घरफिचर्सभाजपचे घोडे अडते कुठे?

भाजपचे घोडे अडते कुठे?

Subscribe

शिवसेना हा भाजपचा वैचारिकदृष्ठ्या जवळचा सहकारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी सध्या शिवसेनेने घरोबो करून मुख्यमंत्रिपद मिळवले असले तरी ते काही शिवसेनेशी वैचारिक जवळीक असलेले पक्ष नाहीत. महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप हा छोटा भाऊ होता, म्हणजे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार असे होते, पण पुढे नरेंद्र मोदींनी केंद्रात भाजपला बहुमत मिळवून दिल्यावर मात्र महाराष्ट्रातील भाजपचा आत्मविश्वास वाढला. आता या पुढे शिवसेनेने आपले ऐकायला हवे, असे भाजपला वाटू लागले, पण शिवसेना तसे करत नाही. इथेच भाजपचे घोडे अडत आहे.

भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वाच्या आधारावर एकेकाळी युती झाली होती, पण पुढे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वाढलेल्या आत्मविश्वासामुळे आता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद काबीज केले पाहिजे, असे तीव्रतेने वाटू लागले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजपच्या युतीची सत्ता आली. त्यावेळी शिवसेनेचे आमदार जास्त असल्यामुळे शिवसेना हा मोठा भाऊ आणि जागा कमी असल्यामुळे भाजप हा छोटा भाऊ असे समीकरण राज्यात होते, त्यामुळे शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आज जरी आपण शिवसेनेचे छोटे भाऊ असलो तरी पुढील काळात आपल्याला मोठे भाऊ व्हायचे आहे, इतकेच काय आपल्याला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवायची आहे, हे त्यांच्या मनात होते. त्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय बैठकांमध्ये ‘शतप्रतिशत भाजप’ अशा घोषणा उठत होत्या. दोघांचे युतीचे सरकार साडेचार वर्षे चालले. पण पुढे जेव्हा १९९९ साली जेव्हा विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर मात्र गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले. कारण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे होते, आता ते आम्हाला मिळायला हवे. पण या मागणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केले नाही. शिवेसना कुठल्याही परिस्थितीत दुय्यम स्थान स्वीकारणार नाही, कारण तो त्यांच्या अस्मितेचा प्रश्न होता. कारण एकेकाळी भाजप महाराष्ट्रात कमकुवत होता, पण पुढील काळात आपले पाय महाराष्ट्रात रुजविण्यासाठी भाजपला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा उपयोग झालेला होता. कारण भाजपवर शेटजी भटजींचा पक्ष अशी छाप होती. पण ती पुसून त्यांचा राजकीय प्रभाव वाढण्यास शिवसेनेचे भाजपला सहाय्य झाले. त्यामुळे पुढील काळात काहीही झाले तरी मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे अशी भूमिका शिवसेनेची राहिली. त्यामुळे १९९९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला. त्याचा फायदा पुढे नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेल्या शरद पवार यांनी उचलला. त्यातून पुढे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची पंधरा वर्षे राज्यात सत्ता राहिले. पण नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पातळीवर सुपर डुपर विजय मिळवून देऊन केंद्रात भापजची बहुमतातील सत्ता आणल्यावर मात्र महाराष्ट्र भाजपच्या पंखात नवे बळ आले. त्यांनी मोदींना महाराष्ट्राच्या मैदानात उतरविले, त्यामुळे आता शिवसेनेची आपल्याला काही गरज नाही. कारण शिवसेना मुख्यंमत्रिपदाचा दावा सोडणार नाही. त्यामुळे उद्या आपल्या जास्त जागा निवडून आल्या तरी  युतीत लढल्यास पुन्हा त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावे लागेल, ही भीती असल्यामुळे भापजने शिवसेनेशी असलेली युती तोडली आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीला ते सामोरे गेले. पण भाजपला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या. त्यामुळे पुन्हा त्यांचे घोडे अडले.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे, त्याचसोबत महाराष्ट्राच्या बुहतांश भागात संघाच्या शाखांचे जाळे पसलेले आहे. पण थेट राजकारणात त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. अन्यथा भाजपने शिवसेनेच्या पुढे कधीच मुसंडी मारली असती. भाजप ही संघाची राजकीय शाखा असली तरी संघातील मंडळी भाजपला परिस्थितीचा अंदाज पाहून मदत करत असतात. त्यात पुन्हा ते जास्तीत जास्त घरोघरी जाऊन प्रचार  करण्यास मदत करू शकतील, पण करिश्मा असलेेले नेते ते निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा राजकीय पातळीवर प्रभावी नेतृत्व पुढे येते तेव्हा ते त्याला सहाय्यभूत ठरत असतात. संघाच्या माध्यमातून भाजप महाराष्ट्रातील तळागाळात लोकांमध्ये प्रचार करू पाहत असतो, पण राजकीय निवडणुका जिंकण्यात त्यांना तसा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी राजकीय पातळीवर सक्षम नेतृत्व लागते. प्रमोद महाजन यांचा त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर प्रभाव होतात, त्याचा फायदा भाजपला होत होता. पण त्यांनी शिवसेनेशी जी युती केली होती, त्याची जोड त्याला होती. पण काहीही झाले तरी शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यांचा उपयोग करून आपल्याला आपला विस्तार करायचा आहे, अशी भाजपची भूमिका राहिलेली होती. कारण काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रादेशिक पक्षांशी कितीही गळ्यात गळे घातले तरी त्यांना एकदिवस त्या प्रादेशिक पक्षाला पूर्णपणे आपल्या पोटात घ्यायचे असते किंवा अगदीच शक्य झाले नाही, तर त्याला घोडा करून त्याच्या पाठीवर बसायचे असते. पण शिवसेना काही केल्या भाजपसाठी घोडा व्हायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भापजचे वांदे होेऊन बसले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात बहुमत मिळवण्यासाठी भाजप जंग जंग पछाडत आहे. त्यासाठी ते नरेंद्र मोदींच्या करिश्म्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे देवेंद्र फडणवीस हे कुठलेही भाषण मोदींच्या नावापासून सुरू होत असते. त्यांच्यासाठी सर्वेसर्वा हे नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या करिश्म्यावर आपण महाराष्ट्रात केंद्राप्रमाणे राज्यातही बहुमत मिळवू शकतो, असे वाटत असल्यामुळेच मी पुन्हा येईन, असा आत्मविश्वास त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारसभांमधून व्यक्त केला होता. पण त्यांचा तो आत्मविश्वास पोकळ ठरला. त्यांना पुन्हा बहुमतासाठी जागा कमी पडल्या. पण यावेळी शिवसेनेने भाजपला खिंडीत पकडले. कारण मागील पाच वर्षे भाजपच्या मागे शिवसेनेने फरपट अनुभवली होती. शिवसेना नाईलाज म्हणून पुन्हा आपल्यासाठी घोडा बनेल आणि आपल्याला मुख्यमंत्री बनता येईल, असे फडणवीस यांना वाटत होते. पण यावेळी शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली.
मी किती दिवस पालखीचा भोई बनू, आता ते शक्य नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यामुळे भाजपची परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमुळे महाराष्ट्राचे लोकमत चार तुकड्यात विभागले गेले आहे. त्यामुळे यापैकी कुठल्याही पक्षाने कितीही ताणले तरी त्याला बहुमत मिळत नाही. त्यांना कुणाला तरी घोडा बनवावा लागते. किवा घोडा बनून आपल्या पाठीवर घ्यावे लागते. भाजप आपल्याला घोडा करू पाहत आहे, पण आपण या वेळी बनायचे नाही, असा निर्धार शिवसेनेने केलेला होता. त्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदींच्या करिश्म्याला महाराष्ट्रात शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोनिया गांधींना राजी करून त्यांच्या विचाराशी विभिन्न असलेल्या शिवसेनेला खांद्यावर घेणे पसंत केले. मुंबई महानगरपालिकेतही भाजपने मोठी मुसंडी मारली होती, पण तिथेही भाजपला अगदी मोजक्या जागा कमी पडल्या. आशिया खंडातील श्रीमंत असलेली मुंंबई नगरपालिकेवर आपली सत्ता स्थापित करण्यात भाजपला अपयश आले. थोडक्यात, काय भाजपला पालिकेत असो किंवा विधानसभेत असो, काही जागा कमीच पडतात. त्यांना बहुमत मिळवता येत नाही, त्यासाठी त्यांना हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेची मदत घ्यावीच लागते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेचा प्रभाव होता. आता भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रभावी नेते असल्यामुळे भाजपाच्या जागा नक्कीच वाढल्या आहेत, पण त्यांना बहुमत मिळत नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेची गरज लागते. पण शिवसेना आता काहीही झाले तरी भाजपला पाठीवर घ्यायला तयार नाही. इथेच भाजपचे घोडे अडत आहे. त्याचा फायदा सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना मिळत आहे. पण शिवसेनेला खांद्यावर घेऊन त्यांना भाजपला रोखण्याचे समाधान मिळवता आले, पण सत्तेचे सुख मिळवता येत  नाही. राज्यातील हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या अंगाचा तीळपापड झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ते विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे केंद्राच्या अख्यत्यारित असलेल्या तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावण्यात येत आहे. आजवर पाहिले तर अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. अशा चौकशा बरेचदा पुढच्या पक्षाला आपल्या दावणीला बांधण्यासाठी होत असतात. महाविकास आघाडीचे सरकार काही बाही कारणामुळे पडले तर शिवसेना त्यापासून वेगळी होईल. त्यानंतर शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा, असाच भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला तर त्यांच्या नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा कदाचित संपेलही, पण त्यासाठी शिवसेनेला भाजपचा घोडा बनावे लागेल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -