घरफिचर्सडिअर मुंबईकर, टेक केअर अँड इसबगोल...

डिअर मुंबईकर, टेक केअर अँड इसबगोल…

Subscribe

...तर मुद्दा काय की मुंबईकरांची काळजी करावी, असा सध्याचा सीझन नाही. आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. पुढच्या निवडणुका दूर आहेत. त्यामुळे तुझे सगळे तथाकथित लोकप्रतिनिधी हे त्यांच्या सात पिढ्यांची सोय करण्याच्या उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत. निवडणूक आल्याशिवाय त्यांना तुझ्याकडे वळूनही पाहावंसं वाटणार नाही. मग, तुला टेक केअर म्हणून सांगतंय तरी कोण आणि कशाला?

अरे यार, असा चमकून पाहू नकोस… आपल्याला टेक केअर अशा शुभेच्छा कोणी दिल्या हे पाहण्यासाठी ७.३३च्या गर्दीत मान वळवण्याचा प्रयत्नही करू नकोस. दोन खरखरीत दाढ्या, एक राईतेलसुगंधित डोकं आणि सिगरेट पिऊन काळेठिक्कर झालेले दोन ओठ यांचा जीव नको नको करून टाकणारा स्पर्श झाल्याशिवाय तुझी मान ३० अंशातही वळू शकणार नाही.

तू का चमकलास, याची कल्पना आहे. आता काही पावसाळा नाही. नाले तुंबून ट्रॅक भरण्याची आणि घरी किंवा ऑफिसात पायी चालत जाण्याची वेळ येण्याची शक्यता नाही. आता तू ट्रेनमध्ये आहेस. कोणत्याही स्टेशनच्या ब्रिजवर नाहीस. त्यामुळे कोणाच्या खिशातलं आठ आण्याचं नाणं पडलं म्हणून धावपळ होऊन त्यात इतर ३२जणांबरोबर इतरांच्या पायाखाली तुडवला जाशील, अशी भीतीही नाही. तू रस्त्यावरही नाहीस. त्यामुळे भर ट्रॅफिकमधून वाट काढत रेसिंग करणार्‍या मवाली पोरांच्या मोटरसायकलींचा जीवघेणा धक्का लागण्याची शक्यता नाही. तू फुटपाथवरही नाहीस. त्यामुळे तोल सुटलेल्या कोणा धनिक बाळाच्या गाडीखाली चिरडून जीव जाण्याचीही धास्ती नाही… रोज मरण्यासाठी नेल्या जाणार्‍या कोंबड्यांच्या गाड्यांमधल्या कोंबड्यांपेक्षाही वाईट अवस्थेत, चेंबलेल्या स्थितीत तू ट्रेनमध्ये उभा असलास, तरी तू त्यातल्या त्यात सुरक्षित जागी उभा आहेस, याबद्दल तू परमेश्वराचे आभार मानले पाहिजेस. अर्थात, नेमका आत्ताच एखादा माथेफिरू तुझ्या कम्पार्टमेंटमध्ये डोक्यावरच्या रॅकवर कुकर बॉम्ब ठेवून मागच्या स्टेशनात उतरून गेला नसेल तरच.

- Advertisement -

तर मुद्दा काय की मुंबईकरांची काळजी करावी, असा सध्याचा सीझन नाही. आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. पुढच्या निवडणुका दूर आहेत. त्यामुळे तुझे सगळे तथाकथित लोकप्रतिनिधी हे त्यांच्या सात पिढ्यांची सोय करण्याच्या उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत. निवडणूक आल्याशिवाय त्यांना तुझ्याकडे वळूनही पाहावंसं वाटणार नाही. मग, तुला टेक केअर म्हणून सांगतंय तरी कोण आणि कशाला?

मित्रा, जगी ज्यास कोणी नाही, अशा मुंबईकराची फक्त दुसरा मुंबईकरच काळजी करतो कायम. तोच पावसात अडकलेल्या लोकलमध्ये चहा आणून देतो, तोच रस्त्यात वडापाव देतो, तोच लोकलमधून पडणार्‍या सहप्रवाशाला वाचवतो. तोच तुझीही काळजी करतोय रे.

- Advertisement -

तुला टेक केअर हे आपलं एक इन जनरल सांगतात तसंही सांगतोय आणि विशेष सांगायचं तर पोटाची काळजी घे, असंही सांगतो आहे. नाही रे बाबा, तुझ्या पोटापाण्याची काळजी घ्यायला ही मुंबई, अजूनही, समर्थ आहे. ती काळजी घ्यायला दुसरा माणूस कशाला हवा? या मुंबईत देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक येतात कामधंद्याच्या शोधात, ही मुंबई कोणाला उपाशी मरू देत नाही. सगळ्यांच्या पोटाला अन्न देते, हीच तर तिची महत्ता आहे. त्यामुळे त्या अर्थाने पोटाची काळजी घ्यायचा विषय नाही, पोटाची काळजी घे, म्हणजे पोट नीट व्यवस्थित स्वच्छ साफ होत राहील, झटपट दोन मिनिटांच्या आत आपला कोठा रिकामा होईल, याची काळजी घे.
अरे का म्हणून काय विचारतोस? तुला तुझ्या जिवाची पर्वा नाही का?
कोठा साफ नसेल तर गंभीर आजार होतात, हे बरोबरच आहे. पण, ते आजार होण्यासाठी तू जिवंत राहशील की नाही, हेही सांगता येत नाही आपल्या प्रिय शहरात.

अरे, असा कोड्यात पडल्यासारखा काय पाहतोयस? काही बातम्या वगैरे पाहतोस की नाही कधी? अरे देवा, मराठी सीरियलमध्ये १० मिनिटं काम केलेल्या सेलिब्रिटीच्या घरी गणपतीला कसला प्रसाद केला होता, त्याची रेसिपी देणारे पेपर पाहतोस तू (ते ‘पाहायचे’च असतात, वाचायला काही नसतंच त्यात), मग तर तुला जिवाची जास्त काळजी घ्यायला हवी. तुला तुझ्या आसपास काय घडतंय याची कल्पनाच नाही.

अरे, आपल्या शहरात गेल्या १५ दिवसांत दोन खून झाले आहेत… हसू नकोस. मला माहितीये या शहरात दिवसाला चार खून पडत असतील आणि दोनपाचशे लोकांचे मृत्यू होत असतील एकेका उपनगरात. मरण इथे स्वस्त आहेच. पण, ते किती स्वस्त आहे, याची तुला कल्पना नाही. तर सांगत काय होतो की हे जे दोन मृत्यू झाले ते सार्वजनिक संडासाबाहेर झाले. दोन्हीकडे समान गोष्ट घडली. सार्वजनिक संडासाबाहेर रांग होती. एकजण आत होता. त्याला वेळ लागला. बाहेरचा घायकुतीला आलेला एकजण अस्वस्थ झाला. त्याने दार वाजवलं. असं केलं की आतल्या माणसाचं कॉन्सन्ट्रेशन कसं लूज होतं आणि मौसम तुटल्याने काय त्रास होतो, याची तुला कल्पना असेलच. साहजिकच आतला माणूस बाहेर आला तेव्हा भडकलेला होता. बाचाबाची झाली. तिचं पर्यवसान मारामारीत झालं आणि त्यात त्यांच्यातल्या एकाचा बळी गेला. हो हो, जीव गेला. असं दोन वेळा झालं.

हे सगळे फक्त आतल्या माणसाला वेळ लागल्याचे, त्याचा कोठा साफ न झाल्याचे भयानक परिणाम होते. तू कधी विचार केला होतास का की साधं संडासला जायला उशीर होणं हे कोणाचा तरी जीव जाण्याचं कारण बनू शकतं? आता यावर उपाय काय? बाकीचे काय करायचं ते करतील, तू मात्र एक तातडीचा उपाय करू शकतोस. इसबगोल घ्यायला सुरुवात कर किंवा धौतीयोग चूर्ण घे, कायमचूर्ण घे, सॉफ्टोवॅक घे किंवा पाटणकर काढा घे किंवा आणखी काय हवं ते घे, पण कोठा साफ ठेव.

कारण आपल्या मुंबईत सध्या ‘कोठा साफ तर जीव सुरक्षित’ अशी परिस्थिती आहे.
तेव्हा मुंबईकर, टेक केअर अँड टेक इसबगोल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -