Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स आटलेल्या नदीच्या प्रवाहाचा शोध!

आटलेल्या नदीच्या प्रवाहाचा शोध!

गावात आता बावडेवर होणार्‍या गजालीदेखील होत नाहीत. प्रत्येकाच्या घरात नळाचं पाणी येतंय किंवा बर्‍याच जणांनी बावडेवर पंप लावून पाणी घरात घेतलं आहे. नदीवर धुणी धुवायलादेखील आता जायची गरज नाही. पोरं नदीवर मासे पकडायला किंवा पोहायला जात नाहीत. कारण नदी आटत चालली आहे. पूर्वी कोणे एकेकाळी येथे मोठी कोंड होती, एवढी नदीची आठवण तेवढी रहिली आहे. नदीला पूज्य देवता मानणारी माणसे होती. हल्ली या नदीकडेच सर्वांनी पाठ फिरवली आहे.

Related Story

- Advertisement -

मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो, तिन्हीसांजेला दिवेलागण, धूप घालून झाला की, माझे आबा आजोबा खळ्यात आरामखुर्चीत बसून भगवद्गीता किंवा पांडवप्रताप असा काही ग्रंथ वाचत बसत. मी कळत्या वयाचा झालो तेव्हा कुर्ला डेपोतून कणकवली गाडी पकडून एकटा गावी जाऊ लागलो. तिन्हीसांजा झाल्या की, कोणीना कोणी आमच्या गावातल्या घराच्या खळ्यात येऊन बसे.असा कोणी माणूस येऊन बसला की, आमच्या आबा आजोबांच्यातला ईनामदार जागा व्हायचा, आबा आजोबा पोलीस खात्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या कळत्या वयापासून ते मुंबईत राहिल्याने त्यांचे बोलणे अगदी नागरी असायचे, घरातदेखील क्वचित मालवणीतून बोलायचे. आजोबांच्या समोर एखादा गाववाला येऊन बसला की, त्यांना माहीत असलेली पारंपरिक कथा ते सांगत-त्याचे झाले असे आम्ही साटम मूळचे आडवलीचे, सुखवस्तीसाठी म्हणून चारशे वर्षांपूर्वी इथे आयनलात वस्तीला आलो. पूर्वी म्हणे असलदे गावाच्यापासून ते थेट माईंनच्या डोंगरापर्यंत आईन या वनस्पती अतोनात प्रमाणात होत्या.

आडवलीवरून सुखवस्तीला आलेल्या साटमाने या गावात वस्ती केली. या परिसरातल्या आईनाच्या झाडांमुळे या गावाचं नाव पूर्वी आयंदळ पडले, जे पुढे आयनल म्हणून रूढ झाले. गावाच्या चतुर्सीमा म्हणजे तिन्ही बाजूला नदी, मागे डोंगर आणि एका बाजूला रस्ता. तिन्ही बाजूला म्हणजे पूर्वेला पसरत गेलेला माईनचा डोंगर, पश्चिमेला चाफेड गावची नदी जी तशीच पुढे जाऊन आचर्‍याच्या खाडीला मिळते आणि उत्तरेच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गाला छेद देऊन निघणारा नांदगाव-शिरगाव महामार्ग.

- Advertisement -

गावात यायला तसं बघितलं तर चारही बाजूने रस्ता आहे. उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूत गावात यायला काही अडचण नसते पण पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहत असल्याने नांदगाव-शिरगाव रस्ता तेवढा वाहतुकीला मोकळा बाकी रस्ते पाण्याने भरलेले असतात. त्यामुळे लोकांच्या रोजच्या जगण्यात नदीचं काय महत्त्व असेल हे आपल्या लक्षात येईल. पूर्वी गावची शेती या नदीच्या पाण्यावर व्हायची. त्या नदीच्या वाहत्या पाण्याला अजून गती मिळायची. पावसाळ्याच्या दिवसात कधी लाईट गेली की, आपण आता कुठल्यातरी बेटावर आहोत की, काय असा भास व्हावा.

पूर्वी काही पट्टीचे पोहणारे नदी ओलांडून अलीकडच्या गावी यायचे. आजही या नदीवर कोणताच पूल नाही, त्यामुळे आमच्या गावात यायचे असेल तर रानातल्या रस्त्याने भोवडा मारून यावे लागते, कारण हल्ली तसे पट्टीचे पोहणारे आहेत कुठे? , चाफेड गावात जायला एक साकव आहे, पावसाळ्यात या साकवावरून जाताना आता पडू की, पुढे पडू अशी अवस्था होत असते. ही अवस्था अगदी पूर्वापार अशीच आहे. हा साकव वापरतात कधी तर गणपतीच्या दिवसात. गावचे गणपती बनवणारे कारागीर पलीकडे-चाफेड गावात. मूर्ती डोक्यावर घेऊन घट्ट पाय साकवावर लावत त्या आणायचे म्हणजे मोठे दिव्यच असते.

- Advertisement -

नव्वदीच्या दशकात कोकणात टेलीफोन आले. टेलिफोन आले म्हणजे सार्वजनिक फोन, गावातल्या पोस्ट ऑफिसात. त्यावेळी केवळ गावातले नाही तर अख्ख्या पंचक्रोशीतले फोन त्या फोनवर येऊ लागले, पण सांगायचा मुद्दा हा की, पावसाळ्याच्या दिवसात विजा पडू लागल्या की, फोन पुढचे कित्येक दिवस नव्हे तर महिने बंद. आज वीस वर्षांनंतरदेखील पावसाळ्यात तीच अवस्था होते. कोकणात जास्त पाऊस पडला की, सर्वांचे मोबाईल बंद, त्यांची रेंज नेहमीची गेलेली. झाले जगाशी संपर्क तुटला. आता काही महत्त्वाचे असेल तर बाईकवर बसून कोळोशीच्या दिशेने या आणि फोन करा. गावात बीएसएनएल शिवाय कुठलेच फोन लागत नाहीत.

कणकवली हे आमचं तालुक्याचं ठिकाण. याठिकाणी जायचे असेल तर कोळोशी-नांदगाव रोडने जाता येते, जे अंतर किमान पस्तीस किलोमीटर आहे, त्या मार्गाने एसटीचं भाडं जवळपास पन्नास रुपये आणि भरणी -तरंदळे मार्गाने अंतर केवळ अठरा किलोमीटर आणि गाडीचे भाडे निम्मे म्हणजे पंचवीस रुपयाच्या आसपास. गावातल्या शाळा. कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांना हा रस्ता आर्थिकदृष्ठ्या परवडतो. पण या रस्त्याने जायचे म्हणजे स्वतःची कंबर मोडून घ्यावी लागेल. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याचे कपचे उडाले आहेत. मुळात हा रस्ता आहे की, गुरांची पाणंद हा प्रश्न पडावा. गावातली दोन चार पोरं मग उद्या दादांका भेटान रस्त्याचा काम मार्गी लावया म्हणेपर्यंत दुसरा कोणी दादाक कशाक मी भाईक सांगतय म्हणून त्याने घातलेल्या कामात खो घालून दादा-भाईच्या राजकारणात अनेक वर्षे रस्ता तसाच पडून आहे. वर्षानुवर्षे हे असेच चालले आहे तरी गाववाले इमानेईतबारे दर पाच वर्षांनी आमदार -खासदार-ग्रामपंचायत सदस्य सर्वांना निवडून देण्याच्या कामात हिरीरीने पुढे घेऊन जातात. कारण त्यांच्या मनाने एक गोष्ट पक्की केली आहे, कोणा दादा -भाईच्या नावाने शिमगा करून काहीही फरक पडणार नाही. त्यांच्या जगण्यातला संघर्ष कमी होणार नाही. त्यांच्या मरणयातना कोणी कमी करणार नाही. गावतले चार-पाच म्हातारे आमच्या खळ्यात येऊन गप्पा मारू लागले की, त्यांच्या आत पेटणारा संघर्ष कोणत्या थराचा आहे हे लक्षात येते.

रे उद्या, आमचो बाबू निवडान इलो म्हणान काय या गावात जोराचो पावस येवन, म्वोप पीक येताला.? आमका जा कष्ट करुचा ता करुक व्ह्यया. उद्या काय ह्यो आमदार आमका पोसतलो आसा. एखादा अशिक्षित म्हातारा जेव्हा असं काही म्हणतो तेव्हा आपल्या काळजाला घरं पडतात.वयाची पस्तीशी-चाळीशी ओलांडलेली माझ्या वयाची, माझ्याबरोबर खेळलेली पोरं बिनलग्नाची फिरत आहेत. सगळीकडून त्यांना नकार आलेले आहेत, आपलं लग्न होतं नाही म्हणून हल्ली ते वाडीत किंवा आवटात फिरत नाहीत. आता सोयरिक जमवण्यासाठी म्हणून त्यांनी बेळगाव-कोल्हापूर गाठलं आहे. पूर्वी गावची चतुर्सीमादेखील सोयरिक करायला पुरेशी होती. तिथे आज गावातील पोरांना केवळ ते शेती करतात म्हणून त्यांना नाकारलं गेलं आहे. गावात आता बावडेवर होणार्‍या गजालीदेखील होत नाहीत. प्रत्येकाच्या घरात नळाचं पाणी येतेय किंवा बर्‍याच जणांनी बावडेवर पंप लावून पाणी घरात घेतलं आहे. नदीवर धुणी धुवायलादेखील आता जायची गरज नाही. पोरं नदीवर मासे पकडायला किंवा पोहायला जात नाहीत. कारण नदी आटत चालली आहे. पूर्वी कोणे एकेकाळी येथे मोठी कोंड होती, एवढी नदीची आठवण तेवढी रहिली आहे. नदीला पूज्य देवता मानणारी माणसे होती. हल्ली या नदीकडेच सर्वांनी पाठ फिरवली आहे.

नदीकडे दुर्लक्ष व्हायचं अजून एक कारण म्हणजे बर्‍याचशा गाववाल्यांनी परवडत नाही म्हणून शेती सोडून दिली आहे. मजूर मिळत नाही. एकट्याने शेती करणं त्यांना जमत नाही. गावातला तरुणवर्ग गावात न राहता तालुक्याला छोटी मोठी नोकरी करण्यात समाधान मानतो. त्यामुळे गुंठानगुंठा ओस पडलेली जमीन डोळ्यांना दिसते. कुणाच्याही गोठ्यात आता जनावरं दिसत नाहीत. खळ्यात सारवण्यासाठी शेण मिळत नाही.गुरांच्या मागे फिरायला वेळ कोणाला किंवा ज्यांना वेळ आहे त्यांना वयानुसार जमत नाही. त्यापेक्षा दुसर्‍यांच्या कुडनात जाऊन चरणार्‍या गुरांना अडवण्यापेक्षा ती गुरं नसलेली बरी. गावातल्या देवळाकडे वळलो तर तिकडेसुध्दा तिच परिस्थिती. दहा वर्षांपूर्वी एवढं मोठ्ठ मंदिर बांधलं. गावात एखादं प्रशस्त देऊळ असावं म्हणून पण आज कोणीही तिकडे फिरकत नाही. कोणी चाकरमानी नारळ घेऊन देवाच्या पाया पडायला आला की, गुरव नेहमीप्रमाणे देवापुढे गार्‍हाणे घालतो. नारळ वाढवून तिथल्या लोकांना देतो आणि अर्धा नारळ आपणासाठी ठेऊन देतो.

पूर्वी या देवळात गेलो की, बाबा मला देवळाच्या मागे असलेल्या पाषाणाकडे घेऊन जायचे आणि त्या पाषाणावर कोरलेल्या अक्षरांकडे बोट करून ही अक्षरं ज्याला वाचता येतील त्याला या पाषाणाखाली असलेली संपत्ती मिळेल. खूप जणांनी म्हणे तसा प्रयत्न केला, पण कोणाला ती अक्षरे वाचता आली नाहीत. पुढे मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तेव्हा हा पाषाण काढावा लागला. ( पाषाण हलवला पण खाली संपत्ती म्हणजे दगड धोंडे मिळाले). पिढ्यानपिढ्या चालत असलेली वार्षिके, जत्रा मेळे होतात, कधी होत नाहीत, पण त्याचा गावच्या जीवनावर काही विशेष फरक पडला असे मला वाटत नाही.गाव कितीही पुढारलं म्हणजे तसा मानायचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी ज्या पिढ्यानपिढ्या चालू आहेत त्याकुठे बदलल्या आहेत. शेतातल्या जागेवाल्याचं, वेशीवरल्या देवचाराचा, रगाड्या आंब्याखालच्या जागेवाल्याचा भागवणं हे आजही चालू आहे. पूर्वी गावाचा म्हणून एखादा कोंबडा भागवण्यासाठी पुरेसा होता. चमचाभर रस्सा आणि एखादी मटणाची फोड याने माणूस तृप्त होत होता,आता गावातला प्रत्येकजण आपण स्वतः एक कोंबडा देऊ शकतो एवढी सुबत्ता आहे. तरी या सर्वांचा संबंध धार्मिक कार्याशी जोडला गेला होता तेव्हा मद्य निषिद्ध होतं. हल्ली देवाचं गार्‍हाणे झालं की, पटापट बाटलीची झाकणं उघडली जातात.

सामाजिक बदल जो अपेक्षित आहे. पंचायती राज्य संघटित होऊन जो बदल एकविसाव्या शतकात व्हावा असे वाटते तो आजही होत नाही ही शोकांतिका दृष्टीआड करता येत नाही. सर्व जाती धर्मातली मुलं शिकली सवरली त्यामुळे गावात त्यांना मिळणारी वागणूक कुठेतरी त्यांना खटकते. भिंतीवर ठेवलेल्या वेगळ्या कपात पूर्वीची पिढी चहा पीत होती, पण आजच्या मागास समाजातील मुलांनी ते अनुकरण का करावं ? सण-समारंभात ही मुलं कुठे सवर्ण समाजात अशी वागणूक मिळते म्हणून जात नाहीत. समाजात मिसळत नाहीत. कायद्याच्या आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांचे पूर्ण बरोबर आहे. पण भौतिक बदल होत असताना या सामाजिक बदलाकडे जेवढे लक्ष दिले गेले पाहिजे तेवढे दिले जात नाही. हा सामाजिक बदल गावाखेड्यातून होणं तेवढाच गरजेचा आहे. या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक बदलाचा विचार करताना पुन्हा नदीच्या काठावर येऊन बसल्यावर जाणवते की, या सर्व बदलांची साक्षीदार असणारी ही नदी हल्ली वाहत नाही. तिचं पात्र मंद झालं आहे. त्या नदीच्या पात्रात शेवाळ गोळा झालं आहे. नदी ही या सर्व सांस्कृतिक बदलांची एकमेव साक्षीदार. नदीच्यावर असणार्‍या डोंगराचे रूप नदीच्या पाण्यात दिसत नाही. नदी एवढी आटली याला कारण नदीवर बसवलेले पंप, हल्ली नदीवर धरण बांधून हे पाणी अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नदीचा प्रवाह असा उथळ नसला तरी संथ असावा ते ग्रामीण विकासाच्या प्रवाहाचं प्रतिक आहे. आटलेल्या नदीच्या प्रवाहाचा शोध तिच्या काठावरून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

- Advertisement -