्वच पातळीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. करोनाचे आक्रमणही महाभयानक आहे. त्यामुळे हे परकीय आक्रमण थोपवायचे असेल तर देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी प्रत्येकाने एकजूट, एकसंध आणि एकोपा ठेवूनच लढा द्यावा लागणार आहे.

मुंबई, ठाणे असो वा कल्याण या शहरात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातही करोनाच्या रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. करोनाचा विषाणू रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारच्या आवाहनाला साथ देणे गरजचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच दुकाने कार्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. गर्दी टाळून प्रत्येकाने घरी बसा असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. युध्दापेक्षाही महाभयंकर असे हे सकंट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूचित केले आहे. त्याचे गांभीर्य प्रत्येक भारतीयाने ओळखण्याची गरज आहे.

- Advertisement -

मात्र अजूनही काहीजण सरकारचा आदेश पाळत नसल्याचे दिसून येतेय. त्यामुळे आपण किती गांभीर्याने वागत आहोत हेच यातून प्रकट होतंय. देशावर राज्यावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी आता प्रत्येकालाच सरकारच्या आवाहनाला साथ द्यावी लागणार आहे. प्रत्येकानेच स्वत:ची जबाबदारी म्हणून याकडं पाहिलं पाहिजे. कारण कोणतीही बेफिकिरी हे आपल्या आणि इतरांच्याही जीवावर उठू शकते हे तितकचं सत्य आहे. लोक सजग नाहीत असे मुळीच म्हणता येणार नाही. अनेकांनी सरकारच्या आवाहनाला साथ देत घरीच राहणे पसंत केले आहे. पण आजही अनेकजण नोकरीनिमित्त लोकल आणि बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. तो त्यांच्या कामाचा भाग असल्याने त्यांनाही दोष कसा देता येईल. पण खबरदारी नक्कीच घ्यावी लागणार आहे. गेल्या देान दिवसांपासून गर्दीचे प्रमाण थोडेफार का होईना, कमी होऊ लागलंय हे आशादायक चित्र आहे.

करोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे सावट असणे साहजिकच आहे. डोंबिवलीत साधारण 19 जण हे परदेशातून आले आहेत. परदेशातून आलेला आपलाच व्यक्ती घरी परतल्यानंतर त्या सोसायटीतील रहिवाशी आणि त्या व्यकतीमध्ये वादंग होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागत आहे. मात्र संबधित व्यक्तीला करोनाची लक्षणे आढळून आली नसली, तरी सुध्दा त्या व्यक्तीने 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे ही रहिवाशांची अपेक्षाही चुकीची म्हणता येणार नाही. परदेशातून आलेल्या कल्याणातील एका व्यक्तीने तर मुंबई ते कल्याण टॅक्सीने प्रवास केलाच, परंतु सोलापूर येथे एका विवाह सोहळ्यालाही हजेरी लावली होती. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली हा वेगळाच भाग झाला. पण परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपल्याबरोबर इतरांच्याही सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे ही साधी सरळ गोष्ट आहे. पण ते गांभीर्य त्यांच्यामध्येही दिसून येत नाही. मध्यंतरीच्या काळात दुबईहून कल्याणात आलेल्या तरूणालाही मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पण पालिकेच्या रूग्णालयात तपासणीसाठी गेल्यानंतरही त्याला 45 मिनिटे वेंटींग करावी लागली होती. यातून आपली वैद्यकिय यंत्रणाही किती सक्षम आहे हेही दिसून येतंय. राज्यपातळीवर असो वा स्थानिक पातळीवर वैद्यकीयदृष्ठ्या आपली यंत्रणा तोकडी पडते हे लपून राहिलेलं नाही.

- Advertisement -

आजही राज्यात चाचणीची सुविधा नाही. ती वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलीत आहेत. पण ही पावले आपण लवकर उचलायला हवीत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशभरातून लोक येत असतात. शहरात सतत लोकांचा ओघ वाढत असतो, दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. लेाकलसेवा ही जीवनवाहिनी आहे ती थांबवली तर सगळ्याच सेवा ठप्प हेातील. त्यामुळेच लोकलसेवा बंदचा निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही. मुंबई ठाण्याची लोकसंख्या कोट्यवधीच्या घरात आहे. त्याप्रमाणात आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का, तर याचे उत्तर नाही असेच आहे. कारण ठाणे पल्याड असणारी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, बदलूपर, शहापूर, कसारा, कर्जत या शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम नाहीतच. इथल्या साध्या साध्या आजाराच्या रूग्णांनाही उपचारासाठी मुंबईला पाठवावे लागते. ही स्थिती नाकारून चालणार नाही.

इतक्या वर्षात कल्याण डोंबिवली सारख्या शहरात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल बांधू शकलेलो नाही. मग इतक्या मोठ्या आजाराचे संकट उभं राहिल्यानंतर त्याला आपण कसं सामोरे जाणार ? त्याचा सामना कसा करणार ? याचा विचार आपल्याला यापुढे करावा लागणार आहे. आपली सगळी मदार ही मुंबईतील हॉस्पिटल्सवर असते. पण लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईच्या हॉस्पिटल्सची क्षमताही मर्यादीत आहे. कोणतंही संकट असो वा आपत्ती ही कधीही सांगून येत नाही. पण करोनाच्या आक्रमणानंतर तरी आपले राज्यकर्ते काही धडा घेतील का? प्रत्येक शहरासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभी राहील का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पण सध्या तरी करोनाचे संक्रमण थांबवायचे असेल तर दहा दिवस गर्दीपासून प्रत्येकालाच अलिप्त राहावंच लागणार आहे. आता ही सरकारची नव्हे तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी बनली आहे ती आपण सगळेजण निभावूयात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -