घरफिचर्ससंघात खरोखर बदल कि बदलाचा निव्वळ भास ?

संघात खरोखर बदल कि बदलाचा निव्वळ भास ?

Subscribe

स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेस चे योगदान होते याचा उच्चार त्यांनी केला. तसेच संघाला काँग्रेस मुक्त नव्हे तर काँग्रेस युक्त भारत हवा आहे असेही विधान केले. काँग्रेस चा अशा प्रकारे उल्लेख करणे या मागचा एक उद्देश आपण राजकीय दृष्ट्या समावेशक आणि लोकशाहीची बूज ठेवणारे आहोत हे दाखविणे असावा . भाजप काँग्रेस मुक्त चा नारा लावत असताना संघाने काँग्रेस युक्त भाषा करणे यातून संघाचे भाजप पेक्षा वेगळेपण दाखविणे आणि सरसंघचालक कोणालाही बांधील नाहीत असा संदेश देणे हा हेतू असू शकतो. - भाऊसाहेब आजबे

डॉ केशव हेडगेवार आणि माधव गोळवलकर गुरुजी या पहिल्या दोन सरसंघचालकांप्रमाणे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचाही संघाच्या जडघडणीवर अमिट असा ठसा आहे. तत्कालीन स्थितीला अनुरूप ,तत्व म्हणून किंवा डावपेच म्हणून संघविचारात व अंमलबजावणीच्या स्वरुपात बदल करण्याची सुरुवात देवरस यांनी केली.

गोळवलकरांच्या काळातील आत्ममग्नतेतून संघाला बाहेर काढण्याचा आणि संघावर पकड असणार्‍या ब्राह्मणी विचाव्युहाला लवचिक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शाखेतून बाहेर पडून इतरांशी संवाद साधण्याची सुरवात देवरस यांनी केली. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे 1974 साली पुण्यात वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेले व्याख्यान . सामाजिक समता व हिंदू जाणीव या आशयाने मांडणी करताना त्यांनी हिंदू धर्मांतर्गत भेदभाव करणारे दोष दाखवून दिले . सामाजिक समरसतेला तात्त्विक अधिष्ठान त्यांनी दिले. वनवासी आश्रम , सेवा भारती , सरस्वती शिशु मंदिर यांचा व्याप त्यांच्या काळात वाढत गेला. त्यांच्या कार्यकाळात भाजप ने गांधीवादी समाजवादाची मांडणी केली. त्यामुळे गोळवलकर गुरुजी पश्चात संघात झालेल्या बदलांची जेव्हा चर्चा होते तेव्हा या व्याख्यानाचा संदर्भ दिला जातो.

- Advertisement -

आताचे म्हणजेच सहावे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 17 -19 सप्टेंबर दरम्यान दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेले व्याख्यान अशाच बदलाची चाहूल देते का अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याचे एक कारण असे कि व्याख्यानाचा विषय जरी ‘भविष्यातील भारत – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन ‘ असा असला तरी संघविषयक कथित गैरसमज दूर करणे आणि विभिन्न विषयांवर संघाची भूमिका मांडणे हा व्याख्यानाचा हेतू होता. तसेच या व्याख्यानासाठी संघाशी संबंधित नसणारे देश विदेशातील उद्योग्य , प्रशासन , कला आदी क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी केलेली मांडणी आणि वस्तुस्थिती पाहणे गरजेचे आहे .

2014 मधे केंद्रात भाजप पूर्ण बहुमातानिशी सत्तेत आले. आजमितीला 20 राज्ये भाजप शासित आहेत. हिंदुत्व विचारधारेचे असे राजकीय वर्चस्व प्रथमच पाहायला मिळत आहे . त्यामुळे संघाची ताकद निश्चितच वाढली आहे. आपला आडवा उभा विस्तार करण्यासाठी संघाकडून राजकीय सत्तेचा वापर हि होत आहे. राज्यसभा टीव्ही किंवा दूरदर्शन वर भागवतांच्या भाषणांना दिला जाणारा मुबलक अवकाश त्याचे एक उदाहरण . परंतु याचबरोबर संघा विषयीचे आक्षेप हि 2014 नंतर उच्चरवात मांडले जात आहेत . समाज माध्यमातून त्याचा वेगवान प्रसार हि होत आहे . संघ फॅसिस्ट आहे , पितृसत्ताक आहे , मुस्लीम विरोधी आहे ,दलित विरोधी आहे , तिरंगा ध्वज विरोधी आहे ,संविधान विरोधी आहे , स्वातंत्र्यसंग्रामात संघाचा सहभाग नव्हता ते गांधी हत्येशी संबंध असे या आक्षेपांचे स्वरूप आहे . गांधीहत्येला संघाला जबाबदार धरणारे विधान करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधीवर भिवंडी येथील न्यायालयात अवमानाचा खटला हि चालू आहे. याचा गांधीपेक्षा संघाला तोटा होताना दिसत आहे. कारण त्याची चर्चा या खटल्याच्या निमित्ताने सातत्याने होताना दिसते . राहुल गांधींनी संघाला आपल्या हिटलिस्ट वर घेतले आहे. ते संघावर शरसंधान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अलीकडे लंडन मध्ये एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतातील मुस्लीम ब्रदरहूड होय असे विधान केले . अरब विश्वात मुस्लीम ब्रदरहूड म्हणजे सामजिक कार्य आणि हिंसा जिथे हातात हात घालून जाते असे संघटन . लोकशाही तत्कालीन अपरिहार्यता म्हणून स्वीकारत शेवटी इस्लामिक राज्य स्थापन करणे हा त्यांचा हेतू . तर मतितार्थ असा कि संघाविषयीचे ‘परसेप्शन’ हे संघाला हवे तसे सर्वत्र नाही . वस्तुस्थितीपेक्षाही परसेप्शन ची गणिते निर्णायक ठरतात हे संघाला चांगले ठाऊक आहेत . त्यामुळेच संघासंबंधी नकारात्मक मुद्दे खोडणे आणि आपला विचार नव्याने लक्ष्य केलेल्या समूहाच्या गळी उतरविणे यासाठी सरसंघचालक प्रयत्नशील असताना दिसतात . याचाच भाग म्हणजे मोहन भागवतांचे दिल्लीतील तीन दिवसीय व्याख्यान होय.

- Advertisement -

संघाचा एक संघटन म्हणून स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग नव्हता हे सर्वश्रुत आहे . सध्यस्थितीत भाजप राष्ट्रवादाचे ढोल वाजवत असताना व विरोधकांना राष्ट्रविरोधी ठरवत असताना हि वस्तुस्थिती अडचणीचे ठरते. त्यामुळेच भागवतांनी संस्थापक डॉ हेडगेवार इयत्ता तिसरीत असल्यापासून कसे देशभक्त होते याच्या कहाण्या सांगितल्या. तिरंगा ध्वजाविषयी संघ नकारात्मक होता. कित्येक वर्षे नागपुरात तिरंगा फडकला नव्हता हि देखील वस्तुस्थिती आहे . परंतु तिरंग्याविषयी संघ नेहमीच सकारात्मक होता असे दाखविण्याचा भागवतांनी प्रयत्न केला . पूर्ण स्वराज्य चा ठराव काँग्रेस ने पारित केल्यानंतर हेडगेवारांनी सर्व शाखांतील स्वयंसेवकांनी तिरंगा ध्वजासह संचलन करावे असे सर्क्युलर काढले असा दावा भागवतांनी केला . पण यातील तपशीलाची मोडतोड केली गेली . ‘डॉ हेडगेवार-पत्ररूप व्यक्तिदर्शन ‘ या ना. ह पालकर यांनी संकलित केलेल्या पुस्तकात यांसंबंधीचे मूळ पत्र आहे . त्यात तिरंगा नाही तर भगवा ध्वजासह संचलन करावे असा उल्लेख आहे . सध्यस्थितीत, एकेकाळी आपण तिरंगा विरोधी होतो हे अडचणीचे ठरू शकते . त्यामुळेच भागवतांना हि कसरत करावी लागली . अशीच कसरत त्यांना संघ हुकुमशाही वृत्तीचा नाही हे पटवून देताना करावी लागली. संघ हि सर्वात अधिक लोकशाही असणारी संघटना आहे असा दावा त्यांनी केला . नागपुरातील त्यांची नोंदणी असलेल्या शाखेतील इयत्ता चौथीतील स्वयंसेवक त्यांना शाखेत नियमित येत नाही याबद्दल विचारणा करतो हे उदाहरण देऊन त्यांनी आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दिले . संघात निर्णयप्रक्रिया नेमकी कशी आहे याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही . स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश का नाही या प्रश्नाचे उत्तर संघ स्थापना झाली तेव्हा तसे पोषक वातावरण नव्हते असे ते म्हणतात . सध्यस्थितीत मात्र पोषक वातावरण आहे तर मग ‘राष्ट्र सेविका समितीचे’ संघात विलीनीकरण का होत नाही यावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले .

संघ राज्यघटनेला मानतो हे त्यांनी अधोरेखित केले . गोळवलकर गुरुजी , के एस सुदर्शन आदी सरसंघचालकांनी भारताच्या राज्यघटनेविषयी नकारात्मक मते स्पष्ट शब्दांत वेळोवेळी व्यक्त केली होती. त्यामुळे आता भागवतांनी घटनेविषयी बांधिलकी व्यक्त करणे हा मात्र किमान मांडणीच्या पातळीवर तरी बदल म्हणावा लागेल .संघ परिवारातील इतर संस्था व अनेक स्वयंसेवकांचा प्रत्यक्ष व्यवहार मात्र अशा बांधिलकीचा अभाव दर्शविणारा आहे .

स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेस चे योगदान होते याचा उच्चार त्यांनी केला. तसेच संघाला काँग्रेस मुक्त नव्हे तर काँग्रेस युक्त भारत हवा आहे असेही विधान केले. काँग्रेस चा अशा प्रकारे उल्लेख करणे या मागचा एक उद्देश आपण राजकीय दृष्ट्या समावेशक आणि लोकशाहीची बूज ठेवणारे आहोत हे दाखविणे असावा . भाजप काँग्रेस मुक्त चा नारा लावत असताना संघाने काँग्रेस युक्त भाषा करणे यातून संघाचे भाजप पेक्षा वेगळेपण दाखविणे आणि सरसंघचालक कोणालाही बांधील नाहीत असा संदेश देणे हा हेतू असू शकतो.

‘बंच ऑफ थॉट्स’ मधील मुस्लीम, ख्रिश्चन व कम्युनिस्टांना शत्रू ठरवणारे विचार मान्य नसल्याचे त्यांनी घोषीत केले. हा भूमिकेतील उल्लेखनीय बदल म्हणावा आहे अशी काही मंडळींची भावना आहे . पण आपली कट्टरतावादी प्रतिमा पुसून काढण्यासाठी ते अपरिहार्य हि झाले होते हेही लक्षात घ्यायला हवे . 2015 मधील बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांनी प्रत्येक सभेत गोळवलकर गुरुजी यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मधील विचारधन वाचून दाखवून संघ भाजपची मोठी अडचण केली होती .

हिंदुत्व हे मुस्लिमांशिवाय अपूर्ण आहे असा नवीन दावा भागवत यांनी केला आहे . गोहत्येविरोधात हिंसा अमान्य असल्याचे त्यांनी म्हटले. परंतु उत्तर प्रदेशात गोहत्या संशयावरून अखलाख यांची हत्या गोरक्षकांनी केली तेव्हा ‘गोहत्या पाप आहे आणि त्यासाठी शिक्षा द्यायला हवी’ असे वेदात म्हटले आहे असे विधान भागवतांनी केले होते . 8 सप्टेंबर रोजी शिकागो येथील ‘वल्ड हिंदू काँग्रेस’ कार्यक्रमातील भाषणात भागवतांनी हिंदू समाजाला सिंहाची उपमा दिली. आणि हा सिंह एकटा असेल तर जंगली श्वान हि सिंहाचा संहार करू शकतात असे विधान केले . यामधे हे जंगली श्वान नेमके कोण हा प्रश्न आहे . त्यामुळे मुस्लीम समुदायाला आपला अविभाज्य भाग मानणे यावर खुद्द भागवतांचेच परस्परविरोधी दावे आहेत .शिवाय मुस्लीम हे हिंदुत्वाचा भाग असतील तर मुस्लीम राष्ट्रीय मंच च्या वेगळ्या अस्तित्वाचे प्रयोजन काय हाही कळीचा प्रश्न आहे. 2014 नंतर संघ परिवारचा प्रत्यक्ष व्यवहार हा मुस्लीम समुदायाला मुख्य प्रवाहातून दूर फेकण्याचा आहे . लव्ह जिहाद , गोरक्षकांनी निष्पाप मुस्लिमांच्या केलेल्या हत्या , निवडणुकीतील मुस्लीम विरोधी विखारी प्रचार , 19% मुस्लीम असणार्‍या उत्तर प्रदेशात भाजप ने एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी न देणे हे त्याचेच द्योतक आहे .

त्यामुळे सरसंघचालक करू पाहत असलेली मांडणी हि जुनी वाइन नवीन बाटलीत टाकण्याचा प्रकार आहे. मूळ विचारांना त्यांनी कुठेही धक्का लावलेला नाही. 2014 पश्चात हिंदुत्ववादाचे स्थापित झालेले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी आणि संघ सर्वसमावेशक व उदारमतवादी आहे असे परसेप्शन तयार करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे यात शंका नाही.

भाऊसाहेब आजबे, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -