घरफिचर्सजाहल्या काही चुका...

जाहल्या काही चुका…

Subscribe

माझ्या कानात प्राण आणून, मी ते कोणत्या गाण्याचे शब्द उच्चारतात याकडे लक्ष देऊ लागलो. श्रीनिवास खळे म्हणाले, आता इतकं आयुष्य सरल्यावर मी जेव्हा जेव्हा माझं ते गाणं ऐकतो तेव्हा ते गाणं मला प्रत्येक वेळी काही नवा अर्थ देऊन जातं...आणि ते गाणं म्हणजे, ‘जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गाईले!’

कोणत्याही गायक, संगीतकार, गीतकाराला कुणीतरी कधीतरी एखादा भाबडा रसिक भाबडा प्रश्न विचारतो – तुमचं आवडतं गाणं कोणतं?अशा वेळी गायक, संगीतकार, गीतकार या भाबड्या प्रश्नावर नेहमीच गोंधळून जातात. त्या प्रश्नाने त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्न उमटतं की या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं?…आणि उत्तर म्हणून आपल्या अनेक गाण्यांमधून नेमकं कोणतं गाणं आवडतं म्हणून सांगायचं? मग, आईला आपली सगळीच लेकरं प्यारी असतात, असं एक छापील उत्तर येतं. पण ते उत्तर छापीलच असतं. त्यापलिकडे कलावंताच्या अंतर्मनात एक खरंखुरं उत्तर दडलेलं असतं किंबहुना सगळ्या गाण्यांमधून एक खरंखुरं आवडतं गाणं दडलेलं असतं. काही कलाकार ते थेट सांगतात तर काही आडून आडून सांगतात.

मला आठवतंय, याच वर्तमानपत्रात बावीस वर्षांपूर्वी मी ‘संध्याकाळचं गाणं’ नावाचा कॉलम लिहीत होतो. गाण्याची जन्मकथा, गाण्याची तशीच एखादी लक्षात राहण्याजोगी आठवण किंवा एखाद्या गाण्याचं रसग्रहण असं त्या कॉलमचं स्वरूप होतं. त्यासाठी कधी मी या गायक-संगीतकार-गीतकारांकडे स्वत: जायचो तर कधी त्यांच्याशी ओळख झाली आणि कधी ती छान ओळख झाली तर मग मी त्यांच्याशी फोनवर म्हणजे त्या काळच्या त्या लॅन्डलाइनवरून बोलायची संधी साधायचो…तर सांगायचा मुद्दा असा की अशाच एका संध्याकाळी मी संगीतकार श्रीनिवास खळेंना फोन केला आणि त्यांच्याशी त्यांच्या गाण्यांबद्दल बोलू लागलो.

- Advertisement -

त्यांच्या निरनिराळ्या गाण्यांबद्दल ते त्या दिवशी भरभरून बोलत होते. बहुतेक ते त्या दिवशी छान मुडमध्ये असावेत. श्रावणात घननिळा बरसला; या चिमण्यांनो, परत फिरा रे, भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, लाजून हासणे अन् हासून ते पहाणे अशा अनेक गाण्यांवर त्या संध्याकाळी त्यांचं मत, त्यांचं निरीक्षण ते सांगत होते…आणि सांगता सांगता त्यांच्या एका गाण्याबद्दल ते त्या संध्याकाळी जरा जास्तच बोलले, म्हणाले, आज इतक्या गाण्यांना मी चाली लावल्या, त्यांचा आनंद घेतला, ती गाणी रेकॉर्ड होताना मी ऐकली, रेकॉर्ड झाल्यावरही आज इतकी वर्षे ती पुन्हा पुन्हा ऐकली, पण ती ऐकताना त्यातल्या एका गाण्याकडे मात्र माझं मन त्या गाण्यातल्या सुरांशी जरा जास्त स्थिरावतं, जरा जास्त घुटमळतं!
ते असं काही म्हणत असताना माझी उत्सुकता चाळवली नसती तरच नवल! माझ्या कानात प्राण आणून, मी ते कोणत्या गाण्याचे शब्द उच्चारतात याकडे लक्ष देऊ लागलो.

श्रीनिवास खळे म्हणाले, आता इतकं आयुष्य सरल्यावर मी जेव्हा जेव्हा माझं ते गाणं ऐकतो तेव्हा ते गाणं मला प्रत्येक वेळी काही नवा अर्थ देऊन जातं…आणि ते गाणं म्हणजे, ‘जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गाईले!’त्या गाण्याचे ते शब्द उच्चारले आणि माझ्या सर्वांगावर खरंच काटा आला. मी अक्षरश: शहारून गेलो. कारण ते माझं अतिशय म्हणजे अतिशय लाडकं गाणं होतं. अगदी माझ्या शाळकरी वयातही ते गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकत होतो तेव्हा माझ्या मनाला त्या गाण्याचे कारूण्याने भारलेले सूर, त्या गाण्याच्या आत निर्माण झालेलं ते गहिरं आणि घनगंभीर वातावरण, लता मंगेशकरांच्या ऐन बहराच्या काळातल्या आवाजातली ती थेट हृदयाला भिडणारी कोवळीक, सगळं काही आतबाहेर भिडायचं. त्या शाळकरी वयातही ते गाणं माझ्या बालमनाला मानवी मनाबद्दल, जीवनाबद्दल काहीतरी समजावून जायचं. गाणं संपलं की मन काही सेकंद तरी सुन्न करून जायचं. ऐकणार्‍याला जीवनाभिमुख करण्याचं अफाट सामर्थ्य त्या गाण्यात होतं.

- Advertisement -

पण ‘चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले’ हेही गाणं जवळ जवळ त्याच तोडीचं आहे, मी खळेंना त्या वेळी बोलता बोलता म्हणालो. हो, आहे ना!…पण ‘जाहल्या काही चुका’ हे माझंच गाणं मला दर दिवशी त्या गाण्याचा नवा चेहरा घेऊन भेटतं. मला दूर कुठेतरी घेऊन जातं, खळे म्हणाले.माझ्या गाण्याच्या कॉलमसाठी खळेंनी त्यांच्याच एका गाण्याबद्दल स्वत:च इतकी सामुग्री पुरवल्यानंतर मी त्याच गाण्याबद्दल त्या आठवड्यात लिहिणं साहजिक होतं. कधीकाळी मीसुध्दा ते गाणं रेडिओवर जीव टाकून ऐकत होतो. कॅसेटच्या त्या काळात खळेंकडूनच त्या गाण्याची कॅसेट घेऊन त्या गाण्याची कितीतरी वेळा सलग ऐकून पारायणं केली होती. ते अवीट गोडीचं गाणं कितीतरी वेळा ऐकूनही मन भरत नव्हतं. त्या गाण्याची ती चाल सर्वसामान्य नव्हतीच. ती केवळ आणि केवळ असामान्य होती.

खळे म्हणाले, त्या चालीला, त्या एकूण गाण्याला न्याय देण्यासाठी लता मंगेशकरांशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. जर ‘जाहल्या काही चुका’ हे गाणं गाण्यासाठी मी इतर कुणाची निवड केली असती तर माझ्याकडूनच काही चुका झाल्या असत्या!आज गंमत पहा, हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा ते गाणं मला जगण्यातल्या गांभीर्याकडे घेऊन जातं, पण हे गाणं नवीन पिढी कोणत्याही रिअ‍ॅलिटी शोमध्ये गाताना कधी दिसत नाही. पण मला त्याचं आश्चर्य वाटत नाही, कारण एकदा आशा भोसले म्हणाल्या होत्या, एक लक्षात ठेवा की दीदीची काही गाणी अशी आहेत की ती गाणी तिची तिनेच गावीत. जिथे परमेश्वरही पाय ठेवायला घाबरेल अशा जागी आपण पाय ठेवायला जाऊ नये!
जाहल्या काही चुका या गाण्याच्या बाबतीत आशाताईंचं हे म्हणणं तंतोतंत लागू पडतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -