घरफिचर्स...ते एक गाणं नितांत मंजुळ!

…ते एक गाणं नितांत मंजुळ!

Subscribe

खय्यामजींचा कलावंत आणि माणूस म्हणूनही सगळ्यात मोठा स्वभावविशेष होता तो म्हणजे त्यांनी स्वत:ला कोणत्याही शर्यतीत किंवा स्पर्धेत उभं केलेलं नव्हतं. आपल्या नावापुढे गाण्यांची, सिनेमांची संख्या वाढावी असं त्यांना कधीच वाटायचं नाही. ते आपल्याच धुनकीत आपल्यातल्या संगीताची कला जगायचे आणि आपलं संगीत करायचे. कुणीतरी प्रतिस्पर्धी आपली जागा घेईल आणि मग आपली संधी हिरावली जाईल, या भयाचा स्पर्श त्यांच्या मनाला कधीच झाला नाही. उलट त्यांच्याकडे चालून आलेल्या संधी त्यांनी त्यांच्या मानी स्वभावानुसार सहज सोडून दिल्या. त्याबद्दल नंतर त्यांनी कधीच कसली खंत, कसला खेद व्यक्त केला नाही.

याच ‘महानगर’ दैनिकातून मी ‘संध्याकाळचं गाणं’ नावाचा स्तंभ लिहीत होतो तेव्हाची गोष्ट. साधारण 1993 सालची. मला संगीतकार खय्याम यांच्या काही गाण्यांबद्दल जाणून घ्यायचं होतं. त्याबद्दल माझ्या स्तंभातून लिहायचं होतं. त्यासाठी मी त्यांना फोन केला. ते मला म्हणाले, माझी मुलाखत वगैरे घेण्याऐवजी तू माझ्या गाण्यांबद्दल तुला काय वाटतं ते लिही आणि मला पाठव ना!

त्यांच्या या अनपेक्षित उत्तराने मी बुचकळ्यात पडलो, इतक्या मोठ्या प्रतिभावान संगीतकाराशी बोलण्याचं दडपण माझ्यावर होतंच, त्यामुळे मी त्यांच्याशी जरा जास्तच जपून बोलत होतो. बोलता बोलता त्यांच्या हे लक्षात आलं असावं. काही दिवसांनी मला फोन कर, मी तुझ्याशी बोलेन, असं त्यामुळेच ते मला बोलले असावेत.

- Advertisement -

पुढे काही दिवसांनी मी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ दिली, पण वेळ देताना त्यांनी मला विचारलं, आपली ही भेट किती वेळ चालेल, म्हणजे त्याप्रमाणे मी माझी पुढची कामं ठरवीन! मला एक तास पुरेसा आहे असं मी लागलीच म्हणालो आणि त्यांनीही ते मान्य केलं.

फोनवर त्यांची आणि माझी ही जी भेट झाली त्यातूनच माझ्या लक्षात आलं की संगीतकार खय्याम हे इतरांसारखं नेहमीच्या चौकटीतलं व्यक्तिमत्व नाही. प्रसिध्दीच्या मागे लागणारं तर नाहीच नाही. विशेष म्हणजे ग्लॅमरच्या सृष्टीत राहूनही इतर कोणत्याही प्रसिध्दीपिपासूंसारखी त्यांना प्रसिध्दीची काडीमात्र पिपासा नाही. त्यांच्या या चौकटीबाहेरच्या स्वभावाची नोंद घेऊनच मी त्यांना भेटायला गेलो.

- Advertisement -

भेटायला गेल्यावर नावगाव विचारण्याचा सोपस्कार झाल्यानंतर त्यांनी मला थेट प्रश्न विचारण्याची सूचना केली आणि त्याच वेळी आपल्या हातावरच्या घड्याळाकडे पाहिलं. मला त्यांचा वेळेबद्दलचा काटेकोरपणा तक्षणी लक्षात आला. मुलाखत संपवण्याच्या वीस मिनिटं आधीही त्यांनी तसंच घड्याळात पाहिलं आणि आता आपल्या मुलाखतीसाठी काही मिनिटंच राहिली असल्याचं लक्षात आणून दिलं.

पण एक गोष्ट आवजुर्र्न सांगायला हवी की या संपूर्ण मुलाखतीत खय्याम कुठेही मी, मला, माझे अशा प्रकारचं प्रथम पुरूषी काही बोलले नाहीत. मी असा, मी तसा, मला असं चालत नाही, मला तसं आवडत नाही, मी या तत्वाचा, मी अशा स्वभावाचा वगैरे बायोडेटा देत बसले नाहीत. त्यांनी आपला जन्म, आपला गाव, आपण संगीतकार कसे झालो या गोष्टींवर तर चक्क फुली मारली. आप ने, मुझे मेरे गाने के बारे में पुछना हैं, ऐसे कहाँ था तो चलो मेरे गाने के बारे में कुछ पुछिए, मै जवाब देता हूँ, असं ते मला थेट म्हणाले. मग मीही त्यापुढे त्यांना त्यांच्या गाण्याखेरीज अवांतर काहीही विचारू शकलो नाही.

पण मला गाण्यात असणारा रस पाहून नंतर त्यांनीच माझ्या प्रश्न विचारण्यात रस घेतला आणि नंतर नंतर तर माझा तो स्तंभ लिहीत असताना त्यांनी मला वेळोवेळी त्यांच्या गाण्यांबद्दल सांगून खूप सहकार्य केलं. ते करत असताना हळूहळू त्यांचा स्वभाव उलगडत गेला.

खय्यामजींचा कलावंत आणि माणूस म्हणूनही सगळ्यात मोठा स्वभावविशेष होता तो म्हणजे त्यांनी स्वत:ला कोणत्याही शर्यतीत किंवा स्पर्धेत उभं केलेलं नव्हतं. आपल्या नावापुढे गाण्यांची, सिनेमांची संख्या वाढावी असं त्यांना कधीच वाटायचं नाही. ते आपल्याच धुनकीत आपल्यातल्या संगीताची कला जगायचे आणि आपलं संगीत करायचे. कुणीतरी प्रतिस्पर्धी आपली जागा घेईल आणि मग आपली संधी हिरावली जाईल, या भयाचा स्पर्श त्यांच्या मनाला कधीच झाला नाही. उलट त्यांच्याकडे चालून आलेल्या संधी त्यांनी त्यांच्या मानी स्वभावानुसार सहज सोडून दिल्या. त्याबद्दल नंतर त्यांनी कधीच कसली खंत, कसला खेद व्यक्त केला नाही. जी संधी सोडली ती विचार करून सोडली असं त्यांचं तत्व असायचं. या संदर्भात त्यांच्या बाबतीतला एक किस्सा सांगितला जातो की यश चोप्रांच्या त्रिशुल वगैरे सिनेमांचं खय्यामनी संगीत केल्यानंतर यश चोप्रांनी एका ठिकाणी मुलाखत देताना काही वेगळं विधान केलं. त्या सिनेमांचं संगीत जरी चांगलं असलं तरी ते सिनेमे त्यातल्या कथानकामुळे जास्त चालले, अशा अर्थाचं ते विधान होतं. खय्यामजींच्या ते कानावर गेलं. खय्यामजींनी खाजगीत आणि जाहीरपणेही त्यावर काहीही वाच्यता केली नाही. जे ऐकलं ते फक्त आपल्याजवळच ठेवलं. पण यश चोप्रा जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या पुढच्या सिलसिला नावाच्या सिनेमाची ऑफर घेऊन गेले तेव्हा खय्यामजींनी त्यांच्या बाबतीत कसलीही खळखळ न करता त्यांची ऑफर अगदी नम्रपणे नाकारली. ती ऑफर धुडकावली असं केलं नाही. त्यांना जे नाही पटलं ते त्यांनी नाही केलं. त्यांनी ती ऑफर नाकारली त्याबद्दलही कुठेही वाच्यता करून आपल्या स्वाभिमानाला प्रसिध्दी मिळवून दिली नाही. वास्तविक, आपण काम केलेल्या एका निर्मात्याचा सिनेमा पुन्हा आपल्याकडे चालून येतो आहे ही त्यांच्यासाठी संधी होती, पण त्या संधीकडे त्यांनी स्वत:हून पाठ फिरवली होती आणि नंतर त्या पाठ फिरवण्याचा यत्किंचितही भलाबुरा विचार केला नव्हता.

खय्यामजींच्या संगीताचा जो काळ होता तो संगीताचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी त्यांच्या अवतीभोवतीचे एकूणएक संगीतकार बिझी होते. त्यांच्याकडे सिनेमांमागूून सिनेमे होते. त्यातले काहीजण अक्षरश: संगीताचा रतीब घालत होते. पण याच्या अगदी उलट चित्र खय्यामजींच्या बाबतीत होतं. हा माणूस आपल्याला जमेल तेवढंच काम आपल्याकडे घेत होता. आपल्याकडे आलेल्या कामाला पूर्णपणे न्याय द्यावा असं त्याचं मतही होतं आणि तत्वही होतं…आणि आपल्या संगीतकार म्हणून सत्तर वर्षांच्या काळात त्यांनी अशा प्रकारच्या न्यायदानाचं कार्य कसोशीने पार पाडलं. प्रत्येक सिनेमा, प्रत्येक गाणं करताना त्यांनी प्रत्येकाचा काळजीपूर्वक अभ्यास केला. प्रत्येक गाण्याचा कोन आणि कोपरा अभ्यासण्यासाठी कायम पुरेसा वेळ घेतला. एका सिनेमामागून दुसरा आला म्हणून तो स्वीकारण्याची घाई त्यांनी कधीच केली नाही. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्यामागून आलेल्या पोरसवदा संगीतकारांनी दीडदोनशे सिनेमे केले तेव्हा त्यांच्याकडल्या सिनेमांची संख्या उणीपुरी साठच्या आसपासच भरली. पण त्यांनी त्यांच्या गाण्यांचं इतरांपेक्षा वेगळं दालन उभं केलं.

खय्यामजींनी गाण्यात कविता पाहिली, शब्द पाहिले, शब्दांतलं सौंदर्य पाहिलं. ही कविता, हे शब्द, या शब्दांतलं सौंदर्य लक्षात घेतलं. त्या शब्दांचा साज लक्षात घेऊन त्यावर त्याला साजेसा असा आपल्या संगीताचा साज चढवला. शब्दप्रधान गायकीमध्ये त्यांनी गीतकाराने लिहिलेल्या शब्दांना जास्त महत्व दिलं किंबहुना अपरंपार मान दिला. कैफी आझमींनी लिहिलेल्या एका गैरफिल्मी गाण्याला त्यांनी चाल लावली आणि ते गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा त्या रेकॉर्डिंगनंतर सगळ्यांनी त्यांच्या संगीताची तारीफ केली, पण खय्यामजींनी ती तारीफ नम्रपणे नाकारली. त्यांनी त्या सुंदर चालीचं सगळं श्रेय कैफी आझमींना दिलं. ते म्हणाले, कैफी आझमींचे शब्दच इतके सुंदर होते की त्याला मी केवळ चाल लावताच एक छान गाणं जन्माला आलं, त्यामुळे हे गाणं जर सुंदर झालं असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय कैफी आझमी आणि त्यांनी लिहिलेल्या शब्दांना जातं. मला नाही.

तसं पाहिलं तर खय्यामजी आणि त्यांचे समकालिन संगीतकार यांच्यात एक मूलभूत फरक होता. तो फरक असा की खय्यामजींचं वाचन चतुरस्त्र होतं. ते भाषेतल्या दर्जाचे, अभिजाततेचे भोक्ते होते. त्यामुळे वरच्या दर्जाच्या गीतकारांशीच त्यांची केमिस्ट्री जुळली. टुकार गीतकारांच्या गीतांशी त्यांच्या संगीताचा धागा कधीच जुळून आला नाही आणि तशा प्रकारच्या गीतकारांशी त्यांनी नमस्कार-चमत्काराच्या पलिकडे आपला दोस्ताना कधीच पुढे नेला नाही. गाण्यात, संगीतातही काही दर्जेदार करायचं असेल तरच त्यांनी आपल्या हार्मोनियमला हात घातला. एखाद्या निर्मात्या-दिग्दर्शकाला कथाकादंबरीवर सिनेमा करायचा असायचा तेव्हा खय्यामजी निर्माता-दिग्दर्शकाकडून ती कथा-कादंबरी खास मागवून घ्यायचे. ती निवांतपणे वाचून काढायचे. त्यासाठी नीट वेळ काढायचे. त्या कथा-कादंबरीतलं वातावरण, त्या कथेचा ओघ तपासायचे आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर मगच त्याचं संगीत करायला बसायचे. वरवरचं किंवा पृष्ठभागावरचं काम करणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. त्यामुळे त्यांच्या कामातही एकप्रकारचा निवांतपणा किंवा संथपणा होता. पण घाईगर्दीत कसंतरी काम उरकणं हे त्यांना कधीच मंजूर नव्हतं. सिनेमातलं एखादं गाणं अप्रतिम चालीचं केलं की बाकीची गाणी कशी तरी रपटवून न्यायची, असा म्हटला तर बहुतांशी संगीतकारांचा कल असतो. खय्याम या तत्वनिष्ठ संगीतकाराचं वागणं मात्र या बाबतीत अगदी या प्रवाहाविरूध्द असायचं. खय्यामजी संगीत देत असलेल्या सिनेमातलं प्रत्येक गाणं हे मन लावून केलेलं असायचं. म्हणूनच ‘बहारो मेरा जीवन भी सवारो’, ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’, ‘ऐ दिल-ए-नादान’ यासारखी कलात्मक गाणी खय्यामजींकडून पेश झाली, जी रसिकांच्या कानाला आजही सुखावत आहेत.

खरंतर खय्यामजींनी ज्या काळात संगीत करायला सुरूवात केली तो सत्तर वर्षांपूर्वीचा काळ होता. त्यानंतर संगीताच्या क्षेत्रात नवनवे प्रवाह आले, नवनवं फॅड आलं, नवनवी फॅशन आली, जुनी वाद्यं काळाच्या पोटात गुडूप झाली, नव्या वाद्यांची भर पडली, अत्याधुनिकता आली तशी त्याचाही संगीतावर परिणाम झाला, पण खय्यामजी बदलले नाहीत, त्यांनी आपली मेलडीची चौकट कदापि सोडली नाही. आपलं गाणं नितांत मंजूळ कसं होईल हेच पाहिलं. दिखाई दिये युँ की बेखुद किया…सारखी त्यांची गझल म्हणूनच कानात झिरपून खोल आत मन शहारत राहिली.

खय्यामजींचं गाणं म्हणजे संथ नदीच्या शांत प्रवाहात अलगद दगड टाकल्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर उमटणार्‍या सूक्ष्म लहरी. त्या निर्माण होऊन नंतर त्या लहरत लहरत विरत जाणं आणि ते मनोरम दृश्य आपण पहाणं, त्या पहाण्याची मजा घेणं म्हणजे खय्यामजींचं गाणं. ‘दिल चीज क्या हेै आप मेरी जान लिजिए’ हे ‘उमराव जान’मधलं गाणं म्हणजे तर याचा अद्भुत नमुना आहे. त्यातला ‘इस अंजुमन में आप को आना हैं बार बार’ हा अंतरा तर पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगा. हे गाणं तसं रेंगाळत रेंगाळत पुढे सरकतं, पण ते रेंगाळणं म्हणजे शब्दसुरांचा संथगतीतला पदन्यास वाटत राहतो…आणि ‘इस अंजुमन में आप को आना हैं बार बार’ ही ओळ ऐकताना त्यातल्या ‘आप’ या शब्दावरच्या हरकती म्हणजे तर सुरांची ऐकत राहावी अशी कलाकुसर! आशा भोसले तर त्यांच्याकडे गातानाच्या आठवणी सांगताना म्हणतात, खय्यामजी त्यांच्या गाण्यातल्या हरकती आम्हाला शिकवायचे तेव्हा त्या कशा स्पष्टपणे आणि न वहावत जाता नेमकेपणाने यायला हव्यात याबद्दल आम्हाला सांगायचे आणि रिहर्सल्स, तसंच रेकॉर्डिंगमध्ये आमच्या गळ्यातून तशाच हरकती येतील असं पहायचे. आशा भोसलेंचं हे म्हणणं ऐकल्यानंतर हे गाणं ऐकलं तेव्हा ‘इस अंजुमन में आप को आना हैं बार बार’ या ओळीतला ‘आप’ कानामनाला वेगळाच स्पर्श करून गेला. कितीतरी वेळ तो मनात खय्यामजींच्या संगीतासारखा रेंगाळत राहिला.

‘दिल चीज क्या हैं आप मेरी जान लिजिए’ हे खय्यामजींनी केलेलं गाणं खरंतर नुसत्या कानांनी ऐकण्यासारखं नाहीच, ते जेव्हा जेव्हा आपण ऐकू तेव्हा ते बुध्दीनेही ऐकायला हवं. ते गाणं म्हणजे कोणत्या तरी संगीतकाराने केलेली सरळसोट चाल नाही. त्यातल्या प्रत्येक सुरामागे संगीतातला एक पक्का विचार आहे. कान देऊन ऐकणार्‍या, जीव लावून ऐकणार्‍या कोणत्याही रसिकाला हे गाणं विचार करायला लावतं, आत्मशोध घ्यायला लावतं. खय्यामजींचा गाण्याच्या रिहर्सल्सवर खूप भर असायचा. रिहर्सल्सवर भर देणार्‍या आणि नेमकेपणाचा अतिशय सोस असणार्‍या खय्यामजींकडून अशा गाण्याची निर्मिती होत असताना त्या गाण्याने आणि ते गाणं गाणार्‍या गात्या गळ्याने किती अतोनात कष्ट घेतले असतील हे गाणं बारकाईने ऐकलं की त्याची कल्पना येतेच येते आणि त्याचबरोबर संगीतकार म्हणून खय्यामजींच्या थोरवीचीही कल्पना येते.

आजुबाजूला धडाम धडाम संगीत सुरू झालं आणि त्याचा कर्कश्य कल्लोळ नको तितका वाढत गेला तरी खय्यामजी आपल्या संगीतातल्या आचारविचारांवर स्थिर राहिले, स्थितप्रज्ञ राहिले. त्यांनी त्यांचं स्वत्व सोडलं नाही की सत्व सोडलं नाही. या असल्या जमान्यातही त्यांनी त्यांच्या संगीताची तीच प्रकृती आणि तीच प्रतिमा जपली. ज्यांना त्यांच्या त्या प्रतिमेशी देणंघेणं होतं ते तिथेच गेले. उदाहरणच सांगायचं तर साहिर लुधियानवीच्या ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता हैं’ या कवितेवरून यश चोप्रांच्या मनात एक रोमँटिक कथा साकारली. त्यात अमिताभ बच्चनला घ्यायचं आणि त्याची मूळ प्रतिमा बदलवून टाकणारी गाणी त्याला द्यायची असाही एक प्रस्ताव यश चोप्रांनी ठेवला. पण तशी जर गाणी करायची असतील तर मग त्यासाठी संगीताची जबाबदारी खय्यामजींवर सोपवायला हवी असा स्पष्ट आग्रह साहिरनी धरला. हे सगळं सांगायचा हेतू हा की खय्यामजींची संगीतातली प्रतिमा ही अशी त्यांच्या एका तत्वाला धरून राहिली. म्हणूनच काही काळानंतर इथल्या संगीताच्या अवकाशात धिंगाडधिंगाणा वाढल्यानंतरसुध्दा गाण्यातली सच्ची मधुरता जपलेल्या मोजक्या संगीतकारांपैकी जर कुणी असतील तर ते खय्याम आहेत हा विश्वास कायम राहिला. हा विश्वास हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे असं स्वत: खय्याम कुणाला म्हणाले नाहीत. पण ते तसं न म्हणताही त्यांची ही पुंजी तशाच जाणकार मंडळींना कायम दिसत राहिली.

खय्यामजींनी मनात आणलं असतं तर याच्या-त्याच्या पुढे पुढे करून, तसा व्यावसायिक जनसंपर्क ठेवून शे-दोनशे सिनेमे आपल्या पदरात सहज पाडून घेतले असते. तसं करून आपलं पासबुकही छान मालेमाल केलं असतं. पण ते तसल्या सवंग स्पर्धेतले खिलाडी कधीच नव्हते. असल्या घायकुतीच्या पैशापाण्याची मोहमाया त्यांना या मायनगरीत राहूनही कधीच जडली नाही. त्यापेक्षा त्यांनी आपल्या सुरांशी, शायरीतल्या शब्दांशी इमान राखलं. चांगला माणूस आणि चांगला कलावंत ही त्यांची ओळखच कायम लोकांसमोर आली आणि तीच कायम तशीच राहिली. आपली सगळी संपत्ती दान करण्याची इच्छा बाळगणार्‍या या थोर माणसाची आणखी वेगळी ओळख आपण काय सांगणार!…तो दानशूर होता…तो महान सूर होता…अशा महानतेला आपण आज मुकलो आहोत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -