घरफिचर्सDilip Kumar Passes Away: रुपेरी पडद्यावरचा बादशहा!

Dilip Kumar Passes Away: रुपेरी पडद्यावरचा बादशहा!

Subscribe

जिस जबान में युसूफ बात करता है…मै भी उसही अंदाज में अपने डायलॉग बोलूंगा…दिलीप कुमारच्या हरियाणवी भाषेतील लहेजा आणि संवादामुळे प्रभावीत झाल्यानंतर राजकुमारने सौदागरच्या सेटवरच अचानक असा हट्ट धरला. या हट्टामुळे सौदागरच्या शुटींग थांबलं आणि सर्व युनिट धास्तावलं. आपल्या हम शिवाय कुणालाही खिजगणीत न धरणार्‍या राजकुमारला समजावणार कोण, याचं दिग्दर्शक सुभाष घईंला टेन्शन आलं. आता कसं करावं, राजकुमार ऐकायला तयार नव्हता, अखेर नाईलाजानं सुभाषनं राजूला समजावायला विरुला धाडलं. 1959 मध्ये पैगाम प्रदर्शित झाल्यावर पडद्यावर आणि पडद्यामागील या दोन्ही कुमारांची मैत्री चर्चिली जात होती. पडद्यावर संवादाचा राजा असलेल्या राज नावाच्या एका कुमारने दिलीप नावाच्या संवादाचा शहेनशहा असेल्या दुसर्‍या कुमारचं ऐकलं आणि सौदागरचं शूटिंग पुन्हा सुरू झालं. दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासाचा घेतलेला वेध…

बॉम्बे टॉकीजची अनभिषिक्त सम्राज्ञी देविकाराणींनी 19 वर्षांच्या तरुण युसूफला दिलीप कुमार हे नाव बहाल केलं होतं. दिलीप कुमारच्या आधी अशोक नावाच्या कुमारानं कृष्ण धवलचा हिंदी पडदा आपल्या अभिनय संवादाने पुरता ताब्यात घेतला होता. या दोघांमधली अभिनयाची जुगलबंदी पडद्यावर रंगवण्याची स्वप्ने बिमल रॉयपासून सुभाष घईंपर्यंत अनेकांनी पाहिली. मात्र तडाखेबंद अभिनयाच्या दोन तळपत्या तलवारी संवादाला न्याय देणार्‍या एकाच म्यानात ठेवण्याचा हा धोका पत्करणं दोन्ही कुमारांचे मित्र असलेल्या नितीन बोस यांनाच दिदार (1951) मध्ये शक्य झालं, यात नर्गिस आणि निम्मी या दोन नायिका होत्या. कोहिनूरमधल्या मधुबनमें राधिका नाचे रे..या एका गाण्यातील व्यक्तीरेखेत जिवंतपणा यावा यासाठी खराखुरा तानपुरा शिकणार्‍या दिलीप कुमारांनी दिदार चित्रपटात खुल्या डोळ्यांच्या अंध नायकाची भूमिका केली. मात्र डोळसपणे अंध व्यक्ती कसा करायचा, हा प्रश्न होता. ही अडचण दिलीपनी मित्र अशोक कुमारला सांगितली. भायखळा स्टेशनबाहेर डोळे उघडले असलेला एक अंध फकीर रस्त्यावरच गाणं बोलत असतो, त्याचं वागणं, जगणं पाहून ये, असा सल्ला अशोकने दिल्यावर, दिलीप या अंध फकिराच्या भेटीला गेले आणि त्याच्याशी मैत्रीही केली. कित्येक आठवडे त्याचं निरीक्षण केल्यानंतर दिदारच्या शूटिंगसाठीचं होमवर्क तयार झालं होतं.

- Advertisement -

या दिदारचे फिल्म एडीटर बिमल रॉय होते. त्यांनीच पुढे हिंदी सिनेमातील प्रेमपटातील मैलाचा दगड ठरलेला मधुमती दिलीप आणि वैजयंतीमाला यांना घेऊन (1951) मध्ये बनवला. अशोक, राज या कुमारांच्या तुलनेत एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेणारे दिलीप हे एकमेव कुमार त्यावेळी सिने इंडस्ट्रीत होते.
बिमल रॉय यांचे बंगाली रंगभूमीशीही नातं होतं. त्याकाळी उत्पल दत्त हे नाव या रंगभूमीला पर्याय होतं… ते म्हणायचे, मी समजत होतो, बंगाली रंगभूमी परंपरेला आणि कला चित्रपटांना अभिनय शिकवणारा अद्याप जन्माला यायचाय. दिलीप कुमारांनी मला खोटं ठरवलं, अशी स्पष्ट कबुली मधुमती आणि बंगाली चित्रपटातील दिलीप कुमारांचा अभिनय पाहून उत्पल दत्त यांनी दिली.

देवदास, आदमी, गंजा जमना, अशा चित्रपट शोकांतिका, कथानकातील विरह वेदना, जगण्याची सवय झाल्याने दिलीप कुमारांना डिप्रेशन, तणावाने घेरले. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत जाऊन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तुम्ही यापुढे हलक्या फुलक्या कथानकांचे विनोदी चित्रपट करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलीपला दिला. त्यामुळे दिलीपने कोहीनूर हा हलका फुलका चित्रपट मीना कुमारीसोबत केला. ही बाब कुतूलहाची आहे की, काहीशा विनोदी असलेल्या कोहीनूरमधील नायक आणि नायिका दोघेही ट्रॅजिडी किंग आणि क्विन म्हणून ओळखले जात होते. दिलीप कुमारांच्या 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम और श्यामचं बॉक्स ऑफीस कलेक्शन पहिल्या पंधरा दिवसातच 10 कोटींच्या पुढे होतं. हा चित्रपट इतका हिट झाला की या कथानकावर पुढे हेमा मालिनीचा सीता और गीता, अनिल कपूरचा किशन कन्हैया आणि श्रीदेवीचा चालबाजही यशस्वी झाला.

- Advertisement -

के आसिफच्या मुघल-ए-आझमचं बजेट त्यावेळी 1 कोटींच्या घरात होतं. तुलनेनं एका नवख्या मुलाला घेऊन त्याची पृथ्वीराज कपूरशी अभिनयातील जुगलबंदी लावून देणं चित्रपटाचं बजेट पाहता धोक्याचं होतं. मात्र के आसिफने हा धोका पत्करला आणि पुढे इतिहास घडला. हिंदी पडद्यावरील प्रेम परंपरेतील पहिला चित्रपट अंदाजमध्ये दिलीप, राज कपूर आणि नर्गिस अशा या प्रेमत्रिकोणाच्या तीन बाजू होत्या. मेहबूब खानचा अंदाज सुपरहीट ठरल्यावर प्रेमत्रिकोण कथानकांची परंपरा हिंदी पडद्यावर सुरू झाली.

शोलेच्या रमेश सिप्पींचा शक्ती हा दिलीप कुमार आणि अमिताभमधील संवादाच्या जुगलबंदीसाठीच जावेद अख्तरने लिहिला होता. मात्र त्यातही अशोक आणि दिलीप या दोन कुमारांना एका प्रसंगात घेण्याची अनेक वर्षांची इच्छा सिप्पींनी पूर्ण करून घेतली. हीच इच्छा यश जौहर यांनाही होती, त्यांनी ती जावेद अख्तरच्याच लेखणीतून ऐंशीच्या दशकात दुनिया नावाचा चित्रपट बनवून पूर्ण केली. याच दशकात आलेल्या शक्ती आणि त्याआधीचा मुघल -ए-आझम ही कथानकाची दोन भिन्न टोकं होती, पण त्यात पित्याविरोधात मुलाने केलेले बंड हा यात समान धागा होता. मुघल-ए-आझममध्ये या बंडाला कारण दुनिया जहाँ म्हणजेच शहेनशाह अकबरच्या विरोधाची पर्वा न करता सलीमने कनिज अनारकलीवर केलेली बेपनाह मोहब्बत कारण होती. तर शक्तीमध्ये अमिताभ आणि दिलीप कुमारमधल्या शीतयुद्धाला तत्वनिष्ठ पोलीस बापाची कानून निष्ठा कारण होती. टोकाचा तात्विक मतभेद असलेल्या बापाला ठाम विरोध असतानाही त्याचा आदरयुक्त दरारा आणि प्रेमाचा ओलावा कथानकात पडद्यावर कसा कायम ठेवायचा, हे मुघल-ए-आझम पाहिल्यावर दिलीप कुमारांकडून शिकल्याचं अमिताभने शक्ती रिलिज होताना सांगितलं होतं.

ऐेंशीच्या दशकातल्या यश चोप्रांच्या मशालनंंतर दिलीप कुमारवरील ट्रॅजिडी किंगचा ठसा दुनियानं आणखी गडद केला होताच. ऐंशीच्या दशकात जावेद अख्तरने लेखणीची मशाल पडद्यावर पेटवली तेव्हा (सुधा) वहिदाच्या रस्त्यावरील हतबल मरणाचा प्रसंग जावेदनं, ऐ भाय कोई है…म्हणत लिहिला. पण हा प्रसंग दिलीप कुमार आणि वहिदाने ज्या परिणामाने साकारला त्यानं मीसुद्धा या प्रसंगाचा संवादलेखक आंतरबाह्य हादरून गेल्याचं जावेद म्हणाला. दिलीप कुमार हे पहिले कलाकार आहेत, ज्यांनी हिंदीच नाही तर जागतिक पडद्यावर मेथडीक अ‍ॅक्टींगचा पाया रोवला. मेथडीक अभिनय म्हणजे दिलेल्या व्यक्तीरेखेतील स्वतःचं वेगळं अस्तित्व बाजूला सारून त्या व्यक्तीरेखेतील व्यक्तीच स्वतःला समजणं किंवा होणं…..यातील भूमिका साकारणं, जगणं या गोष्टीही या संकल्पनेच्या तुलनेत उथळ होत्या.

दिलीप कुमारांच्या बाबतीत कायम एक अडचण होती, दिलीप कुमारच्या संवाद अभिनयाच्या ओझ्याखाली त्यांचा सहज अभिनय झाकोळला जातो, किंबहुना तो दिलीपकडे नाहीच, सहज अभिनयातील दिग्गज बलराज साहनी, अशोक कुमार यांना वळसा घालून आपल्या संवादाची छाप पाडण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांचा अभिनय असा आरोप सिने समीक्षकांकडून दिलीप कुमारांवर करण्यात आला. मात्र दिलीपनं त्याला जुमानलं नाही. यश चोप्रांच्या मशालमध्ये आपल्या मूल्य आणि तत्वासाठी उद्धस्त झालेल्या पत्रकार दिलीप कुमारच्या अभिनयात समतुल्य मित्रांची निवड करण्याचं काम यश चोप्रांसाठी त्यामुळेच सोपं नव्हतं. इंग्रजी रंगभूमीचा प्रभाव असलेले सईद जाफरी आणि मराठी चित्रपट रंगभूमीवरील सहज अभिनयाचे सम्राट निळू फुले ही नावे खूप चर्चाचर्वण करून त्यासाठी निवडण्यात आली.

दिलीप कुमारांच्या वडिलांचे पाकिस्तानच्या पेशावरमध्ये फळांचं दुकान होतं. त्या काळी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भाजीपाला, फळविक्रीचा मोठा बाजार होता. इथं फळे विकण्यासाठीचं दिलीप कुमारचे आईबाबा छोट्या युसूफला घेऊन मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये दाखल झाल्यावर युसूफला फुटबॉलची गोडी लागली. फुटबॉल मैदानावरच त्याचा बराच वेळ जात होता. या फुटबॉल प्रेमापोटीच मशालमध्ये अनिल कपूरला फुटबॉलमध्ये नमवण्याचा प्रसंग दिलीप कुमारच्या आग्रहाखातर यश चोप्रांनी जोडला होता. फुटबॉल खेळाच्या कथानकावर आधारीत अनिल कपूरचा साहेब पहायला दिलीप कुमार आवर्जून गेले होते. खेळात आवड असली तरी वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत यूसूफने कुठलाही सिनेमा पाहिला नव्हता. पुढे शाळा संपवून मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच दरम्यान मुंबईतल्या दमट वातावरणामुळे त्रास झाल्याने आईबाबा पेशावरला परतण्याच्या तयारीत असताना तरुण युसूफने घरखर्चाला हातभार लागावा म्हणून कॉलेज टाळून पुण्यातल्या मिलिटरी कँटीनमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली. तिथंही त्या कँटीनमध्ये परंपरागत फळे विक्री केल्याने ही नोकरीही काही फळाला आली नाही.

निराश युसूफ मुंबईला परतला आणि पित्याच्या फळ व्यावसायात पूर्ण लक्ष घातलं. फळांची ऑर्डर मिळवण्यासाठी तो नैनितालला गेला. या ठिकाणी वीस बावीस वर्षाच्या युसूफची ओळख काही कारणाने अभिनेत्री आणि बॉम्बे टॉकीजच्या मालकिण देविकाराणीशी झाली. ब्रिटिशकाळात देविकाराणी आणि हिमांशु रॉय हे सिनेनिर्मितीत दरारा असलेलं दाम्पत्य होतं. देविकाराणींनी, इस लडके में कुछ बात है…म्हणत बॉम्बे टॉकीजच्या कुटुंबात युसूफला घेण्यासाठी पती हिमांशुंच मन वळवलं. त्यानंतर मुंबईतल्या बॉम्बे टॉकीजच्या स्टुडिओत युसूफला स्क्रीन टेस्टसाठी बोलावणं धाडलं. युसूफ वेळेवर हजर झाले. त्यावेळी काही कारणाने तत्कालीन सुपरस्टार अशोक कुमारांनी बॉम्बे टॉकीजला राम राम करून फिल्मिस्तान कंपनीत काम सुरू केल्यानं बॉम्बे टॉकीजच्या सिनेमातील नायकाची जागा खडखडीत रिकामी होती. बॉम्बे टॉकीजचा कलाकार कर्मचारी म्हणून देविकाराणींनी युसूफला दोनशे रुपये पगारावर तीन वर्षासाठी नोकरीवर ठेवलं. त्यावेळी कलाकारांच्या कुमार नावाला वलय असल्याने वासुदेव, जहाँगीर आदी नावातून निवड करत युसूफचा देविकाराणींनी दिलीप कुमार केला. पुढे शूटिंग पूर्ण होऊन बॉम्बे टॉकीजकडून दिलीप कुमारचा पहिलाच चित्रपट ज्वार भाटा (1944) रिलिज झाला आणि बॉक्स ऑफीसवर दणकून कोसळलाही. या अपयशाचं खापर नियतकालीक फिल्म इंडियातील तत्कालीन सिने समीक्षकांनी नवख्या दिलीप कुमारवर फोडलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी आलेला चित्रपट प्रतिमा (1945) ही तिकिटबारीवर दणकून आपटला. मात्र अपयशामुळे टिकेचा धनी ठरलेल्या दिलीप कुमारांनी पुन्हा नव्याने सुरुवात करायचं ठरवलं.

अमेरिकेतल्या जेम्स स्टीवर्टचे इंग्रजी सिनेमे पाहून दिलीप कुमारने स्वतःच्या अभिनय, संवादावर रियाज करणं सुरू केलं. त्याला बॉम्बे टॉकीजचा जुना मित्र दिग्दर्शक नितीन बोसची साथ मिळाली. नितीनने अभिनयातील बारकावे सांगितले. तुझ्या बोलण्यातील विराम (पॉज) तुझ्या अभिनयाचं बलस्थान असल्याचं नितीननेच दिलीपला आवर्जून सांगितलं. पुढे पहिलं यश दिलीप कुमारला त्यांचा तिसरा चित्रपट मिलनने दिलं. त्यानंतर जुगनू (1947) रिलिज झाला खरा, मात्र मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी सिनेमात अनैतिकता, बिभत्सपणा असल्याचं सांगून चित्रपट थेटरात बंद पाडला. पुढे मेला (1948) मधील नर्गिस आणि दिलीप कुमारच्या जोडीला खूप पसंती मिळाली. या जोडीनेही अनेक हीट सिनेमे दिले. हेच कारण होतं की दिलीपने मेहबूब खानचा मदर इंडिया नाकारला होता. एका नायकाची लोकप्रिय नायिका त्याच नायकाची आई झालेलं प्रेक्षकांना रुचणार नाही, हे दिलीपने ओळखलं आणि मदर इंडियातील बिरजू साकारण्यास नकार दिला, जो पुढे सुनील दत्त यांनी साकारला, जे होतं ते चांगल्यासाठीच आणि जे होत नाही ते ही चांगल्यासाठीच….दिलीपने जे केलं नाही, त्यामुळेही मदर इंडियात इतिहास घडला.

आता आरजू, शबनम अशा चित्रपटांमुळे कामिनी कौशलसोबतही दिलीप कुमारांची हीट परेड सुरू झाली. यातील मेलापासून दिलीपच्या पुढील अनेक चित्रपटांना नौशाद साहेबांनी संगीत दिलं. देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यावर नव्या भारतात शेतकरी कामगार आणि भांडवलदारांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. त्यातचं 1948 मध्ये फिल्मिस्तानचा स्वातंत्र्यचळवळीवर आधारीत शहीद रिलिज झाल्यावर स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका केलेल्या दिलीप कुमारांच्या अभिनयाचे नवे पर्व सुरू झाले. देशप्रेमाधारित सिनेमांची ही सुरुवात लिडर, क्रांती, अलिकडच्या कर्मापर्यंत कायम होती. नसिरुद्दीन शहा यांना दिलीप कुमारांबरोबर काम करण्याची संधी सुभाष घईच्या कर्मानं दिली खरी, पण सिनेमातील तद्दन व्यावसायिक कथानकामुळे या संधीचा दिलीप कुमारांकडून काही नवे शिकण्यासाठी मला उपयोग करता आला नाही, अशी खंत नसिरुद्दीन शहाने व्यक्त केली होती.

ऐंशीच्या दशकात दिलीप कुमारांना समोर ठेवून सिनेमे बनवले जाऊ लागल्याने अभिनयातील नावीन्याला मर्यादा आल्या. विधाता, कानून अपना अपना असे हे प्रयत्न झाले, मात्र अगदी अलीकडचा किला (1998) बॉक्स ऑफिसवर कोसळल्यावर दिलीप कुमारांनी पडद्यावरील अभिनय थांबवला. दिलीप कुमार यांनी हिंदी सिनेमा आणि अभिनय क्षेत्राला जे दिलेलं आहे, ती शिदोरी कित्येक पिढ्यांना पुरेल इतकी आहे. दिलीप कुमार हे नाव हिमनगाचं दिसणारं एक टोक आहे. पाण्याखाली लपलेल्या या अभिनयाच्या हिमालयाचा शोध सिनेक्षेत्रातील येणार्‍या पिढ्यांना सातत्याने घ्यावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -