घरफिचर्सकरूणाकराची ‘करोना संकट’!

करूणाकराची ‘करोना संकट’!

Subscribe

कुठल्याही संकटकाळात माणसाला प्रकर्षाने ईश्वराची आठवण होते. तो येऊन आपल्याला यातून तारेल, यासाठी माणूस त्याचीं प्रार्थना करू लागतो. सध्या करोना विषाणूने जगावर आक्रमण केलेले आहे, अशा परिस्थितीत जगातील ईश्वराला मानणारे लोक आपापल्या देवाचा धावा करत आहेत, तर दुसर्‍या बाजूला निरीश्वरवादी विचारत आहेत की, ज्या देवाला तुम्ही नेहमी भजता आणि पूजता तो अशा संकटकाळी करोनाविरोधी लस आणून तुम्हाला का देत नाही, त्यामुळे हे सगळे थोतांड आहे. ईश्वर ही संकल्पना मानवी उत्क्रांतीतून विकसित होत आलेली आहे. मानवी जीवनाचा ती आधार ठरत आलेली आहे, म्हणूनच तिला कितीही आव्हान दिले तरी ती टिकून आहे. म्हणूनच हे करूणाकरा, ईश्वरा, अशी साद घालताना अनेकजण दिसतात.

हे करूणाकरा, ईश्वरा, कृपादान देई मज, तुजविण कोण निवारी संकट, दृढताही तव पायी, हे गायक रामदास कामत यांनी गायलेले गीत सध्या करोना विषाणूच्या आक्रमणाच्या काळात विशेष प्रकर्षात अनेकांना जाणवत आहे. करोनाचा प्रसार रोखून त्याला संपुष्टात आणण्यासाठी जगभरात लॉकडाऊनचा पर्याय अवलंबण्यात आलेला आहे. अजून तरी करोना विषाणूला निष्प्रभ करणारी लस उपलब्ध झालेली नाही. बरे ज्या देवावर भरवसा ठेवायचा त्याची मंदिरे किंवा प्रत्येक धर्मीयांची धार्मिक स्थळे बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे ज्या देवांना लोक आपल्या धर्मस्थळावर जाऊन सदासर्वदा भजत आणि पूजत असतात, ते संकटकाळी कुठे जातात, असा प्रश्न विचार करणार्‍यांच्या मनात सहज येतो. सध्याच्या स्थितीत काही निरीश्वरवाद्यांनी तर थेट ईश्वरवाद्यांना कोंडीतच पकडलेले आहे. आता बोला कुठे आहे, तुमचा देव, असा प्रश्न करून त्यांना धारेवरच धरले आहे. तर तुम्ही काहीही म्हणा आमचा देव येऊन आम्हाला वाचवेल, असा विश्वास ईश्वरवादी व्यक्त करत आहेत.

खरे तर ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी यांच्यातील हा वाद पुरातन काळापासून चालत आलेला आहे. त्याचा आजवर काही निकाल लागलेला नाही. कारण ईश्वरवाद्यांचे म्हणणे असते की, देव आहे, तर दुसर्‍या बाजूला देव वगैैरे काही नाही, हे थोतांड आहे, यावर निरीश्वरवादी ठाम असतात. मानव समाजावर जेव्हा मोठे संकट येते, त्यावेळी तर ईश्वरवाद आणि निरीश्वरवाद याला चेव चढतो. कारण तेव्हा देवाची कसोटी लागत असते. देव असेल तर तो या संकटात माणसांना का वाचवत नाही, अशी चर्चा सुरू होते. सध्या तर जे करोनाचे संकट आले आहे, ते अखिल मानवजातीवर आलेले आहे. असे संकट पूर्वी जगावर कधीही आले नसेल, कारण या पूर्वी जरी संकटे आली तरी त्यावेळी धर्मस्थळे बंद करण्याची वेळ आलेली नव्हती. सध्या परिस्थिती अशी आहे की, देवाकडे मदत मागायला जावे, तर त्याच्याच घराचा दरवाजा बंद झालेला दिसतो. त्यामुळे अशा वेळी जावे कुणाकडे, असा प्रश्न ईश्वरवाद्यांना पडलेला आहे. काहींचे म्हणणे आहे की, सध्याच्या करोनाच्या संकटकाळात रस्त्यावर उभे राहून सेवा देणारे पोलीस, रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय तसेच स्वच्छता ठेवणारे सफाई कर्मचारी हे देव आहेत. हे लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करत आहेत, त्यामुळे देव देवळांमधून बाहेर पडून या लोकांच्या रूपात गरजवंतांची सेवा करत आहे, असा दावा करून काही मंडळी देव सध्या कुठे आहे, हे दाखवून त्याच्या अस्तित्वाचे जोरदार समर्थन करत आहेत. हे तुमचे लटके समर्थन आहे, ज्या देवाची तुम्ही दररोज पूजा करता, आरत्या करता तो कुठे आहे, असाही सवाल निरीश्वरवाद्यांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

मुळात देव या गोष्टीचा विचार मानवी मनात कधी आला याचा शोध घ्यावा लागेल. जगात जेवढे धर्म आहेत, त्यांचे देव वेगळे आहेत, तसेच त्यांच्या त्यांच्या देवाने वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या प्रकारे या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्या धर्माला मानणार्‍या अनुयायांसाठी जगण्याचे नियम बनवले आहेत. एका बाजूला जर मानवजात एक असेल तर मग जगाची निर्मिती धर्मानुसार वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या प्रकारे कशी काय होऊ शकते? वैज्ञानिकदृष्ठ्या विचार केला तर सध्या जगभरात जी मानवजात अस्तित्वात आहे तिला होमो सेपियन असे म्हटले जाते. मानवी जीवनाचा उगम हा सूक्ष्मजीवापासून झालेला आहे, हे शास्त्रीय संशोधन सांगते. धार्मिक ग्रंथांमधील संकल्पना आणि वैज्ञानिक संशोधन यात नेहमीच संघर्ष होत राहिलेला आहे. पृथ्वी सपाट आहे, असे बायबलमध्ये सांगितले आहे, या विधानाला आव्हान देऊन पृथ्वी गोल आहे, असे शास्त्रीय दृष्टीने सांगणार्‍या गॅलिलिओला तुरुंगवास भोगावा लागला.

सूक्ष्मजीवांपासून मानवाची उत्क्रांती होत गेली, तसा त्याच्या बुद्धीचा विकास होऊ लागला. या बुद्धीच्या विकासामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरू लागला. काळाप्रमाणे तो बदलत गेला. एखाद्या वाघ, सिंहाने आपल्या राहण्यासाठी आधुनिक गुहा बांधल्याचे दिसणार नाही, पण मानवाने मात्र त्याच्या घराची संकल्पना काळाप्रमाणे बदलून त्यात नवनवीन सुधारणा केल्या, त्याला आवश्यक आणि सोयीचे बदल केले. इतकेच नव्हे तर बहुमजली इमारती बांधल्या. माणूस जसा प्राथमिक अवस्थेपासून उक्रांत होऊ लागला, तसा त्याच्या बुद्धीचा विकास होऊ लागला. त्यातूनच त्याच्या जाणिवा विकसित होऊ लागल्या. सुरुवातीला विवस्त्र अवस्थेत राहणारा माणूस हळूहळू झाडाची पाने आणि साली अंगाभोवती गुंडाळू लागला. यात ऊन, वारा, पाऊस यापासून आपल्या शरीराचे रक्षण करणे हा जसा हेतू होता, त्याचप्रमाणे विकसित होत जाणार्‍या जाणिवेचाही भाग होता. सुरुवातीच्या काळात जंगलात आदिम अवस्थेत राहत असताना माणूस कळपात राहायचा, आजच्यासारखे नातेसंबंध त्यावेळी विकसित झाले नव्हते. त्यावेळी तो कळपात राहून जंगलात भटकंती करत असे. शिकार करत असे, पण त्याची एकूणच जीवनशैली ही भटकी होती. तो एका ठिकाणी राहत नसे, पण पुढे तो शेती करू लागला. त्यामुळे मग त्याला शेतीची राखण करण्यासाठी, पीक घेण्यासाठी एका ठिकाणी रहावे लागत असे. त्यातूनच एकत्र वस्त्यांची निर्मिती झाली. त्यातूनच मग पाड्यांची आणि गावांची निर्मिती झाली.

- Advertisement -

एकत्र राहत असताना त्याला एकत्र मनोरंजनाची गरज होती. त्यातून समूहगान आणि नृत्याची सुरुवात झाली. कुठल्याही जिवंत प्राण्याला भीती वाटते. तशी ती मानवाला वाटत होती. ती काल्पनिक अदृश्य गोष्टींपासून होती, तसेच जंगलातील श्वापदांपासून होती, सरपटणार्‍या प्राण्यांपासून होती, आजारांची होती. त्यामुळे या सगळ्यापासून आपले संरक्षण करणारा कुणीतरी हवा. त्यातूनच त्या तारकाची निर्मिती झाली. तो तारक दगडाच्या रूपात त्या मानवी समूहाने गावाच्या मध्ये मांडला. त्याला साक्षी ठेवून त्याच्या भोवती त्यांचे सगळे व्यवहार सुरू झाले. खर्‍याखोट्याचा न्यायही त्या शक्तीसमोर होऊ लागला. आजही आपण गावांचे निरीक्षण केले तर असे दिसेल की, गावाच्या मध्यभागी ग्रामदेवतेचे आणि ग्रामदेवाचे देऊळ असते. आदिम मानवाने स्थापन केलेल्या तारकाचे हेच ते घर होय.

पुढे मानवी समाज उक्रांत होत गेला. त्या उत्क्रांतीत संस्कृती विकसित होत गेली. त्यातूनच हे जग कुणी निर्माण केले असेल. या मागे कोण असू शकेल, असे प्रश्न त्याला पडू लागले. त्यात पुन्हा मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यामध्ये असलेला फरक त्याला जाणवू लागला. भोजन, निद्रा आणि प्रजनन या व्यतिरिक्तही एक आध्यात्मिक विश्व असू शकते. याची त्याला जाणीव होऊ लागली. मानवाला जसा जीव आहे, तसे मनही आहे, हे त्याच्या लक्षात येऊ लागले. मन आहे म्हणजे त्याला शांतीचीही गरज आहे, हे त्याला कळले. त्यातूनच मग त्या अदृश्य दिव्य शक्तीची आराधना हा मार्ग त्याने शोधून काढला. माणूस आणि मानवेतर प्राणी हे संस्कृतीने विभागले गेले आहेत. संस्कृतीची जाणीव जशी मानवाला आहे, तशी ती अन्य प्राण्यांना नाही. त्यामुळेच मानवाला इतर प्राण्यांपासून आपले वेगळेपणा लक्षात आले. माणूस देव या संकल्पनेची आराधना करतो आणि भूत या संकल्पनेला घाबरतो, पण अन्य मानवेतर प्राण्यांच्या बाबतीत असे होताना दिसणार नाही. देव ही संकल्पना मानवी उत्क्रांतीतून विकसित झालेली आहे. ज्यावेळी मानव आदिम अवस्थेत होता, त्यावेळी तो देव आणि भूत यांचा विचार करत नव्हता, पण पुढे मात्र या जाणिवा त्याच्यात विकसित झाल्या.

देव ही संकल्पना मानवी मनाला आधारभूत आहे, उपयुक्त आहे, म्हणूनच मानसाने त्याचा स्वीकार केलेला आहे. ही संकल्पना किती खरी किती खोटी हा मुद्दा बाजूला राहतो. ती मानवी जीवनाला उपयुक्त आहे, त्यामुळे त्याच्या अस्तित्वावर कितीही टीका झाली तरीही ती टिकून आहे. पूर्वीच्या काळी चार्वाकांनी देव आणि धर्म या संकल्पनेला आव्हान दिलेले आहे. या संकल्पना खोडून काढलेल्या आहेत. आजही बर्‍याच लोकांकडून असे आव्हान दिले जाते. तरीही देव ही मानवी जीवनाची गरज असल्यामुळेच तो टिकून आहे. काही लोक त्याचा आपल्या तुंबड्या भरण्यासाठी वापर करतात हा भाग वेगळा. त्यामुळे सध्या करोनाच्या आक्रमणाच्या काळात देव कुठे आहे, तो पुढे येऊन करोनाला का रोखत नाही, असा प्रश्न निरीश्वरवाद्यांनी कितीही केला तरी देवाचे अस्तित्व मोडून पडेल, असे वाटत नाही. कारण मानवी मनाला आधार देणारी ती एक संकल्पना आहे. त्यामुळेच या करोना संकट कालावधित, हे करूणाकरा, ईश्वरा, कृपादान देई मज, अशी प्रार्थना करताना बरेच जण दिसतात.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -