Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स आव्हानांना सामोरे जाण्यातच शहाणपण

आव्हानांना सामोरे जाण्यातच शहाणपण

केवळ सरकारवर अवलंबून न राहता नवा रस्ता तयार करणे आणि जगाच्या स्पर्धेत टिकून राहता येईल इतका सक्षम असा मार्ग निवडणे हाच पर्याय आता आपल्यासमोर आहे.

Related Story

- Advertisement -

केवळ सरकारवर अवलंबून न राहता नवा रस्ता तयार करणे आणि जगाच्या स्पर्धेत टिकून राहता येईल इतका सक्षम असा मार्ग निवडणे हाच पर्याय आता आपल्यासमोर आहे. अशी साखळी तयार होणे ही काळाची गरज आहे. ही साखळी शेतकर्‍याच्या मालकीची राहणे, यातून होणारे काम पूर्ण स्वयंपूर्ण, ताकदीचं आणि जागतिक दर्जाचं होणे हे महत्वाचे आहे. जागतिक प्रवाहातील नव्या स्पर्धेत या यंत्रणा टिकल्या पाहिजेत. याच धर्तीवर आता जावे लागणार आहे. हीच आता नवी वाट हवी.

- Advertisement -

शेतीसमोर आव्हाने कधी नव्हती? ती प्रत्येक काळात होती. ती प्रत्येक काळात राहणार आहेत. वेगवेगळ्या स्वरुपात ती येणारच आहेत. प्रश्न हा आहे की या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत का?

खुलीकरण, उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कर्तृत्वाची, संधींची कितीतरी दालने आपल्यासाठी खुली झाली आहेत. जगातील प्रत्येक क्षेत्रासमोर आव्हाने आहेत. शेती क्षेत्रही त्याला अपवाद नाही. काळाच्या रेट्यात जे समर्थपणे या आव्हानांना सामोरे गेले ते टिकले. ज्यांनी आव्हाने स्वीकारली नाहीत. त्यानुरुप स्वत:त बदल केला नाहीत, त्यांची अवस्था अधिकाधिक बिकट होत गेली.

- Advertisement -

शेती हा माझा पूर्वपरंपरागत व्यवसाय आहे. त्याचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. ते सोडवण्याची जबाबदारी माझी किती? आणि सरकारची किती? यावर चर्चा खूप होते. माझे प्रश्न ही सरकारचीच जबाबदारी आहे. ते सरकारनेच सोडवावेत. ही अपेक्षाही अनेकदा केली जाते. ती कितपत व्यवहार्य आहे? समस्यांपासून पळून जाण्याने कोणत्याही समस्या सुटत नाही. उलट त्या समस्या अधिकाधिक जटील होत जातात. केवळ सरकारवर अवलंबून राहून आता चालणार नाही. सरकार ही निर्माण करणारी व्यवस्था नाही. तर ती नियोजनात साह्यभूत ठरणारी यंत्रणा आहे. हे या यंत्रणेचे वास्तव स्वरुप आपण समजून घेतले तर या यंत्रणेकडून केल्या जाणार्‍या अपेक्षेला कितपत अर्थ आहे, हे आपल्या लक्षात येईल. या यंत्रणेची अंगभूत अशी क्षमता आहे. ती तिच्याशी योग्य समन्वय ठेवून आपल्याला उपयोगात आणता येईल. त्यासाठी मुळात ‘आडात’ काही तरी असले पाहिजे, तर ‘पोहर्‍या’त काही तरी येईल. केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपल्याला आपल्या हिताचा नवा सक्षम मार्ग तयार करावा लागणार आहे. एकटी दुकटी कडी ही कुठेही धुळखात पडून राहते. अशा अनेक कड्या एकमेकांत गुंफून साखळी तयार करावी लागणार आहे. शेतकर्‍याचा माल ते ग्राहक याच्यात एक साखळी कार्यरत आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात दृष्य अदृष्य स्वरुपात अनेक मध्यस्थ घटक आहेत.

… तरच जोखड हटेल

शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही शोषण करतात. ही आताची स्थिती आहे? शेतकर्‍याच्या मालाच्या किमतीपैकी शेतकर्‍याच्या हातात किती पैसे पडतात? ग्राहकाला किती पैसे मोजावे लागतात? या प्रश्नांच्या उत्तरावरुन आजची भयान वस्तुस्थिती तुमच्या लक्षात येईल. हे असेच चालू ठेवायचे का? हा आजच्या काळातला खरा प्रश्न आहे. ही साखळी पूर्णपणे शेतकर्‍याच्या मालकीची असेल तरच त्यातून शेतकर्‍याचे हित साधले जाणार आहे. अर्थात शेतकर्‍याच्या मालकीची साखळी उभारणे आणि ती जगाच्या स्पर्धेत उतरण्याइतपत सक्षम करणे हाच आज तरी बाजाराच्या जोखडातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असे म्हणता येईल. हे काम सरकार स्वत:हून करणार नाही. हे काम करायला कुणी बाहेरुन येणार नाही. हे आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे.

आता नवी वाट हवी…

हे मी काही फार नवीन सांगत नाहीय. शेतकर्‍याला शोषणातून आणि बाजाराच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात अनेक प्रयत्न झालेत. केवळ सरकारवर अवलंबून न राहता नवा रस्ता तयार करणे आणि जगाच्या स्पर्धेत टिकून राहता येईल इतका सक्षम असा मार्ग निवडणे हाच पर्याय आता आपल्यासमोर आहे. अशी साखळी तयार होणे ही काळाची गरज आहे. ही साखळी शेतकर्‍याच्या मालकीची राहणे, यातून होणारे काम पूर्ण स्वयंपूर्ण, ताकदीचं आणि जागतिक दर्जाचं होणे हे महत्वाचे आहे. जागतिक प्रवाहातील नव्या स्पर्धेत या यंत्रणा टिकल्या पाहिजेत. याच धर्तीवर आता जावे लागणार आहे. हीच आता नवी वाट हवी.

यासाठी आतापर्यंत काय काय प्रयत्न झाले?

आपल्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. सहकारने सर्वसामान्य माणसाचे जीवन बदलवले. गावागावात स्थापन झालेल्या सोसायट्यांनी सामान्य शेतकर्‍याला पत मिळवून दिली. सहकारी साखर कारखान्यांनी ऊस या पिकाचं असे मॉडेल उभे केले की ज्या मुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, कामगार, वाहतूकदार, प्रक्रिया उद्योजक अशा अनेक घटकांना एकत्र गुंफत जोडलेल्या प्रत्येकाचे जीवनमान उंचावले. कापूस पट्ट्यात तयार झालेल्या सुतगिरण्या, छोट्या छोट्या गावातील दुध डेअर्‍यांनी शेतकर्‍याच्या घरखर्चाला आधार दिला.आतापर्यंत जे चांगले घडलंय ते असे घडले.

‘अमूल’ कशी यशस्वी ठरली?

सहकाराचा उद्देश सर्वसामान्यांच्या हिताचा होता. तो सुरुवातीच्या काळात बर्‍याच अंशी सफल झाला. नंतरच्या काळात मात्र अनेक कारणांनी या सहकारी चळवळीला उतरती कळा लागली. सहकारी संस्था या राजकीय सत्तेचे साधन बनल्या. त्यांचा राजकीय हेतूने वापर होऊ लागला. त्यातच प्रशासकीय व उत्पादनाच्या पातळीवर अकार्यक्षमता, भ्रष्टाचार या रोगांनी ही चळवळ पोखरली.

सहकार संस्था व्यवहारात, व्यवसायात मागे पडल्या याचे महत्वाचं कारण म्हणजे त्या चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक दृष्टीकोनाचा अभाव हे ठळकपणे सांगता येईल. याच काळातील आणंद (गुजरात) येथील अमूल ही संस्था मात्र वाढत गेली. तब्बल ४० लाख दुध उत्पादक आणि लाखो कामगार व लाखो ग्राहकांना जोडणारी ती भारतातील सर्वात मोठी सहकारी संस्था बनली. स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण कृषि उद्योग क्षेत्रात घडलेली ही सर्वात आश्वासक घटना म्हणून याकडे पाहिले जाते. ‘अमूल’ यशस्वी ठरली तर दुसरीकडे त्याच काळातील हजारो संस्था डबघाईस आल्या. बहुतांश बंद पडल्या. अवसायनात गेल्या. असे का झाले ? ‘अमूल’ने सहकाराला परिपूर्ण व्यावसायिकतेची जोड दिली. लाखो शेतकर्‍यांना जोडतांना साखळीच्या शेवट असलेल्या ग्राहकाला कायम केंद्रस्थानी ठेवले. उत्पादनात गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरले. त्यात सतत सुधारणा करीत गेले, त्यातून केवळ देशातीलच नव्हे तर जगाची बाजारपेठ काबीज करण्याची आकांक्षा त्यांनी बाळगली. त्या दिशेने पाऊले टाकली. आज आपल्या शेतीला या ‘अमूल’ मॉडेलची गरज आहे.

लिकेजेस काढली पाहिजेत

सारासार विचार करता आधी व्यवस्था (इको सिस्टीम) उभ्या राहिल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे त्या शेतकर्‍यांच्या मालकीच्या उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यासाठी काय करावे लागेल? आपली शेती म्हणजे अनेक लिकेजेस असलेली पाईपलाईन झाली आहे. निविष्ठांपासून ते बाजार व्यवस्थेपर्यंत अशी अनेक छिद्रे या पाईपलाईनला पडली आहेत. या लिकेजमधून सगळे पाणी अपेक्षित साध्यापर्यंत न जातात मध्येच गळून जात आहे. ही गळती थांबवण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर कामे करावी लागणार आहेत. लिकेजेस काढले पाहिजेत, मात्र ते एकटा दुकटा शेतकरी करु शकत नाही. त्यासाठी एकत्र येणे हाच पर्याय आहे. साखळी निर्माण करणे म्हणजे काय तर, ग्राहकापासून ते उत्पादकापर्यंतचं नियोजन करणे हे आता आपल्याला करावे लागणार आहे. आपल्या भागातील पिकपध्दती लक्षात घेऊन किमान दहा व अधिक शेतकर्‍यांनी एकत्र यऊन शिवारात शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणे हा त्यावर उपाय आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या दृष्टीने देशभरातील शेतकर्‍यांसमोर रोल मॉडेल बनली आहे. ‘द्राक्ष’ या एका पिकापासून सुरुवात करुन या कंपनीने यशस्वी मुल्यसाखळीचे जाळे उभारले आहे. हे राज्याच्या कोणत्याही भागातील पिकपध्दतीला लागू पडणारे आहे.

तंत्रज्ञान हेच साधन

जगभर ज्याला मान्यता आहे, मागणीही आहे आणि प्रत्येक शेतकर्‍याच्या पातळीवर शक्यही आहे असे अवशेषमुक्त उत्पादन घेणे हा पर्याय आहेच. त्याची शास्त्रशुध्द काटेकोर यंत्रणा उभारणं हे ही शक्य आहे. हे द्राक्षासारख्या पिकांत सिध्दही झालं आहे. नवे तंत्रज्ञान स्विकारुनच पुढे जावे लागेल. प्रश्न, समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच मार्गी लावणे शक्य आहे. जग बदललंय. जगातील शेती बदलली. अमूल जसे आहे, तसे जगभरातही अशी मॉडेल्स उभी राहिली आहेत. आपल्यालाही बदलत्या काळाचा मागोवा घेत पुढे वाटचाल करावी लागणार आहेत. त्यासाठी आता बदलण्याची तयारी ठेवणं गरजेचे आहे.

- Advertisement -