घरफिचर्सधोनी, कोहलीनंतर आता साहा, नेमकं कुणाचं टायमिंग चुकतंय ?

धोनी, कोहलीनंतर आता साहा, नेमकं कुणाचं टायमिंग चुकतंय ?

Subscribe

टीम इंडियाचा विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या निमित्ताने टीम इंडियाच्या खेळाडू आणि प्रशिक्षक तसेच बीसीसीआय यांच्यातील एक वाद समोर आला आहे. या वादाला अनेक क्रिकेटपटूंकडून नाकारण्यात येत असतानाच भारतीय संघातून खेळलेल्या आजी माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने समोर आल्या आहेत. अर्थात या प्रकरणात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने खुलासा केल्याने टीम इंडियातील खेळाडूंच्या बाबतीत होणार्‍या राजकारणाला यापुढच्या काळात तरी पूर्णविराम मिळण्याची आशा आहे. राहुल द्रविडने मोठ्या मनाने घेतलेली भूमिका ही साहाच्या निमित्ताने समोर आली आहे. पण त्याचा बोध मात्र टीम इंडियासाठी खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला घेण्यासारखाच आहे.

टीम इंडियाचा विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या निमित्ताने टीम इंडियाच्या खेळाडू आणि प्रशिक्षक तसेच बीसीसीआय यांच्यातील एक वाद समोर आला आहे. या वादाला अनेक क्रिकेटपटूंकडून नाकारण्यात येत असतानाच भारतीय संघातून खेळलेल्या आजी माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने समोर आल्या आहेत. अर्थात या प्रकरणात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने खुलासा केल्याने टीम इंडियातील खेळाडूंच्या बाबतीत होणार्‍या राजकारणाला यापुढच्या काळात तरी पूर्णविराम मिळण्याची आशा आहे. राहुल द्रविडने मोठ्या मनाने घेतलेली भूमिका ही साहाच्या निमित्ताने समोर आली आहे. पण त्याचा बोध मात्र टीम इंडियासाठी खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला घेण्यासारखाच आहे.

भारतीय संघात विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेपासून निर्माण झालेले वातावरण फारसे सुधारलेले नाही. टी 20, एकदिवसीय सामना आणि कसोटी सामना अशा तिन्ही फॉरमॅटमधील निवृत्तीच्या निर्णयानंतर बीसीसीआयविरूद्ध विराट कोहली असा संघर्ष आणि वाद पहायला मिळाला. याआधीही एमएसके प्रसाद आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांमध्येही अशाच पद्धतीचे वातावरण पहायला मिळाले होते. दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत बीसीसीआय विरूद्ध खेळाडू असाच संघर्ष पहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंनी तडकाफडकी राजीनामा दिला. प्रकरणाचे सगळे खापर हे बीसीसीआयवर फुटले. पण दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीत एका गोष्टीचे साम्य होते ते म्हणजे खेळाडू आणि बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यांमधील संवाद. साहादेखील अशाच प्रकारच्या संवादातील गॅपचा बळी ठरण्याच्या मार्गावर होता. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने वेळीच भूमिका स्पष्ट केल्याने अनेक गोष्टींवर पडदा पडला आहे. राहुल द्रविडच्या स्पष्टीकरणाने अनेक गोष्टींच्या बाबतीत स्पष्टता आली आहे. म्हणून राहुल द्रविडने घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीत त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे.

- Advertisement -

वास्तविकता आणि स्पष्टतेच्या बाबतीतला रिद्धीमान साहाला हक्क होता असे राहुल द्रविडचे स्पष्टीकरण यानिमित्ताने समोर आले आहे. आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी रिद्धीमान साहाला भारतीय संघातून विकेटकीपर म्हणून वगळल्यानंतर अनेक उलटसुलट बातम्या पुढे आल्या. त्यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही नावे ओढण्यात आली. राहुल द्रविडने निवृत्तीचा सल्ला दिला होता अशी साहाची प्रतिक्रिया अनेक प्रसारमाध्यमातून समोर आली खरी. पण राहुल द्रविडने मात्र या संपूर्ण प्रकरणात अतिशय महत्वाचे असे वक्तव्य केले आहे. साहाला निवृत्तीचा विचार करायला हवा, या वक्तव्यावर राहुल द्रविड ठाम आहे. राहुल द्रविडचा क्रिकेटमधील अनुभव पाहता तसेच संघातील सद्य:स्थिती पाहता राहुल द्रविडने अतिशय स्पष्ट भाषेत साहाशी संवाद साधला. मला साहाने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठीचा अभिमान आहे. तसेच क्रिकेटमध्ये साहाने गाठलेल्या यशाचाही मी आदर करतो. मला संघातील खेळाडूंशी थेट बोलता येते, याचा अर्थ असा होत नाही, की मी माझे म्हणणे मनात दाबून ठेवू. मला वेळोवेळी अशा प्रकारचा संवाद हा यापुढच्या काळातही खेळाडूंशी साधावा लागणार आहे, अशा शब्दात राहुल द्रविडेने आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे. तर राहुल द्रविडच्या या भूमिकेवर अनेक माजी खेळाडूंच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. राहुल द्रविड जेव्हा एखादी गोष्ट सांगणार तेव्हा त्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर दिलेला सल्ला योग्यच असणार अशा शब्दात टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाणने राहुल द्रविडच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे.

भारतीय संघात अनेक मोठ्या खेळाडूंना सध्या खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये असणारी दोन नावे म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे. या दोघांच्या खराब फॉर्ममुळेच वारंवार संधी देऊनही आता बीसीसीआयच्या निवड समितीने अखेर दोन्ही खेळाडूंना टीममधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघातील दोन मोठी नावे वगळणे हे सिलेक्टर्ससाठी सोपे नाही. विशेष म्हणजे ज्यांच्या मागे मोठी कसोटी क्रिकेटची कारकीर्द आहे, अशा खेळाडूंच्या बाबतीत निर्णय घेताना राहुल द्रविडला या खेळाडूंशीही आगामी काळात संवाद साधावा लागणार आहे. कारण या खेळाडूंच्या बाबतीतही विराट आणि धोनीसारखा विसंवाद होता कामा नये. त्यामुळे राहुल द्रविडने घेतलेला निर्णय आणि नियम या खेळाडूंच्या बाबतीतही तितकाच लागू होतो. राहुल द्रविडने पुजारा आणि रहाणेशीदेखील तितक्याच खुल्या वातावरणात चर्चा करायला हवी. जो निकष साहाच्या बाबतीत वापरला तशाच प्रकारचा संवाद या खेळाडूंच्या बाबतीतही व्हायला हवा. क्रिकेटमधील फॉर्म हा कायम एकसारखा राहत नाही. त्याला खेळातील मर्यादा आणि वयाचा निकष हेदेखील लागू पडतात. त्यामुळे या बड्या खेळाडूंच्या बाबतीत खेळाडू विरूद्ध बीसीसीआय असा सामना रंगता कामा नये.

- Advertisement -

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हेदेखील निवृत्तीच्या मार्गावर असताना संघातील निवडीच्या चढउताराचा अनुभव दादानेही घेतला आहे. एखाद्या खेळाडूच्या करिअरमध्ये निवृत्तीचा निर्णय अतिशय कठीण असतो. पण अशातही दादाच्या बाबतीत भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दाखवलेला मनाचा मोठेपणा आजही आठवणीत राहण्यासाऱखा आहे. धोनीने कसोटी सामन्याच्या शेवटच्या सत्रात कर्णधारपदाची सूत्रे ही दादाकडे दिली होती. तो सामना दादाचा शेवटचा सामना होता. पण एक आयुष्यभराची आठवण ही दादाच्या समारोपाच्या सामन्याच्या निमित्ताने दादा घेऊन गेला. खुद्द धोनीच्या बाबतीत मात्र ते घडल नाही ना विराट कोहलीच्या बाबतीत. या दोघांनाही सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित होते आणि आहे. कारण दोघांनीही भारतीय क्रिकेटचा एक काळ गाजवलेला आहे. धोनीची कसोटी फॉरमॅटनंतर टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटमधील एक्झिट ही क्रिकेट विश्वाला धक्का देऊन सोडणारी होती. त्यावेळीही असाच बीसीसीआय विरूद्ध खेळाडू असा सामना रंगला होता. विराटच्या निमित्तानेही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. विराटलाही एकाएकी एकदिवसीय कर्णधार पद नसल्याचे थेट कळवण्यात आले. त्याआधीच विराट कोहली हा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन मोकळा झाला होता. पण ना कोचने संवाद साधला ना बीसीसीआयच्या निवड समितीने. विराटला फक्त निर्णय सांगण्यात आला. त्यावेळीही फोन स्विच ऑफ असल्याचे कारण बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते.

नुकतीच लिलाव प्रक्रियेतील बड्या खेळाडूंच्या खरेदी न होण्याचीही अशीच मिळती जुळती कारणे आहेत. आयपीएलमधून एक ओळख निर्माण करणार्‍या सीएसकेच्या सुरेश रैनाचीही निवड कोणत्याच संघात होऊ शकली नाही. तर दुसरीकडे भारतीय फ्रँचायसीकडून अतिशय वाईट वागणूक मिळालेला क्रिस गेलही यंदाच्या लिलाव प्रक्रियेत दिसला नाही. मोठ्या खेळाडूंमध्ये सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ यासारख्या मोठ्या खेळाडूंना लिलाव प्रक्रियेत कोणीही खरेदी केले नाही. या खेळाडूंनाही त्यांच्या फ्रँचायसीकडून अशी वागणूक मिळायला नको होती. आपल्या करिअरचे महत्वाचे योगदान देणार्‍या खेळाडूंच्या बाबतीत अशा प्रक्रारचे निर्णय व्हायला नको. टीम इंडियासोबतच फ्रँचायसीनेही आपल्या खेळाडूंच्या बाबतीत सन्मानाची वागणूक ठेवायला हवी. मग फ्रँचायसी असो वा देशाचे प्रतिनिधीत्व. एखादा खेळाडू देशासाठी जेव्हा योगदान देतो तेव्हा अनेक पद्धतीने आपले सर्वोत्तम योगदान संघासाठी देत असतो. त्यामुळे खेळाडूंच्या बाबतीत अशा पद्धतीची वागणूक ही भविष्यात टाळायला हवी.

राहुल द्रविडने ज्या पद्धतीने निरोपाचा सामना घेतला तसाच अधिकार हा आगामी काळात भारतीय संघातील मोठ्या नावांच्या खेळाडूंचाही आहे. विशेषतः साहा, पुजारा आणि रहाणेसारख्या मोठ्या नावांच्या खेळाडूंसाठी तरी योग्य निर्णय व्हायला हवा. रहाणे पुजाराने भारतीय संघातील एकेकाळचे कसोटी क्रिकेट गाजवले आहे. तर धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतच्या एंट्रीपर्यंत साहाचे योगदानही विसरून चालता कामा नये. भारतीय सिलेक्टर्सनी स्पष्ट केल्यानुसार केएस भरतची निवड ही श्रीलंका दौर्‍यासाठी झाली. मात्र त्याचवेळी बीसीसीआयने भविष्यातील टीम इंडियाच्या अनुषंगानेच हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. सिलेक्टर्सनी भविष्यातील टीम इंडियाचा विचार करतानाच संघातील खेळाडूंसाठीही योग्य न्यायाची आणि सन्मानाची वागणूक देणे यासाठी टीम इंडियाचे खेळाडू आणि निवड समितीतील संवाद वाढायला हवा. अन्यथा साहासारखी प्रकरणे ही वारंवार टीम इंडियाच्या प्रतिमेसमोर प्रश्नचिन्ह उभी करत राहतील.

एखादा खेळाडू आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे संघातील प्रतिनिधीत्व करायला मिळावे म्हणून पणाला लावत असतो. अनेकदा एखादा सामना खेळायला मिळाल्याचेही अनेक खेळाडूंच्या नशीबी आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या निवड समितीमध्ये जेव्हा माजी खेळाडूच येतात, तेव्हा या गोष्टीकडे सहानभूतीने पाहिले जाणे तितकेच गरजेचे आहे. कारण डेब्यूच्या आठवणी या आयुष्यभर साठवण्यासाठीच्या असतात, कोणत्याही खेळाडूसाठी निरोपही तितकाच भावनिक असतो. या निरोपाला वास्तविकतेचे भान आणून खेळाडूंना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्ग दाखवणे आणि त्यांचा सन्मान करणे हेच येत्या काळात टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंच्या बाबतीत अपेक्षित आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -