घरफिचर्सजागतिक अर्थव्यवस्थेला ‘करोना’ची बाधा !

जागतिक अर्थव्यवस्थेला ‘करोना’ची बाधा !

Subscribe

‘द फॅक्टरी’ म्हणून ओळखला जाणारा आणि जागतिक बाजारपेठांमध्ये आपला माल स्वस्त किमतीत ओतणार्‍या चीन या बलाढ्य देशाला सध्या करोना विषाणूने जेरीस आणले आहे. इतकेच नव्हे तर तो अन्य देशांमध्येही पसरत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. करोनाचा फटका विविध देशांतील शेअर बाजारांना बसला. चीनमधून येणार्‍या वस्तू आणि लोक यांच्याविषयी आता इतर देशांमधील लोकांना संशय वाटू लागला आहे. अमेरिकेच्या खालोखाल चीन एक बलाढ्य अर्थव्यवस्था आहे. चीनमधील शेनझेन व शांघाय हे दोन शेअरबाजार अनुक्रमे 3.52 टक्के आणि 2. 75 टक्क्यांनी कोसळले. आपला शेअरबाजार 1 टक्क्याने खाली आला. आपला रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला.

पूर्वी साथीच्या आजाराने एखादे गाव, नव्हे अनेक गावे त्रस्त, भयग्रस्त व्हायची. खुद्द मुंबई शहरात प्लेगची लागण झाल्यावर स्थलांतराची पाळी आली होती. पण तो काळ वेगळा होता. पुढे विज्ञान विकसित झाले, जुने आजार नेस्तनाबूत झाले. पण नव्या काळाने नवनवे आजार आपल्याला भेटीदाखल दिले. उदाहरणार्थ -पिवळा ताप, चिकन-गुनिया. आणि अलीकडे उद्भवलेला ‘करोना’ नामक भीषण विषाणू. त्याने माणसांना घेरले, अनेक देशांतील लोकांना पीडित केले. ‘विषाणू दहशतवाद’ उदयाला आलेला आहे, त्याने माणसांपलीकडे उद्योगाला -अर्थव्यवस्थेला पिडायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय? व्यक्तीला होणार्‍या रोगाने अर्थकारण कसे बिघडू शकते? इतके काय होते ? का होते? हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पार्श्वभूमी – एखादा साथीचा आजार मनुष्यहानी करतो हे आपल्याला माहीत होते, त्यातून कौटुंबिक हानी -अपरिमित नुकसान होते, परंतु देशव्यापी महाआजार किंवा भयंकर रोगराई उद्भवल्यामुळे देशातील लोकांना जसा संसर्ग पोहोचतो, तसा अर्थव्यवस्थेला जबरा तडाखा बसतो. जसा पूर्वी पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात जगभरातील सर्वच देशांना कमी-अधिक तडाखे बसलेले आहेत. इतकेच नव्हे तर दोन देशांत युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण जरी झाली, तरी त्यांच्या-त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्याशी संबंधित देशांवर दुष्परिणाम होतो.

- Advertisement -

मात्र अलीकडे जे नवनवीन आजार किंवा साथीचे विकार पसरत आहेत, त्याकारणांनी अवघ्या जगात भीतीचे वातावरण निर्माण होते, परिणामी माणसा-माणसातील संपर्क, देवाणघेवाण ठप्प होते. साधे व्यवहार अशक्य होतात, तर व्यापारउदीम कसे होणार? संसर्गातून पसरणारे जीवघेणे आजार इतकी दहशत निर्माण करतात की, दळणवळण, जनसंपर्क, वाहतूक इत्यादी गोष्टी विरळ होत जातात. अघोषित संचारबंदी असल्याप्रमाणे तंग वातावरण होते, अर्थव्यवहार होत नाहीत, म्हणजे नेमके काय होते हे पाहणार आहोत.

आक्रमण की अतिक्रमण – आजाराचे अर्थ-व्यवहारांवर आक्रमण की अतिक्रमण – हे ओळखण्याची साधी खूण म्हणजे जिथे आर्थिक उलाढाल होते तिथे म्हणजे शेअरबाजारात सर्वातआधी पडझड होते, लागलीच पडसाद उमटतात. कारण सेन्सेक्स हे अनेक बाबतीत संवेदनशील असतात. नैसर्गिक आपत्ती, निवडणूक वा अन्य कारणांनी राजकीय भूकंप किंवा उलथापालथ झाली किंवा सामाजिक घडामोडी घडल्या की बाजार गडगडतो, उसळी मारतो ! आपल्या देशांत 24 फेब्रुवारीला नेमके हेच घडले. आपला शेअरबाजार कोसळला. याचे मुख्य कारण अंतर्गत किंवा विदेशी राजकारण नव्हते, तर चक्क ‘करोना’ हा आजार कारणीभूत होता. आणि अशी पडझड देशातील महत्वाच्या शेअरबाजारात झालेली होती.

- Advertisement -

चीनमधील भयंकर आजारामुळे चीनशी व्यापारी संबंध असलेल्या देशांवर आणि इतरांवर परिणाम होणे स्वाभाविक होते. कारण अमेरिकेच्या खालोखाल चीन एक बलाढ्य अर्थव्यवस्था मानली जाते. चीनमधील शेनझेन व शांघाय हे दोन शेअरबाजार अनुक्रमे 3.52 टक्के आणि 2. 75 टक्क्यांनी कोसळले. आपला शेअरबाजार 1 टक्क्याने खाली आला. आपला रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला. तरी बरे की, चीनमध्ये या काळात नवीन वर्षाची मोठी सुट्टी असते म्हणून अनेक चिनी पर्यटक विदेशात फिरायला जातात. यंदादेखील किमान 70 लाख चिनी नागरिक जग पर्यटनाला बाहेर पडले. हा आकडा 2019 च्या तुलनेत 40 टक्क्यांनी खाली आला असे म्हटले जाते.

अल्पकालीन व दीर्घकालीन परिणाम- अशा जागतिक स्तरावर मानवी जीवनावर परिणाम करणार्‍या आजाराचे अल्प व दीर्घकालीन परिणाम घडत असतात. असे आजार आपल्या देशांमध्ये पसरू नयेत म्हणून प्रत्येक देश तातडीने उपाय करतो. चीनमधून येणार्‍या सर्वच प्रवाशांबाबत अतिदक्षता घेतली गेली, आपल्या नागरिकांनी तिथे जाणे टाळावे असे काही उपाय अवलंबिले गेले. असा जीवघेणा विषाणू आपल्याकडे येऊ नये, पसरू नये म्हणून त्यातही माणसे तसेच वस्तूंच्या ने-आणण्यावर बंदी घातल्याने साहजिकच आयात-निर्यात व्यापार कोलमडू लागतात. बाजारपेठेवर परिणाम होतो, तसेच तिथून येणारा कच्चा माल येऊ न दिल्याने लगेच चणचण निर्माण होते, परिणामी उत्पादन थांबू शकते. आयात-निर्यात करण्यावर बंधने येतात. सार्वजनिक आरोग्य व सुरक्षा हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो, म्हणून नेहमीचे व्यवहार रद्दबातल होतात.

अर्थव्यवस्थांची महाकोंडी – चीन अर्थव्यवस्थेची कोंडी आणि बाकीच्यांची महाकोंडी झालेली आहे. निव्वळ शेअरबाजार नव्हे तर उत्पादन, आयात-निर्यात अशा महत्वाच्या घटकांवर पडसाद उमटू लागतात. आंतरराष्ट्रीय व्यापार कोलमडला तर देशांतर्गत व्यापाराचे काय होणार? परकीय कमाई होणार नाही किंवा रोडावणार ! त्यावर लागलीच व दीर्घकालीन उपाययोजना करणे क्रमपाप्त असते. चीननेही नेमके हेच केले. अमेरिकेहून येणार्‍या मालाची आवक वाढावी म्हणून आयातीवर असलेला कर कमी केला, हेतू हा की, तिथून मोठ्या प्रमाणावर वस्तू चीनमध्ये याव्यात. आपल्याकडील मागणी व पुरवठा यांच्यातील समतोल बिघडू नये. हा एक उपाय म्हणू शकतो. पण अशा असंख्य उपायांची मोठी साखळी अशा आपत्तीतून चीनसारख्या महाकाय देशाला बाहेर काढण्यास मदत करू शकते. आर्थिक उपायांसमवेत भावनिक गोंधळ उडू नये, म्हणून मानसिक बळ-म्हणजे मोराल वाढावे म्हणून सरकारला प्रयत्न करावे लागतात. चीन सरकारनेदेखील नेमके हेच केले आहे.

अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभता वाढावी व उत्पादन-चक्र अव्याहतपणे चालू राहावे म्हणून अनेक पातळीवर प्रयत्न केले गेले. तरीदेखील असे लक्षात आले की, चीनची आर्थिक प्रगती किमान एक टक्क्याने खाली घसरली. डायमंड मार्केटला मोठा तोटा सहन करावा लागला. अनेक प्रकारच्या कच्च्यामालाच्या किंमती वाढल्या. जगातील दुसर्‍या क्रमांकाची चीनची अर्थव्यवस्था ‘लॉक्ड-डाऊन’ अवस्थेत अडकून पडली. त्यांच्याशी अनेक बाबतीत संबंधित असलेल्या देशांनाही थोड्या-बहुत प्रमाणात झळ पोहोचलीच. तात्पुरती असली किंवा दीर्घकालीन, पण परिणाम होतच राहिले. सिनेमात काल्पनिक पातळीवर दाखवलेले अक्राळ -विक्राळ आजाराची अशी वास्तविक पातळीवरील आर्थिक भयानकता आपण आणि अनेक देश भोगत आहेत. केवळ युद्धच नव्हे तर अशा आकस्मिक आणि आणीबाणीच्या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याची कायमस्वरूपी यंत्रणा असण्याची गरज निर्माण झालेली आहे. ऐनवेळी मास्क बांधून तात्पुरते संरक्षण करता येते, पण अर्थव्यवस्थेवरील आघातांसाठी उपाय करणे आवश्यक आहे.

जीवघेणा करोना – करोना नावाचा एक जीवघेणा विषाणू अनेक कोट्यवधींच्या उलाढाली करणार्‍या शेअरबाजारांवर हल्ला करतो आणि भीषण दैना उडवतो. उदाहरणार्थ -त्यादिवशी मुंबई शेअरबाजार 806 अंशांनी कोसळला व राष्ट्रीय बाजार निर्देशांक 242 अंशांनी गडगडला. परिणामी गुंतवणूकदारांचे 3. 10 लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या घसरणीचा फटका सर्वच शेअर्सना बसला तरी काही विशिष्ट उद्योग-क्षेत्रांना अधिक झळ लागली. धातू उद्योग, वाहन -दूरसंचारक्षेत्र, ऊर्जा, बांधकाम-क्षेत्र तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे भाव दीड ते दोन टक्क्यांनी घसरले. एक आंतरराष्ट्रीय आजार इतकी भयावह दहशत निर्माण करतो, हीच आजच्या काळाची शोकांतिका आहे.

चीन व हाँगकाँगच्या बरोबरीने आशियाई तसेच अमेरिका, युरोप यांचे आर्थिक बाजार व आयात-निर्यात व्यवहार कोलमडले. हे व्यवहार पूर्ववत होण्यास पुढील काही महिने तरी लागतील असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

वाईटातून चांगले – सोन्यात गुंतवणारे वाढले. जेव्हा जेव्हा शेअरबाजार निर्देशांक खालावतो, तेव्हा सर्वच गुंतवणूकदार स्थिर व सुरक्षित गुंतवणुकीचा आधार शोधतात. अशावेळी डॉलरमध्ये, सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतात. त्यापैकी अनेक दशके अग्रेसर असलेला सोने हा धातू भरवशाचा वाटत असल्याने मोहरा तिथेच वळतो. या खेपेलादेखील असेच झाले.

कोणे एकेकाळी सार्सचा आघात –SARS [Severe Acute Respiratory Syndrome]- काही वर्षांपूर्वी या एका भयानक आजाराने सार्‍या जगाला व अर्थ-जगताला हादरा दिला होता. देशा-देशांत युद्ध होतील ना होतील, पण असे साथीचे आजार सार्‍या जगातील मानवाला प्राणिमात्रांना जीव मुठीत धरून एकत्र यायला लावतील. आणि जगाला त्यातून अबाधित -सुरक्षित ठेवण्यासाठी जीविताची हानी होऊ नये म्हणून सदैव प्रयत्नशील राहावे लागणार आहे. सातत्याने चंगळवादी जीवनशैली उपभोगताना काही दुष्परिणाम सोसावे लागणार आहेत. युद्ध होऊ नयेत म्हणून जशी सतर्कता असते, त्याहीपेक्षा अधिक जागरूकता आरोग्य. जीवन सुरक्षेबाबत जपावी व जोपासावी लागणार आहे. नाहीतर भौतिक प्रगतीचा वेग वाढत राहील, पण जगण्याबाबत अदृश्य संकटे, त्यांचे जागतिक दडपण भेडसावत राहणार. केवळ नैसर्गिक प्रकोप, राजकीय -सामाजिक घडामोडीच नव्हे, तर नवनवे आजार आणि त्यांचा वेगाने प्रसार करणारे विषाणू यांना अटकाव करण्याकरिता कटिबद्ध राहणे ही काळाची गरज आहे. गाफीलपणा आणि दुर्लक्ष झाले तर बाजार व अर्थव्यवस्थाच कोसळेल असे नाही तर जगणेच अवघड होईल, हाच जणू करोनाचा इशारा आहे !

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ-अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -