घरफिचर्सकुंकवाची उठाठेव! पँटची उठाठेव!!

कुंकवाची उठाठेव! पँटची उठाठेव!!

Subscribe

अनेक स्त्रिया मला माहीत आहेत. त्यांना मंगळसूत्र घालण्याचे, कुंकू लावण्याचे अजिबात प्रेम नसते. पण केवळ वाद नको, कुणी घालूनपाडून गलिच्छ बोलायला नको, कुणी गृहीत धरू नये म्हणून त्या या गोष्टी घालतात.

घरकाम करणार्‍या ओळखीच्या स्त्रियांना नवर्‍याने टाकलेले आहे, टाकलेले नसतानाही रोजची मारहाण गेली अनेक वर्षे सोसून मगच त्यांचा जीव मोकळा झाला आहे. त्या स्त्रियाही मंगळसूत्र टाकत नाहीत. टिकली लावायची सोडत नाहीत.

- Advertisement -

त्या टिकलीचीही मोठीच गंमत आहे. कपाळ भकास दिसतं म्हणून म्हणे टिकली… विषय एवढाच असतो की डोळ्यांना सवय झालेली असते, ती काही काळाने वेगळी सवयही होऊ शकते.

संस्कृतीरक्षक दांभिक नेहमीच काही ना काही मनोरंजन करत असतात किंवा मग दंगलरंजन करत असतात हा आजच्या कालखंडाचा एवंगुणविशेष झाला आहे. शबरीमलातील प्रवेशाचे रक्तरंजित प्रहसन झाले, अजूनही सुरूच आहे. हे 2018चे स्त्रियांबाबतच्या भारतीय परंपरा-प्रवाहपतितांच्या भूमिकेचे लांच्छन जगभर दिसले.

- Advertisement -

2019ची सुरुवात होताना, जानेवारी महिन्यातही हेच लज्जास्पद दर्शन सुरू राहील असे दिसते आहे. चार दिवसांपूर्वी तीन दशकांपूर्वीची एक नटी मौशुमी चतर्जी भाजपमध्ये धूमधाम के साथ प्रवेशकर्ती झाली. विचारांचा संबंध नसला की चकचकाटीचा आधार घेतला जातो किंवा सनसनाटीचा किंवा मग दंग्याचा हे सत्ताधारी पक्षाचे विशेष झालेच आहे. मौशुमी चतर्जींचा पक्षप्रवेश हा त्याच खात्यात जमा. या स्तंभात त्यांचा उल्लेख करण्याचे कारण इतकेच की त्या मंचावरून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्‍या तरुणीवर तिने पँट घातली म्हणून डाफरल्या. तू साडी किंवा पंजाबी ड्रेस घालायला हवास असा सल्लाही देत्या झाल्या. हवेशीर तिसर्‍या मजल्यात असे सारे घडणार यात काही नवल नाही. पण या निमित्ताने आपल्यातल्या बौद्धिक त्रुटी तपासायची संधी आहे.

स्त्रियांच्या बाबतीत संस्कृती जपणे म्हणजे भारतात-
ती सणवार करते का,
देवधर्म-कुळाचार पार पाडते का,
साडी नेसून, (वेळप्रसंगी तरी) डोईवरून पदर घेते का,
(पँटशर्ट वगैरे घालत नाही नं?)
कुंकू लावते का,
लग्न झालं असेल तर मंगळसूत्र घालते का,
नवरा मेल्यास कुंकू पुसते का, मंगळसूत्र काढते का,

नोकरीबिकरी शिक्षणबिक्षण ठीक आहे- ते तर करावंच लागतं आताशा- पण ते सारं करून घरच्यांचं नीट करते का- या प्रश्नांच्या भोवतीच स्त्रियांची सांस्कृतिक जपणूक गिरमिटत असते.

एक प्रसंग आठवतो. दूरदर्शन सुरू झालं त्या पहिल्या दुसर्‍या दशकात म्हणजे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर दिसणार्‍या वृत्तनिवेदिका त्यांचे दिसणे, त्यांच्या साड्या, त्यांचे दागिने हे बायकांच्या निरीक्षणाचे विषय होते. आज शेकडो मालिकातल्या नटनट्यांचे अनुकरण किंवा त्यांच्या कपड्यालत्त्यांवर चर्चा होते- ती चर्चा तेव्हा या पाचसहा वृत्तनिवेदकांपुरती मर्यादित असे. एक प्रौढा तेव्हा भाजी निवडतानिवडता मला फणकारत म्हणालेली- या बातम्या वाचणार्‍या पोरी गळ्यात वेगवेगळे दागिने घालतात पण मंगळसूत्र नाही घालत. त्यांची लग्न झालीत की नाहीत की काय काही कळायला मार्ग नाही. मी खुदखुदत फटकारलेलं- का तुम्हाला स्थळ घेऊन जायचंय, त्यांचं लग्न झालंय की नाही कळून तुम्हाला काय फरक पडतो. बाई नरमल्या, पण म्हणाल्या आपल्यात पद्धत आहे, ती पाळायला हवीच. मी म्हटलेलं असो असो… पद्धती पाळूनही कुलंगडी करता येतात आणि पद्धती भिरकावूनही माणसं स्वच्छ राहू शकतात. आपण दुसर्‍याच्या कुंकवाचीही उठाठेव करू नये आणि मंगळसूत्राचीही.

पेहराव, अलंकार, परंपरा पालन यापुरतेच स्त्रियांच्या सन्मानाचा परीघ आवळत नेणार्‍या समाज घटकांना आपण स्त्रियांनी जाणीवपूर्वक भिरकावून दिले पाहिजे. गंमत म्हणून, आवड म्हणून नटणे मुरडणे वेगळे आणि एका साच्यात बसण्यासाठी हे सारे करणे वेगळे.

मंगळसूत्र हा विषय तर स्त्रियांनी खास लक्ष द्यावे असाच आहे. अनेक विवाहांत मंगळसूत्राचे प्रस्थ एवढे वाढते की नाते तकलादू आणि मंगळसूत्र चोख एवढेच त्यात उरते. ते सोन्याचे हवे- होऊंदे खर्च. ते इतकेच लांब हवे- होऊंदे खर्च. नवराबायकोंच्या नात्यात फोलपट उरलं असलं तरीही स्त्रिया त्या मंगळसूत्राभोवती वेड्या होऊन गरगरतात. मंगळसूत्र फेस्टिवल वगैरेंच्या भरमसाठ जाहिरातींना भुलून परंपरा साजरी करण्याचा सोस केवढा मोठा असतो.

जगात मंगळसूत्रांविना प्रेम सांभाळणारी जितकी जोडपी आहेत त्यांच्या कैक पटींनी जास्त प्रेमाचा लवलेश उरलेला नसताना मंगळसूत्रांचे ओझे सांभाळणारी जोडपी असतील.

हेच थोड्याफार फरकाने संस्कृतीच्या इतर अनेक फोलकट दृश्य प्रतीकांबद्दल म्हणता येईल. जीन्स, टीशर्ट घालून भारतीय संस्कृतीच्या अवशेषांच्या जतनावर काम करणार्‍या स्त्रिया शेकडो आहेत, जीन्सपॅन्ट टीशर्ट घालून भारतीय समाजात उपयुक्त काम करणार्‍या, अभ्यास करणार्‍या स्त्रिया हजारो आहेत आणि त्या या साडीवाल्या मौशुम्यांपेक्षा अधिक संस्कृतीप्रेमी आहेत, अधिक देशभक्त आहेत.

मौशुमीसारखेच संस्कृतीचे मुलामे गुंडाळलेल्यांत स्त्रीपुरुष सगळेच आहेत. प्रियांका गांधी या सत्तेचाळीस वर्षांच्या स्त्रीने गेल्याच आठवड्यात राजकारणात प्रवेश केला. तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचा प्रभाव भारतीय जनमानसावर पडेल याची खात्री जशी काँग्रेसींना आहे तशीच विरोधकांनाही आहे. त्यात भीतीतून विरोधकांमधून तिच्यावर चिखल उडवायला सुरुवात झाली. (प्रियांका गांधी साडी नेसते बरं… तरीही.) तिला बारबाला म्हणण्यापासून ते तिच्या सेवेसाठी कुठला स्वामी सोडावा वगैरे गलिच्छ बोलून या देशप्रेमी सू-संस्कृत भारतीयांनी आपली नैतिक पातळी दाखवून दिली. आधी इंदिरा गांधींना विधवेच्या हाती देश गेला म्हणणार्‍यांचेच वैचारिक आत्मज सोनिया गांधींना विधवेच्या खात्यात सगळे पैसे वगैरे ख्याख्या करून सार्वजनिक मंचावरून बोलत होते. आता प्रियांका गांधींना तिच्या नवर्‍यावरून ताडन सुरू आहे. ती स्वतःचे नाव प्रियांका गांधी लावत असतानाही तिला प्रियांका वड्रा म्हणून संबोधणारे याच जातकुळीतले. एकंदर या पोकळ देशभक्तांना, संस्कृतीप्रेमींना कर्त्या स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्यच होत नाही.

अनेक स्त्रिया मला माहीत आहेत. त्यांना मंगळसूत्र घालण्याचे, कुंकू लावण्याचे अजिबात प्रेम नसते. पण केवळ वाद नको, कुणी घालूनपाडून गलिच्छ बोलायला नको, कुणी गृहीत धरू नये म्हणून त्या या गोष्टी घालतात.

घरकाम करणार्‍या ओळखीच्या स्त्रियांना नवर्‍याने टाकलेले आहे, टाकलेले नसतानाही रोजची मारहाण गेली अनेक वर्षे सोसून मगच त्यांचा जीव मोकळा झाला आहे. त्या स्त्रियाही मंगळसूत्र टाकत नाहीत. टिकली लावायची सोडत नाहीत.

त्या टिकलीचीही मोठीच गंमत आहे. कपाळ भकास दिसतं म्हणून म्हणे टिकली… विषय एवढाच असतो की डोळ्यांना सवय झालेली असते, ती काही काळाने वेगळी सवयही होऊ शकते.

एक विनोदी किस्सा- घरकामावरच्या एक बाई एक दिवस मोकळ्या कपाळाने आल्या. त्यांना मालकिणीने विचारलं, काय हो, टिकली पडली वाटतं. त्या बाई उत्तरल्या- पडली नाही. बेवड्याने(नवर्‍याने) पैसे मागितले आणि नाही म्हटल्यावर शिव्या देऊ लागला. तेव्हा त्याच्या हातात ठेवली टिकली. म्हटलं- चार आण्याच्या टिकलीसाठी तुझा हजाराचा त्रास- नकोच मला. सोडला त्याला. टिकलीपण सोडली. टिकली काय- टिकली तर टिकली.

आणखी एक गंमत. एका अतिशय बुरसट नवरोबा आपल्या बायकोला सांगत- टिकली नाही हं लावायची. कुंकूच पाहिजे. पिंजर. तीच खरी. टिकली काय काढली की संपलं. ते कुंकू ओघळून नाकावर येई घामाने. पण आपली बायको बावळट दिसली तर बरंच असा हिशेब.

नवरा जिवंत असलेली (स्पेशल) स्त्री घरातून निघताना हळदकुंकू लावण्याची निरर्थक पद्धत अजूनही अनेक घरांतून फार सोज्वळपणे पाळली जाते. मी तरी ते थेट नाकारते. माझ्या कपाळावर नाकावर रंगांचा शिडकावा मला चालत नाही. फार राग येतो लोकांना. मग हे हळदकुंकू लावताना शुभेच्छा देणे जे अध्याहृत आहे ते पार विसरले जाते. आणि मला मनातल्या मनात दुषणे दिली जातात. पण कुणाच्याही दुषणांनी आणि शुभेच्छांनाही वास्तवात काहीही फरक पडत नाही हे एक फार बरे असते.

एकंदर काय, आपल्या म्हणून समजल्या गेलेल्या या सांस्कृतिक प्रतीकांचा आणि नैतिकतेचा काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांची फोलपटेच झाली आहेत. त्या प्रतीकांची जागा सांस्कृतिक इतिहासाच्या पुस्तकात आहे. अंगाखांद्यावर, पैसा खर्च करून अजिबातच नाही.

स्त्रियांनी सुटसुटीत कपडे घालून मोकळेपणाने वावरावे, दागिने कमीत कमी घालावेत, दुसर्‍याच्या कुंकवांची, मंगळसूत्रांची आणि पॅन्टची उठाठेव करू नये. कणखर, नैतिक आणि स्वत्व असलेल्या स्त्रीचे तेच अलंकार ठरतील. डोक्याच्या आत काहीही नसेल कपाळावर लावा टिळे. आणि गळ्यातून उमटणार्‍या शब्दांत धैर्य नसेल तर बांधा लोढणी खुशाल.
बाकीच्यांनी ही लोढणी नि टिळे खुशाल भिरकावून द्यावीत.मौशुमी गेली उडत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -