घरफिचर्सप्रतिभावान संगीतकार जितेंद्र अभिषेकी

प्रतिभावान संगीतकार जितेंद्र अभिषेकी

Subscribe

सारे संस्कार आत्मसात करून निर्माण केली स्वतःची स्वतंत्र गायनशैली

जितेंद्र अभिषेकी हे एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 रोजी झाला. वयाच्या १३ व्या ते १४ व्या वर्षापर्यंत त्यांना वडिलांकडून संगीताची तालीम मिळाली. या तालमीत कीर्तनाव्यतिरिक्त शास्त्रीय संगीताचे धडे जितेंद्र अभिषेकी यांनी गिरवले. दुर्गा, देस, काफी, खमाज असे संगीतातील राग पंडितजी वडिलांकडून शिकले. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमके तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.

संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे मर्म होते. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी दिलेले योगदानही मोलाचे आहे. १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकातील पदांना अभिषेकींनी संगीत दिले होते. त्यांनी तब्बल १७ नाटकांना संगीत दिले. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाचा मुख्य गाभा प्रयोगशीलतेवर आधारित होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील प्रयोग प्रेक्षकांना, संगीत रसिकांना खूप आवडले. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची सुरुवात पंडितजींनी भैरवीने केली. १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. विशेष म्हणजे या नाटकात सर्वप्रथम रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरण्यात आले होते.

- Advertisement -

आकाशवाणीत काम करत असताना त्यांची पु. ल. देशपांडेंसोबतची ओळख वाढली. पुढे आकाशवाणीच्या बिल्हण या संगीतिकेत पु. लं. च्या संगीत दिग्दर्शनात मंगेश पाडगावकर लिखित गाणी पंडितजींनी गायली. आकाशवाणीत कामाला असताना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांना संगीत दिले. एवढेच नाही तर ‘वैशाख वणवा’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे गीतही त्यांनी म्हटले. १९८६ मध्ये पंडितजी पुण्यात स्थायिक झाले. १९८६ ते ९५ या काळात त्यांनी पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात गायन केले. १९९५ रोजी ७६व्या नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. संगीतकलेची लाभलेली भेट त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या शिष्यांना मुक्तहस्ताने पंडितजींनी बहाल केली. अशा या महान प्रतिभावान संगीतकाराचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -