घरफिचर्सFlash Back 2020: डेडलाईन, खर्चात वाढ... कामे पूर्णत्त्वाकडे

Flash Back 2020: डेडलाईन, खर्चात वाढ… कामे पूर्णत्त्वाकडे

Subscribe

मुंबई मेट्रोची कामे, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प, कृषीपंप जोडण्यासाठी धोरण याला लॉकडाऊनचा फटका बसला. याचा परिणाम प्रकल्पांची डेडलाईन लांबण्यावर आणि खर्च वाढण्यावर झाला. मात्र, अनलॉकच्या प्रक्रियेत हे प्रकल्प ठराविक टप्प्यात सुरू झाल्याने काही कामे पूर्णत्त्वाच्या दिशेने सरकत आहेत. मुंबईतील मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे यंदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले. मुंबईच्या मेट्रो प्रवासाचे भवितव्य हा कारशेड डेपो ठरवणार आहे. त्यामुळेच मुंबईकरांच्या प्रवासाच्या लढाईसोबतच आता राजकीय ‘इगो’ची आणि अस्तित्वाची लढाईही सुरू झाली आहे.

मेट्रो प्रकल्पासाठीचे कारशेड
मेट्रो प्रकल्पामध्ये कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पांतर्गत आरेतील कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण ढवळून निघाले. न्यायालयाचा लढा, मिठागर आयुक्तालयाची भूमिका, खासगी विकासकांच्या याचिका यासारख्या मुद्यांमुळे हे प्रकरण न्यायालयीन कचाट्यात अडकले. पण न्यायालयानेच कांजुरमार्ग येथील कामाला स्थगिती दिल्याने प्रकल्पाचे काम रखडले. त्यामुळे प्लॅन बी, प्लॅन सी च्या रूपात कांजुरमार्गच्या जागेला पर्याय म्हणून वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन प्रकल्पाची जागा तसेच पहाडी गोरेगावमधील जागा यासारख्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली. कांजुरमार्गच्या जागेवर चार मेट्रो प्रकल्प असल्याने आता कांजुरमार्ग हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कळीचा मुद्दा बनला. त्याचाच परिणाम हा येत्या दिवसांमध्ये मुंबईकरांना उपलब्ध होणार्‍या मेट्रो प्रकल्पांवर दिसणार आहे.

- Advertisement -

कोरोनाचा परिणाम मेट्रो प्रकल्पावर
कोरोनाचा परिणाम मुंबईतील मेट्रो प्रकल्पांवरही झाला. मुंबईत ७ बी प्रकल्प आणि मेट्रो २ अ प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कामावर कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे या प्रकल्पाची डेडलाईन ही सहा महिन्यांनी पुढे गेली. तसेच प्रकल्प लांबल्याचा परिणाम म्हणजे या मेट्रो प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पाच्या मार्गिकेची चाचणी आणि प्रकल्पाच्या कामावरही झाला.

फास्ट टॅगची जलद अंमलबजावणी
राज्यातील अनेक टोल नाक्यांवर फास्ट टॅगची डिजिटल यंत्रणा असणार्‍या प्रणालीची अंमलबजावणी या वर्षात मोठ्या प्रमाणात झाली. मुंबईतील एंट्री पॉईंट, वांद्रे वरळी सी लिंक तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरही फास्ट टॅगची प्रणाली कार्यरत झाली. नोव्हेंबर अखेरीस १२ कोटींहून अधिक व्यवहार हे फास्टच्या माध्यमातून टोल नाक्यांवर यशस्वीपणे पार पडले.

- Advertisement -

रस्त्यांच्या कामाला वेग
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या विशेष परवानगीमुळे या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 16 टप्प्यात या महामार्गाचे काम सुरू असून ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्यातील मार्गाला सुरुवात होणार आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर मिसिंग लिंकच्या कामांतर्गत २ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले.

पायाभूत सुविधा प्रकल्पांचे स्वॅपिंग
विरार अलिबाग कॉरिडॉर हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. तर एमएमआरडीएचा ठाणे-बोरिवली टनेलचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एमएसआरडीएला हस्तांतरीत करण्यात आला आहे.

कल्याणकरांना दिलासा
कल्याण शीळफाटा रूंदीकरण वेगवान पद्धतीने सुरू असून, येत्या काही दिवसांमध्ये या मार्गावर प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदाच्या वर्षातले सर्वात क्लिष्ट आणि रखडलेल्या कामांपैकी एक असलेल्या पत्री पुलाच्या कामातही रेल्वे ब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. यावरूनही मोठ्या प्रमाणात राजकारण रंगले होते. लॉकडाऊनच्या काळातही ठाणे खाडीपुलाचे काम वेगाने सुरू झाले. वांद्रे वर्सोवा प्रकल्पात कांदळवनाच्या 150 मीटरच्या जागेत काम करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

मोनोरेल ऑनट्रॅक
मोनोरेलच्या करारामध्ये कंत्राटदार ब्लॅकलिस्ट झाल्याने काही ट्रेन धूळ खात पडल्या होत्या. कंत्राटदार स्कोमी आणि एल एण्ड टी या कंपन्यांच्या एक पाऊल पुढे जात एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी देशातच मोनोरेलच्या सुट्ट्या भागांना जोडण्याची किमया केली. त्यामुळे धूळ खात पडलेल्या मोनोरेल कार्यरत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प (शिवडी न्हावाशेवा)
मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा (पनवेल) अशी कनेक्टिव्हिटी देणार्‍या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांतर्गत ३५.२९ टक्के काम या वर्षात पूर्ण झाले. समुद्रात अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्याने मोठ्या प्रमाणात काम पुढे सरकले. अवघ्या तासापेक्षाही कमी वेळात हा टप्पा पार करणे यामुळे शक्य होणार आहे.

मेट्रो ३ प्रकल्पाचा ३५ वा ब्रेकथ्रू
कुलाबा वांद्रे सीप्झ प्रकल्पांतगर्त नुकताच ३५ वा ब्रेकथ्रु पार पडला. दादर नयानगर येथे मेट्रो स्टेशनच्या ब्रेकथ्रूचा टप्पा पार पडला. संपूर्ण वर्षभरात अनेक प्रकल्पाच्या ठिकाणी स्टेशनच्या ठिकाणची कामे पूर्ण करण्यात आली. काही ठिकाणी ब्रेकथ्रूची कामे पार पडली.

शेतकर्‍यांना एक लाख कृषीपंप
नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. कृषी फिडर व वितरण रोहित्रावरील मिटर अद्ययावत करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. तसेच सद्य:स्थितीत कार्यरत असणार्‍या कृषीपंपांना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. यासाठी पायाभुत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी 1500 कोटी रुपये याप्रमाणे 2024 पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -