Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

Related Story

- Advertisement -

दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन. (१६ फेब्रुवारी १९४४) दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्रींचे नाव द्वारकाबाई. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर १८८५ साली ते तेथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. १८८६ मध्ये त्यांचा पहिला विवाह झाला.

पुढे १८९० साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच वास्तुकला व साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्टोन ब्लॉक करणे याचा त्यांना छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनाने रतलाम येथे तीनरंगी ठसे बनविण्याची प्रक्रिया (थ्री कलर प्रोसेस), प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथो) व छायाचित्रण इ. क्षेत्रांत प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली होती. १८९५ साली गोध्रा (गुजरात) येथे छायाचित्रकार म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता; परंतु १९०० मध्ये प्लेगने त्यांच्या पत्नीचे देहावसान झाले म्हणून ते परत बडोद्याला गेले. तेथेच १९०१ साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पत्करले.

- Advertisement -

पुष्कळ ठिकाणी जादूचे प्रयोगही करून दाखविले. प्रो.‘केल्फा’ (फाळके या नावाचा उलटा क्रम) यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. १९०२ मध्ये त्यांचा दुसरा विवाह झाला. १९०३ साली भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून त्यांना नोकरी लागली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. १९०६ साली त्यांनी वंगभंग चळवळीच्या निमित्ताने आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. १९०८ साली लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था त्यांनी सुरू केली. ती पुढे दादर येथे हलविली. तिचेच रूपांतर नंतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ मध्ये झाले.

१९०९ साली फाळके जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन आले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पुढे दादासाहेबांनी १९१० मध्ये सुवर्णमाला नावाचे अत्यंत कलापूर्ण असे मराठी-गुजराती मासिकही सुरू केले; परंतु १९११ च्या प्रारंभी भागीदारांशी मतभेद झाल्यावर या व्यवसायाशी त्यांनी आपला संबंध तोडून टाकला.

- Advertisement -

उद्विग्न मनःस्थितीत असतानाच मुंबईत गिरगावमधील अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ या तंबूवजा चित्रपटगृहात (हल्ली तेथे हरकिसनदास हॉस्पिटल आहे) १५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मितिविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.

भारतीय चित्रपट व्यवसायाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून १९३९ च्या एप्रिल-मेमध्ये मुंबईत एक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी फाळक्यांचा सत्कार करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना पाच हजार रूपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे नाशिक येथे निधन झाले. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून (१९७०) चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो.

- Advertisement -