घरफिचर्सकरोना, व्हायरल पोस्ट आणि माणुसकी !

करोना, व्हायरल पोस्ट आणि माणुसकी !

Subscribe

जगाच्या कानाकोपर्‍यातील व्यक्ती आता करोनावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. आपल्या अनुभवातून एकमेकांना सावध करू लागल्या आहेत. यातील प्रत्येक व्यक्ती ही करोनाला जवळून बघणारी आहे. यात सामान्य नागरिकांपासून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, लेखक, बिझनेसमनबरोबरच करोनामुक्त व्यक्तींचाही समावेश आहे. जे आमच्याबरोबर झालं किंवा होत आहे ते तुमच्याबरोबर नको. आणची माणसं जशी डोळ्यासमोर तडफडून मेली, तशी तुमची नको. यामुळे वेळीच सावध व्हा. घऱातच राहा. सुरक्षित राहा. हा एकच संदेश प्रत्येकजण देत आहे. समाज माध्यमातून करोनाच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या पोस्ट जगभर व्हायरल होत असून सगळेजण माणुसकीच्या नात्यातून एकमेकांना मानसिक आधार देत आहेत.

चीननंतर इराण, इटली, स्पेन, अमेरिका व भारतासह दोनशेहून अधिक देशांना करोना विषाणूने विळखा घातला आहे. करोनाचा कहर काही थांबायचं नाव घेत नाहीये. करोना नावाच्या या विषाणूने सगळ जगच थांबवून टाकलयं. सध्या तरी दुसर्‍या विषयावर ऐकण्याची किंवा बोलण्याची कोणाचीच मनोवस्था नाहीये. करोनाबद्दल काय वेगळं ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. यामुळे जगाच्या कानाकोपर्‍यातील व्यक्ती आता करोनावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. आपल्या अनुभवातून एकमेकांना सावध करू लागल्या आहेत. यातील प्रत्येक व्यक्ती ही करोनाला जवळून बघणारी आहे. यात सामान्य नागरिकांपासून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, लेखक, बिझनेसमनबरोबरच करोनामुक्त व्यक्तींचाही समावेश आहे. जे आमच्याबरोबर झालं किंवा होत आहे ते तुमच्याबरोबर नको. आणची माणसं जशी डोळ्यासमोर तडफडून मेली, तशी तुमची नको. यामुळे वेळीच सावध व्हा. घऱातच राहा. सुरक्षित राहा. हा एकच संदेश प्रत्येकजण देत आहे. जो प्रत्येकाला अंतर्मुख करण्याबरोबरच दुसर्‍याच्या दु:खात सहभागी व्हायला शिकवतोय. म्हणूनच असेल कदाचित की ज्यांना आपण कधी पाहिलं नाही, ज्यांचा आपल्याशी दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही अशा इटली, स्पेन व इतर देशांमध्ये करोनामुळे मृत्यूमुखी पडलेली लोक आपलीच वाटू लागली आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे मित्र मैत्रिणींचे संदेश ऐकताना वाचताना आपल्याही पापण्यांच्या कडा ओलावू लागल्या आहेत. सगळ्यांचं दु:ख एकच झाल्याचा हा संदेश आहे.

याच भावनेतून करोनाचं थैमान व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून व्यथित झालेली इटालियन लेखिका Francesca Melandri हीन एक पत्र सोशल मीडियावर शेअर केलं. लेटर फ्रॉम द फ्यूचर या मथळ्याखाली लिहण्यात आलेले हे पत्र आजच्या परिस्थितीत इतक काही सांगून जात की उद्याचं भविष्य यात स्पष्ट दिसायला लागतं. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने व्हिडीओच्या माध्यमातून नुकताच या पत्राचा मराठी अनुवाद वाचूनही दाखवला. पत्र इटलीतील परिस्थिती बघून लिहिण्यात आलेल असलं तरी आज आपणही त्याच अनुभवातून जात असल्याने हे पत्र आपल्यासाठीच लिहिण्यात आल्यासारखं प्रत्येकाला वाटतय. यामुळे हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

- Advertisement -

दिवसागणिक करोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांचा खच पाहता इटलीत सध्या स्मशानशांतता आहे. लॉकडाऊन असल्याने जो तो घरात बंदिस्त आहे. मृत्यूचं सावट सगळीकडे आहे. यामुळे इटालियन नागरिक रोज बाल्कनीत येऊन गाणी गात आहेत. यात देशभक्तीपर गाण्याबरोबरच एकमेकांच मनोधैर्य वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं इटालियन पत्रकार मुत्जर याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केलं असून आम्हीदेखील अशाच प्रकारे एकमेकांच मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करू असे अनेक यूजर्सने सांगितल्याने करोनाची संबंधित पोस्ट किती मार्मिक ठरत आहेत. हे दिसून येत आहे. एकमेकांच्या अनुभवातून शहाणपण घेत जगातील अनोळखी लोक करोनाबरोबर लढण्यासाठी सज्ज होत आहेत. हीच काय ती यावेळची सकारात्मक बाजू म्हणावी लागेल.

इटलीतील हीच भयाण स्थिती लुका कारारा या व्यक्तीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आणि सगळ जग हादरलं. इटलीत बर्गामो भागातील अलबिनो येथे लुकाचे वयस्क आई वडील राहत होते. वयाची ऐशी पार केलेल्या या जोडप्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या मुलाला लुकाला त्याच्या आईवडिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याचे पोलिसांकडून फोनवर सांगण्यात आले. पण त्यांना कुठल्या रुग्णालयात नेण्यात येतय हे मात्र त्याला सांगण्यात आले नाही. लॉकडाऊन असल्याने लुका घराबाहेर पडू शकत नव्हता. पण तो सतत पोलिसांना फोन करून आई वडिलांना एकदा तरी भेटू द्या, अशी विनवणी करत होता. पण त्याला परवानगी तर नाकारण्यात आलीच शिवाय त्यांना कुठल्या रुग्णालयात नेण्यात आलं हेदेखील सांगण्यात आले नाही. शेवटी आठ दिवसांनी लुकाला पोलिसांचा फोन आला. तुझे आईवडील या जगात नाहीत. असे त्याला सांगण्यात आले. हे ऐकताच लुका कोसळला. पण त्याही अवस्थेत त्याने कसंबस पोलीस स्टेशन गाठलं. मला आई वडिलांचा मृतदेह द्या. अंत्यसंस्कार करायचेत. अशी विनवणीही त्याने केली. पण ते सोपस्कार आम्ही केव्हाच केले असं उत्तर त्याला देण्यात आलं. सगळच भयंकर होतं. नंतर लुकाने चौकशी केल्यावर कळालं की त्यांना फक्त क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कसलेच उपचार करण्यात आले नाहीत. कारण रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात तेवढे व्हेंटीलेटरच नाहीत. त्यातही जे जगण्याची शक्यता आहे त्यांनाच वाचवा, त्यातही तरुणांना प्राधान्य द्या, असा आदेशच सरकारने दिल्याने डॉक्टरांचाही नाइलाज होता.

- Advertisement -

लुकाची ही प्रतिक्रिया जगाला हादरवणारी असली तरी ती इटली व करोनाची भयाणकता दर्शवणारी आहे. यामुळे अनेकांनी यावेळी लुकाच्या दुखात सहभागी असल्याचे सांगितले. पण त्याचबरोबर हे वास्तव आहे ते स्वीकारायला शिक, असा प्रॅक्टिकल सल्ला त्याला अनेकांनी दिला. त्यानंतर अनेकजणांनी लुकासारखाच अनुभव आपल्याला आल्याचे सोशल मीडियावर व्यक्त केले. यामुळे लुकासारख्या व्यक्तींच्या मनात आयुष्यभर बोचणारी सल कमी करण्यास मदत मिळाली. कारण लुकासारख्याच अनुभवातून अनेक नागरिक गेले होते. लुकाच्या निमित्ताने ते एकत्र आले व एकमेकांना धीराने उभं राहण्यास मदत करत आहेत. पण ते ही लांबून. सोशल डिस्टन्सिंग राखून.

वुहानमधल्या एका २७ वर्षांच्या ली च्यान या नर्सनेही तीन महिन्यांनंतर आपली चूक कबूल केली. ली हीला येथील रुग्णालयात नवीनच नोकरी लागली होती. यामुळे ती दिवसरात्र रुग्णांची सेवा करत होती. त्याचवेळी अचानक करोना व्हायरसचे रुग्ण वाढले. सुरुवातीला हा आजार कळत नव्हता, पण नंतर या विचित्र आजारात लोकांचा मृत्यू होऊ लागल्याने चीन हादरले. एव्हाना हा संसर्गजन्य आजार असल्याचे समोर आले होते. यामुळे लीच्या आई-वडिलांनी तिला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. पण आपण करोना रुग्णांच्या विभागात काम करत नसल्याची थाप मारत लीने वेळ मारून नेली. मात्र सतत करोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने ली ला व अनेक डॉक्टर व नर्सेसला करोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आलं. यामुळे लीच्या घरच्यांना धक्का बसला पण तरीही तिने आपण करोना रुग्णांना तपासत नसल्याचेच घरच्यांना सांगितले. ती क्वारंटाईन असतानाच तिच्या तीन वर्षांच्या मुलीला करोनाची लागण झाल्याचे तिला कळाले. आपण काय लपवलं त्याची आता किंमत मोजावी लागणार हे तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने घरच्यांना फसवल्याची कबुली दिली. पण तोपर्यंत तिच्या आईवडिलांनाही करोनाची लागण झाली होती.

देवाच्या कृपेने ली व तिचे कुटुंब करोनामुक्त झाले आहेत. पण आपल्या एका चुकीमुळे सगळ्यांनाच त्रास झाल्याची सल मनात कायम राहणार असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगून करोनाबद्दल काहीही लपवू नका, असे आवाहन लोकांना केले. त्यानंतर अनेकांनी तिच्या आवाहनाची गांभीर्याने दखल घेत करोनाची तपासणी केल्याचं व पुढील अनर्थ टाळल्याचं सांगितलं. अशा बर्‍याच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर काहीजण स्वत:च त्या शेअर करत आहेत. यामुळे जग सावध होण्याबरोबरच सुजाणही होत आहेत. या गोष्टींमुळे या करोनाच्या वातावरणात चांगल्या गोष्टी कशा घडू शकतात किंवा आपण त्या कशा हाताळायला हव्यात हे एक माणूस दुसर्‍या माणसाला सांगू लागलाय. यामुळे माणसांना माणसांपासून दूर करणार्‍या करोनाच्या वातावरणात आजही माणुसकी जिवंत असल्याचे हे द्योतक आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण आजच्या घडीला ट्रम्पपासून आपल्यापर्यंत सगळ्यांची जगण्याची धडपड मात्र सारखीच आहे.

डॉक्टर ली वेनलियांग यांचा गूढ मृत्यू

एवढ्या सगळ्या प्रपंचात एका गोष्टीची मात्र खंत वाटते. ती आहे डॉक्टर ली वेनलियांग यांच्या गूढ मृत्यूची. चीनमधील वुहान शहरात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक सात जणांना सर्दी, खोकला व तापाचा त्रास सुरू झाला. यामुळे त्यांना येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फ्लूची लक्षणं असल्याने त्यांच्यावर तेच उपचार करण्यात येत होते. पण रुग्णांची प्रकृती झपाट्याने खालावू लागली, काहीजणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. साध्या फ्लूमध्ये असा त्रास होत नसल्याने डॉक्टर ली यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा विचित्र ताप असून तो घातक ठरु शकतो. तो कदाचित करोना व्हायरस असू शकतो. अशी शक्यता ली यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्यक्त केली.

ली यांचा हा मेसेज बघता बघता वार्‍यासारखा चीनमध्ये व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय मीडियानेही त्याची दखल घेत चीनला घेरण्यास सुरुवात केली. विरोधकही आक्रमक झाले. यादरम्यान वुहानमध्ये करोना रुग्णांचा आकडा वाढत गेला. यामुळे चीन सरकारने डॉक्टर ली यांच्यावर खोटी माहिती पसरवल्याचा व देशातील शांततेला धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकारामुळे चीनचा खरा चेहरा जगासमोर आला. अमेरिकेने चीनला लक्ष्य केले. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर चीनमधील स्थानिक मीडियाने ली यांच्यावर अन्याय झाल्याच्या बातम्या देण्यास सुरुवात केली. यामुळे नाईलाजाने ली यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर ली पुन्हा कामावर रुजू झाले. ते दिवसरात्र करोना रुग्णांची सेवा करत होते. करोनावरील लस शोधणार्‍या संशोधकांच्या ते सतत संपर्कात होते. त्यानंतर त्यांनाच करोनाची लागण झाल्याचे वृत्त आले व आठ दिवसाच्या आतच ली यांचा मृत्यू झाल्याचे चीन सरकारने जाहीर केले. ली यांच्या सारख्या लढवय्या डॉक्टरच्या मृत्यूने पुन्हा एकदा चीनवर सर्वच स्तरातून सडकून टीका होऊ लागली. यामुळे याची परिणती म्हणून काही दिवसांपूर्वी चीन सरकारने ली यांना शहीदाचा दर्जा जाहीर केला व त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफीही मागितली. पण त्याने ली काही परत येणार नाहीत. मात्र त्यांनी जो जनजागृतीचा प्रयत्न केला तो आज या पोस्टमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत होत आहे. हीच खरी ली यांना जगाची श्रद्धांजली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -