घरफिचर्सऔषधांची गरज भागवणारा दवा बाजार!

औषधांची गरज भागवणारा दवा बाजार!

Subscribe

दवा बाजारातील दुकानांमध्ये औषधांच्या कच्च्या मालापासून सर्व प्रकारची वैद्यकीय उपकरणे होलसेल व किरकोळ भावात विकली जातात. राज्यातील औषध कंपन्यांना कच्चा माल पोहोचविणे हे कामदेखील या दुकानांमार्फत केले जाते. याशिवाय मुंबईतील रुग्णालये व औषधांच्या दुकानांमध्ये जाणारा तयार मालही दवा बाजारातून नेला जातो. कच्चा माल ठेवणारे, तयार माल ठेवणारे असे दुकान मालकांचे विभाजन केले आहे. त्याशिवाय येथे औषधी तेल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, जेनेरिक औषधांची वेगवेगळी दुकाने आहेत. त्याशिवाय खाण्याच्या रंगाची विक्री करणारे येथे मोठे दुकान आहे.

मुंबईच्या प्रत्येक बाजाराला एक इतिहास आहे. काही बाजारांचा इतिहास आजही जिवंत आहे तर काहींचा इतिहास काळाच्या पोटात गडप झाला आहे. एक-दोन विक्रेत्यांपासूनच या बाजारांची सुरुवात झाली. पण ते एक-दोन विक्रेते कोण हे मात्र आता कोणालाही माहीत नाही. त्या विक्रेत्यांनी आणि आपल्या सोयीसाठी त्यांच्याकडून सामान खरेदी करणार्‍यांनी खर्‍या अर्थाने बाजारांची नीव ठेवली. त्यातून हळूहळू बाजार विकसित झाले, नावारुपाला आले. त्यांची ओळख तयार झाली. मग तो बाजार क्रॉफर्ड मार्केट असेल किंवा ससून डॉकमधील मासळी बाजार. मुंबईतील सर्वात मोठा औषधांचा बाजारही असाच सुरू झाला. इंग्रजांच्या काळात अ‍ॅलोपॅथी औषधांची फारशी ओळख देशातील नागरिकांना नव्हती. साधारणत: १८ व्या शतकाच्या शेवटी मुंबईच्या आजूबाजूच्या भागातून येणारे काही लोक वनौषधी घेऊन क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूला विकायला बसायची. त्यांच्याकडून ही वनौषधी खरेदी करण्यासाठी मुंबईतील वैद्य या भागात यायचे. तसेच युनानी औषधांचे विक्रेतेही या भागात आपली उत्पादने विकण्यासाठी यायची.

ही वनौषधी आणि युनानी औषधे विकणारी काही लोक नाडी पाहून रोगाचे निदान करायची. त्यातून मग मुंबईकरांचा ओढा या भागात वाढू लागला. औषध विक्रेत्यांचा एक बाजारच तेथे अस्तित्वात आला. त्याला औषध म्हणजेच ‘दवा बाजार’ असे संबोधले जाऊ लागले. कधी रस्त्यावर बसणारे औषध विक्रेते हळूहळू आजूबाजूंच्या चाळीच्या तळमजल्यावर दुकान घेऊन त्यातून व्यापार करू लागले. त्यामुळे या बाजाराला मार्केटचे स्वरूप प्राप्त झाले. आज त्या जागेवर मुंबईतील सर्वात मोठी औषधांची बाजारपेठ तेथे वसलेली आहे. या बाजारपेठेला खर्‍या अर्थाने आकार दिला तो पारसी लोकांनी. याच दवा बाजारात पारसी लोकांची होमियोपॅथीची औषधे विकण्याची दुकाने होती. त्यात सर्वसामान्य मुंबईकर फारसा फिरकत नसला तरी उच्चभ्रू लोक आयुर्वेदीक औषधे अथवा वनौषधी न घेता होमियोपॅथिक औषधेच घ्यायची. त्या दुकानांमुळे या भागाला खर्‍या अर्थाने बाजाराचे स्वरुप प्राप्त झाले. आज मुंबईचा दवा बाजार हा मुंबईतील सर्वात जुन्या बाजारांपैकी एक मानला जातो.

- Advertisement -

मंगलदास मार्केट आणि लोहार चाळ मार्केटच्या मधोमध हा बाजार वसलेला आहे. या दवा बाजार भागातील इमारती १०० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. काही इमारती तर लाकडाच्या आहेत. या इमारतींच्या तळ मजल्यावर औषधांची दुकाने, पहिल्या मजल्यावर झालेच तर त्या दुकानांची लहान गोदामे आणि त्यावरील मजल्यावर निवासी गाळे, असे येथील इमारतींचे स्वरूप आहे. भारतात अ‍ॅलोपॅथीच्या प्रसारानंतर हा दवा बाजार खर्‍या अर्थाने औषधांच्या दुकानांनी फुलून गेला. साधारणत: १९१८ सालापासून येथे अ‍ॅलोपॅथीक वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची विक्री सुरू झाली. पण आयुर्वेदीक आणि होमियोपॅथीक औषधांची दुकाने मात्र तेथे कायम होती. पण जसजसा अ‍ॅलोपॅथीक औषधांचा वापर वाढू लागला तसतसा दवा बाजारातून आयुर्वेदीक आणि होमियोपॅथीक औषधांची दुकाने कमी होऊ लागली. युनानी औषधांची दुकाने तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली. दवा बाजारात औषधे घाऊक मिळू लागली. मुंबईतील इतर केमिस्टच्या दुकानात त्यांचा पुरवठा होऊ लागला. आज खर्‍या अर्थाने हा दवा बाजार दिवसाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा मुंबईतील एक महत्त्वाचा बाजार झाला आहे.

औषधांचा बाजार विकसित झाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या भागातील दुकानांचे नऊ झोनमध्ये विभाजन केले. त्यात दवा बाजाराचा उल्लेख पहिल्या झोनमध्ये करण्यात आला. आज प्रिन्सेस स्ट्रीटवरील दवा बाजारातच ४८८ औषधांची दुकाने आहेत. या भागात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यायची. त्यांचा साठाही त्याच भागातील गोदामात केला जायचा. ही गोदामे त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर अथवा जवळच्या अन्य ठिकाणी असायची. रोज ट्रक, टेम्पो भरून या ठिकाणी औषधै, औषधांसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे यायची. त्यामुळे या भागात लाखोंचा माल ठेवला जायचा. या ठिकाणी ही गोदामे फोडून लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य पळून नेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या वस्तूंचा साठा केला जायचा. हा संपूर्ण परिसर औषध आणि वैद्यकीय उपकरणांचे एक गोदाम होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने १९८९ साली या मालावर जकात कर लावला. प्रत्येक मालासाठी ५ टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंत जकात वसूल केली जात होती. त्यामुळे येथील व्यापार्‍यांचे नुकसान होऊ लागले. त्यात लोकसंख्या वाढली. नवीन नवीन शोधांमुळे औषधे आणि वैद्यकीय उपकरणांमध्येही वाढ झाली. या भागातील जागांचे भावही गगनाला भिडले. त्यामुळे या भागात गोदाम घेणे जकात आणि जागेच्या मुल्यांच्या तुलनेत महाग पडू लागले. त्यामुळे येथील व्यापार्‍यांनी आपली गोदामे भिवंडी, ठाणे, वसई या भागात हलवली. तेथून माल आणताना तो वाहतूक खर्च करावा लागत असला तरी जकात नाहीशी झाली होती. तसेच या भागात अतिशय कमी किमतीत मोठे गोदाम मिळू शकत होते. त्यामुळे पूर्वीचे दवा बाजारचे ‘नीचे दुकान उपर गोदाम’ हे स्वरूप बदलले. पुन्हा वसई, भिवंडी या भागात गोदामे गेल्यामुळे तेथून माल आणण्यासाठी, तो गाडीत चढवण्या, उतरवण्यासाठी पाटीदार हमालींची गरज भासू लागली. त्यातून या भागात पाटी घेऊन ओझी वाहणार्‍यांना रोजगार मिळाला. तर दुसर्‍या बाजूला व्यापार्‍यांची कामेही कमी पैशात होऊ लागली.

- Advertisement -

दवा बाजारातील दुकानांमध्ये औषधांच्या कच्च्या मालापासून सर्व प्रकारची वैद्यकीय उपकरणे होलसेल व किरकोळ भावात विकली जातात. राज्यातील औषध कंपन्यांना कच्चा माल पोहोचविणे हे कामदेखील या दुकानांमार्फत केले जाते. याशिवाय मुंबईतील रुग्णालये व औषधांच्या दुकानांमध्ये जाणारा तयार मालही दवा बाजारातून नेला जातो. कच्चा माल ठेवणारे, तयार माल ठेवणारे असे दुकान मालकांचे विभाजन केले आहे. त्याशिवाय येथे औषधी तेल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, जेनेरिक औषधांची वेगवेगळी दुकाने आहेत. त्याशिवाय खाण्याच्या रंगाची विक्री करणारे येथे मोठे दुकान आहे. दवा बाजारातील या दुकानांमधून मुंबईभरातील खासगी व सरकारी रुग्णालयात माल पोहोचविला जातो. इतर दुकानांमध्ये मिळणारे औषध किंवा वस्तू या दुकानांत निम्म्यापर्यंतच्या दरात दिल्या जातात. त्याशिवाय रुग्णालयाला आवश्यक असलेले उपकरण भारतात उपलब्ध नसेल तर परदेशातील कंपन्यांकडून मागविले जाते.

पूर्वी येथील भागात विस्कळीत असलेले औषध विक्रेते १९२५ साली दवा बाजार दुकानदार असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र आली. रुग्णालये आणि औषध कंपन्यांसोबत ठरलेल्या धोरणातून काम केले जात आहे. यामध्ये माल किती असावा याबाबतची नियमावली ठरविण्यात येते. आज औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात मल्टिनॅशनल कंपन्यांचा शिरकाव झालेला आहे. औषध हे कोणासाठी जीव वाचवण्याचे साधन असले तरी काहींसाठी हा कोट्यवधी रुपयांचा व्यापार झालेला आहे. काही पैशांच्या आशेने रुग्णांच्या जीव धोक्यात टाकण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.चांगले, वाईट दोन्ही सोबत असते.

केवळ चांगले किंवा केवळ वाईट हे कधीच होत नाही. त्याला दवा बाजारही अपवाद नाही. येथे फिरल्यास अनेक नियमबाह्य गोष्टीही दिसून येतात. पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम अन्न आणि औषध प्रशासन करत असते. त्यामुळे येथील प्रत्येक गोष्टीवर शासनाची करडी नजर असते. या बाजारात कुठली औषधे आहेत, ती किती दिवस टिकू शकतात, त्याची योग्यता पडताळून पाहणे हे दुकानदारांचे काम असते. पण पैशाच्या मोहापोटी म्हणा किंवा इतर काही कारणांनी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तेव्हा प्रशासनाकडून बाजारावर कारवाई करण्यात येते. दवा बाजार हे मुंबईतील सर्वात मोठे मार्केट आहे. या ठिकाणी घाऊक तसेच किरकोळ औषधांची विक्री केली जाते. अर्थात बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत. तसेच एखादे औषध, गोळ्या इतर कुठेही मिळाल्या नाहीत तर त्या या दवा बाजारात हमखास मिळून येतात. या मार्केटची मला स्वत: एक गंमत वाटली. बरे नसल्यावर आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर आपल्याला सफेद, लाल, निळ्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या गोळ्या देतात. त्या गोळ्या येथे चक्क किलोच्या भावात, वाणी जसे धान्य छोट्याशा खुरपणीतून पिशवीत भरतो तशा भरल्या जातात. ते पाहणे खरेच नवलाचे असते.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -