घरफिचर्सदेवराई

देवराई

Subscribe

देवराई म्हणजे देवाच्या नावाने सोडलेली राई. एवढा साधा सरळ अर्थ असावा असं मला पहिल्या प्रथम वाटलं; पण अनेक गोष्टींसाठी आपल्या पूर्वजांचं मला जसं कौतुक वाटतं तसं या देवराईच्या बाबतीतदेखील मला वाटतं. पूर्वजांनी दूरदृष्टी ठेऊन अशा देवराईची कल्पना मांडली असावी. आज ठिकठिकाणी जंगलतोड होत असताना या कल्पनेमागची त्यांची भूमिका आपण लक्षात घ्यायला हवी.

गावी गेलो की, नेहमीप्रमाणे गावातल्या निरनिराळ्या ठिकाणांना भेटी द्यायला जातो. ही गावातली ठिकाणं गावकुसाच्या बाहेर आहेत. त्यामुळे याठिकाणी नेहमीच शांती. घरापासून चालत दोन किलोमीटर चालत गेलो की, गवळद्याचा मोठा माळ लागतो. पूर्वी याठिकाणी वाडीतली सर्व गुरंढोरं चरायला यायची. आम्ही त्यावेळी या माळावर क्रिकेट खेळायचो. गावातले मित्र उजव्या बाजूला क्रिकेटचा फटका मारू नका म्हणून सांगायचे. त्याला कारण होतं, त्या उजव्या बाजूला देवराई होती.

- Advertisement -

तिकडे बॉल गेला की, परत मिळायची शक्यता खूपच कमी. म्हणजे जवळजवळ तो पुन्हा मिळायचाच नाही. त्या देवराईच्या आत शिरून बॉल आणायची कोणी हिंमत करत नसे. त्याला कारणदेखील तसेच होते, त्या राईत अनेक झाडं होती. तसेच प्राणीदेखील असायचे. त्यामुळे सहसा कोणी त्या राईत जायच्या भानगडीत पडत नसे. हल्ली गावी गेल्यावर सहज फिरायला म्हणून त्याठिकाणी गेलो तेव्हा ही राई कुठे दिसेना. मला आश्चर्य वाटलं, इकडची राई गेली कुठे? घरी विचारलं तेव्हा कळलं की, ही राई तोडली. मनातून खुट्ट होऊन मी त्या ठिकाणाहून निघालो. घरी आलो आणि देवराई डोक्यातून बाजूला ठेवायचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या देवराई डोक्यातून जाईना. एका विचित्र मनस्थितीत सापडलो होतो.

काही वर्षांपूर्वी सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांचा ‘देवराई’ हा सिनेमा मी पहिला होता. वास्तविक या चित्रपटातील मुख्य कथेचा आणि देवराईचा असा थेट संबंध नव्हता. हा चित्रपट पाहिल्यानंतर जी एक प्रकारची उदासी मनाला आली होती तशीच काहीशी अवस्था ही भग्न झालेली देवराई बघून माझी झाली होती.

- Advertisement -

देवराई म्हणजे देवाच्या नावाने सोडलेली राई. एवढा साधा सरळ अर्थ असावा असं मला पहिल्या प्रथम वाटलं; पण अनेक गोष्टींसाठी आपल्या पूर्वजांचं मला जसं कौतुक वाटतं तसं या देवराईच्या बाबतीतदेखील मला वाटतं. पूर्वजांनी दूरदृष्टी ठेऊन अशा देवराईची कल्पना मांडली असावी. आज ठिकठिकाणी जंगलतोड होत असताना या कल्पनेमागची त्यांची भूमिका आपण लक्षात घ्यायला हवी. आपल्या मनात आजही देवाधर्माबद्दल भीती आहेच. निदान देवाच्या नावाने एखादे रान किंवा राई सोडली तर ती टिकून राहील आणि पर्यायाने जंगलतोडीपासून ती राई आणि झाडं टिकून राहतील, हा एक उद्देश यात असावा. पण हल्ली या संकल्पना केव्हाच धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे देवराईदेखील तोडल्या जात आहेत.

देवराई ही एक स्वतंत्र परिसंस्था आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. देवराईमध्ये अनेक वृक्ष, वनस्पती तसेच प्राण्यांचा अंतर्भाव होतो. इंग्रजीमध्ये या देवराईला सेक्रेड ग्रोव्ह असे म्हटल्याचे आढळते. या देवराई सरकारच्या वनविभागाने अनुदान देऊन सांभाळल्या नसून त्या गावच्या परंपरेचा एक भाग म्हणून जतन केल्या आहेत. देवराई या वैदिक काळापासून अस्तित्वात आहेत. या देवराईच्या उत्पत्तीबाबत अनेक जाणकारांमध्ये मतांतरे आहेत. परंतु देवराईचे मूळ हे श्रद्धा या विषयाशी निगडित आहे. कारण देवराईत राईतल्या एखाद्या देवतेची स्थापना केलेली असते. ही देवता बहुतेक निराकार दगडाची असते. याबाबत डॉ. धर्मानंद कोसंबी यांनी जे मत मांडले आहे ते असे – देवराईत ज्या देवता स्थापन केल्या आहेत त्यापैकी बहुतेक मातृदेवता आहेत. त्यांना कोणी पुरुष सहचर नाही. या देवतांची नावे शिरकाई, वरदाई अशी ठेवल्याचे आढळते.

देवराई ही परिसंस्था मुख्यत्वे कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. जवळपास सोळाशेच्यावर देवराया एकट्या सिंधुदुर्गात आहेत. या देवरायांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती सापडतात. बहुतेक देवराया देवळाच्या कडेने उभ्या आहेत. देवराईच्या आत अनेक औषधी वनस्पती असायच्या. गावातली माणसं काहीवेळा देवराईत देवाच्या परवानगीने प्रवेश करायची आणि आपल्याला हवी असलेली वनस्पती मिळवायची. देवाच्या परवानगीने म्हणजे देवाला कौल लावायची. या प्रकारचे एक सौजन्य गावकरी आतापर्यंत जपत होते. हल्ली राई तोडताना हे सौजन्य कुठे लयाला गेले की, काय हा प्रश्न पडतो.

हल्ली मुंबई-गोवा हमरस्ता चौपदरीकरण करताना अनेक झाडं तोडली गेली. मोठ्या प्रमाणात वनसंपदा तोडली गेली; पण हे होत असताना देवराई मात्र शाबूत राहिल्या. कोकणी माणसाने झाडापेडांवर मनापासून प्रेम केलं. या नैसर्गिक बाबी मनापासून जतन केल्या. देवराया त्याने देवाच्या भीतीने जपल्या. किंबहुना त्याने भक्तिभावाने त्यांचे रक्षण केले; पण पूर्वजांनी दूरदृष्टीने जपलेला हा वारसा कुठे तरी पुढे जात नाही हे दृष्टीआड करता येत नाही. आता या देवराया जतन करणं हे आपल्या हातात आहे. त्यासाठी काही ठोस पाऊले उचलावी लागतील. कदाचित या संकल्पामध्ये लोकप्रतिनिधींना काही ठोस उपयोजना करायची गरज भासेल.

देवराईच्या बाजूला जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा अनेक प्राण्यांचा आवाज यायचा. त्या प्राण्यांच्या अस्तित्वाची ती खूण होती. पण कोणी गाववाले सांगायचे की, रात्री पाण्याच्या आशेने हे प्राणी देवराईच्या आसपास फिरायचे. उन्हाळ्याच्या दिवसात रानडुक्कर कधीतरी या राईत वास्तव्य करून असायचे. हरण, भेकर असे प्राणी तर केव्हाही देवराईत तळ ठोकून असायचे. या देवराईचा सामाजिकदृष्ठ्या विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की, या देवराईने समाज टिकवायला मदतच केली आहे. लहानपणी गावातला किंवा वाडीतला कोणी माणूस आजारी पडला की, लोक अंगावरून मीठ-मोहरी उतरवून देवराईच्या दिशेने जायचे आणि हातातला उतारा तिकडे सोडून यायचे. यामागे गावकर्‍यांची भावना होती की, त्या माणसाच्या अंगातील रोग बरा करण्याची क्षमता देवराईत असणार्‍या वनस्पती आणि तिथल्या देवतेमध्ये आहे.

देवराईत अगदी दीडशे-दोनशे वर्षे वयाची झाडं असायची. त्यांना वेढा घातलेल्या वेली असायच्या. ही सर्व वनसंपदा म्हणजे त्या ठिकाणचं वैभवच होतं. या राईने अनेक वन्यजीवांना आश्रय दिला. हल्ली नैसर्गिक देवराया नष्ट होत असताना कृत्रिम देवराया निर्माण करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत हे दृश्य जरी आश्वासक वाटलं तरी जंगलतोड ह प्रश्न ज्वलंत बनत आहे. हल्ली तर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पहिला घाव बसतो तो देवळाच्या बाजूला असणार्‍या देवरायांवर. देवळाच्या बाजूने वाढलेली राई ही देवासाठीच उपयोगात आणायची नाही तर कोणासाठी? असे भावनिक प्रश्न उपस्थित करून देवराया तोडल्या जात आहेत. एकदा हा श्रद्धेचा प्रश्न आला की, मग तो थोपवण्यासाठी देवराई तोडणं हे आलंच.

या सर्व नैसर्गिक देवराया एका बाजूने उभ्या असताना, सिमेंटच्या जंगलात श्री प्रमोद नारगोळकर यांनी वीस एकर जमिनीवर मानवनिर्मित देवराई उभारली आहे. त्यांनी निर्माण केलेली ही देवराई सिपना देवराई पुणे पानशेत रस्त्यावर आहे. ही देवराई उभारणारे नारगोळकर हे स्वतः इंजिनिअर होते. त्यांनी या वीस एकर जागेवर अक्षरशः जंगल पेरले. ठिकठिकाणावरून आणलेले पाचशेहून अधिक वृक्ष त्यांनी लावले. विविध प्रकारचे वीस हजारांहून जास्त वृक्ष या देवराईत आढळतात. विशेष म्हणजे या वनराईतील एकही फळ न तोडता ते प्राणी आणि पक्षी यांनी खावं आणि त्याचे बीज पुनरुत्पादित करावे हा एकमेव उद्देश इथे आढळतो.

अनेक प्रश्न आहेत त्यामुळे या रायांचं भविष्य काय हा प्रश्न उभा राहतो. पण देवळाच्या बाजूने वाढलेली ही राई बघून मनाला एक समाधान मिळते. या देवराईतले डेरेदार वृक्ष बघितले की, मनाला उभारी येते. देवराई ही परिसंस्था कोकणात आजही टिकून आहे. तिथल्या निसर्गरम्यतेत ही परिसंस्था भर टाकते. या राया निर्माण होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी त्या प्रकारची पोषकता या भूमीत आहे. त्या राया टिकवण्यासाठी शास्त्रीय कारणे लोकांनी लक्षात घेतली नाहीत; पण लोकसमजावर आणि भावनिक, श्रद्धाळूपणावर या देवराया टिकून आहेत.

-प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -