Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शक्तिप्रदर्शन कोणाचं? कोणासाठी?

शक्तिप्रदर्शन कोणाचं? कोणासाठी?

Related Story

- Advertisement -

सध्या राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट येईल या भीतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने सर्वत्र पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. अशा वेळेला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यासारख्या विदर्भातील सेनानेत्याने-मंत्र्यानं आपल्यावरील गंभीर आरोपांमधून वाट काढताना पोहरादेवीसारख्या पवित्र जागेची निवड करून पक्षनेतृत्वाला आपण समाजाचेच नव्हे तर विदर्भातीलही दबंग राजकारणी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. संजय राठोड हे एकनाथ शिंदे या शिवसेनेतील गटाचे सदस्य आहेत असं बोललं जातं. त्यामुळेच त्यांनी राठोड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असावी.

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, विदर्भातले शिवसेनेचे आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्यावर बंजाराकन्या पूजा लहू चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या आरोपांचं काहूर उठलेलं असताना त्यांनी पंधरा दिवस स्वतःला राजकीय ‘क्वारंटाईन’ केलं होतं. ते ना पक्षातील नेत्यांना भेटत होते ना प्रसारमाध्यमांसमोर येत होते. त्यांच्याबाबतच्या ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यामुळे त्यांची, त्यांच्या पक्षाची आणि ते ज्या बंजारा समाजातून येतात त्या समाजाची खूपच बदनामी झाली. गायब मंत्री राठोड यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा असा एक जोरदार मतप्रवाह शिवसेनेत होता. त्यावेळी संजय राठोड यांच्या पाठीशी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उभे राहिल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय राठोड जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणं किंवा त्यांचा राजीनामा घेणं हे त्यांच्यावर अन्यायकारक होईल अशा स्वरूपाची भूमिका शिंदे आणि पक्षातील राठोड त्यांच्या काही हितचिंतक मंडळींनी घेतली. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे संजय राठोड यांच्यावरील राजकीय गंडांतर थोडक्यासाठी हुकलं. खरंतर हे राजकीय गंडांतर टळल्यानंतर मंगळवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला राठोड आणि त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी जवळ जो काही शक्तिप्रदर्शनाचा तमाशा केला तो संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबनलाल महाराज यांनाही कदाचित पसंत पडला नसावा. कारण या सगळ्या संत महाराजांचं देशातील बारा कोटी बंजारांच्या प्रति जे योगदान आणि आशीर्वाद आहेत ते पाहता जे काही घडत होतं ते राठोडांवरच्या राजकीय संकटाला आणि बंजारा समाजाला अडचणीत ओढणारंच होतं. संजय राठोड यांचे शक्तिप्रदर्शन जसं बंजारा समाजातील थोर संत महाराजांना पसंत पडलं नसेल तसं ते मुख्यमंत्री उद्धव ज्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अभिमानाने घेत राज्याचा प्रमुख म्हणून राज्यशकट हाकतात त्या स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांनाही ते रुचलं नसावं. पोहरादेवी हे धार्मिक स्थळ बंजारा समाजासाठी पवित्र समजलं जातं. या समाजाने पोहरादेवीला काशीचा दर्जा दिलेला आहे. याच पवित्र ठिकाणी संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पसंती दिली. संजय राठोड यांच्या पोहरादेवीच्या भेटीसाठी हजारो कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन समाज माध्यमांवरुन, वर्तमानपत्रांमधून आणि वाड्या-वस्त्यांवरुन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ‘एक बंजारा-लाख बंजारा’, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘एक ही नारा संजय भाऊ हमारा’ ‘संजय भाऊ, अंगार है बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. हा सगळा माहौल बघून आठवण झाली 2005 साली नारायण राणे यांना पक्षातून बाहेर काढण्यात आल्यावर त्यांच्या समर्थकांनी मुंबई विमानतळावर केलेल्या शक्तिप्रदर्शनाची. राणे साब अंगार है, बाकी सब भंगार है। ही घोषणा स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांच्या खूपच जिव्हारी लागली होती.

- Advertisement -

सध्या राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट येईल या भीतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने सर्वत्र पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. प्रशासनाकडून सामान्यांना जाचक अटी आणि प्रशासकीय दंडाला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळेला संजय राठोड यांच्यासारख्या विदर्भातील सेनानेत्याने-मंत्र्यानं आपल्यावरील गंभीर आरोपांमधून वाट काढताना पोहरादेवीसारख्या पवित्र जागेची निवड करून पक्षनेतृत्वाला आपण समाजाचेच नव्हे तर विदर्भातीलही दबंग राजकारणी आहोत हे दाखवण्याचा हा प्रकार होता. संजय राठोड हे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्यांची विदर्भातील राजकीय शैली आणि फडणवीस मंत्रिमंडळातील कामकाज पद्धती विलक्षण वादग्रस्त आहेच. आता तर त्यांनी आपल्या समर्थकांना चेतवून ‘मातोश्री’लाच आव्हान दिलं आहे. संजय राठोड हे एकनाथ शिंदे या शिवसेनेतील गटाचे सदस्य आहेत असं बोललं जातं. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेत कोणताही गट नाही असं शिवसेनेचे अनेक नेते वाहिन्यांच्या कॅमेर्‍यांसमोर आणि जाहीर सभांमधून सांगत असतात. पण प्रत्यक्षातील वास्तविकतेचा भाग म्हणून बहुदा एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे संजय राठोड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असावी. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंनंतर आणि अजित पवारांनंतर सरकार मधले सर्वाधिक लोकप्रिय मंत्री तर आहेतच. पण त्याच वेळेला ते शिवसेनेतील आणि मातोश्रीतील सदस्यांनंतर सर्वाधिक लोकसंग्रह आणि जनसंपर्क राखणारे सेनानेते आहेत. ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पदचिन्हांवर चालल्याचं त्यांच्या पावलागणिक आपल्या लक्षात येऊ शकतं. एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांची पक्षाचे मंत्री,आमदार आणि नेते यांच्यासमोर केलेली पाठराखण पाहता कदाचित स्वर्गात आनंद दिघे यांनाही ते रुचलं नसेल. महिलांबाबतच्या तक्रारी संदर्भात स्वतः स्वर्गीय शिवसेनाप्रमुख आणि स्व.आनंद दिघे अत्यंत संवेदनशील असत. त्यांचाच चेला असलेल्या एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांची पाठराखण करणं हे अनेकांच्या पचनी पडलं नव्हतं. असं म्हणतात की एखादी व्यक्ती अडचणीत असताना तिच्या पाठीशी उभे राहणं हे केव्हाही तुमचे त्या व्यक्तीबरोबरचे त्या व्यक्तीच्या समाजाबरोबरचे बंध घट्ट होण्यासाठी उपयोगाचं असतं. थोड्याफार प्रमाणात ते बरोबरही असेल, मात्र संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाणबाबत असलेले अत्यंत गंभीर आरोप आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंसारख्या लोकप्रिय नेत्याने त्यांची पाठराखण करणं हे चक्रावून टाकणारं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे आणि शिंदे यांच्या हो मध्ये हो मिसळलेल्या पक्षातील आमदार नेत्यांमुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावरील कारवाई लांबणीवर टाकली. पण त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांना बोलावून पूजा चव्हाण प्रकरणाचा खोलवर तपास करायला भाग पाडलं. संजय राठोड यांच्यासाठी बंजारा समाज उद्विग्न झाला असं भासवलं जातं. त्याच समाजातील एक चुणचुणीत कार्यकर्ती म्हणून पूजा लहू चव्हाण या गरीब कुटुंबातील तरुणीकडे पाहिलं जात होतं. मग राठोडांच्या मागे उभा राहणारा समाज एका तरुण कार्यकर्तीच्या कुटुंबामागे उभा राहणार नाही का? समाजातील संत-महंतांना स्मरुन बंजारांनी याचं उत्तर द्यायला हवं.

पूजाचा मृत्यू झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला. कार्यकर्त्यांनी उत्साहात अनेक ठिकाणी ठाण्यात होर्डिंग लावले. कोपरीतल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने तर कहरच केला.त्याने मंत्रालय ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर ठळकपणे शिंदेंच्या अभिष्टचिंतनाचे होर्डिंग लावले. कोपरी भागातील या पदाधिकार्‍याने जाणीवपूर्वक ही करामत केली होती. त्याच्या पत्नीला किंवा मुलीला तिकीट मिळविण्यासाठी त्याची आत्तापासूनच तयारी सुरू आहे. त्यासाठी केलेल्या उचापतींची झळ एकनाथ शिंदे यांना पोहचू शकते हे बहुधा त्याच्या गावीही नाही. संजय राठोडांसारख्या गंभीर आरोप असलेल्या एखाद्या सहकार्‍याला किती आणि कसे पाठीशी घालावं याचा विचार शिंदे यांनी करायला हवा. त्याच वेळेला ठाण्याच्या कोपरीसारख्या भागातून येऊन विनाकारण पक्षनेतृत्वाच्या नजरेत सलेलं असे जाणीवपूर्वक होर्डिंग्ज लावणार्‍या ठाण्यातील लाळघोट्या ‘बाळां’ना शिंदे यांनी आवरायलाच हवं. कारण पक्षातील आमदार नेत्यांसमोर ज्या संजय राठोड यांची शिंदे यांनी बाजू घेतली त्याच राठोड यांनी उद्धव ठाकरे यांनाच जणू आव्हान देण्याचा प्रकार पोहरादेवीत घडवून शिंदेंची स्थिती अवघडवून टाकली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. तर दुसर्‍या बाजूला वर्षाच्या आणि मंत्रालयाच्या अंगणात चाळीस किलो मीटर अंतरावर जाऊन होर्डिंग लावणार्‍या कार्यकर्त्यांचा उद्देश शिंदे यांनी तपासायला हवा. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाण्यातील गडकरी रंगायतन कार्यक्रमात पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले, शिंदे यांनी किसन नगर, वागळे इस्टेटमधून बाहेर येऊन एकनाथ ऐवजी लोकनाथ होण्याची गरज आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आयुक्त फणसळकर यांनी पोलीस सेवेतील आपल्या अभ्यासानुसार आणि ठाण्यातील पोलीस प्रमुखपदाच्या खुर्चीवरून केलेल्या चिकित्सेनंतर केलेलं हे विधान म्हणता येईल. तर दुसर्‍या बाजूला राजकारणात मिळालेल्या खुर्चीचा आणि त्याआधारे आलेल्या पैशाच्या मस्तवालपणामुळे रावडी ‘राठोडां’नी शिंदे यांना 23 तारखेला तोंडघशी पाडलेलं आहे. या दोन्ही गोष्टीतून एक सारांश आपल्या हाती लागतो तो म्हणजे पक्ष नेतृत्वासमोर कोणीही शक्तिप्रदर्शनात यशस्वी ठरत नाही. मग ते नारायण राणे असोत, छगन भुजबळ असोत किंवा बहुजनांचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे असोत.

- Advertisement -