घरफिचर्सरुपेरी पडद्यावरचा बादशहा!

रुपेरी पडद्यावरचा बादशहा!

Subscribe

जिस जबान में युसूफ बात करता है ‘मै भी उसही अंदाज में अपने डायलॉग बोलूंगा’ दिलीप कुमारच्या हरियाणवी भाषेतील लहेजा आणि संवादामुळे प्रभावित झाल्यानंतर राजकुमारने ‘सौदागर’च्या सेटवरच अचानक असा हट्ट धरला. या हट्टामुळे सौदागरच्या शुटींग थांबलं आणि सर्व युनिट धास्तावलं. आपल्या हम शिवाय कुणालाही खिजगणीत न धरणार्‍या राजकुमारला समजावणार कोण, याचं दिग्दर्शक सुभाष घईला टेन्शन आलं. आता कसं करावं, राजकुमार ऐकायला तयार नव्हता, अखेर नाईलाजानं सुभाषनं राजूला समजवायला विरुला धाडलं. १९५९ मध्ये ‘पैगाम’ प्रदर्शित झाल्यावर पडद्यावर आणि पडद्यामागील या दोन्ही कुमारांची मैत्री चर्चिली जात होती. पडद्यावर संवादाचा राजा असलेल्या राज नावाच्या एका कुमारने दिलीप नावाच्या संवादाचा शहेनशहा असलेल्या दुसर्‍या कुमारचं ऐकलं आणि सौदागरचं शूटिंग पुन्हा सुरू झालं. दिलीप कुमार यांचे बुधवारी ७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासाचा घेतलेला हा वेध.बॉम्बे टॉकीजची अनभिषिक्त सम्राज्ञी देविकाराणींनी १९ वर्षांच्या तरुण युसूफला दिलीप कुमार हे नाव बहाल केलं होतं. दिलीप कुमारच्या आधी अशोक नावाच्या कुमारानं कृष्ण धवलचा हिंदी पडदा आपल्या अभिनय संवादाने पुरता ताब्यात घेतला होता.

या दोघांमधली अभिनयाची जुगलबंदी पडद्यावर रंगवण्याची स्वप्ने बिमल रॉयपासून सुभाष घईंपर्यंत अनेकांनी पाहिली. मात्र, तडाखेबंद अभिनयाच्या दोन तळपत्या तलवारी संवादाला न्याय देणार्‍या एकाच म्यानात ठेवण्याचा हा धोका पत्करणं दोन्ही कुमारांचे मित्र असलेल्या नितीन बोस यांनाच दिदार (1951) मध्ये शक्य झालं. यात नर्गिस आणि निम्मी या दोन नायिका होत्या. ‘कोहिनूर’मधल्या मधुबनमें राधिका नाचे रे…या एका गाण्यातील व्यक्तिरेखेत जिवंतपणा यावा यासाठी खराखुरा तानपुरा शिकणार्‍या दिलीप कुमारांनी ‘दिदार’ चित्रपटात खुल्या डोळ्यांच्या अंध नायकाची भूमिका केली. मात्र, डोळसपणे अंध व्यक्ती कसा करायचा, हा प्रश्न होता. ही अडचण दिलीपनी मित्र अशोक कुमारला सांगितली. भायखळा स्टेशनबाहेर डोळे उघडले असलेला एक अंध फकीर रस्त्यावरच गाणं बोलत असतो, त्याचं वागणं, जगणं पाहून ये, असा सल्ला अशोकने दिल्यावर, दिलीप या अंध फकिराच्या भेटीला गेले आणि त्याच्याशी मैत्रीही केली. कित्येक आठवडे त्याचं निरीक्षण केल्यानंतर ‘दिदार’च्या शूटिंगसाठीचं होमवर्क तयार झालं होतं.

- Advertisement -

या दिदारचे फिल्म एडिटर बिमल रॉय होते. त्यांनीच पुढे हिंदी सिनेमातील प्रेमपटातील मैलाचा दगड ठरलेला मधुमती दिलीप आणि वैजयंतीमाला यांना घेऊन (1951) मध्ये बनवला. अशोक, राज या कुमारांच्या तुलनेत एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेणारे दिलीप हे एकमेव कुमार त्यावेळी सिने इंडस्ट्रीत होते.

बिमल रॉय यांचे बंगाली रंगभूमीशीही नातं होतं. त्याकाळी उत्पल दत्त हे नाव या रंगभूमीला पर्याय होतं. ते म्हणायचे, मी समजत होतो, बंगाली रंगभूमी परंपरेला आणि कला चित्रपटांना अभिनय शिकवणारा अद्याप जन्माला यायचाय. दिलीप कुमारांनी मला खोटं ठरवलं, अशी स्पष्ट कबुली मधुमती आणि बंगाली चित्रपटातील दिलीप कुमारांचा अभिनय पाहून उत्पल दत्त यांनी दिली. ‘देवदास,’ ‘आदमी,’ ‘गंगा जमुना,’ अशा चित्रपट शोकांतिका, कथानकातील विरह वेदना, जगण्याची सवय झाल्याने दिलीप कुमारांना डिप्रेशन, तणावाने घेरले. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत जाऊन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तुम्ही यापुढे हलक्या फुलक्या कथानकांचे विनोदी चित्रपट करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलीपला दिला. त्यामुळे दिलीपने कोहीनूर हा हलका फुलका चित्रपट मीना कुमारीसोबत केला. ही बाब कुतूलहाची आहे की, काहीशा विनोदी असलेल्या कोहिनूरमधील नायक आणि नायिका दोघेही ट्रॅजेडी किंग आणि क्वीन म्हणून ओळखले जात होते. अमेरिकेतल्या जेम्स स्टिवर्डचे इंग्रजी सिनेमे पाहून दिलीप कुमारने स्वतःच्या अभिनय, संवादावर रियाज करणं सुरू केलं. त्याला बॉम्बे टॉकीजचा जुना मित्र दिग्दर्शक नितीन बोसची साथ मिळाली.

- Advertisement -

नितीनने अभिनयातील बारकावे सांगितले. तुझ्या बोलण्यातील विराम (पॉज) तुझ्या अभिनयाचं बलस्थान असल्याचं नितीननेच दिलीपला आवर्जून सांगितलं. पुढे पहिलं यश दिलीप कुमारला त्यांचा तिसरा चित्रपट ‘मिलन’ने दिलं. त्यानंतर जुगनू (१९४७) रिलिज झाला खरा. मात्र, मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी सिनेमात अनैतिकता, बिभत्सपणा असल्याचं सांगून चित्रपट थेटरात बंद पाडला. पुढे मेला (१९४८) मधील नर्गिस आणि दिलीप कुमारच्या जोडीला खूप पसंती मिळाली. या जोडीनेही अनेक हीट सिनेमे दिले. हेच कारण होतं की दिलीपने मेहबूब खानचा ‘मदर इंडिया’ नाकारला होता. एका नायकाची लोकप्रिय नायिका त्याच नायकाची आई झालेलं प्रेक्षकांना रुचणार नाही, हे दिलीपने ओळखलं आणि ‘मदर इंडिया’तील बिरजू साकारण्यास नकार दिला, जो पुढे सुनील दत्त यांनी साकारला. जे होतं ते चांगल्यासाठीच आणि जे होत नाही तेही चांगल्यासाठीच. दिलीपने जे केलं नाही, त्यामुळेही ‘मदर इंडिया’त इतिहास घडला.

ऐंशीच्या दशकात दिलीप कुमारांना समोर ठेवून सिनेमे बनवले जाऊ लागल्याने अभिनयातील नावीन्याला मर्यादा आल्या. ‘विधाता,’ ‘कानून अपना अपना’ असे हे प्रयत्न झाले. मात्र, ‘किला’ (१९९८) बॉक्स ऑफिसवर कोसळल्यावर दिलीप कुमारांनी पडद्यावरील अभिनय थांबवला. दिलीप कुमार यांनी हिंदी सिनेमा आणि अभिनय क्षेत्राला जे दिलेलं आहे, ती शिदोरी कित्येक पिढ्यांना पुरेल इतकी आहे. दिलीप कुमार हे नाव हिमनगाचं दिसणारं एक टोक आहे. पाण्याखाली लपलेल्या या अभिनयाच्या हिमालयाचा शोध सिनेक्षेत्रातील येणार्‍या पिढ्यांना सातत्याने घ्यावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -